subhash inamdar

subhash inamdar

Thursday, March 3, 2011

महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांची स्मृती लष्करी संग्रहालयात

भारतीय सैन्य दलात ३० रेजिमेंट आहेत. त्यापैकी महार रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंट या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यापैकी महार रेजिमेंट ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून उभारली गेली आहे. त्यासाठी १९२२ ते १९४१ या कालावधीत प्रयत्न करण्यात आले. जुलै १९४१ मध्ये या रेजिमेंट विषयीचा शेवटचा मसुदा डॉ. आंबेडकरांनी दिला. ब्रिटिश शासनाकडून सप्टेंबर १९४१ मध्ये याविषयी आदेश निघाले आणि एक महिन्याच्या अवधीतच पहिली महार बटालियन स्थापन झाली. महार रेजिमेंटच्या २३ बटालियन आज कार्यरत आहेत. महार रेजिमेंटच्या अनेक आठवणी, कागदपत्रे, महत्त्वाचा दस्तऐवज, दुर्मिळ छायाचित्रे, पदके सुधाकर खांबे यांनी या वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवली आहेत. महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांची स्मृती जपणारे पुण्यातील हे लष्करी वस्तुसंग्रहालय मालधक्का चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात ‘सुभेदार धर्माजी खांबे स्मरणार्थ राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय’ या नावाने साकारले आहे. यासाठी त्यांचे चिरंजीव सुधाकर खांबे अथक प्रयत्न करीत आहेत.

या संग्रहालयाच्या माध्यमातून अभ्यासक, कलाप्रेमी आणि संग्राहक यांना मोठे सहकार्य होणार आहे. श्री. सुधाकर खांबे यांनी या लष्करी संग्रहालयात भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटमधील आपल्या पूर्वजांच्या शौर्यगाथेचा इतिहास चित्रमय रूपात मांडला आहे. त्यात रेजिमेंटच्या स्थापनेपासूनच्या विविध प्रसंगांची लष्करी छायाचित्रे, लष्करी अधिकाऱ्यांच्या व सैनिकांच्या वापरातील रुबाबदार पोशाख व कॅप्स, कॅप बॅजेस, शोल्डर बॅजेस, बटन्स, बेल्ट्स, रेजिमेंटच्या स्थापनेपासूनचे कमांडंट, तसेच आपल्या पराक्रमाच्या बळावर शौर्यपदके मिळवून दिलेल्या वीर योद्धय़ांची छायाचित्रे, शौर्यवान व कर्तृत्ववान अधिकारी/ सैनिकांना मिळालेली शौर्य व सेवापदके (मेडल्स), भारतातली आणि परदेशातील वेगवेगळ्या मोहिमेत शौर्य गाजविल्याबद्दल बहाल करण्यात आलेली पदके, सन्मान व प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह, सरसेनापतींच्या हस्ताक्षरातील पत्र, ग्रीटिंग कार्ड्स, सेवापुस्तके, विविध सोहळ्याप्रसंगी काढलेली प्रथम दिवस अनावरण पाकिटे याशिवाय लष्कराशी संबंधित अनेक वस्तू श्री. खांबे यांनी अतिशय परिश्रमाने प्रसंगी भटकंती करून मिळविल्या व तितक्याच समर्पकरीतीने त्यांची मांडणी या लष्करी संग्रहालयात केली आहे.

देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या वीर जवानांचे सदैव स्मरण राहून भारतीय लष्कराची स्मृती चिरंतन राहावी या उद्देशाने या संग्रहालयाची स्थापना केली आहे.

हवालदार राऊ कांबळे १९४७ मध्ये जम्मू-काश्मीर युद्धात शहीद झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठविलेले त्यांच्याच हस्ताक्षरातील सांत्वनपत्र, तसेच सर्वात जुने आणि दुर्मिळ असे १८९० दरम्यानचे मूळ सेवापुस्तक श्री. खांबे यांचे आजोबा (आईचे वडील) यांचे आणि पहिल्या जागतिक युद्धातील १९१७ च्या दरम्यानचे सेवापदक उपलब्ध आहे. तसेच १०९ बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रन्ट्री व नंतर १११ महार बटालियन १९१७ च्या दरम्यान पहिल्या महायुद्धात सहभागी झाले त्यांचे त्यावेळचे सेवापदक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे दुर्मिळ छायाचित्र, १८८० च्या अफगाण युद्धात शौर्य गाजविल्यामुळे पनवेलची जहागिरी व राव बहादूर हा खिताब मिळालेले सुभेदार गंगाराम भातनकर यांचे रुबाबदार छायाचित्र तसेच  पहिल्या जागतिक युद्धात तुर्कस्तान येथे रणांगणावर शहीद झालेले जमादार सवादकर यांचे तुर्कस्तान येथील स्मारक व कोरोनेशन पदक, १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भीमा-कोरेगाव येथील स्तंभास दिलेली भेट तसेच जुलै १९४२ मध्ये कामठी (नागपूर) येथील महार रेजिमेंट मुख्यालयास दिलेली भेट, १९४९ रोजी महार रेजिमेंटच्या २ बटालियनला दिल्ली येथे सहपत्नी दिलेली भेट, महार रेजिमेंटचे १९४५ मध्ये इराक येथील मोहिमांचे चित्र, १९४७ दरम्यानचे फाळणीचे फोटो,

 १९६२ च्या युद्धातील दुर्मिळ फोटो तसेच परमवीर चक्र ते वीरचक्र यांना शौर्य पदके म्हणतात. ही पदक मिळविलेल्या विरांची तसेच परमवीरचक्र, महावीरचक्र, कीर्तिचक्र, अशोकचक्र यांची छायाचित्रे. महार रेजिमेंटचे अधिकारी/ सैनिक यांनी संग्रहालयासाठी दिलेले स्मृतिचिन्ह, मानचिन्ह, मानपत्र त्याचप्रमाणे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची पत्रे व त्यांनी दिलेले अभिप्राय, महार रेजिमेंट असोसिएशन (यूके) येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांचे छायाचित्र व पत्र आदींचा समावेश या संग्रहात आहे.
ले. कर्नल करंदीकर यांच्या वापरातील १९५३ सालातील लष्करी गणवेश, तसेच ब्रिगेडियर बजीना (वीरचक्र) यांच्या वापरातील लष्करी गणवेश, डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषद लंडन येथून (महार रेजिमेंट स्थापनेसाठी प्रयत्न करीत असताना) पाठविलेले त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र, माजी लष्करप्रमुख जनरल के. व्ही. कृष्णाराव आणि जनरल जे. जे. सिंग यांनी पाठविलेली शुभेच्छा पत्रे, काठमांडू (नेपाळ) येथे महार रेजिमेंटकडून मशिनगनचे प्रशिक्षण देतानाचे छायाचित्र, महार रेजिमेंटला मशिनगनचा हुद्दा मिळालेल्या आदेशाचे पत्र, महार रेजिमेंटशी संबंधित वर्तमानपत्रातील कात्रणे, लष्कराच्या विविध महत्त्वाच्या प्रसंगाची ‘प्रथम दिवस अनावरण’ डाक पाकिटे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती व माहिती, महार रेजिमेंटच्या इतिहासाची रेजिमेंटने प्रकाशित केलेली पुस्तके, सी.डी. आणि मासिके , स्वतंत्र महार रेजिमेंट स्थापनेसाठी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला जुलै १९४६ मध्ये सादर केलेला मसुदा हेही येथे पाहावयास मिळतो.

आजपर्यंत या लष्करी संग्रहालयास सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, आजी-माजी लष्करी अधिकाऱ्यांनी तसेच देशी-परदेशी अभ्यासक, इतिहास संशोधक यांनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तसेच तीनही दलांच्या प्रमुख प्रतिभाताई पाटील यांनीसुध्दा या संग्रहालयास भेट देऊन या दस्तऐवजांचे कौतुक केले. या आगळ्या-वेगळ्या राष्ट्रीय व समाजोपयोगी कार्याचे महत्त्व ओळखून ज्यांच्याकडे लष्कराशी संबंधित वस्तू असतील तर त्यांनी या संग्रहालयाच्या वाढीसाठी देणगी म्हणून द्याव्यात, अशी विनंती या संग्रहालयाचे संस्थापक सुधाकर खांबे यांनी केली आहे.
दुर्मिळ लष्करी वस्तू व  दस्तऐवज जतन करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. युद्ध व आपत्कालीन समयी आपल्याला सैनिकांची व लष्कराची आठवण होते. त्या संकटसमयी आपण त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वतोपरी मदत करतो. कालांतराने सर्वानाच त्यांचे विस्मरण होते. पुणे मनपाने या संग्रहालयाची भरभराट होण्याच्या दृष्टीने आर्थिक आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सुधाकर धर्माजी खांबे (वय ५८ वर्षे) हे सेवायोजन कार्यालयात (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज) रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना त्यांच्या तीन पिढय़ांचा लष्करी वारसा लाभल्यामुळे त्याचा त्यांनी संग्रहालयाच्या उभारणीत पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. ऐतिहासिक महत्त्वाच्या दुर्मिळ लष्करी वस्तू संग्रहित करणे अशक्य असूनसुध्दा त्यांनी ते साध्य केले आहे. त्यांना वडिलांकडून संग्राहक वृत्तीचे बाळकडू मिळाले असल्यामुळेच त्यांनी या लष्करी संग्रहालयाची उभारणी केली. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लष्करी संग्रहालय व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या लष्करी वस्तुसंग्रहालयाची उभारणी सुधाकर खांबे यांनी आपली शासकीय नोकरी सांभाळून केली आहे. त्यांच्याकडे महार रेजिमेंट संबंधित २५० च्या आसपास मूळ फोटो असून या व्यतिरिक्त भारतातील इतर रेजिमेंटची प्रथम दिवस अनावरणाची ३५० पाकिटे आहेत.

दयानंद ठोंबरे
nand.tho@gmail.com


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140386:2011-03-03-18-17-43&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212

No comments:

Post a Comment