subhash inamdar
subhash inamdar
Wednesday, March 28, 2012
मृगजळाचे बांधकाम करणारे कवी ग्रेस
ग्रेस कुणाला कळले आणि कुणाला कळले नाहीत या युक्तिवादात आता तसा काहीच अर्थ उरलेला नाही. कारण हा संध्यासूक्ताचा यात्रिक आता आपल्यातून कायमचा निघून गेलेला आहे. तो निघून गेला आहे महानिर्वाणाच्या दिशेकडे. त्यांच्यावर दुर्बोधतेचा शिक्का मारणार्या अनेकांचे डोळे ते गेल्याने भरून आलेले असतील. ते मान्य करण्यासाठी सुद्धा दिलदारी लागते.
ग्रेस यांची कविता मला एक दिवस सहज भेटली. त्या कवितेतला आपल्याला कळलेला अर्थ आणि त्यातील गर्भितार्थ यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्यानंतर हळूहळू जाणवत गेलं. कविता कुठलीही असू दे, त्यातील गूढरम्यता, भावविश्वता आपण कल्पनाही करू शकणार नाही आणि सहसा तिथवर पोचू शकणार नाही अशा अमर्त्य भावविश्वाचं दर्शन घडवते.
हृदय कोरून बाहेर काढावं, त्याचे ठोके आपल्या समोर पडतांना पहावेत आणि आपण जिवंत आहोत का निवर्तलोय या असल्या संभ्रमात आपण पडावं असं काहीसं देखणं, मोहून टाकणारं, बर्याकच अंशी ठाव न लागणारं किंबहूना ठाव न लागु देणारं लेखन हे खूप आतूनच उमटावं लागतं. म्हणजे...
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
नभातूनही मंद तार्यावप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा
ही कविता असू दे किंवा
देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पार
घुबडाच्या डोळ्यालाही कारूण्याची धार
ही असू दे, त्यातील गांभीर्य आणि भावानुभुती हा केवळ अनुभव नाही. तो साक्षात्कार आहे. अनुभव शिळे होतात, साक्षात्कार नव्हेत.
अगदी त्यांच्या मृगजळाचे बांधकाम या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत सुद्धा ग्रेस म्हणतात...
संध्यामायेच्या शुभमकरोती ओंजळीतून सांडताना
तू अचानक, अवाक होऊन,
दरदरून थरथरलीस... मला प्रयाणाची दिशा दाखवीत...
तू थांबली असतीस तर या मृगजळात
एखादा रंगीत मासा तरंगू शकला असता...
तिरीप एकदा बुबुळात शिरली की मग ती
अश्रूंच्या आदेशानेही पापण्यातून खाली
सांडतच नाही; या सबब, शरमेवर तू नाही
थांबलीस !
पण मला तर हे बांधकाम, तुझ्याच निर्मितिसत्त्वाचे
शील म्हणून करणे भाग पडलेय ना ?
तेव्हा हे मृगजळाचे बांधकाम, मी तुलाच
अर्पण करतोय.
अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पणही
यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ
असतात काय ? संभवतात काय?
माझ्या मते भाषेनी बहाल केलेली चौकट बर्या च वेळेला वर्तुळाकार असते. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं कौशल्य स्वतःला अभिमन्यू समजणार्याट बर्यायच साहित्यिकांकडे नसतं. तीच करामत या भाषेच्या जादूगाराने करून दाखविली. वेदनेला केवळ दु:ख समजणार्याि महाभागांना ग्रेसची कविता समजायची नाही. अ़ज्ञाताच्या तळाशी बुडी मारण्यासाठी साहस लागतं. मनस्वीता लागते.
पुन्हा कवितेचं गाणं झालं, तरी गाणं त्यातील कवितेसाठी आणि त्यातील वेदनेच्या पुनःप्रत्ययासाठी ऐकलं जाणं यात शब्दकाराचा विजय आहे. तो विजय आहे या अश्वत्थाम्याच्या चिरंतन जखमेचा वारसा लाभलेल्या सांध्यमग्न पुरूषाचा. ग्रेस जिंकले. मृत्युंजय ठरले ते त्या अर्थीसुद्धा.
ग्रेस म्हणजे एक गूढ. एखाद्या शापीत देवाच्या टेकडीवरील, वार्याववर किंचितही न हलणार्याा एका पोक्त, अनासक्त वडाच्या झाडाच्या बुंध्याच्या ढोलीत कुणीतरी ओलेती दिवा लावून जाते तसं काहीसं!
-केदार केसकर
keskarkedar@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)