subhash inamdar

subhash inamdar

Sunday, January 29, 2012

मर्मबंधातली व्हायोलीन वादनाची सुरेल संध्याकाळ..

व्हायोलीन वादनातले तीन तरबेज शिलेदार एकत्र आले. त्यांनी शास्त्रीय वादनातून आणि नाट्यगीतातून तसेच विविध धून वाजवून मन मोहित करुन तर सोडलेच..पण एक सुरेल वादनाची मंद धुंद आळवत रसिकांना मोहवून टाकले.

पुण्यातल्या भारत गायन समाजात रविवार संध्याकाळ पं. भालचंद्र देव यांनी आपल्या गुरूंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त व्हायोलिन वादनाची मैफल मोठ्या श्रध्दापूर्वक आयोजिली होती. वादन आणि गायनाच्या क्षेत्रातले ते मोठे नाव म्हणजे..पं. गजाननबूवा जोशी.


दरवर्षी ते आपल्या गुरुंच्या स्मृती या माध्यमातून जपतात आणि स्वतः बरोबरच काही व्हायोलीन वादकांना खास आमंत्रित करतात.. याशिवाय आपली कन्या व शिष्या सौ. चारुशीला गोसावी हिच्यासोबत जुगलबंदीची मैफलीही रंगवतात.

सो. निलीमा राडकर या मधुकर गोडसे आणि रमाकांत परांपजे यांच्या शिष्येला आमंत्रित केले होते. त्यांनी आरंभी `चंद्रकंस` वाजविला आणि नंतर `पांडुनृपती जनकजया` हे नाट्यपद वाजवून आपली तयारी रसिकांना सादर केली. व्हायोलीन तर सुरेल होतेच..पण त्यातली खासीयत म्हणजे आपल्या नाजूक स्वरातून त्यांनी वेगळाच स्वरनाद घडविला.


जुगलबंदीच्या बैठकीवरुन पं. भालचंद्र देव आणि सौ. चारुशीला देव यांनी राग `जोग` रंगविला. त्यातली विविध आवर्तने मोहक आणि दाद मिळवून घेणारी होती. अनेक विविध कार्यक्रमातून साथ करणारे हे दोन पिता-कन्या जेव्हा स्वतंत्रपणे व्हायोलीन वादन करतात, तेव्हा त्यांच्या कसदार लयकारीची आणि स्वतंत्र बैठकीची रसिक सहजपणे दाद देताना दिसतात.

श्रीधर पार्सेकर आणि पं. गजाननबूवा जोशी यांच्या गती वाजवून त्यांनी आनंदाचे उधाण आणले. स्वतः तयार केलेली धून पं,. देव यांनी `जनसंमोहिनी` रागातली वाजविली...आपली स्वतंत्र शेली त्यांनी तयार करुन आपला वेगळा ठसा या क्षेत्रावर उमटविल्याचे चित्र स्पष्ट दिसतें.

सौ. चारुशीला गोसावी यांची वादनातली किमया...त्य़ाच तोडीची किंबहुना `बापसे बेटी अधिक`स्वतंत्र आणि शैलीचे विविध कंगोरे सादर करताना...टाळ्याही घेत होती.

दोन नाट्यपदांची झलक या दोन्ही कलावंतांनी दाखवून भैरवीने जुगलबंदीची सांगता केली. या व्हायोलीन वादनाची मोहकता आणि रंजकता वाढली ती रविराज गोसावी यांच्या तबला साथीने... सूत्रसंचालन स्वरबहारचे राजय गोसावी यांनी केले होते.सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

Wednesday, January 25, 2012

स्वकुलतारक सुता...जयमाला शिलेदार.. हे नाव नुसतं उच्चारलं तरी लगेच डोळ्यासमोर त्यांचा सदा प्रसन्न हसरा चेहरा उभा राहातो. अशी काही मोजकी व्यक्तिमत्व असतात की ज्यांच्या उपस्थितीनचं सगळं वातावरणा प्रसन्न होऊन जातं.... जयमालाबाई त्यातल्याच....

नुकताच त्यांना संगीत नाटक अकादमीचा रविंद्रनाथ टोगोर पुरस्कार जाहिर झाला. त्यांच्या गायनावर प्रेम करणा-या सर्वांनाच खूप आनंद झाला. आत्तापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रपातळीवरच्या या पुरस्कारानं आणखी एक मानंचं पान खोवलं गेलं. त्यांची आजपर्यंतची वाटचाल पाहिली की, त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वापुढं नतमस्तक व्हावसं वाटतं...वडिलांच्या इच्छा पूर्ण करणरी लाडकी लेक. समानधर्मी कलावंताची पत्नी. गुणी कन्यांची माता. मोठा गोतावळा असलेल्या घरातली कर्तव्यदक्ष गृहिणी. संगीत रंगभूमीवर सतत २५ वर्षे नायिका रंगविणारी गानसम्राज्ञी.....अगणित शिष्यांना नाट्यसंगीताचं शिक्षण देणा-या आदर्श गुरु....किती म्हणून सांगू.......श्री एकवीरादेवीची, श्री स्वामी समर्थ यांच्या निस्सीम भक्त अशी जयमालाबईंची विविध रुपं आहेत...

महत्वाची गोष्ट म्हणजे या विविध रुपांची सरमिसळ कधीही झाली नाही. प्रत्येक रुपात त्या समर्थपणे, सहजपणे वावारल्या. रंगमंचावर रुक्मिणी, भामिनी, सिंधू साकारताना किंवा एखादी मैफल रंगवताना घरातली कोणतीही चिंता त्यांना स्पर्श करीत नाही. घरातल्या पाहुण्यांच्या आदरसत्कार करताना, त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनविताना, रंगभूमिवरची ही महाराणी साधीसुधी गृहिणी असते. लाडक्या लेकीचे मऊ पंचांनी केस पुसून देणारी ही आई.... पेटी काढून समोर शिकवायला बसली की काटेकोर गुरू होते.. मग मुलगी म्हणून सवलत नाही.

प्रत्येक काम करायचं ते मनःपूर्वक, नीटनेटकं...कशातच चालढकल नाही....असाच जयमालाबाईंचा स्वभाव !
म्हणूनच घरसंसार आणि नाट्यसंसार समर्थपणे सांभाळला गेला. अर्थातच याचं मोठं श्रेय जयराम शिलेदारांनीही तेवढचं जातं...कारण पत्नीच्या कलागुणांना प्रोत्साहन देणा-या दिलदार पतिचा पाठिंबा जयमालाबाईंवर नेहमीच होता.
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपत असताना शिलेदारांनी `मराठी रंगभूभी` ही संस्था स्थापन केली आणि कितीही संकटं आली तरीही न डगमगता संगीत नाटकांचे प्रयोग केले. आजच्या तरुण पिढीला जयमालाबाईंच्या रंगमंचावरच्या अदभूत कामगिरीची कल्पनाच नाही.

सुडौल बांधा, बोलके डोळे, चापूनचोपून नेसलेली नऊवारी साडी, प्रसन्न चेहरा आणि मधुमधुर अशी गायकी...त्यामुळं जयमालाबाईंना उदंड लोकप्रियता लाभली. अमाप यश मिळूनसुध्दा त्या नेहमीच विनम्रच राहिल्या. आजही गुरूजनांबद्दल तेवढाच आदर त्यांच्या मनात आहे.

त्यांच्या मैफली आणि नाटके रंगतात..याचं मर्म म्हणजे... शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया. तालासुरावर प्रचंड हुकूमत. कोणताही अभिनिवेश नसलेलं निर्मळ गाणं. ह्दयातून उमटलेले सूर .. आणि ते रसिकांच्या ह्दयापर्यंत पोचविण्याचा अनंद सोहळा म्हणजे..जयमालाबाईंचं गाणं...!

नाट्यसंगीताचा ख्याल न करता त्यातल्या अर्थाकडे, भावनेकडे लक्ष देऊन मर्यादित वेळेत ते कसं रंगवावं ही मोलाचा शिकवण त्यांच्या शिष्यवर्गाला मिळते.

आज या पदापर्यंत पोचताना त्यांनी केलेल्या कष्टाचं महत्व तेवढेच आहे. वेगवेगळ्या गुरुंकडून तालीम घेऊन. भरपूर मेहनत करुन स्वतंत्र गायकी निर्माण केली आहे.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा सगळ्या गतस्मृतींना ..झालेल्या अडचणींचा पाढा डळ्यासमोर येतो...मन हेलावते...
.
जयराम शिलेदारांसारखाय गंधर्वभक्त पतीच्या साथीने संगीत रंगभूमीची कीर्ती-लता वाढविणा-या या स्वकुलतारकसुतेला शतशः दंडवत....


वर्षा जोगळेकर, पुणे

email-varsha.joglekar3@gmail.com


जयमाला शिलेदार यांना अभिष्टचिंतन

आज शुभदिनी जमलो आपण सारे सुहृदजन
करावया अपुल्या जयमालाबाईंचे अभिष्टचिंतन.
एके काळी गंधर्वांच्या नंतर कोण ? असा प्रश्न पडला रसिकमनाला.
जणू तो सोडविला जयरामानी घालून वधूमाला जयमालेला.
लता - कीर्तीच्या रूपाने रंगभूमीची पूजा बांधिली या आठ हातानी.
सुगीचे दिवस पुनश्‍च आले रंगभूमी बहरली अभिनय गायनानी.
मृदु मितभाषी बाईनी विद्यादानही केले सढळ हातानी
त्याचेही स्वागत केले तरुण दमदार कलाकारानी.
सर्वांतर्फे देते शुभेच्छा माझे निर्मल मन
शिलेदार कुटुंबियांच्या सेवेचा पुणेकरांना सार्थ अभिमान.


-- निर्मला गोगटे ( पुणे, २६ जानेवारी २०१२ समारंभात)

राज्यामध्ये आपल्या कलेने मराठीपण जपणाऱ्याच नाट्यक्षेत्राला निश्चिषत प्रोत्साहन देऊ असे आश्वा्सन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृत्यर्थ आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण सोहळा व जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. गोपिनाथ सावकार व जयमाला शिलेदार यांना जीवन गौरव पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नाट्‌य संमेलनाध्यक्ष राम जाधव, नाट्‌य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे, डॉ. मोहन आगाशे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

Tuesday, January 17, 2012

लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी `व्हायोलिन गाते तेंव्हा..`

सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमासाठी मदतीचे हात पुढे यावेत


दुर्गम भागीतील आदिवासींच्या आरोग्यासह सर्वांगीण विकासासाठी झटणा-या डॉ,
मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील `लोकबिरादरी
प्रकल्पास` जास्तीत जास्त मदत मिळवून देण्य़ासाठी पुण्याच्या
व्हायोलिनवादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलिन गाते
तेव्हा...` या कार्यक्रमाचे १२ फेब्रुवारी २०१२ रोजी ``सांस्कृतिक
पुणे ` च्या वतीने आयोजन केले आहे.

या कार्यक्रमातून जमा होणारी सर्व रक्कम (खर्च वजा जाता) यांच्या
`लोकबिरादरी प्रकल्पास` देण्यात येणार आहे.

पुण्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. . सदर कार्यक्रम बालशिक्षण
संस्थेच्या ,मयूर कॊलिनी (कोथरुड) ,पुणे येथे १२ फेब्रुवारी, रविवारी
सकाळी १० वाजता होणार आहे.


सौ. चारुशीला गोसावी या गेली ३२ वर्षे व्हायेलिनवादनाची साथ आणि स्वतंत्र
शास्त्रीय व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत. सुमारे
२५०० कार्यक्रमातून साथ आणि १०० चे वर स्वतंत्र व्हायेलिन वादनाचे
कार्यक्रम झाले आहेत.. आजही ते सुरुच आहेत.

वडील पं. भालचंद्र देव यांच्याकडून व्हायेलिन वादनाचे धडे घेऊन त्या
स्वतंत्रपणे आपली या वाद्यावरची हुकुमत त्यांनी वेळोवेळी सादर केलेल्या
कार्यक्रमातून रसिकांना परिचित आहेच. मात्र अशा प्रकारचा स्वतंत्र
गीतांचा कार्यक्रम त्या प्रथमच करीत आहे. असे कार्यक्रम लोकबिरादरी
प्रकल्पाच्या मदतीसाठी महाराष्ट्रात इतरही शहरात सांस्कृतिक पुणेच्या
वतीने करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. आणि तसे आम्ही करणार आहोत.

मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतांना तसेच अभंग, नाट्यगीत,
लावणी, आणि सुगम संगीतातली गाणी आपल्या सुरेल व्हायोलिन वादनातून सौ.
चारुशीला गोसावी या कार्क्रमातून सादर करणार आहेत.

आपल्या सारख्या जाणकार आणि उदार रसिक आश्रयदात्यांकडून या कार्यक्रमाचा आर्थिक
मदतीचा हात मिळेल अशी आशा आहे. त्यातूनच आम्ही लोकबीरादरीच्या
प्रकल्पासाठी मोठी आर्थिक मदत देऊ शकू.या साठी आपणतर मदतीचा हात द्यालच.
पण इतरांना सांगून स्व.बाबा आमटेंनी स्थापन केलेल्या कार्यासाठी आपल्या मित्रांना
आणि माहितीच्या संस्थांनाही मदतीचे आवाहन कराल याची खात्री बाळगतो.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीही मदत स्विकारण्याची सोय करण्यात आली आहे.
सुभाष इनामदार,
( सांस्कृतिक पुणे करिता)
www.culturalpune.blogspot.com
9552596276

Saturday, January 14, 2012

हृषीकेश बोडस-गंधर्व गायकीची मोहक छाप

शनिवारी संध्याकाळी( शनिवार १४ जानेवारी २०१२) पुण्यातल्या भारत गायन समाज या शताब्दी पाहिलेल्या वास्तूत मिरजेचा गायक कलावंत हृषीकेश बोडस जेव्हा छोटा गंधर्वांच्या नटखट सौंदर्यपूर्ण पध्दतीने सौभद्र या संगीत नाटकातले `लाल शोलजोडी जरतारी` हे पद रंगवत होता तेव्हा भारत गायन समाजात स्मृतीत गेलेले थोर गायक नट, साथीदारही त्यांचे गाणे एकूण तृत्प मनाने या गुणी गायकाला आशीर्वादच देत असतील.....
खरेच आजची ती संध्याकाळ उपस्थित संगीत रसिकांसाठी वेगळी आठवण जपली जाणारी होती. मिरजेचा गायक अतिशय जिद्दीने आणि मनापासून सुरांना कुरवाळत आपल्या गायनात रंग भरत होता. स्वरराज छोटा गंधर्व, तात्यासाहेब पित्रे आणि संस्थेच्या एक देणगीदार शांताबाई अण्णेगीरी यांच्या स्मरणार्थ हा गायनाचा जलसा आयोजित केला होता.
आरंभी मुलतानी रागाच्या विविध आलापींनी बोडसांनी गाणे खुलविले..आपल्या लयादार आदाकारीच्या सुरेल फिरतीमधून गळ्याची गोड जात सर्वपरिचित होऊन गेली.. आणि मग स्वरांशी आणि लयींशी खेळत आपला राग डौलदार पध्दतीने सादर करुन त्यांनी श्रोत्याकडून दाद मिळविली.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनितीबाई खाडीलकर यांच्या हस्ते कलावंतांचा आणि साथीदार राजीव परांजपे( हार्मोनियम) आणि तबला साथीला बसलेले संस्थेचे कार्यवाह विद्यानंद देशपांडे यांचा सन्मान केला गेला.
`या नव नवल नयनोत्सवा` आणि छोटा गंधर्वांनी गायलेल्या अभंगाच्या रचनेतून गंधर्व गायकीची मोहक छाप त्यांनी रसिकांच्या मनावर कोरुन दाखविली.
एकूणच पुण्यात अनेक ठिकाणी अनेक गायकांच्या मैफली झडत असतात...पण ही ह्षीकेश बोडसांची गायनाची रंगत काही वेगळी आणि लडीवाळ पणाने स्वरांना कुरवाळत बहारदार सादर होत होती.
मला तर बुवा त्यांच्यातल्या कृष्णाच्या रुपाने एकेकाळी मोहवून टाकले होते...आजही सौभद्र आठवले की त्यांनी केलेला कृष्ण आणि वर्षा खाडीलकर (आता भावे) यांनी सादर केलेली रुक्मीणी आजही लक्षात रहाते.

सुभाष इनामदार,पुणे

Friday, January 13, 2012

उदयन काळे- आठवणीतील साठवण

उदयन काळे या संगीत रंगभूमिवरच्या उमद्या गायक अभिनेत्याचे ३० डिसेंबरला पुण्यात अचानक निधन झाले. त्याला श्रध्दांजली म्हणून रविवारी..१५ जानेवारीला `संगीत सौभद्र ` या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही शब्दांजली....संगीत रंगभूमीवर पहिली एंट्री `संगीत शाकुंतल` या नाटकात दुष्यंताची घेताना मनात धाकधुक होत होती. तरीही आपल्या आवाजात गायलेल्या पदांनी त्याने रसिकांना मोहवून टाकले. साथीला शकुंतलेच्या भूमिकेत होती..क्षमा वैद्य. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या त्या रंगभूमीवर नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे तालमी घेत. बाबूराव त्या पौराणीक कथानकातला नेमके भाव येण्यासाठी संवाद घटवून घेत. पण पहिल्यांदाच पाऊल टाकलेल्या उदयन काळे यांना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने ती घेतलीही...पुढे तीच मेहनत कामी आली. .अनेक नाटकातून त्यांने विविध संगीत भूमिकांना न्याय दिला.

आज जेव्हा वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने मन गलबलून उठते. आठवणी येतात त्या त्याच्यासोबत `शांकुतल` नाटकात काम करताना घालविल्या दिवसांच्या.

दिसायला गोरा-गोमटा...गोल चेहरा..कोकणातून आल्याने आवाजात ती कोकणस्थी खास शैली.. त्यातही नाजुकता... पाठांतराला थोडे कष्टही पडत... फारसे गंभीर न होता जेवढे जमेल तेवढे मनापासून करण्याचा त्याचा स्वभाव...मात्र एक नक्की...तो गायला लागला की सुरांशी एकरूप झालेला आवाज..अभिनयाकडे कमी पडल्याचे मग कुणालाच जाणवित नसे..अगदी स्पर्धतही ...नाटकाला प्रथम तर उदयनला वैयक्तिक रोप्यपदक जाहिर झाले. एका त्या शाकुंतल नाटकाने उदयन काळे हे नाव पुण्यतल्या आणि संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात ओळखू यायला लागले.

तसा हळवा आणि काहीसा लाजरा त्याचा स्वभाव...बोलायलाही मितभाषी आणि मृदु. काही काळ तो बिबवेवाडीतल्या त्याच्या भावाच्या घरी तो रहात...तेव्हा मी जात असे...चंद्रकांत काळे उदयनचा थोरला भाऊ. बेतास-बात शिक्षण घेतल्यामुळे थोडा आत्मविश्वास कमी पडायचा...तरीही त्यांने जिद्द सोडली नाही...संगीतातल्या लयकारी आणि गाणे नटविण्याची त्याची शैली त्याला पुढे अनेक भुमिका मिळविण्यासाठी उपयोगी पडली. काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकींकडे संगीताचे शिक्षण त्याने घेतले.


`लावणी भुलली अभंगाला` मधल्या वेगळ्या भूमिकेने त्याला एक वेगळा रसिक मिळाला. यातली `निळोबाची` भूमिका त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोगांमध्ये केली . जीवनात स्थेर्य आले...मात्र नट म्हणून करीयर घडविण्याचा मनसुबा काही त्याला पूर्ण करता आला नाही.

अखेरीस `आकाशवाणी`च्या दप्तरी `तंबोरा वादक` म्हणून तो चाकरी करु लागला. आणि संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली..नव्हे ती त्याच्याकडे चालून आली.. . शिलेदार कुटुंबीयांच्या "मराठी रंगभूमीद्वारे' त्यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. . संगीत सौभद्र व स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्सगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्वीनशेठ हे काही वानगीदाखल सांगता येईल.

तसा सन्मान आणि कीर्ती फारशी नव्हे अपुरीच मिळाली..मा. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेला नाट्य परिषदेचा आणि छोटा गंधर्व यांच्या नावाने कोरेगाव (सातारा) इथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार उदयन यांना मिळाला..
ऐन उमदीच्या काळात अचानक त्याचे या जगातून नाहीसे होणे ही सर्वांच्या दृष्टीने धक्कादायक घटना.. त्याच्या जाण्याने संगीत नाटकात रुपाने देखणा आणि पदांना खुलविणारा एक मनमोकळा दिलदार अभिनेता नाहिसा झाला....त्याच्या कुटुंबियांना बळ आणि भविष्यकाळासाठी यथायोग्य शक्ती मिळावी हिच मनोकामना......त्याची स्मृती रसिकांच्या ठायी सदैव रहावी हिच अपेक्षा..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

`या गोल गोल डब्यातला`

वृध्दांसाठी दिशादर्शविणारावृध्दांनी केलेल्या कष्टाची जाणीव न ठेवता तरुण मुलगा जेव्हा त्यांना न विचारता . त्यांच्याकडे न लक्ष देता स्वतःला वाटेल तसे जगत रहातात.. त्यात ना स्वतःला आनंद..ना आपल्या आई-वडिलांना समाधान..सारेच आधंतरी... मग त्यांनी मुलाकडे रितसर कोर्टाकडून पोटगी घेऊन स्वतंत्र व्हावे काय?

कितीतरी प्रश्न..वृध्द आणि तरुण पिढीतला संघर्ष दाखविणारा तुमच्या घरचा चष्माच वाटावा असा चित्रपट २० जानेवारी पासून येतोय.


चित्रपटातली भूमिका वेगळ्या बाजाची आहे.. माझ्या संवादातून अशोक सराफ डोकावेल..पण थोडा गंभीरतेकडे झुकणारी भूमिका...जरा वेगळा रोल...म्हणून मी या चित्रपटाकडे पहातोय..असे अशोक सराफ सांगतात.

त्यांची पत्नी झालेल्या स्मिता तळवलकरांना आई-वडिलांचे करियरच अमान्य करणारा..आणि मुलाचीही घुसमट दाखविणारा हा चित्रपट ..आणि ही वेगळी कलाकृती वाटते...तर असा रोल मी यापूर्वी केलाच नव्हता असे त्या सांगतात.


संतोष जुवेकर यांना या दोन दिग्गज कलावंतासमवेत भूमिका करण्याचे भाग्य लाभल्याचा अधिक आनंद होतो आहे.. आत्तापर्यंतच्या चित्रपटांतल्या भूमिकांपेक्षा वेगळा टाईपबाज कॅरेक्टर न करता स्वतःला सिध्द करणारी भूमिका करायला मिळाली असा वेगळा हा चित्रपट आणि आज्या तरुण पिढीचे नेतृत्व करायला मिळाल्याचे समाधान वाटतेय..
एकूणच स्मिता तळवलकर सांगतात त्याप्रमाणे आज आई-वडिलांया मुलांशी संवादच हरविला आहे...हे स्पष्टपणे दाखविणारा आजच्या काळाशी सुसंगत चित्रपट आहे.

गोवोगावी फिरून मुलांना डबड्यातला चित्रपट दाखविणारा बजाबा या चित्रपटातून प्रथम मराठी पडद्यावर नायक होतोय..हे वेगळेपण...

आसित रेडीज यांची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन...सारेच..ते याबाबत फारच समाधानी आहेत. हा प्रश्न घेऊन ते आलेत. अशोक सराफ असल्यामुळे यात मनोरंजन तर नक्की मिलेल..पण वेगळ्या बाजाची ही कथा तुम्हाला स्वतःकडे पहायला लाविल असा विश्वास वाटतो. मुख्य तीन कलाकारांशिवाय स्मिता शेवाळे, आसालता वाबगावकर, विजय चव्हाण, आकांक्षा ठाकूर या कलावंताच्या यात भूमिका आहेत.

रिध्दी एन्टरटेन्मेंटची ही निर्मिती सतीश चंद्र यांनी संगीत दिले आहे. समीर आठल्ये यांचे छांयांकन आहे तर राजेश राव यांचे संकलक आहेत...आता उत्सुकता आहे ती पर्त्यक्ष प्रदर्शित होण्याची..

पुण्यातल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती सांगण्यात आला...त्यावरुन चित्रपट वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडणार हे नक्की वाटते.. पाहू..
सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276