subhash inamdar

subhash inamdar

Friday, October 28, 2011

पुणेकर न्हाले स्वरांच्या नादात

दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज या दिवशी पुणे शहरात अनेक ठिकाणी 'दिवाळी पहाट'चे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी झालेल्या संगीत, नृत्य यांच्या रंगारंग कार्यक्रमाला रसिकांनी अतिशय उत्साहाने प्रतिसाद देऊन ते संस्मरणीय केले.

'बाबूजी आणि मी'
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके व श्रीधर फडके या पितापुत्रांतील सांगीतिक प्रवास उलगडणारा 'बाबूजी आणि मी' हा आगळा कार्यक्रम 'रंगयात्रा'चे शिरीष कुलकर्णी यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी या दोघांच्या स्वररचना श्रीधर फडके आणि शिल्पा पुणतांबेकर यांनी सादर केल्या. त्यांना सचिन जांभेकर, केदार परांजपे आदींनी वाद्यांची साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

नवा सण नवा प्रकाश, नव्या या दिवशी उजळू दे आकाश, नवी चाहूल नवी आशा, प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा, असा शुभेच्छा संदेश पं. जसराज व माधुरी जसराज यांनी पुणेकरांना दिला.

'स्वरनूपुर'ला उत्साही प्रतिसाद
युवराज शहा, महावीर जैन विद्यालय आणि सॅटर्डे क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या 'स्वरनूपुर' या पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. गोवर्धन दूध यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.
स्वरनूपुरचे केतन गोडबोले, प्राची ओक यांनी गणेशवंदनेने कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर त्याची रंगत वाढतच गेली. त्याच्या मेणबत्ती नृत्याला सर्वांत जास्त प्रतिसाद मिळाला.

सारसबागेत नेत्रदीपक दीपप्रज्वलन

दिवाळीचा पाडवा आणि नववर्षानिमित्त सारसबागेत नागरिक, सारसबाग मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच विविध संघटना यांनी 'दीपोत्सव' साजरा केला. पहाटे ४पासून सारसबागेत हजारो नागरिक जमले होते. आकर्षक रांगोळ्या आणि आकाशकंदील यांमुळे हा परिसर उजळून निघाला. सारसबाग मित्र मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या 'दीपोत्सवा'चे हे १६वे वर्ष होते.
सचिन वठारे ग्रुप, वंदेमातरम कबड्डी संघ, कलाअकादमी ग्रीनरी सीकर्स, पुणे एव्हरेस्ट, विश्‍व प्रतिष्ठान, वुई फॉर एव्हरीवन या संघटनांतर्फे सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या.

हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजक अनिल गेलडा, सारसबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष अँड. एन. डी. पाटील, कार्यवाहक अँड. शिरीष शिंदे, राणी गावडे, माधवराव चिरमे, पल्लवी जाधव, कल्पना रावळ, पोपट ओस्तवाल, शिवाजीराव भागवत, दिलीप तातुसकर, नितीन काकडे, शिवाजीराव डावळकर, दिलीप रायसोनी, अजित लुणावत, सुलक्षणा नाईक यांनी प्रयत्न केले.

राणी लक्ष्मीबाई उद्यानात संगीत समारंभ

सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई उद्यानात 'दिवाळी पहाट' साजरी करण्यात आली. सुनीता गोकर्ण, श्रीकांत कुलकर्णी आणि नरेंद्र डोळे यांनी या वेळी सुरेल गाणी सादर केली. त्यांनी भाव-भक्तिगीते, भजने ते लावणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली. त्यांना रेवती समुद्र, अभिजित जायदे आदींनी वाद्यांची साथ केली. ज्योती घोडके यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, वा. हे. कुमठे, कैलासराव कोद्रे, महेश देशपांडे आदी उपस्थित होते.

अरण्येश्‍वर मंदिरात भावगीते

अरण्येश्‍वर मंदिराच्या परिसरात वॉर्ड ६७च्या वतीने भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर, सिंधूताई सपकाळ, उल्हास पवार, राजेंद्र ढुमे, अशोक तावरे, जांभोरकरगुरुजी यांच्या हस्ते महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी महिलांना साड्यावाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, मंजूषा गोडसे उपस्थित होत्या. नीला व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


कस्तुरी पायगुडेंचा 'दीपस्वर'

निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहातली 'सांस्कृतिक पुणे'च्या सुभाष इनामदार यांनी आयोजलेली 'दिवाळी पहाट' कस्तुरी पायगुडे-राणे यांच्या अहिर-भैरव स्वरांच्या आवर्तनाने रंगत गेली.
कस्तुरी या प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम,भक्तिगीतेही त्या तेवढय़ाच तयारीने सादर करतात. नुकताच त्यांचा 'मी प्रेमिका' हा अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
या कार्यक्रमात त्यांनी 'रसिया म्हरो' ही बंदिश सादर केली. त्यानंतर 'बेग बेगा आओ मंदिर'द्वारे आपल्या आवाजाचा उत्तम आविष्कार सादर केला. शास्त्रीय गायनानंतर त्यांनी निगरुणी भजने सादर केली. 'अवघारंग एकचि झाला'ने त्यांनी मैफिलीची समाप्ती केली.
त्याना हार्मोनियमची साथ स्वानंद कुलकर्णी यांनी, तर तबल्याची साथ गणेश तानवडे यांनी केली. तंबोरा साथीला कल्याणी शेटे, आभा पुरोहित होत्या. सुभाष इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी 'रंगतरंग' या दिवाळी अंकाचे प्रकाशन रवी चौधरी यांच्या हस्ते झाले.

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=42&querypage=8&boxid=25846398&parentid=4485&eddate=10/29/2011