subhash inamdar

subhash inamdar

Saturday, November 12, 2011

मुलाच्या स्मृतिसाठी ...एक आदर्श पुरस्कार


मुलाच्या स्मृतिसाठी ...कलावंतांना पुरस्कार
अनंतरंग आर्ट फौंडेशनचे कला गौरव पुरस्कार आणि त्यामागची भूमिका


रविवारी १३ नोव्हेबरला पुण्यात भारत गायन समाजात असंख्य संगीत श्रोत्यांच्या साक्षीने बालरोगतज्ञ डॉ. प्रमोद जोग यांच्या हस्ते समारंभपूर्वक श्रीपाद भावे आणि सौ. अस्विनी गोखले यांना तो दिला गेला.
प्रथम तो ३०० रुपयांचा. मग ५०० आणि नंतर ७५० रुपयांचा झाला. आणि गेली काही वर्षे तो १००१ रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन वितरीत केला जातो. त्यासाठी काही लोक स्वेच्छेने पैसे देतात..पण न मागता...पण त्यासाठी स्वबळावर तो देण्याची परंपरा भिड़े कुटुंबीय जपत आहे.

या `अनंतरंग आर्ट फौंडेशनचे` कार्यवाह चित्रगुप्त भिड़े सांगतात... पुरस्कारासाठी आम्हीच नावे ठरवितो. काहींचा सल्लाही घेतो. आत्तापर्यं दिल्या गेलेल्या पुरस्कारात मधुवंती दांडेकर, विजय कोपरकर, कै. शरद गोखले, मुकुंदराज गोडबोले, रविंद्र कुलकर्णी, प्रभाकर करंदीकर, अश्विनी भिडे, सानिया पाटणकर, संजीव मेहेंदळे, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे, आनंद भाटे, राजीव परांजपे, सुचेता अवचट, संपदा थिटे ,उदयन् काळे, मानसी खांडेकर, बिल्वा द्रविड अशा अनेक गायक-वादकांचा समावेश आहे.

अनंत भिडे. हे ज्येष्ठ चित्रकला शिक्षक. अनंतरंग आर्ट फौंडेशन यानावानं ते वयाच्या ७७व्या वर्षी आपली कला जपत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होत असतात. आपल्या मिळालेल्या कमाईतला काही वाटा ते आवर्जुन समाजोपयोगी कार्यासाठी दरवर्षी वापरतात. त्यातलाच एक भाग म्हणजे सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या श्री नृसिंह मंदिरात ते गेली दहा वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला ३०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा करतात. यंदा तर त्यांनी पितळी निरांजने विकत घेऊन त्या १५० कायमस्वरुपी प्रकाशांनी मंदिर उजळून निघाले होते.

त्यांचा तिसरा मुलगा जन्मापासूनच मेंदुच्या पक्षघाताने आजारी असायचा. त्याला कुठलाही उपचार नाही. तो उठून बसणेही शक्य नाही. हाताच्या आधाराने बसायचा. मोजकेच अन्न भरवायचे. आई, बाबा, काका आणि आमा एवढेच चार शब्द तो उच्चारु शकायचा. सर्व उपचारानंतर तो जन्मभर तसाच रहाणार. उठणे आणि चालणे शक्य नाही. कधी झटका येईल याची खात्री नाही. त्याही अवस्थेत अनंतराव भिडे आणि त्यांच्या पत्नी यांनी आपली रोजची कामे , नोकरी सांभाळून या मुलाला..त्याचे नाव विश्वजित ...सांभाळले. अगदी २२ वर्षे. बुध्दीत वाढ होणार नाही..म्हणून शाळेत नाव नाही.. केवळ जन्म दाखला..एवढेच... त्या काळात दोघांनी आणि घरातल्या दोन्ही मुलांनी या `विश्वजीत`ला जपले. पेरुगेट भावे हायस्कूल मध्ये चित्रकला शिक्षकाचे काम ध्यासाने केले. विश्वजीतच्या काळात..कुठे सभा-समारंभात जाणे नाही... नाटक, सिनेमा पहायचा नाही. सारा वेळ मुलाच्या पालनपोषणात...घालविला...

विश्वजीतला बोलता..येत नव्हते..मात्र.. क्रिकेटचे वेड अफाट..टीव्हीवरची सगळी मॅच तो पहायाचा..मात्र लंच झाला की तो संतापायचा...भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत त्याला फार प्रिय होते. गाणे बंद झाले की तो अस्वस्थ असायचा..ते संपण्याआधी ते वडिलांना खुणेने सांगायचा..

आयुष्यातली २३ वर्षे..जपल्यानंतर तो १९९७ साली गेला. मात्र तुमचा विश्वास बसणार नाही..गेल्यानंतर महिन्याभराने अनंत भिडे यांच्यासमोर हजर झाला आणि मी दुस-यांकडे उत्तम असल्याचा साक्षात दृष्टांत दिला. भावाला `तुम्ही समारंभाला जाता पण माझे पोटाचे काय? `, असे स्वप्नात विचारले..त्यानंतर रोज सकाळी त्याला वरणःभाताचा नैवैद्य दाखवून मगच आम्ही जेवतो...अनंतराव भिडे सांगत होते..

तो तसा मासाचा गोळाच जणू..पण आमच्याकडे जन्माला आला हे भाग्य..आमच्याकडून सेवा व्हायची होती..म्हणून...त्यांचे नाव कुठेच नाही..केवळ जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यापुरते उरले..त्याचे अस्तित्व आणि नाव जागविण्यासाठी त्याला आवडत असलेल्या संगीतात काम करणा-या कलावंतांना गेली १३ वर्षे त्याच्या नावे पुरस्कार देण्य़ाचे व्रत हे कुटुंबीय करतात. स्वतःच्या पैशातून..हे कायम रहावे यासाठी एक लाख रुपये त्यासाठी डिपॉझिट ठेऊन त्याच्या व्याजातून दरवर्षी दोन कलाकारांना कलागौरव पुरस्कार दिला जातो.

आपल्याकडून समाजासाठी काही करावे यातूनच हा एक वस्तुपाठ अनंत भिडे आणि त्यांचे कुटुंबीय जपत आहेत. आपल्या मुलाचे हाल तर पाहिले..सोसले...त्याला बळ दिले..जगायला दोन हात दिले...आणि तो गेल्यावर त्याचे नाव अशा त-हेने पुरस्कार देऊन समाजासमोर ठेवले..

हा एक आदर्शच आहे..त्यासाठी यात राबणा-या सा-याच हातांचे आभार....


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276