subhash inamdar

subhash inamdar

Friday, December 31, 2010

बेला शेंडे-उषा अत्रे पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात  गायिका बेला शेंडे यांना "उषा अत्रे पुरस्कार', तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा ही नटरंग चित्रपटातली लावणी सध्या सर्व वयोगटाच्या रसिकश्रोत्यांच्या तोंडी आहे. ती लावणी बेलाने गायली आणि तिच्या प्रचंड लोकप्रियतेत आणखी भर पडली.
लहान वयात अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळवून हिंदी, मराठी आणि अन्य भाषातून गाणारी पार्श्वगायिका म्हणून बेला शेंडे हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर केव्हाच पोचले आहे. अर्थात त्यासाठी तिचा असलेला गाण्याचा रियाज नक्कीच महत्वाचा आहे.
बेलाने शास्त्रीय संगीताचे शिक्षण आपल्या आजीकडून, सौ. कुसुम शेंडे यांच्याकडून आणि नंतर मोठी भगिनी ख्यातनाम गायिका सावनी शेंडे-साठ्ये हिच्याकडून घतले आहे. तर उपशास्त्रीय आणि सुगम संगीतातले बहुमोल मार्गदर्शन वडिलांकडून, डॉ. संजीव शेंडे यांच्याकडून मिळालं आहे.
१९९८ मध्ये टी व्ही एस. सारेगमप मध्ये बेलाला प्रथम क्रमांक मिळाला आणि तिथूनच तिने आपली य़शाची शिखरे गाठायला सुरवात केली.
तेरा मेरा साथ रहे, एहसास, पहेली, जोधा अकबर अशा हिंदी चित्रपटांसाठी तिने पार्श्वगायन केले. जोधा अकबर मुळे तिला संगीतकार ए आर. रेहमान यांच्याकडे गायची संधी मिळाली. तर दक्षिणेतल्या इलायराजा यांच्याकडे तामिळ भाषेत तिने अनेक गाणी गायली आहेत.
उत्तरायण ह्या मराठी चित्रपटाबरोबरच सोनसावली, झाले मोकळे आकाश, सारेगमप, शुभंकरोती या मालिकांची शिर्षक गीतेही बेलाने गायली आहेत.
माझ्या मना, हृदयामधले गाणे (डॉ. सलिल कुलकर्णी), पंढरीचा स्वामी (आशुतोष कुलकर्णी), हे तिचे मराठी अल्बम्स प्रसिध्द आहेत.
सपने, कैसा ये जादू या तिच्या हिंदीतल्या अल्बम्सला झीचा पुरस्कार लाभला आहे. अ.भा. सुगम संगीत संमेलन, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन, एलोरा फेस्टिव्हल, हृदयनाथ मंगेशकरांचा भावसरगम, श्रीनिवास खळे संगीत रजनी, नक्षत्रांचे देणे, पुणे फेस्टिव्हल तसेच सोनू निगम, शंकर महादेवन, दलेर मेहंदी यांच्यासमवेत रंगमंचीय कार्यक्रम तिचे चालू असतात.
पहिला नर्गिस दत्त पुरस्कार, पुणेकी आशा पुरस्कार, Pride of Pune 2004, रेडिओ मिरचीचा Best Playback Singer पुरस्कार, नटरंगमधल्या लावण्यांसाठी पुरस्कार, आयफा साठी नामांकन, सह्याद्रिचा महाराष्ट्र संगीतरत्नचे सूत्रसंचालन आणि सध्या ई-मराठीवरील गौरव महाराष्ट्राचाची परीक्षक...अशा अनेक उल्लेखनीय गोष्टी......
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त नटरंगमधल्या लावण्यांसाठी बेला शेंडे यांना झी गौरव, म. टा. सन्मान, व्ही. शांताराम आणि कलागौरव हे पुरस्कार मिळाले आहेत.. शिवाय राज्य पुरस्कारही आहेतच.

कमलेश भडकमकर-विजया गदगकर पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात वादक कमलेश भडकमकर यांना "विजया गदगकर पुरस्कार' तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

झी-मराठीच्या जगभर लोकप्रिय असलेल्या सा रे ग म प या कार्यक्रमाचे संगीत संयोजक म्हणून कमलेश भडकमकर यांचे नाव सर्वपरिचित आहे. पण या आधीपासून, हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादक म्हणून ते संगीत क्षेत्रात ओळखले जातात.
पहिल्यापासून मुंबईत असल्याने त्यांना मोठे कार्यक्षेत्र उपलब्ध झाले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, गानसरस्वती किशोरी आमोणकर, श्रीनिवास खळे यांच्या रंगमंचीय कार्यक्रमातून तसेच ताक् धिना धिन (सह्याद्रि वाहिनी), नक्षत्रांचे देणे यातही त्यांनी साथ केली आहे.
सध्या कमलेश भडकमकर हे संगीत दिग्दर्शन आणि संगीत संयोजन क्षेत्रात स्वतःचे नाव गाजवित आहेत. अनेक हिंदी, मराठी चिक्त्रपटांचे . काही दूरदर्शन मालिकांच्या शीर्षक गीतांचे संगीत देत आहे. कमलेश यांच्या नावावर मराठी गाण्यांचे अल्बम्सही बाजारात आले आहेत.
संगीत संयोजक म्हणून त्यांची कामगिरी प्रचंड आहे. आधार, कृष्णाकाठची मीरा, पांढर, एक उनाड दिवस, आरं आर आबा आता तरी थांबा, गाव तसं चांगले, आनंदी आनंद, बालगंधर्व अशा चित्रपटांबरोबरच संगीतकार श्रीनिवास खळे, कौशल इनामदार, डॉ. सलिल कुलकर्णी, कमलाकर भागवत, उल्हास  बापट अशा अनेक संगीतकारांबरोबर असंख्य ध्वनिफितींचे संगीत संयोजन त्यांनी केले आहे. यात अवघा रंग एक झाला या नाटकाची समावेश आहे. शिवाय सध्याच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचं संगीत संयोजन त्यांचेच आहे.
झी गौरव पुरस्कार, सा रे ग म प मेगाफायनल्स अशा भव्य कार्यक्रमांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करीत असतात. मिस वर्ल्ड १९९६ या आंतराष्ट्रीय समारोहाला भडकमकरांचे संगीत संयोजन होते.
आजच्या काळातील संगीत आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी कमलेश भडकमकरांनी २००६ मध्ये मनसा ही स्वतःची संस्था सुरू केली. या संस्थेतर्फे त्यांनी तीन अल्बम्सची निर्मिती केली असून ३५ अल्बम्सचे वितरण केले आहे.
त्यांना आधार या मराठी चित्रपटाच्या संगीतासाठी २००३चा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा झी गौरव पुरस्कार आणि २००८ मध्ये जागो मोहन प्यारे या मराठी नाटकाच्या पार्श्वसंगीतासाठी राज्य पुरस्कार मिळाला आहे.

विजय कोपरकर-माणिक वर्मा पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात गायक विजय कोपरकर यांना "माणिक वर्मा पुरस्कार',  तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच नाट्यसंगीत या सर्व क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे कलाकार म्हणून विजय कोपरकर यांचा विशेष नावलौकिक आहे.
वयाच्या ८ व्या वर्षापासून सतत  २२ वर्षे संगीतसाधना करून विविध मान्यवर गुरूंकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले आहे. अगदी सुरवातीचे मार्गदर्शन त्यांनी डॉ. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडून घेतले. त्यानंतरची पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. नंतरची आठ वर्षे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून संगीत शिकण्याचे भाग्य मिळाले.
 विजय कोपरकर हे आकाशवाणीचे उच्च दर्जा लाभलेले गायक असून आजवर देशात-परदेशात अनेक मान्यवर संगीत महोत्सवात त्यांचे गायन झाले आहे. त्यातले विशेष उल्लेखनीय म्हणजे एन. सी. पी.ए.(मुंबई), पुण्याचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव, दीनानाथ मंगशकर समारोह (गोवा), राजाभाऊ पूंछवाले समारोह (जबलपूर), नागवर्धन सभा (कानपूर), पं. जितेंद्र अभिषेकी स्मृति समारोह (मंगलोर), भजन सभा ( कालिकत-केरळ), इंडिया इंटरनॅशनल सेंटर (दिल्ली). याशिवाय अहमदाबाद, नाशिक, इंदूर, आग्रा, चेन्नई, मणिपाल या ठिकाणीही त्यांच्या मैफली झाल्या आहेत. नुकतेच ते अमेरिकेचा दौराही करून आले अहेत. विजय कोपरकर यांनी गायलेल्या विविध रागांच्या ध्वनिफिती यापूर्वीच प्रकाशित झाल्या आहेत.
आजवरच्या संगितिक कामगिरीबद्दल त्यांना अनेक मानसन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. १९८३ ते १९९० या वर्षात त्यांना सुधीर फडके यांच्या सुलश्री प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती मिळाली होती. याशिवाय गांधर्व महाविद्यालयाचा पं. रामकृष्णबुवा वझे पुरस्कार. अनंतरंग आर्ट फौंडेशनचा कलागौरव पुरस्कार. सुशिलकुमार शिंदे ट्रस्टचा सुशील स्नेह पुरस्कार. विश्वेश फौंडेशनचा विश्वेश पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.
विजय कोपरकर हे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.ई. (Mattallurgy) असे उच्चविद्याविभूषित असून एक लघुउद्योजक म्हणूनही स्वतःचा व्यवसाय सांभाळतच आहेत. 

केदार पंडित -केशवराव भोळे पुरस्कार'

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात संगीतकार केदार पंडित यांना "केशवराव भोळे पुरस्कार',  पुरस्कार' तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी व-हाडी झटका, पुणेरी फटका या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करून केदार पंडित यांनी कारकीर्दीला सुरवात केली.
केदार पंडित यांनी अल्बम्स. चित्रपट. Animation Movies. दूरचित्रवाणी मालिका. जाहिरात. नाटके. आणि बॅले यासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांचे काम मुख्यतः भक्तिसंगीत प्रकारात अधिक आहे. सुगम, लोकसंगीत, गझल, भावगीत आणि रॅप प्रकारही त्यांनी सहजपणे हाताळले आहेत. त्यांच्या अल्बम्स मधील संगीतात गुंफलेले मंत्र आणि स्त्रोस्त्रे रसिकप्रिय आहेत. केदार पंडित यांच्या मराठी, हिंदी तसेच संस्कृत भाषातील दिग्दर्शित रचना लोकप्रिय आहेत.
संगीत दिग्दर्शक म्हणून केदार पंडितांनी जुन्या आणि नव्या पिढीतल्या पं. जसराज, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, अनुप जलोटा, संजीव अभ्यंकर, देवकी पंडीत, साधन सरगम, शान, आशा खाडिलकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, अजित कडकडे, वेशाली सामंत, श्रीकांत पारगांवकर, आरती अंकलीकर, अजय पोहनकर, स्वप्निल बांडोदकर, अभिचित सावंत, सावनी शेंडे, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे अशा गायक कलाकारांबरोबर काम केले आहे.
टाईम्स, सोनी, म्यूझिक टुडे, ई.एम.आय, बिग, व्हेल, फाऊंटन, विंग्ज, व्हिनस, पाकॉक, टिप्स म्यूझिक अशा कंपन्यांसाठी ३५० हुन अदिक अल्बम्सला संगीत दिले आहे. त्यांचे भारत है हमारी मातृभूमी हे शकर महादेवन यांनी गायलेले गाणे OVI च्या संकेस्थळावर सर्वेत्तम २० गाण्यांच्या यादीत ७ वे आणि एकमेव चित्रपटेतर गीत होते.
संगीत दिग्दर्शक वडील प्रभाकर पंडितांबरोबरच आई श्रीमती अनुराधा पंडितही निष्णात व्हायोलिनवादक असल्याने केदार यांना संगीत वारसा हक्कानेच मिळाला आहे. या पोषक वातावरणातच त्यांनी शास्त्रीय संगीत आराधनेला सुरवात केली. आधी अजराडा घराण्याचे कै. पे. यशवंतराव केरकर यांच्याकडे तबला शिकल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ज्येष्ठ गुरुबंधू व केरकरजींचे शिष्य पं. श्रीधर पाध्ये यांच्याकडून घेतले. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी पं. जसराज, श्रीमती किशोरी आमोणकर, पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी इत्यादी दिग्गजांबरोबर तर नव्या पिढीतले संजीव अभ्यंकर, देवकी पंडीत, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, रतन शर्मा, शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, सावनी शेंडे अशा कलाकारांना तबल्यावर साथ केली. शास्त्रीय संगीताच्या मैफलीबरोबरच केदार पंडित यांचा नेहमीच सिनेसंगीत आणि इतर रेकॉर्डिंगमध्ये लता मंगेशकर, मन्ना डे, नौशाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल, उत्तम सिंग, जतिन ललित, शंकर एहसान लॉय, सुधीर फडके, प्रभाकर पंडित, य़शवंत देव, अशोक पत्की, श्रीधर फडके या संगातकार आणि गायकांबरोबरचा सहभाग हा एक महत्वाचा भाग आहे.
केदार पंडित यांनी शास्त्रीय संगीताच्या अनेक प्रतिष्ठित मैफलीत भारतात तसेच जगभर कार्यक्रम सादर केले आहेत.
अंतर्नाद (पुणे-२०१०) या Guiness Book of World Records मध्ये नोंद झालेल्या विक्रमी कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन आणि संगीत संयोजन केदार पंडित यांनी केले होते. यात २७०० शास्त्रीय संगीत गायक एकाच वेळी एकाच मंचावरून गायले.
केदार पंडित हे मेवाती घराना पुरस्कार व अष्टपैलू संगीतकार या दोन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

कलाकार नव्हे तर कला मोठी

""कलाकार नव्हे तर कला मोठी असते, याचे भान कलाकाराला येते तेव्हा कला आणखी मोठी, समृद्ध होत असते,'' असे प्रतिपादन तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी गुरुवारी येथे केले. संगीत हे प्रवाहशील असते आणि असायला हवे. त्यामुळे ते अधिक भावते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात संगीतकार केदार पंडित यांना "केशवराव भोळे पुरस्कार', गायक विजय कोपरकर यांना "माणिक वर्मा पुरस्कार', गायिका बेला शेंडे यांना "उषा अत्रे पुरस्कार', वादक कमलेश भडकमकर यांना "विजया गदगकर पुरस्कार' पं. तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, गीतकार सुधीर मोघे, कार्यकारी विश्‍वस्त प्रकाश भोंडे उपस्थित होते.
कलेच्या सेवेत ईश्‍वरसेवा आहे, असे सांगून पं. तळवलकर म्हणाले, ""हल्लीचे संगीत पूर्वीसारखे नाही, अशी ओरड होत असली तरी या मताशी मी सहमत नाही. संगीत हे प्रवाहशील असते आणि असायलाही हवे. त्यामुळे ते अधिक भावते. खरे तर संगीत ही एक संस्कारक्षम विद्या आहे. त्याशिवाय संगीत आत्मसात करता येत नाही. म्हणून कलाकारांनी संगीतातच रमायला हवे. पुरस्कार मिळवण्यापेक्षा रसिकांचे प्रेम मिळवणे महत्त्वाचे आहे''. सुगम संगीताच्या क्षेत्रात "स्वरानंद' गेली 40 वर्षे सतत काम करते हे अतिशय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

कमलेश भडकमकर म्हणाले, ""संगीतात सतत कष्ट करण्याची तयारी हवी. मात्र, रिऍलिटी शो, झटपट प्रसिद्धी-पैसा यामुळे सध्या कष्ट करण्याची पद्धत कमी होत आहे. हे असुरक्षिततेचे वातावरण घातक आहे.''

पुरस्काराला महत्त्व असते. मात्र, तो कोणातर्फे, कोणाच्या हस्ते, कोणासोबत मिळतोय यालाही महत्त्व असते, असे कोपरकर यांनी सांगितले.

केदार पंडित यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला.
तर, "वाजले की बारा', "अप्सरा आली' ही गीते सादर करून बेलाने रसिकांची खास दाद मिळवली.





Thursday, December 30, 2010

दमां'च्या पुस्तकांचे हक्क "मेहता पब्लिशिंग'कडे

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची लोकप्रिय पुस्तके बाजारपेठेमध्ये सहजपणे उपलब्ध होत नाहीत. हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क "मेहता पब्लिशिंग हाउस'कडे दिले आहेत. नव्या पिढीच्या वाचकांसाठी नव्या संचातील १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत. 

मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनील मेहता यांना मिरासदारांची पुस्तके बाजारामध्ये मिळत नसल्याचा अनुभव आला. आठ महिन्यांपूर्वी त्यांना "माझ्या बापाची पेंड' हे पुस्तक हवे होते. त्यांनी चौकशी केली असता या पुस्तकासह मिरासदारांची सर्वच पुस्तके उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यातून त्यांनी प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या माध्यमातून प्रा. मिरासदार यांच्याशी संपर्क साधला आणि पुस्तके नव्याने प्रकाशित करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मिरासदार यांनी त्यांच्या १८ पुस्तकांचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊसला दिले.
मेहता म्हणाले, ""एखाद्या लेखकाची पुस्तके उपलब्ध होत नाहीत याचा अर्थ त्यांचे नाव कमी होते की काय, अशी भीती मला वाटली. ही पुस्तके नव्या पिढीपर्यंत पोहोचवावीत हा यामागचा उद्देश आहे. मिरासदार यांच्या बहुतांश पुस्तकांना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची मुखपृष्ठे आहेत. त्यामुळे उर्वरित पुस्तकांनादेखील नव्याने मुखपृष्ठे करून द्यावीत, ही आमची विनंती फडणीस यांनी मान्य केली आहे. "मिरासदारी' आणि "निवडक द. मा.' या पुस्तकांमध्ये त्यांच्या निवडक कथांचा समावेश आहे.''
"गाणारा मुलूक', "मी लाडाची मैना तुमची', "नावेतील तीन प्रवासी', "माझ्या बापाची पेंड', "चुटक्‍याच्या गोष्टी, "गुदगुल्या', "भोकरवाडीच्या गोष्टी', "सरमिसळ', "चकाट्या', "हसणावळ', "गंमत गोष्टी', "जावईबापूंच्या गोष्टी', "गप्पांगण', "माकडमेवा', "बेंडबाजा', "खडे आणि ओरखडे', "सुट्टी आणि इतर एकांकिका' आणि "विरंगुळा' ही १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Wednesday, December 29, 2010

सुगम संगीताचा इतिहास शब्दबद्ध

नव्या पिढीत सुगम संगीताची आवड आणखी वाढावी, यासाठी "स्वरानंद'च्या वतीने मराठी सुगम संगीताचा इतिहास शब्दबद्ध करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबविला जात आहे.

महाराष्ट्राभर मराठी सुगम संगीताचा रंगमंचीय आविष्कार सादर करणारी "स्वरानंद प्रतिष्ठान'  सुगम संगीताचा इतिहास आणि सूची तयार करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. हे काम प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, गीतकार सुधीर मोघे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त प्रकाश भोंडे यांनी दिली.

मराठी भावगीते, चित्रपट गीते, अभंग, लोकसंगीत असे सुगम संगीताचे आविष्कार सूत्रबद्धरित्या रंगमंचाच्या माध्यमातून एकत्रपणे सादर करण्याचा प्रयत्न विश्‍वनाथ ओक आणि हरीश देसाई यांनी 40 वर्षांपूर्वी प्रथम केला. त्यातून "स्वरानंद'चा जन्म झाला. सुगम संगीतावर "फोकस' करून वाटचाल करण्याऱ्या प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर पु. ल. देशपांडे, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, शांता शेळके, यशवंत देव, अशोक पत्की अशा दिग्गजांचे गौरव सोहळे झाले. तसेच, रंजना पेठे, अजित सोमण, सुधीर दातार, अरविंद थत्ते, अपर्णा संत, हृषीकेश रानडे, मधुरा दातार अशा वेगवेगळ्या पिढीतील गायक-वादकांनी आपली कला सादर केली, असे भोंडे यांनी सांगितले.

Tuesday, December 21, 2010

पुणेरी `गोडबोल्याची` एकसष्टी

जन्मजात पुणोरी बाणा अंगात आणि स्वभावात रूजविणारा तमाम मराठी रसिकांच्या समोर असणारे नाव म्हणजे सुधीर गाडगीळ. आम्ही काही जण त्यांला गोडबोलेही म्हणतो.सदाशिवपेठी पुणेरी भाषा सुधीर गाडगीळ यांच्या नसानसातून फिरत असल्याने त्यांच्या सा-या मुलाखत तंत्रात पुणेरी स्पष्टपणा डोकोवणे सहाजिकच नाही काय ?
पंचवीशीपर्यत मुंकुंदराव किर्लोस्करांच्या साप्ताहिक मनोहरात पत्रकारितेची उमेदीची वर्षे सुधीर गाडगीळांनी घालविली...नाही त्यामुळेच ते घडले.. दिसले आणि सर्वत्र संचारु लागले.  कॉलेजमधल्या नायकासारखे उमदे रुप. झकपकीत पोषाखी ऐट. दिमाखदार बोलणे आणि सतत रूपेरी पडद्याच्या जवळ जाणा-या या तरूणाला साप्तकाहिकाच्या रुपाने संपर्कमाध्यमच साध्य झाले. अनेक मुलाखती शब्दात उमटू लागल्या. त्यांची वाहवा मिळाली. खरे तर हीच संधी पुढे रंगमंचीय स्थिर झाली ती स्वरानंद या संस्थेच्या मंतरलेल्या चैत्रबनात या गदिमा गीतांच्या कार्यक्रमातील निवेदॉकाच्या भूमिकेत. सुधीर मोघेंनंतर सुधीर गाडगीळ या निवेदकाच्या भूमिकेत रुजले आणि सजलेही.
या निमित्ताने महाराष्ट्राला एक सूज्ञ . पुणेरी भाषेचा. सुसंस्कृत मुलाखतकार मिळाला.
रंगमंचावरचे निवेदन भावेनेच्या भरात श्रोत्यांच्या घरा-घरापर्य़ंत जाउन पोचले. अस्सल मराठी सुसंस्कृत किस्से आणि विनोदाचा बाज घेऊन `सुधीर गाडगीळ` नावाला वयल येत गेले. रंगमंचावर गदिमा, बाबुजी यांच्याशी गप्पांचा फड मारता मारता दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर गाडगीळांची वाणी प्रकट होउ लागली. आशा भोसले आमि सुधीर फडके यांच्या मुलाखतीच्या रूपातून गाडगीळ मराठी माणसांच्या जवळचे झाले.
विषयाचा अभ्य़ास आणि तात्काळ व्यक्त होण्याची हातोटी साधल्याने त्यांचे ते प्रश्न कलावंतांमधली प्रतीमा अधीक उजळ करायला मदतच झाली. पण पुढे गाडगीळ काय चिमटे काढतील याचा नेम नसल्याने कलावंतही सावध होत. भाषेतला मवाळपणा आणि शब्दातले बोचरे वळण यातून मुलाखत रंगत जायची. मुलाखत घेणारा आमि रसिक यातले अंतर कमी होण्यास यामुळे मदतच झाली.पुढे कार्यक्रमा वाढले. वाहिन्यात वाढ झाली. तरी गाडगीळ तेच राहिले. साधे आणि तेवढेच खोचक पुणेरी बोलणारे.
नोकरी केव्हाच सोडून दिलेली. निवेदक आमि मुलाखतकाराची झूल अंगावर घेतली आणि हा शब्दभ्रमाचा खेळाडू महाराष्ट्रातच काय जगभरातल्या मराठी माणसांच्या जवळ गेला. उड्डाण झाले. परदेश पाहिला. मनमुराद आनंद घेतला. त्यांनाही तो दिला. दिवाळी पहाट म्हणू नका, समारंभातले साधे सोपे वाटणारे निवेदन म्हणी नका जिथे-तिथे त्यांचीच मोनॉपॉली झाली. त्यांच्या वाणीने जग जिंकले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणूनच सुधीर गाडगीळ एक सांस्कृतिक संस्थान ठरले. अनेक संदर्भ. अनेक इतिहास आणि अनेक माणसे त्यांच्याशी जोडली गेली आहेत.

तसा हा गप्पीष्ट माणूस. पण संसारात वहिनिंच्या आजाराने खचलेला आणि आता एकला चालो रे च्या धोपट मार्गावर वाटचाल सुरू आहे. कलावंत मित्र झाले. संस्था मिळाल्या. राजकीय नेत्यांच्या जवळीक लाभली.  पण कधी हाततल्या लेखणीची आणि वाणीचा कधीही दूरोपयोग केला नाही. सात्वीकता आणि प्रेमळता आजही एकसष्टीच्या उंबठ्यावर झिरपत आहे.
घराला घरपण आलेय. मुलांनी पंख मोठे केलेत. नातवांनी घरात पसारा केलाय. भिंती रंगवल्यात. पण हा आजोबा झालेला सुधीर आजही तेवढाच हसतमुख आहे. चेह-यावरची तुकतुकी कमी झालीय. थोड्या अस्पष्ट रेषाही उमटायला लागल्यात. पण मन तरूण आङे. शब्दात बळ आहे. ताकद आहे. आमच्या सर्वाचा हा मित्र असाच आनंदी रहावा. त्याला हसतमुखच पहात रहावे. त्यांच्या इच्छांना नवे बळ मिळावे..... असाच धीराचा चेहरा इतरांनाही आधार वाटावा.
काल ती व्याक्ती होती...आज ती संस्था बनली......... त्याच्या कर्तृत्वाला सलाम....आनंद देत आणि घेत रहा.........

तुझाच मित्र म्ङणवून घेणारा
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmal.com
Mob. 9552596276

वा गुरू


चंद्रशेखर फणसळकरांच्या नविन नाटकातली दिलीप प्रभावळकरांची भूमिका पाहल्यानंतर नाट्यरसिकांच्या मनात सहजच एक शब्द घुमतो तो म्हणजे `वा गुरू`. मृत्यूचे भय न बाळगता आयुष्यातल्या जुन्या स्मृतींना जागवत आपल्या मनात सतत असणा-या विचारांना बोलते करणारा हा हाडाचा शिक्षक. पायापासून हळूहळू एकेक अवयव काम न करताना दिवसेंदिवस शरीराने खंगत जातो. ती वेदना हसत हसत झेलताना आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या एके काळच्या प्रिय विद्यार्थ्याजवळ सांगतात. सगळे नाटकच थोड्याफार फरकाने गंभीर आहे. मूळ ईंगर्जी  कथेवरून  बेतलेल्या या कथालकातली सारी पात्रे आपले चेहरे घेऊन येतात .अस्सल मराठमोळ्या वातावरणाचा मुलामा देउन एक नवा अनुभव सुयोगच्या या नाटकाने दिला आहे.
ब-याच दिवसांनी या नाटकाच्या निमित्ताने नाटकाचा मूळ प्रेक्षक पुन्हा एकदा खेचला गेल्याचे चित्र पहिल्या प्रयोगाला दिसत होते. दिलिप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा सुदर आविष्कार पाहण्याची संधी या नाटकाने दिली . त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमध्ये ही एक वेगळी छटा पहायला मिळते. ही भूमिका निभावताना त्या व्य़ाक्तिचा बाज. त्याच्या मनाला चटका देणारे अनुभव. आणि प्रेम आणि स्पर्श या दोन भाषेतून माणसाने का बोलावे याचे गुरूजींच्या रूपातले विवेचन अगदी आत रुतुन बसते. शांततेलाही अर्थ देणारा हा हाडाचा शिक्षक जे बोलतो ते खरोखरीच ऐकत रहावेसे वाटते. ती भाषा पेलण्याची आणि संवादता भावार्थ त्यांच्या भूमिकेतून अनुभवायला हवा.  ती मानसीकता, ते शव्दातले नाते. तो जिव्हाळा , ती वेदना, ती असाय्यता , ती ओढ, ते आसुसलेले हळवे रुप. सारेच प्रभावळकरांच्या व्यक्तिमत्वातून उलगडत जाते. वेदनेला सोसताना ज्यापध्दतीने बोलण्यातून आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा एखादा हाडाचा शिक्षक जशी माया लावेल तसे ते व्यक्तित्व दिलीप प्रभालकर यानाटकातून प्रेश्रकांसमोर आणतात. त्यांच्या भूमिकेला अनुभवताना म्हणूनच ओठा शब्द येतो...वा गुरु.

छोट्या-छोट्या प्रसंगातून खुलत जाणारे हे नाटक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवित नेते. विजय केंकरे यांनी अगदी व्यक्तिरेखेला साजेशी भाषेची ढब कलाकारांच्या उत्तम टिमकडून साकारुन समोर ठेवली आहे. आपण आता यापुढे काय होणार या उत्सुकतेतू प्रत्येक प्रसंग निरिक्षणपूर्वक टिपत रहातो. शिक्षकाच्या व्यक्तिरेखेतून मानवी मनाचे सामान्य वाटणारे असामान्य क्षण नेमके ठळकपणे बाहेर काढून ते प्रेक्षकांसमोर उलगडण्यात केंकरे यशश्वी झाले आहेत.
कोणेएकेकाळी आपल्या हाताखाली शिकून गेलेल्या विद्यार्थ्य़ांच्या आठवणीत रमता रमता जिवनाचे तत्वज्ञानच या नाटकातून लेखकाने नेमके मांडले आहे. त्यात सत्यता तर आहेच पण ते कधी कधी जिव्हारी लागेल इतके झोंहते देखील.
दिलिप प्रभावळकरांच्या जोडीला अतुल परचुरे सारखा हुन्नरी कलावंत या नाटकातून रसिकांसमोर येतो. शब्दांच्या सुरेल मैफलीतील ती नेमकी तान घेतो आणि दादही घेतो तो अतुल परचुरे. व्यवसायाच्या धकाधकीतही भावभावनांचे नाते घट्ट करताना आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतो. सहजता आणि तेवढीच ओढ निर्माण करून अतुल परचुरे सोळावर्षांनंतर भेटणा-या शिक्षकांविषयींची कृतज्ञताही तेवढ्याच नम्रपणे जेव्हा साकारते तेव्हा टाळ्याही भरभरुन येतात.
ब-याच कालावधीनंतर गिरीजा काटदरे संगीत नाटकांची परंपरा असलेल्या भूमिकातून गद्य नाटकात आल्या. नुसत्याच आल्या नाहीत तर ते सूरही आळवून दाद घेउन गेल्या. पूर्णीमा तळवलकरांनीही साकारलेली तरूणी विविधअंगानी आमच्यासमोर आणली. करीयरकडे लक्ष देता देता लग्नाला वेळच नसणा-या आजच्या पीढीला तीच्याकडून शिकायला मिळते.
स्वतःची छाप पाडणारे. दिलिप प्रभावळकर आणि अतुल परचुरेंच्या आभिनयाने सौंदर्यवान बनविलेले चंद्रशेखर फणळकरांचे हे नाटक विजय केंकरेंच्या दिग्दशर्नातून पहाताना मजा आला.
आजचा प्रगल्भ होत असलेला प्रेक्षक `वा गुरू`ला दाद देईल अशा आशा आहे.


सुभाष इनामदार, पुणे
mob- 9552596276


गंधर्व नाटक मंडळी-बालगंधर्वात

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात दिवाळीनंतचा दिपोत्सव सुरु होता. रंगमंचावर गंधर्व नाटक मंडळीतल्या कलाकारांची मैफल रंगली होती. आमंत्रीत अशा नाट्यसंगीताच्या जाणकांरांच्या सहवासातल्या मैफलीचे चित्रिकरण सुरू होते. वातावरणात संगीत नाटके पाहणारा तो उल्हसित पुणेकर दाद देत होता. बालगंधर्वातल्या बालगंधर्वाच्या चित्रकार देउस्करांनी रेखाटलेल्या प्रतिमेजवळ बालगंधर्वांची भूमिका करणारा करणारा कलावंत सुबोध भावे प्रसिध्दी माध्यमांना बाईट देत होता. निमित्त होते. एके काळी संगीत रंगभूमिवर सुवर्णकाळ आणणा-या महानायकाच्या चरित्रावरच्या चित्रपटाचे शुभारंभी चित्रिकरण. गंधर्व नाटक कंपनीच्या सेटवर मंगळवारी ९ नोह्बरला चित्रपटाचा मूहूर्त साधला गेला. आणि जमलेल्या शेकडो रसिकांनी नितिन चंदर्कांत देसाई निर्मित बालगंधर्व चित्रपटला शुभेच्छा दिल्या.

तीन महिने बालगंधर्वाचे मिळेल ते साहित्य वाचनाचा झपाटा लावून सव्वा-दोन तासाच्या चित्रपटाद्वारे गंधर्व एक कलावंत आणि गंधर्वांच्या चरित्राला मराठी भाषेतून साकार करणारी कथा, पटकथा आणि संवादाच्या साच्यात बंदिस्त केली ती अभिराम भडकमकर यांच्या शब्दरूपाने. गंधर्व गायकीचे साक्षिदार . त्यांच्यासोबत काम करणारे जयमाला शिलेदारांसारखे कलाकार . लता मंगेशकरांच्या आठवणीतले बालगंधर्व. बालगंधर्वांच्या आयुष्यातला पत्नीचा आणि गोहरजान यांचा प्रभाव. यातून संगीत रंगभूवर त्यांना स्कारलेली नाटके . त्यातले नाट्यसंगीत. सा-यातून असे बालगंधर्व आता न होणे असे पुलं नी म्हटले असतानाही बालगंधर्वयूग  शोधण्याचा प्रयत्न करणारे नितिन देसाई यांच्या कलाकृतीतून मराठी महानायकाची ही कथा पडद्यावर साकारली जाणार आहे.
भारतरत्न पं. भिमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने या चित्रपटाचा मूहूर्त करताना गंधर्व परिवाराला पुण्याच्या रसिकांनी दाद दिली तशीच  चित्रपटाला दाद देतील असा विश्वास चंदर्कांत प्रॉडक्शन प्रा. लि. चे नितिन देसाई यांनी व्यक्त केला.
नारायण श्रीपाद राजहंस यांच्या संगीताने आणि अभिनयाने भारलेल्या काळाला साकारताना हा चित्रपट बनविणे हे शिवधनुष्य पेलण्याचा आपण प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक रवि जाधव सांगतात.
आपल्या संगीताची मोहिनी घालणा-या या महानायकाला पडद्यावर साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. बालगंधर्वांच्या वेषात तो आज वावरत होता. खरी कसोटी आहे स्त्री वेषातले बालगंधर्व साकार करताना. आपल्या वाट्याला ही भूमिका आली याचा आनंद व्यक्त करताना ती भूमिका पेलण्याची संधी मिळाली याचे समाधान  सुबोधच्या चेह-यावर दिसत होते.
बालगंधर्वांच्या पत्नीची भूमिका विभावरी देशपांडे साकारणार आहेत. त्यांच्या मते आपल्या पतीला सतत प्रेत्साहन देणारी आणि तरीही पडद्यामागे राहिलेली ही बाई बालगंधर्वांच्या जवळ जेव्हा गोहरजान आल्या तेव्हापासून ढासळली. बालगंधर्वांच्या आयुष्यातले  लक्ष्मीचे स्थान काय होते ते तुम्हाला पडद्यावर दिसेल. मला ही भूमिका मिळाली याचा आनंद झाल्याचे विभावरी सांगते.
जुने संगीत. त्यातही ऑर्गनचा स्वर. भारावलेले संगीत. आणि संगीतावर प्रेम करणारा प्रेक्षक यासा-यांतून या चित्रपटाच्या संगीताचा बाज निर्माण करणे हे जबाबदारीचे आणि जोखमीचे होते. संगीतातला भराव देताना कुठेही अधुनिक काळाशी सुसंगत असे कांही घडता कामा नये याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आज नांदी ऐकली ना... चित्रपटातल्या नाट्यसंगीताही तसाच प्रय्तन केला आहे. कौशल इनामदार बोलत होते. आनंद भाटे या पं. भीमसेन जोशा यांच्या शिष्याने गंधर्व गायकीची ढब हुबेहुब निर्मिण केली आहे. स्वानंद किरकिरे यांच्या दोन गाण्यांनीही या चित्रपटाला वेगळेपण पुरविले आहे. पारंपारिक संगीत नाटकातले तेच वातावरण संगीतातून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे कौशल सांगतो.
भारलेल्या वातावणाने पुन्हा एकदा संगीत नाटकांचा काळ जिवंत झाल्यासारखे भासले. एके काळी रंगभूमी गाजविणा-या कलावंताचे जीवन रुपेरी पडद्यावर येते आणि आजकाल खंडीत झालेली संगीत नाटकांची परंपरा पुन्हा वाढच रहावी अशीच इच्छा अनेक जण इथे बोलून दाखवत होते. कलावंताचे माहेरघर असणा-या पुण्यात गंधर्वयुग घडले. त्यामुळे बालगधर्वांच्य़ा चित्रपटाला इतके सुयोग्य वातावरण दुसरीकडे कुठे मिळणार....
पुण्याच्या सुवर्णमय पेढीचे दाजीकाका गाडगीळ यांच्या सुवर्णमयी उपस्थितीने संगीताचा सुवर्णकाळ देणा-या महानायकाचा परिसस्पर्श घडला. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, जयमालाबाई शिलेदार , किर्ती शिलेदार, लता भोगले, भास्करबूवा बखले यांची नातसून शैला दातार, , लंडनचे अनिल नेने, माजी खासदार श्रीनिवास पाटील, बालगंधर्वांच्या नात्यापैकी काही आणि संगीत रसिक यांच्या साक्षीने साकारलेल्या गंधर्वातल्या त्या संगीत पर्वाने काय सांगावे  पुन्हा संगीत नाटकांची पुन्हा चलती व्हावी. मराठी रंगभूमीवर जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याचे सुनिल बर्वे यांनी मनी घेतले आहे. तसे कुणीतरी संगीत नाटकांना रसिकाक्श्रय मिळव्ण्यासाठी पुढे येईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करीत आहे.

बालगंधर्व या चित्रपटातून पुढच्या पीढीला काही जुनी जाणती व्यक्तिमत्वे पहायला मिळणार आहेत. यात व्ही. शांताराम (ओमकार कुलकर्णी), शंकरराव मुजुमदार (विद्याधर जोशी), गणपतराव बोडस ( किशोर कदम), देवल मास्तर (श्रीरंग गोडबोले), गोविंदराव टेंबे (आदित्य ओक), कृष्णाजी खाडीलकर (क्षितीज झारापकर), राम गणेश गडकरी (मनोज कोल्हटकर), बाबुराव पेंटर ( अभय कुलकर्णी), भास्करबूवा बखले ( अजय पुरकर), मास्टर कृष्णराव ( विक्रंत आजगावकर) छत्रपती शाहू महाराज ( राहूल सोलापूरकर) आणि गोहरजान ( प्राची मेहेत्रे- सध्या ती बाजीराव मस्तानी मध्ये मस्तानी करत आहे).
चित्रपटाच्या माध्यमातून का होईना संगीत रंगभूमिचा आणि त्यातल्या कलावंतांचा इतिहास जपला जाईल याचा आनंद अधिक आहे.


सुभाष इनामदार, पुणे
Mob- 9552596276




सांस्कृतिक घटनांचा साक्षिदार

सांस्कृतिक पुणे
कालच्या आजच्या आणि उद्याच्या सांस्कृतिक घटनांचा साक्षिदार
काल, आज, उद्याच्या सांस्कृतिक घडामोडींचा आलेख
सांस्कृतिक घटनांचा भाष्यकार