subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 14, 2013

संतूरचे सूर माधुर्य



 संतूरचे सूर माधुर्य हे कायमच प्रत्येकालाच मोहोळ घालतात. मात्र, याला प्रयोगांची जोड व वैविध्याचे नावीन्य हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरले. पंडित उल्हास बापट यांनी संतूर या वाद्याच्या र्मयादा असूनही  त्यावर मात करून, नव्या रागांचीही निर्मिती केली आहे.
 यंदा १४ वर्षांनंतर या स्वरमंचावर संतूर वादनाची किमया त्यांनी रसिकांना दाखविली. राग पूर्वा कल्याणने त्यांनी वादनाला सुरुवात केली. वातावरणात प्रसन्नतेची लहर पसरवत त्यांनी आलाप सादर केला. जो, झाला यानंत विलंबित झपतालातील रचना सादर करत त्यांनी सुरांची बरसात केली. त्यानंतर दृत तीनतालातील रचना सादर केली.


 'क्रोमॅटिक ट्युनिंग' याविषयी रसिकांना समजवताना ते म्हणाले, ''१२ स्वर संतूरवर असले, तरी जो राग वाजवायचा तो सतत ट्यून करावा लागतो. परंतु, क्रोमॅटिक ट्युनिंगमध्ये १२ स्वर ट्यून करून, त्यानुसार ते वाजविण्यात येतात. म्हणजे प्रत्येकवेळी ट्यून करण्याची वेळ येत नाही. अत्यंत सतर्क राहून चुकून दुसरा स्वर वाजू नये याची काळजी घ्यावी लागते.'' हे त्यांनी विविध रागांची सरगम वाजवून सहोदारण समजून सांगितले.
आसमंतात भरून राहणारी वैशिष्ट्यपूर्ण मिंड ही त्यांच्या वादनाची खासियत. यासाठी वेगळी स्टीक व तंत्र त्यांनी विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या वादनाच्या वैविध्याचा अजून एक नमुना दाखवत मिश्रकाफी रागातील टप्पा त्यांनी सादर केला. 'आम्ही केवळ सूर व तालाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. शब्द फक्त दिलेला पाळतो.' असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी सुरांचा एक अनमोल नजराणा त्यांनी पेश केला. त्यानंतर 'देवा घरचे ज्ञात कुणाला' हे नाट्यपद सादर करून एक सुखद धक्का देणारा आविष्कार सादर करून त्यांनी मैफलीचा समारोप केला.
त्यांना रामदास पळसुले (तबला), गौरी लिमये (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

गदीमांच्या पायवाटेवरून चालण्याचा प्रयत्न



हजारो जणांच्या मनावर राज्य करतो तो खरा कवी. गदिमा तसे होते. त्यांनी कविता आणि गाण्यातील अंतर मिटवले आणि लोकसाहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली, हे त्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्यासारखे लिहिणे कठीण असले, तरी त्यांनी निर्माण केलेल्या पायवाटेवरून मी आणि माझ्यासारखे कवी चालायचा प्रयत्न करीत आहोत,अशा भावना ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी व्यक्त केल्या.
'गदिमा प्रतिष्ठान'तर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे आज महानोर यांच्या हस्ते वितरण झाले, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे यांना गदिमा पुरस्कार देण्यात आला, तर 'गृहिणी -सखी-सचिव पुरस्कार' मधुरा जसराज यांना प्रदान करण्यात आला. कवी आणि लेखक गुरू ठाकूर यांना 'चैत्रबन पुरस्कार', तर गायिका विभावरी आपटे-जोशी हिला 'विद्या-प्रज्ञा पुरस्काराने' गौरवण्यात आले. मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल कवलापूरचा प्रतीक फाळके यालाही गदिमा पारितोषिक देण्यात आले.

महानोर म्हणाले, ''गदिमा जातिवंत शेतकरी, अतिशय प्रतिभावान पण साधा माणूस होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत जसे आणि जितके काम केले, तसे करणारे फार कमी असतील. लावणीला खरी प्रतिष्ठा त्यांनी दिली.'' आपली आणि माडगूळकरांची पहिली भेट ६८मध्ये मराठवाडा साहित्य संमेलनात झाली, त्या वेळी आपल्यासारख्या नवोदित कवीला प्रोत्साहन दिल्याच्या आठवणी महानोर यांनी जागवल्या. 

इंद्राणी मुखर्जी


बनारस घराण्याच्या युवा गायिका इंद्राणी मुखर्जी यांनी  रसिकांना अभिवादन करून राग यमनने त्यांनी गायनाला सुरुवात केली.
खडा आवाज, सुरांमधील स्पष्टता आणि आर्तता यंमुळे त्यांनी सुरुवातीच्या काही वेळातच मैफल जिंकली. आलाप आणि तानांवरील प्रभुत्व दर वेळी रसिकांच्या 'वाहऽऽवा'चे मानकरी ठरले.
'मोरी नय्या पार करा..' या बंदिशीसह त्यांनी रागाचा विस्तार करून वातावरणनिर्मिती केली. 'गणपती गजानन देवा..' या बंदिशीद्वारे सुरांवरील पकड सिद्ध करीत वातावरणात पवित्रता भरली. त्यानंतर पेश केलेला दादरा 'हमसे ना बोलो..' यातील हरकती व मुरक्यांचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

 रसिकांच्या आग्रहाला मान देत लोकभाषेतील पूर्वी दादरा 'हमे ना भावे यारीरे सावरिया..' सादर करून त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला.
त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), पंडित रामदास पळसुले (तबला), आभा पुरोहित व नीला वैद्य (तानपुरा) यांनी साथसंगत केली.