subhash inamdar

subhash inamdar

Thursday, June 28, 2012

संगीतविषयक 'मिंड' या इंग्रजी ई-मॅगझिनचा उपक्रम


नाट्यसंगीताला 'लाइव्ह म्युझिक ट्रॅक'ची जोड देऊन अभिनव प्रयोग करणाऱ्या युवा संगीतकार गंधार संगोरामने आता जागतिक संगीतविषयक 'मिंड' या इंग्रजी ई-मॅगझिनचा उपक्रम हाती घेतला आहे. या मॅगझिनचा पहिला अंक जुलैमध्ये सादर केला जाणार असून, दर महिन्याला हे मॅगझिन ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध होणार आहे. भारतीय संगीताबरोबरच जागतिक स्तरावरील संगीतक्षेत्रामध्ये होणारे प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

सध्याच्या तरुणाईला भारतीय संगीताबद्दल जगभरातील संगीताबद्दलही तितकेच आकर्षण असून, संगीतामध्ये होत असणारे प्रयोग, बदलते तंत्रज्ञान, नवे संगीतकार, त्यांच्या रचना आदींबाबत तरुणाईमध्ये कुतुहल आहे. या सगळ्याबद्दल दजेर्दार माहिती देऊ शकेल असे मॅगझिन आपल्याकडे उपलब्ध नाही, ही उणीव लक्षात घेऊन गंधार संगोरामने ई-मॅगझिनचा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाविषयी-

भारतामध्ये संपूर्णपणे जागतिक संगीताला वाहिलेले एकही मॅगझिन उपलब्ध नाही. बऱ्याच मॅगझिन्समध्ये संगीतकारांविषयी, वादकांविषयीची माहिती असते; मात्र संगीताविषयी गांभीर्याने कोणीच बोलत नाही. एका अर्थाने उत्तम दर्जाच्या संगीत समीक्षेची उणीव आहे. तरुण कलाकारांना जागतिक स्तरावरील संगीताविषयी नक्कीच कुतुहल आहे, त्या स्तरावरील संगीताविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे; मात्र त्याबाबत परिपूर्ण माहिती मिळत नाही. या मॅगझिनमधून संगीतकार, वादक, तंत्रज्ञान, सांगीतिक प्रयोगांबरोबरच त्याच्या दर्जाविषयी विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Thursday, June 21, 2012

जरा विसावू या वळणावर!

वारसा निर्माण करणारी कलावंत जोडी...

संसाराच्या सारीपटावर दोन सोंगट्या एकाच रुळावर धावताहेत...आजही रेल्वे धडधडतीच आहे..पण त्याचा फोन प्रवास आता थांबलाय! सुमारे ३८ वर्षांचा बीएसएनएल मधला नोकरीतला प्रवास आता अशोक अवचट याने थांबवला आहे.. तो होतोय निवृत्त !

...नाटकातला हा गद्य नट आणि ती संगीत कलेत निपुण आणि नाटकात सुरेल काम करणारी..दोघे पडले प्रेमात...हातात हात आले...एका छत्राखाली पती-पत्नी झाले...आता तो नोकरीतून अलिप्त झाला..आणि तिने त्याच्या या प्रवासासाठी शुभेच्छा चिंतून त्याला `जरा विसावू या वळणावर.` .हे गीत म्हणून त्याने केलेल्या कामाचे दिव्य स्वरुप दाखवून संसाराच्या सारीपटावर..झालेल्या अनेक वाद-संवादाची आठवण करून दिली..आणि पुढच्या वाटचीलीतही मी बरोबर आहे....हे सांगत `प्रेम सेवा शरण..`म्हणूत भारतीय संस्कृती प्रमाणे पुढेही एकत्र चालण्याचे वचन दिले..तेही संगीतामधून....

गेले काही दिवस भरत नाट्यमंदिराच्या बोर्डवर एका कार्यक्रमाची पाटी झळकत होती...२१ जून संध्या, ६ वाजता..सौ. सुचेता अवचट आणि अभिषेक अवचट यांचा संगीतमय कार्यक्रम `या वळणावर..`.

गुरुवारी प्रत्यक्ष तो काय आहे हे पाहल्यावर प्रचिती आली की अशोक अवचट या आमच्या मित्राच्या निवृती निमित्त त्याच्या पत्नीने म्हणजे सुचेताने त्याला ही या वळणावर ही स्वरमयी भेट देण्याचा घाट घातला आहे...किती सुंदर...

कलावंत हे दांपत्य...एक जण लग्नाची बेडी, तो मी नव्हेच, एकच प्याला या नाटकात हजारो प्रयोग करत करत नोकरी केली. आता त्याच्या निवृत्तीची घोषणा झाली..त्याला आपल्या संगीतातून तिने हे सुरेल नजराणा बहाल केला....मानापमान, कट्यार, सुवर्णतुला, सौभद्र अशा नाटकातून तिने यापूर्वी संगीत अभिनेत्रीच्या भूमिका केल्या...स्वरराज छोटा गंधर्व आणि. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे नाच्यसंगीताची रितसर तालीम घेतली. तिचे नाट्य संगीतातले सादरी करण ऐकणे आणि यांचा मुलगा अभिषेक याने ही कला पुढे नेण्याचे दिलेले गीतांच्य़ामाध्यमातून वचन..हे सारे वेगळे आणि भारावणारे होते.

`घननिळा लडविळा `ने सुरवात करुन सुचेता अवचट...एकेक गीते सादर करत होती...फक्त अशोकने आरंभी हा कार्यक्रम का करित आहे याची माहिती दिली..आणि पुढे सारा सुरेल आविष्कार आपल्या भाऊक आणि लजिवाळ आणि धारदार तेजःपुंज आवाजॉत सादर केला तो सुचेताने..

भक्तिगीतातून सुरवात करुन, सुगम संगीत, भावसंगीत, गझल, ठुमरी, चित्रपट गीते आणि नाट्यगीतातून या वळणावर...आपल्या पतीच्या चरणी समर्पित केला....एका सुंदर कल्पनेचा हा भावाविष्कार शब्दातून सांधला तो रविंद्र खरे यांनी. आणि यासाठी तबला साथ दिली ती प्रसाद जोशी यांनी तर हार्मोनियमवर आपल्या कौशल्यमयी बोटाची किमया दाखवून कार्यक्रमाला बहार आणली ती सचिन जांभेकर यांनी...अगा वैकुंठीच्या राणा. हो भक्तीगीत..याद पिया की आये..ही ठुमरी...प्रेम सेवा शरण म्हणत अवघा रंग एकची झाला या भैरवीने सुचेता अवचट यांनी खरच रसिकांना फुलविले..स्वरांनी तृप्त केले..
.
कलेची सेवा करीत नोकरी करणे ही काळाची गरज..पण त्यातली कलासेवा फुलवून ती जपत तो वारसा पुढे नेणारे हे अवचट दांपत्य... आपल्या अशा कार्यक्रमातून वेगळे भासविले..एक वेगळा पायंडा पाडत एक आदर्शही घालून दिला...त्यांच्या या शुभघडीला आमचाही मुजरा.....!

अशोकच्या निवृत्तीनंतरच्या कलाप्रवासाला शुभेच्छा !सुभाष इनामदार,पुणे

Sunday, June 17, 2012

व्हायोलीन वादकांनी केली सुरेल उधळण!

उगाच मराठी माणसांबद्दल अफवा पसरवितात...दोन मराठी मंडळी एकत्र येत नाहीत..त्यांच्या संस्थेत फाटाफूट होते...प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघांचे नाट्यक्षेत्रातले उदाहरण देतात...पण पुण्यात असा एक व्हायोलीन वादकांचा ग्रुप आहे...तो दोघांनी सुरु केला ( संजय चांदेकर आणि अभय आगाशे) आता गेली पाच वर्षे त्यात दोन नविन मराठी व्हायोलीन वादकांची (चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर) भर पडून आता ते चौघे कलावंत दरवर्षी जागतिक व्हायोलीन दिन सादरा करतात....रसिकप्रिय व्हिओलिना ! कालच त्यांचा कार्यक्रमही अप्रतिम रंगला..पुणेकरांची साथही तेवढी जोरदार होती...पावसाची साथ मिळाली तरीही..हे हे वेगळे...बाहेर पावसाच्या सरी कोसळताना पहाताय..कावळे..फिरताहेत..कोकिळा कूजन करताहेत...आणि आतल्या तशा ओपन वाटाव्या अशा निवारा सभागृहात व्हायोलीन वादक आपली मैफल सादर करताहेत..किती वेगळा आणि आनंददायी अनुभव होता तो !

एक व्हायोलीन वाजत असले तर किती सुरेलता प्रकटते..इथे तर चार वादक एकच गाणे सादर करताहेत...फारच सुंदर..अगदी `गगन सदन` पासून सुरवात करुन..वनिता मंडळ, आकाशवाणी मुंबई केंद्राची धुन आणि या सुरांनो चंद्र व्हा..ही भेरवी आणि त्यानंतर चार वादकांची जुगलबंदीतली एकाग्रता आणि कसब... जेव्हा हे व्हायलीन वादक सुरावट आळवितात..तेव्हा रसिकांची दाद टाळ्यांच्या निनादात सहजी मिळते..

गेली दहा वर्षे हा उपक्रम संजय चांदेकर आणि अभय आगाशे....व्हिओलिना...या ग्रुपव्दारे सादर करताहेत..गेली पाच वर्षे चारुशीला गोसावी आणि निलिमा राडकर यात सहभागही झाला आणि हा सुस्वर झेंडा त्यांनी आपल्या जिद्दीने सर करत नेला आहे..आता त्याला कुठे मुळे फुटायला लागली आहे..यंदा त्याला अनाहत या ट्रस्टची साथ मिळाली.
केवळ व्हायोलीन वादन तर आहेच पण यंदा अनय गाडगीळ आणि विनित तिकोनकर या वादकांच्या सहाय्याने केलेली फ्यूजनची कमालही तेवढीच दाद देण्यासारखी होती..

गाणी किती आणि कोणती यापेक्षाही हा सारा दोन तासांचा अनुभव संगीत सुरात न्हाऊन निघालेला होता..हे महत्वाचे..आज मालिकांच्या आणि पावसाच्या नादात घरातून बाहेर येऊन या वादाकांची वादनशैली अनुभवण्य़ाची गरज पुणेकरांन वाटली.. त्यातच निवारा सारख्या तशा मोकळ्या जागेच्या सभागृहात.. ( कारण इथे डास घोंघावत होते..पावसाचे किडे फिरत होते...त्यातही भर म्ङमून तिनदा प्रकाशही गायब झाला.)

रविराज गोसावी आणि मनोज चांदेकर यांच्या तबला साथीतून नाद घुमत होता...स्वरांना लयदार करीत होता. अविनाश तिकोनकर यांची साथ आणि विनित तिकोनकर यांची पखवाजची साथ रंगत अधिक वाढवित होती... निवेदिकेच्या नवख्या शब्दामधून सतत एफ टी आयच्या रेडीओची जाहिरात होत होती..मधूनच श्रोत्यांना दाते संबोधून निधी देण्याची विनंती केली जात होती. दाते उस्फूर्तपणे देणग्या जाहिर करत होत्या..सारे सुरु होते या व्हायोलीन वादनाच्या मैफलीत...

वन्समोअर घेत आणि टाळत ही हिदी-मराठी गितांची आणि त्यातही नाट्यसंगीताची बरसात श्रोते मनसोक्त अनुभवित होते...

एक सातत्याने केला जाणार उपक्रम असाच सुरु रहावा आणि ह्या व्हायोलीन वादकांनी नवीन सुरावटीतून या वाद्याचे वेगळेपण कायम ठेऊन रसिकांचे मनोरंजन आणि महती वाढवित ठेवावी...

सुभाष इनामदार,पुणे

Tuesday, June 5, 2012

निगर्वी , सात्विक तबलावादक विनायकराव थोरात

तबला वादनाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठलेला कलाकार


मराठी संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सर्व गायक अभिनेता आणि अभिनेत्रींसाठी, मराठी संगीत नाटकाच्या आणि नाट्यसंगीताच्या रसिक प्रेक्षकांसाठी आज एक अतिशय आनंददायक घटना घडली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे बालगंधर्वांच्या जन्मदिनी देण्यात येणाऱ्या "बालगंधर्व पुरस्कार " साठी ज्येष्ठ, श्रेष्ठ

श्रेष्ठ तबलावादक पंडित विनायकराव थोरात यांची एकमताने निवड झाली आहे... येत्या २६ जून २०१२ रोजी, म्हणजेच बालगंधर्वांच्या १२४ व्या जन्मदिनी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे..

सुमारे ५० हून अधिक वर्षे विनायकरावांनी तन-मन-धन विसरून नाट्यसंगीत आणि संगीत नाटकाच्या साथीला वाहून घेतले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरराज छोटा गंधर्व यांना केलेली साथ असो, किंवा कित्येक वर्षे शिलेदारांच्या मराठी रंगभूमीच्या सर्वच संगीत नाटकांना केलेली साथ असो, अनेक थोर गवैय्यांना मैफिलीमध्ये केलेली साथ असो, थोरातांच्या साथीची खरोखर तुलनाच होऊ शकत नाही..

आजच्या पिढीतल्या ज्या तबलजींना संगीत नाटकांची, नाट्यसंगीताची साथ करायची आहे, त्यांनी केवळ आणि केवळ थोरातांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असा हा थोर कलाकार..

सर्वच गायक कलाकारांनी एक गोष्ट सतत ध्यानात ठेवावी की आपलं गाणं रंगणं, खुलणं हे साथीदारांवर अवलंबून असतं.. साथीदारांशिवाय गाण्याला रंगत येत नाही.. म्हणून ५०% गाणं हे साथीदारांच्या संगतीवर अवलंबून असतं.

विनायकरावांची साथ ही कायमच गाण्याला पूरक अशीच राहिली. त्यांनी कधीही गाण्यावर कुरघोडी केली नाही.. गाणं कसं बहरेल याचाच विचार त्यांनी कायम केला. कितीही बुजुर्ग गायक असोत किंवा अगदी माझ्यासारखे छोटे गायक असोत की ज्यांचं संगीत क्षेत्रात आत्ताशी कुठे पाऊल पडतंय, सगळ्यांबरोबर ते तितक्याच तन्मयतेनी साथ करतात..

कधीही मेहनत करायची सोडू नये आणि कधीही कुणा कलाकाराची टिंगल करून उणी दुणी काढू नयेत ही त्यांची आमच्या पिढीला दिलेली शिकवण.

हा माणूस किती मितभाषी आणि मृदुभाषी आहे , हे त्यांच्या सहवासात आलेले सर्व कलाकार जाणतातच. रिकाम्या, फावल्या वेळेत ते केवळ चिंतन आणि चिंतनच करतात.

त्यांच्या ठेक्यातला डौल, आंस ही केवळ शिक्षणामुळे आलेली नाही, तर त्यांनी आपल्या कलेवर जे प्रेम केलं आणि संपूर्ण आयुष्य तबलावादनात झोकून दिलं, त्याचा हा परिणाम आहे. तीनताल, एकताल, रूपक, झपताल हे नेहमीचे प्रचलित ठेके सुद्धा त्यांच्याकडून ऐकणे हा एक विलक्षण आनंद सोहळा असतो. परंतु जे ठेके तितकेसे प्रचलित नाहीत, पण जे नाट्यसंगीतात अनेक ठिकाणी वापरले गेले आहेत ते ठेके ऐकावेत तर केवळ थोरात यांच्याकडूनच. गंधर्व ठेका, पंजाबी, झम्पा, हे ठेके इतक्या सफाईनी वाजवणारे तबलजी आजच्या पिढीमध्ये मिळणे फारच मुश्कील आहे, हे सत्य आहे.. साधा केहरवा, धुमाळी असो, थोरातांकडून तो ऐकताना त्यामध्ये खास "थोरात छाप" ऐकायला मिळते.

असा हा तबला वादनाच्या क्षेत्रात आभाळाची उंची गाठलेला कलाकार , आजही जमिनीवर घट्ट पाय रोवून निगर्वी , सात्विक पणे उभा आहे. यासारखा आदर्श आमच्या पिढीपुढे दुसरा कुठला असणार?

पुणे महानगरपालिकेनी आज या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना किती आनंद झालाय ते शब्दात वर्णन करणे शक्य नाही.

या निमित्तानी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी सदैव राहोत अशी दत्त महाराजांच्या चरणाशी विनम्र प्रार्थना करतो..

-अतुल रविंद्र खांडेकर, पुणे