तबला वादनाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठलेला कलाकार
मराठी संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सर्व गायक अभिनेता आणि अभिनेत्रींसाठी, मराठी संगीत नाटकाच्या आणि नाट्यसंगीताच्या रसिक प्रेक्षकांसाठी आज एक अतिशय आनंददायक घटना घडली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे बालगंधर्वांच्या जन्मदिनी देण्यात येणाऱ्या "बालगंधर्व पुरस्कार " साठी ज्येष्ठ, श्रेष्ठ
श्रेष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांची एकमताने निवड झाली आहे... येत्या २६ जून २०१२ रोजी, म्हणजेच बालगंधर्वांच्या १२४ व्या जन्मदिनी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे..
सुमारे ५० हून अधिक वर्षे विनायकरावांनी तन-मन-धन विसरून नाट्यसंगीत आणि संगीत नाटकाच्या साथीला वाहून घेतले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरराज छोटा गंधर्व यांना केलेली साथ असो, किंवा कित्येक वर्षे शिलेदारांच्या मराठी रंगभूमीच्या सर्वच संगीत नाटकांना केलेली साथ असो, अनेक थोर गवैय्यांना मैफिलीमध्ये केलेली साथ असो, थोरातांच्या साथीची खरोखर तुलनाच होऊ शकत नाही..
आजच्या पिढीतल्या ज्या तबलजींना संगीत नाटकांची, नाट्यसंगीताची साथ करायची आहे, त्यांनी केवळ आणि केवळ थोरातांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असा हा थोर कलाकार..
सर्वच गायक कलाकारांनी एक गोष्ट सतत ध्यानात ठेवावी की आपलं गाणं रंगणं, खुलणं हे साथीदारांवर अवलंबून असतं.. साथीदारांशिवाय गाण्याला रंगत येत नाही.. म्हणून ५०% गाणं हे साथीदारांच्या संगतीवर अवलंबून असतं.
विनायकरावांची साथ ही कायमच गाण्याला पूरक अशीच राहिली. त्यांनी कधीही गाण्यावर कुरघोडी केली नाही.. गाणं कसं बहरेल याचाच विचार त्यांनी कायम केला. कितीही बुजुर्ग गायक असोत किंवा अगदी माझ्यासारखे छोटे गायक असोत की ज्यांचं संगीत क्षेत्रात आत्ताशी कुठे पाऊल पडतंय, सगळ्यांबरोबर ते तितक्याच तन्मयतेनी साथ करतात..
कधीही मेहनत करायची सोडू नये आणि कधीही कुणा कलाकाराची टिंगल करून उणी दुणी काढू नयेत ही त्यांची आमच्या पिढीला दिलेली शिकवण.
हा माणूस किती मितभाषी आणि मृदुभाषी आहे , हे त्यांच्या सहवासात आलेले सर्व कलाकार जाणतातच. रिकाम्या, फावल्या वेळेत ते केवळ चिंतन आणि चिंतनच करतात.
त्यांच्या ठेक्यातला डौल, आंस ही केवळ शिक्षणामुळे आलेली नाही, तर त्यांनी आपल्या कलेवर जे प्रेम केलं आणि संपूर्ण आयुष्य तबलावादनात झोकून दिलं, त्याचा हा परिणाम आहे. तीनताल, एकताल, रूपक, झपताल हे नेहमीचे प्रचलित ठेके सुद्धा त्यांच्याकडून ऐकणे हा एक विलक्षण आनंद सोहळा असतो. परंतु जे ठेके तितकेसे प्रचलित नाहीत, पण जे नाट्यसंगीतात अनेक ठिकाणी वापरले गेले आहेत ते ठेके ऐकावेत तर केवळ थोरात यांच्याकडूनच. गंधर्व ठेका, पंजाबी, झम्पा, हे ठेके इतक्या सफाईनी वाजवणारे तबलजी आजच्या पिढीमध्ये मिळणे फारच मुश्कील आहे, हे सत्य आहे.. साधा केहरवा, धुमाळी असो, थोरातांकडून तो ऐकताना त्यामध्ये खास "थोरात छाप" ऐकायला मिळते.
असा हा तबला वादनाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठलेला कलाकार , आजही जमिनीवर घट्ट पाय रोवून निगर्वी , सात्विक पणे उभा आहे. यासारखा आदर्श आमच्या पिढीपुढे दुसरा कुठला असणार?
पुणे महानगरपालिकेनी आज या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना किती आनंद झालाय ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही.
या निमित्तानी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी सदैव राहोत अशी दत्त महाराजांच्या चरणाशी विनम्र प्रार्थना करतो..
-अतुल रविंद्र खांडेकर, पुणे