मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा ही नटरंग चित्रपटातली लावणी सध्या सर्व वयोगटाच्या रसिकश्रोत्यांच्या तोंडी आहे. ती लावणी बेलाने गायली आणि तिच्या प्रचंड लोकप्रियतेत आणखी भर पडली.
लहान वयात अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळवून हिंदी, मराठी आणि अन्य भाषातून गाणारी पार्श्वगायिका म्हणून बेला शेंडे हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर केव्हाच पोचले आहे. अर्थात त्यासाठी तिचा असलेला गाण्याचा रियाज नक्कीच महत्वाचा आहे.
बेलाने शास्त्रीय संगीताचे शिक्षण आपल्या आजीकडून, सौ. कुसुम शेंडे यांच्याकडून आणि नंतर मोठी भगिनी ख्यातनाम गायिका सावनी शेंडे-साठ्ये हिच्याकडून घतले आहे. तर उपशास्त्रीय आणि सुगम संगीतातले बहुमोल मार्गदर्शन वडिलांकडून, डॉ. संजीव शेंडे यांच्याकडून मिळालं आहे.
१९९८ मध्ये टी व्ही एस. सारेगमप मध्ये बेलाला प्रथम क्रमांक मिळाला आणि तिथूनच तिने आपली य़शाची शिखरे गाठायला सुरवात केली.
तेरा मेरा साथ रहे, एहसास, पहेली, जोधा अकबर अशा हिंदी चित्रपटांसाठी तिने पार्श्वगायन केले. जोधा अकबर मुळे तिला संगीतकार ए आर. रेहमान यांच्याकडे गायची संधी मिळाली. तर दक्षिणेतल्या इलायराजा यांच्याकडे तामिळ भाषेत तिने अनेक गाणी गायली आहेत.
उत्तरायण ह्या मराठी चित्रपटाबरोबरच सोनसावली, झाले मोकळे आकाश, सारेगमप, शुभंकरोती या मालिकांची शिर्षक गीतेही बेलाने गायली आहेत.
माझ्या मना, हृदयामधले गाणे (डॉ. सलिल कुलकर्णी), पंढरीचा स्वामी (आशुतोष कुलकर्णी), हे तिचे मराठी अल्बम्स प्रसिध्द आहेत.
सपने, कैसा ये जादू या तिच्या हिंदीतल्या अल्बम्सला झीचा पुरस्कार लाभला आहे. अ.भा. सुगम संगीत संमेलन, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन, एलोरा फेस्टिव्हल, हृदयनाथ मंगेशकरांचा भावसरगम, श्रीनिवास खळे संगीत रजनी, नक्षत्रांचे देणे, पुणे फेस्टिव्हल तसेच सोनू निगम, शंकर महादेवन, दलेर मेहंदी यांच्यासमवेत रंगमंचीय कार्यक्रम तिचे चालू असतात.
पहिला नर्गिस दत्त पुरस्कार, पुणेकी आशा पुरस्कार, Pride of Pune 2004, रेडिओ मिरचीचा Best Playback Singer पुरस्कार, नटरंगमधल्या लावण्यांसाठी पुरस्कार, आयफा साठी नामांकन, सह्याद्रिचा महाराष्ट्र संगीतरत्नचे सूत्रसंचालन आणि सध्या ई-मराठीवरील गौरव महाराष्ट्राचाची परीक्षक...अशा अनेक उल्लेखनीय गोष्टी......
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त नटरंगमधल्या लावण्यांसाठी बेला शेंडे यांना झी गौरव, म. टा. सन्मान, व्ही. शांताराम आणि कलागौरव हे पुरस्कार मिळाले आहेत.. शिवाय राज्य पुरस्कारही आहेतच.