subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, December 30, 2015

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..मंगेश पाडगावकर यांना समर्पित..

या जन्मावर प्रेम करावे असा आपल्या सुंदर..आयुष्यातल्या सर्व वळणार आनंदाने जगायला लागणारे ब आपल्या शब्दातून सर्वांच्या रसिकतेला सलाम करणारे ज्येष्ठ कवीवर्य मंगेश पाडगावकरांचे निधन झाले..
वाटेवरच्या प्रत्येक वळणावर पाडगावकरांची कवीता साथ करीत रसिकाच्या मनात रुंजी घालत होती..
मग ती लिज्जत पापडाच्या जाहिरातीत दरवर्षी हमखास भेटणारी असो वा श्रावणात बरसणा-या रिमझिम धारांनी तृप्त करणारी असो..

जगताना भान देणारी आणि जगायला बळ देणारी त्याची प्रतिभा सतत मराठी मनात कायम वास्तव्य करत राहिली..
केवळ कवीता करून ते थांबले नाहीती..ती रसिकाच्या मनापर्यत आपल्या शब्दांच्या भावनांनी बोलकी करत ते देशभर फिरले..त्यांच्या कवीता सादर करण्यातला वेगळेपणा शब्दातून सांगता येत नाही..तो अनुभवावाच लागेल.
शब्द त्यांच्या पुढे पुढे करत आणि त्यांना ते अगदी निवडक..वेचित मराठी मनाला संपन्न करत एकेक कवीता करत राहिले..
आता कितीही सूर लावून गायलेले गीत त्यांच्यापर्य़त पोचू शकणार नाहीत..कारण ते आपल्यातून कायमचे दूर निघून वेगळ्या प्रवासाला निघाले आहेत..


आपल्या पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा मारून त्यानी हा मृत्यूलोक सोडला. आता आपल्याला डोळ्यामधले आसू पूसून ओठांवर गाणे म्हणावे लागेल.
कारण ह्दयात दाटलेले सारे ह्दयातच राहिले आहे..आता बंद पापण्यांनी अश्रूत भिजवून त्यांची आठवण उरली आहे.
पाठीवर मायेने फिरणारा त्यांचा हात केवळ थरथरला नाही तो आता  उरलाच नाही ..असे झाले आहे.
आता अवती भवती न पाहता आकाशी पाहण्याचे आपल्या नशीबी असणार आहे.
तुमचे चित्र समोरून जाताना पाहण्याचे फक्त उरले आहे..
त्यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे तू कुठेही जा...चंद्र माझा साथ आहे...गीत माझे घेऊन जा ..त्यात माझा प्राण आहे..म्हणत पाडगावकर गेले.

अंतरी कारूण्य असताना वेदनेची फुंकर घालीत त्यांची कवीता आपल्या सोबत आहे..त्यांचा तो आवाज माध्यमाच्या चमचमत्या लखलखाटात उरला आहे..ते शब्द आता आपली साथ करणार आहे..त्यातली वेदना..प्रेम, कारूण्य..तरलता सारे तसेच आहे..पण ज्या शरीरातून ही वेदनेची फुंकर घातली गेली ते शरीर आता उरले नाही..याचा खरे दुःख आहे..
आता नवल वर्तले..अंती देवाचिये पायी
ज्योत जळून काजळी उरलीच नाही...
ते पिंपळपान आता गळून गेले..नदीच्या काठचे गाणे विरून गेले..आता केवळ उरल्या स्म-ती..वेदना आणि हूरहूर..

त्यांच्या स्मृतीला सांस्कृतिक पुणेच्या वतीने विनम्र शब्दांजली..-सुभाष इनामदार,
www.culturalpune.blogspot.com
9552596276