subhash inamdar

subhash inamdar

Saturday, May 14, 2011

व्हायोलिन वादन-'शब्दांविना कळले

'व्हायोलिन गाते तेव्हा...'
 'शब्दांविना कळले सारे शब्दांच्या पलीकडले...' असे म्हणता म्हणता जेव्हा व्हायोलिनचे सूर शब्दांतीत बोल काढू लागते, तेव्हा नकळतच हात जुळतात आणि टाळ्यांच्या कडकडाटासह वाह वाह आपसूकच उमटू लागतात, अशी अनुभूती आज पुणेकर रसिकांनी 'व्हायोलिन गाते तेव्हा...' या कार्यक्रमात घेतली.
ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित भालचंद्र देव यांच्या अमृतमहोत्सवी समारंभानिमित्त दोन दिवसांच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील प्रथम दिनी त्यांची कन्या व शिष्या चारुशीला गोसावी यांचे व्हायोलिन वादन झाले. या वेळी ५०चे दशक गाजविणाऱ्या काही अजरामर हिदी-मराठी गाण्यांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.
मधाळ सुरांनी मोहळ ही शब्दांची होती, की शब्दांविना होती अशा संभ्रमात टाकणारे हे वादन झाले. या वेळी 'तुझे गीत गाण्यासाठी सूर लाभू दे रे...', 'थकले रे नंदलाला...' अशा भक्तिगीतांसह 'बय्याँ ना धरो...', 'चांदणे शिपीत जाशी...' अशा प्रेमगीतांचेही या वेळी सादरीकरण झाले. स्वरांमधील लडीवाळपणा, मुरक्या, हरकती सारे काही गळ्याप्रमाणे गोसावी यांच्या व्हायोलिनच्या तारांनीही तेवढाच उभेउभ साकारला. प्रत्येक गाण्यातील बारकावे टिपत सादर केल्या जाणाऱ्या कलाविष्काराला तेवढ्याच दिलखुलासपणे रसिकही दाद देत होते.
'श्रावणात घन नीळा बरसला...' सादर करताना अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात व्हायोलिनच्या सुरांनी न्हाऊ घतले.
या वेळी 'जांभूळ पिकल्या झाडाखाली...' अशा उडत्या चालीच्या गीतांचेही सादरीकरण करून श्रोत्यांच्या टाळ्यांचा ठेका मिळविला. एखाद्या लावण्यवतीने आपल्या नृत्याने मोहळ घालून मिळवावी, तशी दाद व्हायोलिनच्या सुरांनी मिळविली. गीतांमधील वैविध्याचे दर्शन घडविताना 'काहो धरीला मजवरी राग...' ही लावणीदेखील तेवढ्याच ताकदीने सादर करण्यात आली.
या वेळी शुभदा आठवले यांनी हार्मोनियम, श्रद्धा कानिटकर यांनी सिथेसायझर, राजेंद्र साळुंखे यांनी तालवाद्यांची, तर रविराज गोसावी यांनी तबल्याची साथसंगत केली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.