व्हायोलीन वादनातले तीन तरबेज शिलेदार एकत्र आले. त्यांनी शास्त्रीय वादनातून आणि नाट्यगीतातून तसेच विविध धून वाजवून मन मोहित करुन तर सोडलेच..पण एक सुरेल वादनाची मंद धुंद आळवत रसिकांना मोहवून टाकले.
पुण्यातल्या भारत गायन समाजात रविवार संध्याकाळ पं. भालचंद्र देव यांनी आपल्या गुरूंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त व्हायोलिन वादनाची मैफल मोठ्या श्रध्दापूर्वक आयोजिली होती. वादन आणि गायनाच्या क्षेत्रातले ते मोठे नाव म्हणजे..पं. गजाननबूवा जोशी.
दरवर्षी ते आपल्या गुरुंच्या स्मृती या माध्यमातून जपतात आणि स्वतः बरोबरच काही व्हायोलीन वादकांना खास आमंत्रित करतात.. याशिवाय आपली कन्या व शिष्या सौ. चारुशीला गोसावी हिच्यासोबत जुगलबंदीची मैफलीही रंगवतात.
सो. निलीमा राडकर या मधुकर गोडसे आणि रमाकांत परांपजे यांच्या शिष्येला आमंत्रित केले होते. त्यांनी आरंभी `चंद्रकंस` वाजविला आणि नंतर `पांडुनृपती जनकजया` हे नाट्यपद वाजवून आपली तयारी रसिकांना सादर केली. व्हायोलीन तर सुरेल होतेच..पण त्यातली खासीयत म्हणजे आपल्या नाजूक स्वरातून त्यांनी वेगळाच स्वरनाद घडविला.
जुगलबंदीच्या बैठकीवरुन पं. भालचंद्र देव आणि सौ. चारुशीला देव यांनी राग `जोग` रंगविला. त्यातली विविध आवर्तने मोहक आणि दाद मिळवून घेणारी होती. अनेक विविध कार्यक्रमातून साथ करणारे हे दोन पिता-कन्या जेव्हा स्वतंत्रपणे व्हायोलीन वादन करतात, तेव्हा त्यांच्या कसदार लयकारीची आणि स्वतंत्र बैठकीची रसिक सहजपणे दाद देताना दिसतात.
श्रीधर पार्सेकर आणि पं. गजाननबूवा जोशी यांच्या गती वाजवून त्यांनी आनंदाचे उधाण आणले. स्वतः तयार केलेली धून पं,. देव यांनी `जनसंमोहिनी` रागातली वाजविली...आपली स्वतंत्र शेली त्यांनी तयार करुन आपला वेगळा ठसा या क्षेत्रावर उमटविल्याचे चित्र स्पष्ट दिसतें.
सौ. चारुशीला गोसावी यांची वादनातली किमया...त्य़ाच तोडीची किंबहुना `बापसे बेटी अधिक`स्वतंत्र आणि शैलीचे विविध कंगोरे सादर करताना...टाळ्याही घेत होती.
दोन नाट्यपदांची झलक या दोन्ही कलावंतांनी दाखवून भैरवीने जुगलबंदीची सांगता केली. या व्हायोलीन वादनाची मोहकता आणि रंजकता वाढली ती रविराज गोसावी यांच्या तबला साथीने... सूत्रसंचालन स्वरबहारचे राजय गोसावी यांनी केले होते.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com