subhash inamdar

subhash inamdar

Thursday, February 24, 2011

प्रमोद मराठे

गांधर्व महाविद्यालाचे  सर्वेसर्वा प्रमोद मराठे

Born in the family of musicians, he received preliminary lessons in vocal classical music from his father , Pt . Dhundiraj Marathe .
Later he decided to concentrate wholly on harmonium playing. He received harmonium training from Shri Dilip Gosavi of Kalyan. At present he is receiving advance training from Pt Manohar Chimote. He has been accompanying most of the top class artists such as Pt. Bhimsen Joshi , Dr. Prabha Atre , Mrs Malini Rajurkar Mrs Veena Saharabuddhe .Pt Prabhkar Karekar , Mrs Aarti Ankalikar to name a few.
पूर्वी संगीत कलेला समाजात मानाचे स्थान नव्हते. ही कला काही थोडया लोकांपुरतीच मर्यादित होती. त्यावेळी पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी संगीत शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. स्वतःच्या निर्व्यसनी आणि निष्कलंक चारित्र्याने एक आदर्श निर्माण केला. संगीतप्रसारासाठी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांचा अनेक शिष्यांनी गुरुंचा हा वारसा पुढे चालविला. त्यापैकी एक होते विनायकराव पटवर्धन. गुरुंच्या आज्ञेनुसार संगीत रंगभूमीवरची दैदिप्यमान कारकीर्द सोडून शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी पूर्णवेळ वाहून घ्यायचे ठरविले आणि ८ मे १९३२ रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी त्यांनी गांधर्व महाविद्यालय पुणे या संस्थेची स्थापना केली. ती महान परंपरा गांधर्व महाविद्यालयाचे आत्ताचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे चालवित आहेत. 

     प्रमोदजींचा जन्म एका संगीत-अभ्यासक कुटुंबात झाला. वडील श्री. धुंडिराज मराठे हे संगीत प्रवीण होते. जवळ जवळ ५० वर्ष त्यांनी गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले आणि निरपेक्षपणे संगीताची सेवा केली. स्वतः संगीतप्रसाराचे कार्य करीत असताना त्यांनी प्रमोदजीच्या आई कमलताई यांनाही लग्नानंतर विशारद पर्यंतचे शिक्षण दिले आणि आपल्या कार्यात सहभागी करुन घेतले.

      आई-वडिलांकडून आलेला संगीताचा वारसा घेऊन पं. प्रमोद मराठे दोन दशकाहून अधिक काळ कलेच्या सेवेत व्यग्र आहेत. सुरुवातीचे शिक्षण वडीलांकडून घेतल्यावर त्यांनी श्री. दिलीप गोसवी आणि पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे हार्मोनियमचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात १८-१८ तास रियाज त्यांनी केला आणि या संवादिनीवर प्रभुत्व मिळविले.

       हार्मोनियम हे खरं तर पाश्चिमात्य वाद्य पण ते भारतीय संस्कृती मध्ये असं काही रुळलं आहे की इथलेच वाटावे. कुठलीही गायनाची मैफ़ल याच्या साथीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे याचं खरं सार्थ नाव संवादिनी असेच आहे. 

       संगतकाराला साथ करत असताना अनेक गोष्टींचे भान पाळावे लागते. कलाकाराला फ़ुलवणारं वादन त्याच्याकडून अपेक्षित असते. श्री. प्रमोद मराठे हे अतिशय उत्तम संगतकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गंगुबाई हनगळ, डॉ. प्रभा अत्रे, श्री. मालिनी राजूरकर, पं राजन-साजन मिश्रा, पं. प्रभाकर कारेकर, वीणा सहस्त्रबुध्दे, उ. राशिदखान, श्री. आरती अंकलीकर, श्री. संजीव अभ्यंकर, पं. सी. आर. व्यास आदि मान्यवरांना हार्मोनियमची साथ केली आहे. पं. यशवंतबुवा जोशी, पं. बाळासाहेब पूछवाले, पं. के. जी. गिंडे, आणि दिनकर कैकणी यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या कलेची तारीफ़ केली आहे.

        त्यांनी संपूर्ण भारतभर अनेक संगीतमहोत्सवांमध्ये वादन केले आहे. सवाई गंधर्व संगीत समारोह, विविद स्मृती समारोह (पुणे), चतुरंग आणि गुणीदास संगीत समारोह (मुंबई), भारतभवन (भोपाळ), सप्तक मैफ़िल (नागपूर), इंडियन म्युझिक अ‍ॅकॅडमी (मद्रास), भातखंडे कॉलेज (लखनौ) विष्णू दिगंबर जयंती समारोह आणि शंकरलाल समारोह (नवी दिल्ली), तानसेन समारोह (ग्वाल्हेर) हे त्यापैकी काही.

       १९९२ मध्ये माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी पं. प्रमोद मराठे यांना राष्ट्रपतीभवनातील भजन महोत्सवासाठी ३ दिवस विशेष निमंत्रित केले होते.


ई.टी.व्ही., डीडी यासारख्या विविध राष्ट्रीय चॅनेल्स आणि आकाशवाणीवर त्यांनी आपले वादन सादर केले आहे. आजपर्यंत त्यांनी एच.एम.व्ही., टी.सिरीज, रिदम हाऊस, अलूरकर आणि फ़ाउंटन यासारख्या नावाजलेल्या म्युझिक कंपन्यांसाठी ५० पेक्षा जास्त कलाकारांच्याबरोबर १०० च्या वर कॅसेट्स साठी सहवादन केले आहे.

       त्यांनी अनेक मान्यवर कलाकारांसमवेत देशात तसेच परदेशाही कार्यक्र्म केले आहेत. ऑस्ट्रेलिया, दुबई, अबुधाबी, युके, मस्कत, बहारीन, सिंगापूर, हॉंगकॉंग, फ़्रान्स, स्कॉट्लंड, स्विर्झंलंड, अमेरिका, कॅनडा, इटली आणि अफ़गाणिस्तान आदि देशांचा दौरा त्यांनी केला आहे.

       सध्या ते गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषवित आहेत. या ऎतिहासिक संस्थेशी ते १९८२ पासून निगडीत आहेत. गांधर्व महाविद्यालय आणि प्रमोद मराठे हे एक समीकरणच झाले आहे. विद्यालयाला सध्याचे वैभव प्राप्त करुन देण्यामध्ये श्री. मराठे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत विद्यालयात अनेक बदल झाले आहेत. काही वर्षांपूर्वीच विद्यालयाने जुन्या वास्तुतून नव्या वास्तूत पदार्पण केले. सध्या विद्यालयाकडे ५००० स्के. फ़ूट जागा आहे. त्यात एक मोठा हॉल आहे जिथे संगीत समारोह, सभा आयोजित केल्या जातात. याशिवाय ९ वर्ग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरले जातात. विद्यालयाकडे समृध्द अशी लायब्ररी आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना रहाण्यासाठी हॉस्टेल आहे. आज विद्यालयात शास्त्रीय गायन, हार्मोनियम, तबला, सुगम संगीत, कथक, भरतनाट्यम शिकविले जाते. संगीत अलंकार, संगीत प्रवीण पर्यंतच्या अभ्यासक्रमांची तयारी करुन घेतली जाते. आज विद्यालयात ५००हून अधिक विद्यार्थी संगीत साधना करीत आहेत. परदेशातील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिकवण्या तसेच परीक्षांची सोयही आता आहे. त्याला भरघोस प्रतिसाद ही मिळत आहे. 
श्री. शरद पवार यांच्या विशेष निमंत्रणामुळे पं. मराठे बारामतीच्या सरस्वती संगीत विद्यालयाचे प्राचार्यपदही समर्थपणे सांभाळतात. सध्या या विद्यालयात ४००हून अधिक विद्यार्थी गायन-वादनाचे शिक्षण घेत आहेत.

      गांधर्व महाविद्यालयाची वाकड नंतर आता फ़लटण येथेही शाखा सुरु होत आहे.
      श्री. मराठे हे नुसतेच उत्तम कलाकार नाहीत तर उत्तम मार्गदर्शकही आहेत. त्यांचे अनेक शिष्य आज संगीत क्षितीजावर चमकत आहेत. डॉ. सलिल कुलकर्णी, राजीव तांबे, मिलिंद कुलकर्णी, उमेश पुरोहित, तन्मय देवचक्के व इतर अनेक. याशिवाय अनेक विद्यार्थी उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय अनेकजण उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यातले अनेकजण उत्तम संगतकार आहेत. संगतकार हे मुख्य कलाकाराइतकेच तयारीचे असतात तथापि त्यांना मुख्य कलाकाराइतकी लोकप्रियता मिळत नाही आणि मानधनही अतिशय कमी मिळते याची खंत प्रमोदजींना वाटते.

     पं. मराठे यांनी आत्तापर्यंत विविध रागांमध्ये आणि निरनिराळ्या तालांमध्ये ५०हुन अधिक रचना केल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून देखील ते काम करतात. त्यांनी हार्मोनियमवर अनेक पुस्तके लिहिली आहेत जी संगीत अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे गांधर्व महाविद्यालयाने शैक्षणिक सीडीज आणि कॅसेट्सची निर्मितीही केली आहे. 

     यासर्व कार्यामध्ये पं. मराठे यांच्या पत्नी सौ. परिणिता मराठे आणि मुलगा चि. प्रणित यांचा सहभागही अत्यंत महत्वाचा आहे. सौ. परिणिता विद्यालयाच्या कार्यालयीन कामकाजवर देखरेख करतातच पण पुस्तके, सीडीज आणि कॅसेट्सच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.त्या संगीत विशारद आणि एम.ए.(संगीत) आहेत.

    पं. प्रमोद मराठे यांच्या विद्यालयाच्या बाबतीत अनेक नव्या योजना आहेत. विद्यार्थ्यांना भरभरुन ज्ञान देणारा गुरु म्हणून त्यांचा लौकिक आहे. पाश्चात्य संगीताच्या आक्रमणामुळे भारतीय संगीत लोकांमध्ये रुजविण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच गांधर्व महाविद्यालयांसारखी विद्यालये ही सामाजिक आणि सांस्कृतिक गरज आहे. 
 - गौरी शिकारपूर ,
पुणे
email- geetgauri@gmail.com