subhash inamdar
subhash inamdar
Thursday, August 18, 2011
इचलकरंजी ते कॅलिफोर्निया-अभिजित कुंभार
सकाळी सकाळी ऐकलेले गाणे दिवसभर मनात बसते. मग तेच गाणे गुणगुणत बसणे हे तर अगदीच रुटीन. परंतु केवळ अशी गाणी गुणगुणत बसण्यापेक्षा स्वतः रचलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गुणगुणायला किती आनंद मिळतो, या कल्पनेतूनच सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करताना इचलकरंजी ते कॅलिफोर्निया असा पल्ला गाठणाऱ्या अभिजित कुंभारने चक्क स्वरचित गीतांचा एक म्युझिक अल्बमच तयार केला आणि तोही त्याच्या आयटी क्षेत्रातली टिपिकल ऑफशोअर ऑपरेशन्सची कल्पना वापरून! अभिजितने आपल्यासारख्या अनेकांना, ज्यांना इच्छा असून वेळ काढता येत नाही किंवा पायरसीच्या भीतीमुळे त्यांची कल्पना कल्पनेतच विरते अशांना एक वाट खुली करून दिली आहे.
"मी प्रेमिका' या अभिजितच्या म्युझिक अल्बमने समस्त तरुण वर्गाचा विकपॉइंट असलेले "प्रेम' आणखी एकदा गाण्यातून सादर केलेय. "जी मिळे ती नजर..', "चहू ओर पाहता...', "नवा नवा श्वास हा...' अशा एकूण आठ गाण्यांच्या या अल्बमचे गीत आणि संगीतकार अभिजित, संगीत संयोजक मिलिंद गुणे आणि गायिका कस्तुरी पायगुडे-राणे हे तीन मुख्य आधारस्तंभ. अभिजितने गीते रचली, त्यांना चाली लावल्या आणि ती कस्तुरी यांच्याकडे पाठवली. त्यानंतर मिलिंद गुणेंनी त्यावर काम केले. गीत-संगीतकार कॅलिफोर्नियात आणि संगीत संयोजक व गायिका पुण्यात असे ऑफशोअर ऑपरेशन सुरू असताना फोनवर खूप चर्चा झाल्या, टिप्स दिल्या-घेतल्या गेल्या.
संगीताचे शिक्षण घेता आले नसले तरी चाली रचण्याचा छंद पूर्वीपासून होता. अभिजितवर प्रभाव आहे तो हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, आर. डी. बर्मन आणि एस. डी. बर्मन यांचा! रोजच्या रहाटगाडग्यातून समाधान मिळेल अशी रचना करण्याच्या तीव्र इच्छेने "प्रेमिका'ची संकल्पना सत्यात आल्याचे अभिजित सांगतो. नव्या संगीतकारांसाठी या क्षेत्रात पाय रोवणे किती कठीण आहे हे आपल्याला या अल्बमच्या निमित्ताने कळले, असे सांगतानाच अभिजितने जगभरातल्या मराठी कलावंतांना विश्वासाने एकत्र येण्यासाठी एखादे व्यासपीठ नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. अल्बम पूर्ण करण्याच्या ऊर्मीतून अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती मिळत गेली आणि पुढे जात राहिलो, असे सांगतानाच पत्नी मानसीची साथदेखील यात महत्त्वाची असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
परदेशात स्थायिक असल्यामुळे तिकडच्या मराठी रसिकांपर्यंत हा अल्बम बऱ्याच प्रमाणात पोचला आहे. भारतातून विदेशात गेल्यानंतर मातृभूमी, मातृभाषेचे महत्त्व लक्षात आले आणि त्यातूनच प्रेरणा मिळाली. करिअरच्या मागे धावताना आपले छंद, आवडी जोपासणे सोपे नाही; पण परदेशात राहूनही आपली सांस्कृतिक मूल्ये जपत असताना कलेची आवड जोपासणाऱ्या गुणवंतांची संख्याही कमी नाही. या आवडीपोटी असे धाडस हे कलावंत करू धजतात, असे अभिजितला वाटते.
http://www.esakal.com/esakal/20110818/5341174800411566553.htm
Subscribe to:
Posts (Atom)