सोमवार सकाळी १० ची वेळ... अनंतचतुर्थी निमित्त रविवारी सुरू झालेली गणपती विसर्जनाची मिरवणूक अद्याप सुरूच होती. मी टिळक रोडवरच्या स्पीकरच्या भिंतींनी हादरून गेलो. लांब उभे राहून नुसती नजर टाकली तर मिरवणुतील सजावटीच्या मखरात बसलेला श्री मंगलमूर्ती शांतपणे मांडी घालून ठामपण बसलाय.. माझ्या हाती काही नाही .कार्यकर्ते नेतील तसा मी पुढे सरकतो आहे,...असे सांगत.
अनेकांना ऑफिस गाठायची घाई. कुणाला दुकान सुरू करायची..तर कुणाला काही...पण या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याचे काय....
प्रत्येक गणपती मंडळाच्या ट्रॅक्टरमागे विजपुरठा करणारे जनरेटर लावलेले होते. एका गाडीत डीजे गाण्य़ांची निवड करून ठोका असणारी गाणी निवडत होते. लय आणि तालात धुंद होऊन मंडळी नाचत होती. अंगविक्षेप करीत होती. अंगात बळ आल्यासारखे त्यांचे अंग तालावर जणू थिरकत होते..
सा-या वातावरणाचा ताबाच जणू या मंडळाच्या कर्णकर्कश ( योपेक्षा दुसरा शब्द सापजत नाही) आवाजाने घेतला होता. वास्तविक श्री गणेशाचे विसर्जन अनंतचतुर्थीच्या दिवशीच पूर्ण व्हावे असे शास्त्र सांगते.... नंतर सुरु होतो पितृपंधवडा... तो अशुभ मानतात...पण त्याचे कोणाला काय....
आपल्याच मस्तीत नाचणारे इतके मश्गुल असतात की ठेका हेच त्यांचे लक्ष... आणि अंगाला हिसके देउन नाचणे हा त्यांचा धर्म.
गणपती बाप्पा मोरया... या निनादात बुध्दीचे हे आराध्य दैवत .. स्पिकरच्या भिंतीत अडकून गेले आहे. इथे नशा दिसते ती भक्तिची नाही तर आवाजाच्या नशेची.
खरं सांगतो..मी तर टिळक रोडवर चाललेल्या एका ट्र्रक्टरच्या मागे काही कार्यकर्त्यांच्या हातात दारूची बाटली बघीतली. ते सर्वजण अगदी त्यांचा डीजेही आस्वादात मग्न होता... ते काही मंडळी इतर कार्यकर्त्यांना आत बोलावित होता. आता ही खरी नशा चालू होती..
तसे पाहिले तर नाचणा-या तरूणांच्या डोळ्य़ात ती धुंदी कशाची आहे ते दिसत होते. त्यांचे पाय थिरकतच होते... अंग वळतच होते... हे सारे कुणासाठी... का ही संधी साधून हे सारे भक्त आपल्या दैवतासमोर हा आगळा खेळ करण्यातच धन्यता मानतात... (देवा गजानना पाहतो आहेस ना... हे काय चाललयं ते...)
पोलिसांचे एक पथक या मंडळींना पुढे येण्यासाठी सतत सांगत होते.. पण ते तात्पुरते ऐकत...पालिस पुढे गेले की लयीत..संथता आलीच.. एक पोलिस चौकात डीजेला स्पीकरचा आवाज कमी करायला सांगत होता. काही काळ लोटला की डीजे पुन्हा आवाजाची बटने वाढविताना दिसत होते...
हे सारे पाहिलेले तुम्हापर्यत पोचवावे वाटले. तुम्ही ते अनुभवलेलेही असेल..पण मला ते सांगावेसे वाटते... या माध्यमातून...
खरच...आपण सारे यातून काय मिळवितो.. समाधान..शांती..आराधना...
भक्ति की नुसतीच नशा..भक्तिची.....
सुभाष इनामदार, पुणे
( गणपती मिरवणुकीतील हे दृष्य...लक्ष्मी पथावरचे व संग्रहातले आहे.याचा या लेखाशी संबंध नाही)