पु. ल. देशपांडे, विजयाबाई मेहता, कुसुमाग्रज, आरती प्रभू यांच्या नावाने घटकेत हळवा होणारा... त्यांनी दिलेले भरभरून वेचणारा तरीही, आपण कितीसे घेऊ शकलो हा प्रश्न पडलेला... समाजाला आपण दिलेच पाहिजे, देतो म्हणजे उपकार करत नाही, हे ठामपणे ऐकवणारा आणि नाटक-चित्रपट करताना घडलेले किस्से सांगताना प्रेक्षकांना खळाळून हसविणारा... नानाची नाना रूपे... त्यातीलच काही रूपांना श्रोत्यांनी आज पुन्हा पाहिले आणि पुन्हा नानामय होण्यात धन्य मानले. निमित्त होते पु. ल. स्मृती सन्मानचे...
"
तरुणाई'चे उद्घाटन व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी नाना पाटेकर यांना पु. ल. स्मृती सन्मान व आर. के. लक्ष्मण यांना विशेष पुरस्कार रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी श्रीकांत गद्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत नानाचा एकपात्रीचा अनुभवच रसिकांनी घेतला. काव्यवाचनात आपल्या तरल मनाचे प्रतिबिंब उमटविणारा, पूर्वाश्रमीच्या देण्याने कृतार्थ असल्याची भावना व्यक्त करणारा आणि दुसऱ्याची टोपी उडविणारा खट्याळ अशा नाना रंगात रसिक रंगून गेले. आपल्या शिष्याला पुरस्कार देताना मेहता यांनीही गुरूच्या अधिकाराने पहिल्यांदा कान पिळले आणि नंतर प्रेमाने जवळही घेतले. पाटेकरही मग लहान झाले. पाया पडलेच होते; पण बाईंच्या उंचीपेक्षा लहान दिसावे म्हणून गुडघ्यात वाकून "बाल' झाले.
वडलांच्या नावाने पुरस्कार मिळाला, असे कृतार्थतेने सांगत पाटेकर म्हणाले, ""पितृसमान असलेल्या पुलंच्या लेखनावर आमचा पिंड पोसला गेला. त्यांनी पुस्तकात जी माणसे लपविली, ती मला कधी एकटे पडू देत नाहीत. पुलंच लेखन कधीच एकपदरी वाटले नाही. विजयाबाई या चालतीबोलती शाळा आहेत. आम्ही नेमके कोण आहोत, हे माहीत नसताना आमच्याकडून त्यांनी काढून घेतले.''
नाटकाच्या तालमी, दौऱ्याचे किस्से केवळ ऐकवत नव्हे; तर उभे राहून रंगमंचावर साकारत त्यांनी रसिकांना जणू आपल्याबरोबर त्या काळात नेले. पुरुष नाटकावेळी बायका माझ्यावर खूप चिडायच्या असे सांगत, 5-6 वेळा रंगमंचावर आलेल्या चप्पल "पुरस्कार' म्हणून जपल्याचे मनमोकळेपणे सांगितले.
परकाया प्रवेश करतो तो चांगला अभिनेता, असे सांगत, नानाला हे जमले अशी शाबासकीही मेहता यांनी दिली.
http://www.esakal.com/eSakal/20111217/5158034451279370942.htm