-आरती अंकलीकर-टिकेकर
‘‘शास्त्रीय संगीत म्हणजे स्वरप्रधीन गायकी, जी ख्याल गायकी म्हणूनही प्रसिध्द आहे. ती अतिशय सूक्ष्म आणि तरल आहे. तीला शब्दांची गरज नाही. पण आजचा प्रवास आत्मरंजनाकडून मनोरंजनाकडे उलट्या दिशेने सुरू आहे. म्हणूनच आज शास्त्रीय गायकालाही शब्दप्रधान गायकीकडे जावे वाटते. त्याचा अभ्यास करावा लागतो.,’’ असे मत ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी व्यक्त केले.
‘सांस्कृतिक पुणे’च्या वतीने ‘आकांक्षा क्रिएशन’निर्मित ‘मी प्रेमिका’ या म्युझिक अल्बमचे प्रकाशन अंकलीकर यांच्या हस्ते रविवारी एस एम जोशी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक, ज्येष्ठ उद्योजिका लीला पूनावाला, फिरोज पूनावाला, अल्बमच्या गायिका कस्तुरी पायगुडे-राणे, संगीत संयोजक मिलिंद गुणे उपस्थित होते. अल्बमचे संगीतकार, गीतकार अभिजित कुंभार आहेत, मात्र ते कॅलिफोर्नियात असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे आई-वडिल हजर होते.
अंकलीकर म्हणाल्या, ‘‘जेव्हा माईक संगीतात आला, तेव्हा शास्त्रीय गायकही आपला आवाज त्यातून कसा जातो, फ्रिक्वेन्सी कशी आहे या गोष्टींचा विचार करू लागला. तेव्हा शास्त्रीय गायकीत शब्दांच्या उच्चारावर भर देण्याचे वळण आले. त्यावेळी शास्त्रीय गायकही शब्दप्रधान गाणे उत्तम गाऊ शकतो हे समोर आले. शास्त्रीय गायक तसेच रागधारीची साधना करणारा प्रत्येक गायक हा उत्तम संगीत दिग्दर्शक असतो. कारण प्रत्येक आवर्तन म्हणजे एकेक क्रिएशनच असते.``
आजकाल कोणतेही गाणे अनेक वेळा ऐकले की, आपल्याला त्याची सवय होते आणि तो गायक/गायिका उत्तम गातात, असा समज होतो. मात्र, आजकाल गाणे येत नसलेलेही या ‘हॅमरिंग’मुळे प्रकाशझोतात येतात व त्यांचे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. त्यामुळे पालकांना कळकळीचे सांगणे आहे की, मुलांना उगाच काहीही न ऐकवता दर्जेदार संगीत ऐकवा, अशी सूचना ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी केली.
`कस्तुरीचा नितळ, निकोप व ताजा आवाज असून तो ध्वनीमुद्रणासाठी अतिशय उत्तम आहे.ही दैवी देणगीच आहे,`` असे मत आनंद मोडक यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सध्या ताजेपणा, ताजगी सहसा सापडत नाही. कृत्रिमता वाढत आहे. जेव्हा माणसातील विद्यार्थी संपतो त्यावेळी त्यातील कलावंतही संपतो. कस्तुरीचा विद्या शिकण्याचा हा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत सुरू रहावा,’’ असा आशिर्वादही मोडक यांनी दिला.
आपण अल्बममधील सर्व गाणी ऐकली असून पूनावाला म्हणाल्या, ‘‘.कलाकाराला सर्व प्रकारचे गाणे गाता येणे आवश्यक आहे. ज्यांना रसिकांच्या पसंतीप्रमाणे गाता येते तो खर्या अर्थाने कलाकार आहे असे मला वाटते. रसिकांना समाधान देता येणे आवश्यक आहे ’’ तशीच ती झाली असल्याचे मतही त्यांनी बोलून दाखविले.
प्रकाशनानंतर या सीडीमधली तीन गाणी कस्तुरी पायागुडे-राणे यांनी प्रत्यक्ष सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवून आपली गायकीतली तयारी सिध्द करून दाखविली. .आपल्या गायकीचा प्रवास व सीडीच्या वाटचालीबद्दलचे मनोगतही सूत्रसंचालक अरूण नूलकर यांनी विचारलेल्या प्रश्नातून व्यक्त झाले .
संगीत संयोजक मिलिंद गुणे हे ही या संवादात सामिल झाले होते.
सीडीसाठी सहाय्य केलेल्या सर्वांचाच सक्तार यावेळी करण्यात आला. सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी एस एम जोशीत गर्दी केलेल्या उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार प्रकट केले.
http://www.facebook.com/?sk=lf#!/photo.php?fbid=196818063706914&set=a.132694696785918.32502.100001361659055&type=1&theater