महिन्याभरात श्रावण येईल. मुली, महिला आणि नव्याने लग्न झालेल्या नवरीकडे मंगळागौर पूजली जाईल. आणि त्यातल्या भोंडल्यात हे नक्की म्हटले जाईल..
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोंनी मारीतं....
ऐकायला या भोंडल्याच्या ओळी चांगल्या वाटतात. भोंडला म्हणणा-या मुली हासून वेळ मारून नेतात.. पण मला मात्र सासरचा अनुभव अतिशय चांगला मिळाला . म्हणूनच तो शब्दात मांडायचा हा प्रयत्न केला आहे.
मुलगी सासरी आली की, ती सतत ताणतणावाखाली. घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली . मान खाली घालून वावरत असे..पण मला मात्र सासरी आल्यानंतर माहेरची आठवणही होऊ नये इतके प्रेमळ सासू-सास-यांकडून लाभले. आणि मी सतत अस्सं सासर सुरेख बाई ..म्हणत त्या घरात रममाण झाले. माहेरून व्हायोलिन वादनाच्या कलेचे रोप घेऊन आले आणि सासरी त्याचा वटवृक्षात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये..
मुलगी सासरी आली की, त्या घरातल्या रीतीभाती समजून घेऊन, घरातल्या माणसांचे स्वभाव ओळखून त्या घराला समजून घेत हळूहळू त्या घरात रुळते. मी माझी कला घेऊन त्या घरात आले. आणि सर्वांना कलाकार सून मिळाली म्हणून खूप आनंद झाला.
तुम्हाला सागते..माझ्या यजमानांनी तर मला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूनच पसंत केले. मग काय कलाकार बायको मिळल्याच्या त्यांना केवढा अभिमान. तो आजही आहे. ते तर सतत माझ्या पाठीमागे खंबीर उभे असतात. माझे दीर, जाऊ, नणंदा या सर्वांनाही माझ्या कलेचे काय कौतूक केले . ते सारेच माझ्या कलेला नेहमीच देतात आजही...
आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजावून घेऊन, सर्वांच्या आवडी-निवडी जपून सगळे सण, समारंभ, वाढदिवस खूप छान त-हेने साजरे करतो. सासू-सासरे जुन्या वळणाचे असल्यामुळे सुरवातीला थोडे मतभेद झाले. वादही झडले. पण आम्ही आणि त्यांनी दोघांनीही काही गोष्टींशी तडजोड करून त्यातून सुवर्णमध्य काढून पुढे गेलो. कोणत्याही गोष्टी जास्त विकोपाला जाणार नाहीत याची खबरदादारी घेतली. माझी थोरली जाऊ आणि मी तशा एकाच कार्यालयात . म्हणून का म्हणाना आमचे नाते बहिणीसारखे बनले. टिकले. वाढले. कायम राहिले.
माझा कुठेही कार्यक्रम असला तर ही सारी सासरची माणसे कौतूकाने आवर्जून हजर राहतात. दाद देतात. सारी मदत करतात.
आम्हा दोघी सुनांना सासूबाईंनी मुलाप्रमाणेच वागवले. आमच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. आमच्या मुलांनाही त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. त्यामुळेच तर आम्हाला नोकरीसाठी बाहेर पडताना कधीच मुलांची काळजी करावी लागली नाही. मुलांनाही आजी- आजोबांचे प्रेम भरपूर मिळाले. सहवास मिळाला. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले.
आजकाल ब-याच मुलींना एकत्र कुटुंब नको असते पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे मुलींनी नक्कीच पाहिले पाहेजेत.
अशा माझ्या प्रेमळ हौशी, संगीतप्रेमी सास-यांना नुकतीच ११ जूनला देवाज्ञा झाली..पण त्यांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील याची खात्री आहे.
असचं सासर सगळ्या मुलींना मिळावे. त्यांनी ते जपावे. वाढवावे. संस्कार हेच धन पुढच्या पुढीपर्यंत द्यावे यासाठी कसोशिने प्रयत्न करावा...
अखेरीस मी म्हणेन...अस्सं सासर सुरेख बाई...सर्वांना मिळावे.....
सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com