subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, July 31, 2012

सन्मानाचा आनंद

संगीतकार आनंद मोडक यांनी स्वतः फेसबुकवर आपल्या पुरस्काराच्या निमित्ताने माहिती दिली आहे...त्यांच्या शब्दात काहीही बदल न करता ती माझ्या या ब्लॉगमधून देत आहे...संगीतकार आनंद मोडक यासाठी माझ्यावर रागविणार नाहीत याची खात्री आहे..

सुभाष इनामदार, पुणे

मित्रानो ,मला तुमच्याबरोबर माझ्या होणा-या सन्मानाचा आनंद वाटून घेताना खूप chhaan वाटतंय..अखिल भारतीयमराठी नाट्यपरिषद पिंपरीचिंचवड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त
शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २०१२ रोजी संध्याकाळी ५ वाजता रामकृष्ण मोरे नाट्य गृह ,चिंचवड ,पुणेयेथे संपन्न होणाऱ्या सोहळ्यात कै.बालगंधर्व स्मृती पुरस्कार माझ्या मराठी रंगभूमीवरील अमूल्य आणि अभ्यासू कार्याबद्दल मला प्रदान केला जातोय..घाशीराम कोतवाल या नाटकापासून सुरु झालेल्या आधुनिक संगीत रंगभूमीच्या प्रवासात घाशीराम कोतवाल या नाटकात सहभागी झालेला रंगकर्मी इथपासून माझा प्रवास सुरु झाला तो महानिर्वाण ( लेखक-सतीश आळेकर ) या नाटकाचा संगीतकार म्हणून माझं पदार्पण झालं..

त्यानंतर बदकांचे गुपित ( लेखक - बा सी मर्ढेकर ) ,तीन पैश्याचा तमाशा ( लेखक- पु.ल.देशपांडे ) , मृगया ( लेखक- राजन मोहाडीकर ) , फिल्लम स्टुडिओ मुंबाय ( लेखक- राजन मोहाडीकर ) ,
पडघम ( लेखक- अरुण साधू ) , विठ्ठला ( लेखक- विजय तेंडूलकर )
तुमचे अमुचे गाणे ( लेखक- रत्नाकर मतकरी ) , अफलातून ( लेखक-विक्रम भागवत ) , संगीत म्युन्सिपालीटी ( लेखक- माधवराव जोशी ) अलीबाबाची हीच गुहा ( लेखक- दिलीप वि. चित्रे ) जळळी तुझी प्रीत ( लेखक - अभिराम भडकमकर ) , मदन भूल ( लेखक- प्रदीप ओक )
अशा १३ संगीतमय नाटका करीता मी शेकड्यांनी गाणी आणि पार्श्वसंगीत हि स्वरबद्ध केले.

तर शांतीदूत ( संहिता-वसंत बापट ) ,लीलावती ( संहिता -झेलम परांजपे ) , प्रीत गौरीगिरीशम ( लेखक- कृ. रा. अर्जुनवाडकर ), मेघदूत ( कुसुमाग्रजांच्या मराठी काव्यानुवादावर आधारित संहिता लेखक -
सदानंद डबीर ) या नृत्य नाट्याना संगीत दिलं... चंद्रकांत काळ्यांच्या शब्दवेध या संस्थेकरिता अमृतगाथा (१९८८), प्रीतरंग(१९९२) साजणवेळा(१९९७), शेवंतीच बन (२००२) आणि आख्यान तुकोबाराय ( २००४)
असे मराठी साहित्यातल्या विविध विशुद्ध कवितेच्या वाचिक अभिनयातून गद्द्यआणि गाण्याच्या रूपातील रंगमंचीय अविष्काराकरिता संगीतकार म्हणून योगदान दिले...या सगळ्या कामाचे स्मरण " अमूल्य आणि अभ्यासू कार्याबद्दल " या उल्लेखामुळे मला झाले. अन्यथा एरवी हे माझ्या स्मरणात हि नसते...किंबहुना मी - स्वत: काही मिळवलेच नाही तर गमावणार काय- अशा विचार सरणीने येणारी प्रत्येक संधी पहिलीच समजून स्वत: ला नव्याने सिद्ध केले पाहिजे या एकमेव जिद्दीने त्या आव्हानाला सामोरा जातो...कधी फसलो हि असेन...पण त्यातून हि शिकण्याची वृत्तीच मला पुढे पुढे नव्या जोमानं काम करायला प्रेरणा देत असावीसे वाटते...शेवटच्या श्वासापर्यंत माझं हे विद्द्यार्थीपण अक्षय राहो अशा शुभेच्छा तुम्ही सर्वांनी मला द्याव्यात ही विनंती...