subhash inamdar

subhash inamdar

Thursday, March 31, 2011

तीन दशकांची समाधानपूर्ती ..झलक,पुणे


महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या तीव्र उर्मीतून झलक,पुणे या संस्थेची स्थापना झाली..आता त्याला तीन दशके झाली आहेत.

रसिका तुझ्याचसाठी.. गंगाधर महांबरे यांच्या शिर्षक गीताच्या नावाने संस्थेने पहिला कार्यक्रम झाला..आणि झलकची झलक रसिकांच्या टाळीला पसंत पडली. मौखिक परंपरेतील पारंपारिक गीते आणि अघुनिक गीते सादर करणे हा उद्देश..
झलकला आपल्या मातीतला आणि मनातला हा बहुश्रृततेचा धागा. परंपरेतील समृध्द वारसा या कार्यक्रमातून जपणे हे जास्त मोलाचे वाटले. ते त्यांनी तीन दशके सुरू ठेवले.


इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि इंटरनेटच्या युगातही प्रेक्षागृहातले रसिक आणि कलाकार एकमेकांसमोर असताना तालवाद्ये जुळविली जातात. सूर-लय-तालाच्या लडी उलगडल्या जातात. आणि बघता बघता त्या सर्वांचे अद्वैत तयार होते. झलक त्या सांगेतिक अनुभूतीचा परिणाम देण्यासाठी आजही सज्ज असते...पुढेही राहणार आहे.

मागच्या तीन दशकांमध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सुधीर फडके, राम कदम, शांताबाई शेळके, प्रभाकर जोग, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, आशा भोसले, किशोरी आमोणकर यांनी झलकच्या स्वरमंचावर येवून कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.

स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या प्रचलित व अप्रचलित गीतांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून रंगत गेला. आज झलकचे तोच चंद्रमा, सूर तेची छेडिता, मधुघट, इंद्रधनू, गा मेरे मन, सारखे वेगळे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर पावसाची गाणी आणि मन उधाण वा-याचे सारखे वेगळे कार्यक्रम आजही स्मरतात. २५०० प्रयोगांची या सा-या प्रयोगांची संख्या होईल.


पुण्यात स्थापन झालेली कलाकारांची ही संस्था गेली तीन दशके एकविचाराने, अभंगपणे आमि आपल्या भूमिकेशी ठाम पाहून आजही काम करत आहे....याचे श्रेय झलक परवारात सामिल झालेल्या विविध कलावंतांना तर जातेच पण त्याही पेक्षा अधिक जाते ते... अविनाश वैजापूरकरांच्या संघटनाकौशल्याकडे. यासा-यांना म्हणजे कलाकार आणि रसिक यांना बांधणारा सेतू निवेदनातून साधला तो उपेंद्र खरे यांनी....

झलकची ही तीन दशकांची तपपूर्ती साजरी झाली तीही आगळ्या पध्दतीने...
आता ज्येष्ठ म्हटले पाहिजे.. ते सुधिर गाडगीळ यांच्या साठीच्या निमित्ताने त्यांना मानपत्र देउन...तर प्रमुख उपस्थितीत विक्रम गोखले झलकच्या कलावंतांना अधिक सुरात गा असा सुरात गा हा सल्ला द्यायला विरसले नाहीत.


तीन दिवसांच्या ह्या सोहळ्याला पुणेकरांची दाद ही उपस्थितीने तर मिळालीच. पण ती गीतांना टाळ्यांनी साद घालून.

कितीही जमाना बदलला तरी त्या दिवसांची आठवण देणारे असे कार्यक्रमच संस्कृती टिकवून ठेवते.. गेलेले दिवस परत स्मरणात रहातात... ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविते हे निश्चित....

( लेखातील सर्व छायाचित्रे शेखर डेरे यांनी काढली आहेत )

सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276

http://subhashinamdar.blogspot.com/2011/03/blog-post_29.html?spref=fb

Wednesday, March 23, 2011

संजीव अभ्यंकर-रसभरीत गाणं

पुण्यात आयोजित करण्यात आलेली रविवार दि. १३ मार्चची `सुरेल सभा` खर्‍या अर्थाने रसिकांसाठी आनंदाचा ठेवा ठरली. पं. संजीव अभ्यंकर यांनी रात्रीच्या रागांचे स्वरूप त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण शैलीत उलगडून दाखवित केलेल्या सुरांच्या वर्षावात श्रोते चिंब झाले. 


मैफिलीची सुरूवात 'पुराना चंद्रकंस' या रागातील "ए पिया बिन" या बडा ख्यालाने झाली व त्यानंतर मैफिलीत उत्तरोत्तर रंग भरत गेला. पुढे 'बिहागडा' रागातील मध्य लयीतील "आली री अलबेली" ही बंदिश त्यांनी सादर केली. या बंदिशीतील स्थायी व अंतरा हे दोन्ही वेगळ्या तालात बांधलेले होते. स्थायी त्रितालात तर अंतरा एकतालात बद्ध होता. हा वैविध्यपूर्ण अविष्कार श्रोत्यांची मने जिंकून गेला. मध्यंतराआधी नगध्वनी कानडा आणि नायकी कानडा यांच्या सुरेल मिलाफातून त्यांनी या दोन्ही रागांचे अंतरंग स्पष्ट केले.

मध्यंतरानंतर प्रचलित 'चंद्रकंस' रागातील स्वरचित तराणा पंडीतजींनी रसिकांपुढे मांडला व त्यास रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. 'कलावती' रागातील "जा री जा री छिप जा सखी री" या द्रुत बंदिशीनंतर त्यांनी एकनाथ महाराजांची गवळण सादर केली आणि सिंध भैरवीतील अभंगाने सांगता करीत त्यांनी या मैफिलीस कळस चढविला.

रागसादरीकरणासोबतच पंडीतजींनी श्रोत्यांशी केलेला संवाद या मैफिलीत विशेष ठरला. पंडीतजींची रसिकांपर्यंत सदैव काहीतरी नाविन्यपूर्ण पोचवण्याची आस आणि तळमळ त्यांच्या शब्दांतून जाणवत होती. बोलतांना ते म्हणाले, कुठल्याही वैमानिकाला विमान स्वत:च्या बळावर इष्ट स्थळी नेण्याची इच्छा असते. विमानाने वैमानिकास नव्हे तर वैमानिकाने विमानास वश केले पाहिजे. तसेच कधीतरी, गात असता, गळा बुद्धीवर मात करून जातो. पण बुद्धीला जे हवं ते गळ्यातून बाहेर निघणं हे खरं अवघड काम! गाणं अनवट आणि बुद्धीप्रधान असूनही ते लोकांपर्यंत सहजतेने पोचले पाहिजे. त्यातील रस, रंग अबाधित राहीला पाहीजे यातच खरे कसब!

पंडीतजींच्या आवाजातील गोडवा, स्वरांचा लगाव आणि सुरांतील सच्चेपणा, अत्यंत गुंतागुंतीची तानप्रक्रिया पण संगीत अभ्यासकापासून ते सामान्य श्रोत्यापर्यंत ते तितक्याच सुरसतेने कळेल असं रसभरीत गाणं यामुळे ही मैफल श्रोत्यांच्या चिरस्मरणात राहील याबाबत शंका नाही.

केदार केसकर

Monday, March 21, 2011

हास्यगंगेची 'मिरासदारी'


आदिमानवापासून ते ' आयटी ' च्या लाटेवर ऐटीत जगणाऱ्या आधुनिक मानवापर्यंत स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोषांवर बोट ठेवत केलेले व्यंग कायमच मामिर्क विनोदाचे उगमस्थान ठरते . आणि अशा विनोदामधून निर्माण झालेली हास्यगंगा कधीही आटत नाही ...

... कधी गावाकडच्या चावडीवर , देवळातल्या पारावरच्या गप्पांमधून , तर कधी विडंबन , उपहास , अतिशयोक्ती या अस्त्रांचा वापर करीत पोट धरून हसण्यास लावणारे . मा . मिरासदार ' मटा ' शी संवाद साधत होते .

निमित्त आहे त्यांच्या अठरा पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनाचे . ' दमां ' च्या गाजलेल्या अठरा पुस्तकांचा संच मेहता प्रकाशनतफेर् आज ( सोमवारी ) रसिकांसमोर आणला जात आहे . वगनाट्यापासून ते विनोदी कथासंग्रहांपर्यंत विविध प्रकारातील पुस्तकांचा इरसाल पात्रांचा ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाऱ्या ' दमां ' च्या गंमतगोष्टी , गुदगुल्या , चकाट्या , चुटक्याच्या गोष्टी , माझ्या बापाची पेंड , गावरान मेवा , विरंगुळा , नावेतील तीन प्रवासी , माकडमेवा , भोकरवाडीत अशा लोकप्रिय पुस्तकांचा यात समावेश आहे . सर्वच पुस्तके नव्या पद्धतीने प्रकाशित करण्यात आली असून यातील काहींसाठी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि . . फडणीस यांनी मुखपृष्ठेही काढली आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनातफेर् हा संच प्रकाशित करण्यात येणार आहे .

अजूनही तुमचा विनोद हसवणार का , असे विचारता ' दमा ' उत्तरादाखल खळाळून हसतात आणि सांगतात , ' चांगले साहित्य , विनोदनिमिर्तीला काळाची बंधने नसतात . त्यामधील मामिर्कता जोपर्यंत कायम आहे , तोपर्यंत तो खुलविणारा ठरतो . कॉलेजमध्ये प्राध्यापकी करताना हाच अनुभव घ्यायचो . पिढ्या , त्यांची भाषा बदलली , विनोद व्यक्त करण्याच्या तऱ्हा बदलल्या , तरी मामिर्कता कायम असेल , तर विनोदातील हास्याला पिढ्यांची कुंपणे राहात नाहीत .'

' शब्दनिष्ठतेसह इतर कोणत्याही विनोदाला काही मर्यादा पडते . अत्र्यांसारख्या भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा झेंडूची फुलेमधील विनोद सध्याच्या पिढीला उमगत नाही . कारण , ते कशाचे विडंबन आहे , हेच त्यांना कळत नाही . याउलट मानवी स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित विनोद काळाच्या कसोटीपलिकडे जातो . कारण , अगदी आदिमानवापासून अतिप्रगत यंत्रमानवापर्यंत स्वभावविशेष हे कायमच राहतात . माझ्या पुस्तकांमधून हीच स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोष टिपण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे सध्याची पिढीसुद्धा माझ्या विनोदाला तुफान दाद देते ,' असेही ' दमा ' स्पष्ट करतात .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7750256.cms

Friday, March 18, 2011

पंच्याहत्तरीची सुरेल वाटचाल !

पं. भालचंद्र दामोदर देव
`व्हायोलिन` या वाद्याला `आंधळं वाद्य` असे म्हणतात, कारण त्यावर स्वरांची बोटे बरोबर पडण्यासाठी पडदे किंवा पट्ट्या काहीच नसते. केवळ वादनातल्या कौशल्यामुळेच अचूक स्वर साधता येतात. अशा या अवघड वाद्याबरोबरचा  सुरेल प्रवास करणारे ज्येष्ठ व्हायोलिन वादक ,माझे वडील आणि गुरूही.
 श्री. भालचंद्र देव. परिचितांचे `नाना` २ एप्रिल २०११ रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यांच्या आयुष्याचा हा थोडक्यात घेतलेला धावता आढावा.....


नानांचा जन्म मुंबईचा. माझे आजोबा दामोदर चिंतामण देव, हे नोकरीनिमित्त मुंबईत आले होते. ते म्युनसिपाल्टीच्या शाळेत संगीत शिकवित असत. ते गाण्याबरोबरच हार्मोनियमही वाजवित असत. प्रसिध्द व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी यांचे ते शिष्य. आजोबांना थोडे व्हायोलिनही वाजवता येत होते. त्यामुळे घरातील संगीताच्या वातावरणामुळे नानांनाही संगीताची गोडी लागली. यामुळेच वयाच्या ११ व्या वर्षी तेही आजोबांकडे व्हायोलिन शिकू लागले.
आजोबांची नोकरी संपल्यावर नाना पुन्हा चिंचवडला  आले. (तसे हे देव कुटुंब चिंचवडच्या मोरया गोसावीच्या कुळातले. कामानामित्त मुंबईला जरी गेले तरी पुन्हा परतोनी माघारी म्हणजे चिंचवडला स्थिरावले) शालेय शिक्षण पूर्ण झाल्य़ावर आजोंबांकडे व्हायोलिनचे धडे घेणे सुरूच होते. वाणिज्य शाखेचे पदवी घेतल्यावर आजोबांनी नानांना पं. गजाननबुवांकडे व्हायोलिन शिकण्यासाठी पाठविले.
रोज दहा तास, असे जवळजवळ तीन वर्षे डोंबिवलीत बुवांकडे व्हायोलिनचे धडे गिरविले. बुवांची शिस्त अतिशय कडक. कोणत्याही बंदिशी किंवा स्वररचना लिहून घ्यायच्या नाहीत. हा दंडक. घरी गेल्यावर त्या आठवून त्याचा रियाज करायचा... हे विद्येचे तंत्र. बुवांच्या या धाकामुळे व्हायोलिनशी जवळीक अधिक झाली.. बुवांच्या सहवासामुळे त्यांचे खास गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची कला अवगत झाली. त्यात ते माहिर . तबल्याच्या बोलाचेही तिथे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले... एकूणच गायकी अंगाने वादन आणि तेही तबल्याच्या लयीत वाजविण्याची कारागिरी सहजी प्राप्त झाली.
पुण्यात टेलिफोन खात्यात नोकरीचा कॉल आला..आणि नाना खुद्द पुण्यात दाखल झाले. पुण्यात नोकरी आणि व्हायोलिन दोन्ही गाष्टी एकत्रच सुरू झाल्या. पुण्यात पं. नागेश खळीकर, बबनराव कुलकर्णी, धुंडिराज मराठे यांचेकडेही नानांनी संगीताचे शिक्षण घेतले. पं. गजाननबुवांनी शिकविलेल्या व्हायोलिनच्या विद्येत पुरते प्राविण्य आल्यावर मग नानांनी रेडीओची परिक्षाही यशस्वीपणे पास केली. पुण्यात आलेल्या ६२च्या पुराने राहते घर कोलमडून गेले. गोखलेनगरला संसाराचा पुन्हा मांड मांडला. लग्नानंतर आईलाही गाण्याची आवड लक्षात आली. आईने नानांच्या कार्यक्रमांना तंबो-याची साथ केली. आई (सौ. निला भालचंद्र देव) भक्तिगीत आणि अभंग छान म्हणत असे.
नानांचा पहिला कार्यक्रम १९६३साली रेडिओवर प्रथम झाला . त्यानंतर घरी रेडिओ विकत आणला गेला. आईने घरातली सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. सर्व जबाबदा-या तिने आनंदाने, समाधानाने पार पाडल्य़ा. नाना घरात व्हायोलिनच्या शिकवण्या घेत असत. कार्यक्रमांना साथ करण्यासाठी बाहेर जात असत. घराची सारी मदार आईवर असायची.. तीही तेवढीच ..कलाप्रेमी आणि मोठ्या मनाची.
घरातल्या संगीताच्या या वातावरणामुळे वयाच्या नवव्या वर्षी मी व्हायोलिन शिकू लागले. तेही नानांच्या कडक शिस्तीत.. मला आठवते.. माझ्या शेजारी रहाणारी मैत्रीण संगीता आणि मी दोघीही क्लासला बसायचो.. आधी शिकविलेल्या रागांच्या आलाप, ताना जर पाठ नसल्या तर नाना मला क्लासला बसू देत नसत..इतकेच नाही तर वाजविताना काही चूक झाली तर हातातल्या बो ने एक जोराचा फटका मारीत....मात्र या मुळेच माझे व्हायोलिन वादन तयार झाले..आज ते सारे मागे वळून पाहताना डोळे पाणावतात.
आज वयाच्या पंच्याहत्तरीतही नानांचा वक्तशिरपणा आणि शिस्त तशीच कायम आहे. पण जेवढे ते कठोर शिक्षक तेवढेच समोरच्याचे कौतुकही ते मनापासून करतात.. मी ते प्रत्यक्ष अनुभवले आहे.
आपल्या इतक्या वर्षांच्या सुरेल प्रवासात त्यांनी कधीही प्रसिध्दीची किंवा कुठल्य़ाही पुरस्काराची अपेक्षा कधीच धरली नाही. आठ ते सत्तर वयोगटातल्या कितीतरी जणांनी नानांकडे शिक्षण घेतले आहे. आजही घेत आहेत.
पण व्हायोलिन हे फार अवघड वाद्य असल्यामुळे शिकायला येणारे फार चिकाटीने ते शिकत नाहीत..अर्धवट सोडून जातात ही त्यांची खंत आहे.
मितभाषी आणि तेवढेच मिश्किल ही त्यांची स्वभाववैशिष्ठ्ये सांगता येतील. ते तसे मितहारीपण असल्यामुळे मोजकाच आहार घेऊन सतत उत्साही असणारे आमचे नाना अजुनही बसने प्रवास करून घरोघऱी शिकवण्या घेण्यासाठी तर जातातच पण गेली ४० वर्षे शनिपारच्या भारत गायन समाजात संगीत शिक्षक म्हणून आजही कार्यरत आहेत. अजूनही कोणत्याही कार्यक्रमालाच काय पण तालमिंनाही वेळेवर हजर असतात. त्यांनी हिच शिस्त आम्हा बहीण-भावांना लावली. त्याचा उपयोग आम्हाला आमच्या आयुष्य़ात खूप झाला.
त्यांचा हा संगीताचा वसा मी (व्हायोलिन) आणि माझा मुलगा रविराज( तबला) आणि मुलगी मधुरा(हार्मांनियम) यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे.
निर्मळ मनाचे.. कोणत्याही कलेच्या राजकारणापासून अलिप्त असलेले.. व्हायोलिनवरची निष्ठा कायम ठेवणारे... ते वादनाचे धडे पुढच्या पिढीला शिकविणारे...पं. भालचंद्र देव...
तुम्हाला आयुष्याची स्वर-संगत अशीच अखंड लाभत राहो.. कला आणि कलावंत दोघांनाही याचा लाभ होवो...हिच अपेक्षा...
दिर्घायुष्याचे वरदान लाभो
तुमच्या आयुष्या
हिच विनंती करतो आम्ही
परमेशाच्या देशा...
आपलीच,
सौ. चारूशीला गोसावी ( देव )
मयुरेश, बी-५५, राजर्षी शाहू सोसायटी,
सातारा-पुणे रस्ता, पुणे- ३७
फोन. ०२०- २४२३ ००६० मोबा.९४२१०१९४९९



Friday, March 11, 2011

कणखर आणि कोमलता म्हणजे कुसुमाग्रज

अक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावरचा कार्यक्रम त्यांच्याच स्मृतींना उजाळा देउन केला गेला. ज्ञानपीठ विजेते वि. वा शिरवाडकर साहित्यिकांच्या अभ्यासक डॉ. माधवी वैद्य यांनी स्वतःच्या कुसुमाग्रजांच्या आठवणींनी पुन्हा एकदा जागृत केले. त्यांच्या मते कुसुमाग्रजांच्या आठवणी बकुळीच्या फुलासारख्या आहेत. आपण सहजच त्या सुगंधांचा दरवळ मनात घेत रहातो.
यातून उमजलेले कणखर आणि तेवढेच कोमल कुसुमाग्रजांमधील काही कट्ट्यावरून घरी आलेले काही मुद्दे-
-          कवीचे शब्द बदलण्याचा हक्क बदलण्याचा कुणालाच नाही, ह्या ठाम मताचे कपसुमाग्रज.
-          अत्यंत स्वागतशिर व्यक्तिमत्व.
-          तात्यासाहेबांच्या घरी दरबार रोज भरत असे. यात कवी, कलावंत, साहित्यिक, विद्यार्थी यांचेबरोबर माळी, रिक्षावालेही असत.
-          नाशिकला त्यांनी सांस्कृतिक, साहित्यिक रूप दिला. नाशिकनेही त्यांना आपले मानले.
-          त्यांचे आयुष्य म्हणजे आळवावरचे पाण्यासारखे थेंब..सगळ्यात असूनही कशातच नसल्यासारखे.
-          त्यांचा सहवास..त्यांचे घर म्हणजे देवघरासारखे...जिथे तुम्ही सहजच नम्र होता.
-          त्यांना पाहिल्यानंतर आपलं दुःख, वेदना सहजपणे हरपून जायचे.
-          ओळखलतना सर मला..या कवीतेचा खास उल्लेख... त्यांच्याकडून अनेकांनी आशिर्वाद घेतले.
-          पाठीवरती हात ठेऊन..तुम्ही फक्त लढ म्हणा..हा मेत्र मनसेचे राज ठाकरे यांनाही भावला.. त्यांचे आशिर्वाद...
-          माती आणि आकाशाशी संवाद साधणारे शब्द-भावनांचे नाते ते आपल्या लेखनात फार वेगळे व्यक्त करीत असत.
-          त्यांना स्वातंत्र्याचा ध्यास होता.
-          कणखर आणि तेवढेच कोमल असे त्यांचे लेखन आणि व्यक्तित्वही होते.


आज कुसुमाग्रज वेगवेगळ्य़ा घटनांमधून व्यक्त झाले. पुण्यातल्या बाजीराव रोडवरच्या बुक गॅलरीच्या सुंदर पुस्तक दालनासमोर..अक्षरधाराच्या कट्ट्यावर... वाचकांची गर्दी फार नव्हती..पण होते माजकेच साहित्यप्रेमी.
आजुबाजूच्या परिसरातही त्यामुळे आपोआपचा साहित्याचा दरवळ पसरला गेला. आत येण्याचे न लक्षात येणारा श्रोता बाहेर उभा राहून कोण काय बोलतोय हे टिपत होता. तसा बाहेर  उभा राहूनही तो हा अनुभव घेत होता.
पिंपळाच्या पारावर..पायरीवर अंथरलेल्या बैठकीवर बसून आज तो कुसुमाग्रज अनुभवीत होता..
उद्या दुसरा कोणी... नक्कीच या उपक्रमाला वाचक प्रतिसाद मिळेल..तो साहित्यिकांना आणि वाचकांनीही खेचून आणेल...राठिवडेकर बंधूंना शुभेच्छा....


करीन म्हणतो सेवा...वाचकांची
त्याला देईन म्हणतो..शब्द..जगण्यासाठी
जिवन अधिक सुंदर करण्यासाठी
वाचायला लावेन... वाचकांना
बोलते करेन लेखकाला...त्याच्या भावनेला
करीन की संसार..
हाच..
पुस्तकांचा....प्रदर्शनाचा
आहे की नाही हा छान उपद्व्य़ाप !

सुभाष इनामदार, पुणे.
Mob- 9552596276


Monday, March 7, 2011

कोकणावरचा समग्र संदर्भ ग्रंथ साकार

`कोकण विविध दिशा आणि दर्शन` पुस्तकरूपी

सह्याद्रिच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन!
झुळझुळ गाणे,मंजूळवाणे गात वहाती झरे
शिलोच्चयातून झुरूझुरू येथे गंगाजळ पाझरे!

अशा कोकणच्या सौंदर्य प्रदेशावरचे हे काव्य कुणाला मोहित करणार नाही ?
ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकाच्या संपादिका डॉ. लिला दीक्षित यांनी आपल्या भाषणात गेली साडेतीन वर्ष ज्या गंथाचा खटोटोप चालू होता तो वाचकांसमोर सकार होतानाचा आनंद शब्दात असा वर्णन केला.
हा ग्रंथ म्हणजे सामूहिक असा एक अक्षराविष्कार आहे. सर्व अभ्यासकांनी मनापासून सहकार्य केले. भाग्य असे की त्या त्या विषयाला तज्ञ अभ्यासक मिळाले. आणि हे काम उभ राहिले.
चोवीस लेख, दहा परिषीष्ट आणि २४ ग्लॉसी पेपरवर नकाशे, चित्रे, जुन्या नियतकालिकांची मुखपृष्ठे, कोकणच्या विविध नररत्नांचे फोटो. उपलब्ध झोलेली तिकीचे, कोकणाती अप्रतिम मूर्ति वैभव, कोकणचा निसर्ग डोक्यात ठसेल असे नानाविध सुंदर फोटो असा १०८ रेगीत चित्रांचा खजाना यात आहे.
आज माझे मन अत्यंत शांत आणि तृप्त आहे. कोकण माझी मर्मबंधातली ठेव आहे. इथला निसर्ग, पशु पक्षी,झाडे झुडपे, निरव शांतता देणारा समुद्रकिनारा, नारळाच्या विस्तॉत बाला. इथली सुंदर मंदिरे, त्यांचे उत्सव या सा-यांवर माझे नितांत प्रेम आहे.
कोकणचा माणूस अपल्या परंपरेतील संस्कृतीमधील स्वत्व जपणारा आहे.  माझे तेच खरे हा अभिनिवेश त्याच्यात असतो. पण याच त्याच्या जिद्दीने कोकणात कर्तृत्ववान पुरूषांची एक रांग उभी आहे. हा ग्रंथ कोकणविषयी गुंफलेला आहे. प्रादेशिक अस्मिता फुलविणारा किंचिंत स्पर्श असेलही. ` तरीही मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे` ही केशवसुतांची मानसिकता इथे आहे. कोकणचा माणूस भारतीय आहे. अणि भारतीयाची अंतिम ओळख ` विश्वमानव` अशीच असावी. ..
असा भावूक श्बदात डॉ, दीक्षित यांनी पुस्तकाचे मर्म थोडक्यात वर्णन केले.


आता कार्यक्रमाकडे वळताना...
`ठाण्यापासून गोव्यापर्यंत विस्तरलेल्या किनारपट्टीलगत महामार्गाची गरज आहे. तो झाल्याने कोकणाचा आणखी विकास होणार आहे..कोकणाच्या बंदरांचा, जेटींचा विकास झाला पाहिजे. आज कोकण केवळ निसर्गसंपन्न आहे. मात्र राहण्याची चांगली सोय होणे गरजेचे आहे. कोकणाचे समग्र दर्शन घडविण्या-या पुस्तकाची गरज होती. ती `कोकण विविध दिशा आणि दर्शन `या पुस्तकामुळे कांही प्रमाणात पूर्ण झाली आहे. तरीही कोकणाचा खरा विकास ही काळाची गरज आहे. विकासाची गती मिळण्यासाठी आंदोलनाची आज गरज आहे. त्या आंदोलनाचे नेतृत्व करायला आपण तयार असल्याचे माजी केंद्रिय मंत्री मोहन धारिया यांनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरुन जाहिर केले. आपण स्वतः कोकणात जन्मलो. कोकणाचा सार्थ अभिमान आहे. कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर होउ शकतो पण त्या दृष्टीने विकास होण्याची गरज त्यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षपदावरून व्यकत केली.
सोमवरी ७ मार्चला संध्याकाळ कोकणच्या माणसांना सुखावह वाटणारी घटना एस एम जोशी सभागृहात घडत होती. ती म्हणजे कोकणचा समग्र ग्रंथ इथे डॉ. लिला दीक्षित यांच्या संपादकत्वाखालील संदर्भ ग्रंथाचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अद्यक्ष आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्थापनाकार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते २४ लेखकांनी कोकणच्या विविध बाजूवर लिहिलेल्या आणि प्रतिमा प्रकाशनाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होत होते. यानिमित्ताने पुस्तकाविषयी खास पुणेरी परखड मत डॉ. विजय देव यांनी मांडले. असाच पध्दतीवे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा भागांवरही संदर्भ ग्रंथ लिहिण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. हा कार्यक्रम प्रतिमा प्रकाशन आणि कोमसाप या दोन संस्थांच्या वतीने साकार करण्यात आला. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशक अरुण पारगावकर यांचे खास अबिनंदन सर्वांनीच कौतूक केले.
या निमित्ताने कोमसापचा परिचय करून देताना या संमेलनाचा अध्यक्ष निवडला जातो..त्यासाठी निवडणूक होत नाही. याचा संदर्भ देउन मोहन धारिया यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार कोणत्या पध्दतीने होतो आहे..याकडे लक्ष वेधून.. साहित्यिक क्षेत्रात निवडणुकीची प्रथा केवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यात साहित्यिकाला निवडून देण्याची केवढी स्पर्धा चालली आहे याबद्दल खंत व्यक्त केली.
दुसरी खंत मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केली. वास्तविक असे संदर्भमुल्य असणारे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने काढायला हवे होते..पण ते होऊ शकले नाही...

सुभाष इनामदार, पुणे
9552596276
 and




Sunday, March 6, 2011

अभिजात..आश्वासक..अमलताश !


हे निमित्त आहे ते कांही वर्षापूर्वी पुण्यात भावसंगीताच्या क्षेत्रात गाजत असलेल्या सुचेता आणि प्राजक्ता जोशी या दोन सुरेल गायिकेंच्या पुर्नप्रवासाचे... एक संसारानंतर पुन्हा व्यासपीठावर गातेय..त्याच भावूकतेने...हळूवार संवेदनाक्षम सूरात...तर दुसरी सुचेता पुणे सोडून बाहेर पडली..मुंबई नंतर दिल्लीत स्थिरावली.. फिरोदिया करंडकाच्या स्पर्धसाठी तात्काळ रचना करून ह्षीकेश रानडेला गायनाचे प्राईझ देणारी..आणि आता तीच सुचेता आता पुण्यात साकारत होती स्वतः लिहलेल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या समारंभात...आणि तीने संगीत दिलेल्या गाण्यांनाही पुण्यात या निमित्ताने चालीला दाद दिली..पुणेकरांनी आणि संगीत क्षेत्रातल्या मान्य़वरांनी..म्हणून तीच्या कार्यक्रमाची ही दखल..

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
9552596276
--------------------------------------------- 

भावनांशी प्रामाणिक राहून सादर केलेला नवा काव्य-संगीताविष्कार...अमलताश..


शिशिर प्राक्तन घेऊन बनती
 आयुष्याची वळणे दुर्गम,
अशाच वेळी सतेज कांती
घेऊन येतो हा वृक्षोत्तम
देखुन त्याची रूपझळाळी
भविष्यात रे पहा..
सदेव नूतन वेष लपेटी
अमलताश हा पहा !

दुःख, वेदना, निराशा असा नकारत्मक दैवभोगांवर मात करत भविष्याकडे पाहण्याचा आशावादी दृष्टीकोन सूचित करणारा ` अमलताश... ` एक दुर्मीळ वृक्ष .. अभिव्यक्त झाला अमलताश या  कविता-संग्रहातून आणि काव्यप्रेमी पुणेकर रसिकांना एका अभिजीत काव्यनिर्मितीची आश्वासक चाहुल या निमित्ताने लागली.. काव्य आणि संगीत या दोन्ही दृष्टीने एक आगळा कार्यक्रम ऐकण्याची संधी लाभली.

सुचेता जोशी-अभ्यंकर या नवोदित कवयित्रीच्या अमलताश या पहिल्या काविता संग्रहाचे प्रकाशन  २ मार्चला पुण्यात कविवर्य सुधीर मोघे यांचे हस्ते झाले..आणि कवितांवर आधारित सात गीतांचाही कार्यक्रम रंगला आणि थेट पोचला रसिकांच्या ह्दयात.

मूळचा गोड गळा आणि त्यावर झालेले अभिजात संगीताचे संस्कार यातून सुचेता जोशी प्रथमतः एक गुणी गायिका म्हणून रसिकांना भावली. अमृताची गोडी, मी निरांजनातील वात..अशा अनेक रंगमंचीय आविष्कारातून. त्यानंतर विवाहानंतर सुमारे आठ वर्षांच्या कालखंडात संगीताशी जुळलेले हे नाते कसोशिने जपताना . तसेच मुंबई, दिल्लीत वास्तव्य असताना कविमनाच्या सुचेताला एक अनामिक अस्वस्थता बेचैन करून गेली. याच भावविश्वात ती कवितेच्या रूपाने व्यक्त होत गेली. आणि अखेर साकार झाला पुस्तकस्वरूपातला उत्तम आविष्कार स्वानंद प्रकाशनाने साकारले पुस्तकरूपी ` अमलताश`.


`तरीही वसंत फुलतो` अशा आशावादी शब्दातून व्यक्त होणारे कवी सुधीर मोघे यांनी आपल्या प्रस्तावनेत सुचेता बद्दल लिहितात `..वाट्याला आलेलं आयुष्य..त्यातील सगळ्या चढ-उतारासकट जगत राहिली..स्वतःच्या मनाच्या आंदोलनांना धीटपणे सामोरी जात राहिली.. आणि मग आपसुकच कवियत्री झाली.... स्वतःची कवितांची वही घेऊन इतक्या वर्षांनंतर भेटायला आली. ,,तेव्हा मी नवलाईने आणि कौतुकाने न्याहळत राहिलो. अरे ही तर तिच. आपण बारा-तेरा वर्षापूर्वी पाहिलेली..ऐकलेली गुडिया...आज हलके फुलके परिपक्व होत चाललेल्या एका नव्या रूपात आपल्यासमोर बसली आहे... ही गात रहाणार. .ही लिहित राहणार...` आपल्या मनोगतातून त्यांचं भारावलेपण अक्षरशः अनेक वेळा व्यक्त झाले आहे.

कार्यक्रमातही सुधीर मोघे हे न रहावता शेवटच्या गाण्याच्या सादरीकरणाच्या आधी रंगमंचावर आले..आणि सुचेता मध्ये केवळ आश्वासक नव्हे तर संजीवनी मराठे, पद्मा गोळे आणि इंदिरा संत काव्याची परंपरा आसल्याची भावना व्यक्त करून तिच्या भावी आयुष्य़ाला आशिर्वाद देऊन गेले. इतकेच नव्हे..तर तिने असेच लिहित रहावेच पण असे संगीताविष्कार आपल्या कवितांचा सादर करण्याची वाट स्विकारण्याची विनंती केली...हा कार्यक्रम ही त्याची सुरवात आहे.....

सुचेता जोशी-अभ्यंकर हिने आपल्या मनोगतातून बोलताना संगीताला प्रथम प्राधान्य होते.. तरीही नकळत अनेक विषयांचे पडसाद शब्दातून उमटत राहिले. कधी भावनांचा कोंडमारा म्हणून तर कधी भावनांचा विस्फोट म्हणून . असा निर्मितीमधल्या प्रेरणा स्त्रोतांचा धावता आढावा घेतला.
जोशी कुटुंबीयांचे जवळचे स्नेही संजय पंडित यांनी सुचेता जोशी यांच्या  संवेदनाशिल व्यक्तित्वाचा उल्लेख करून त्यांचे संजीवनी मराठे या ज्येष्ठ कवयित्रीशी असणारे साम्यही नमूद केले.

उत्तरार्धात या काव्यसंग्रहातील निवडक सात कविता प्राजक्ता रानडे ( सुचेताची बहीण ) , ह्षीकेश रानडे, अपर्णा केळकर आणि स्वतः सुचेता जोशी यांनी आपल्या स्वराविष्कारातून सादर केल्या. या सर्व संगीतरचना सुचेता जोशी यांच्या होत्या. त्याला संगीत संयोजन लाभले होते ते केदार परांजपे यांचे.. तेवढेच समर्पक.

कौतुकाने जमलेली पुणेकर रसिकमंडळी नकळत या सुंदर, मोहक आणि अभिजात आविष्कारात रंगून गेली होती. घरी जाताना एक काव्य-संगीताना आश्वस्त करणारा कार्यक्रम दिल्याबद्दल सुचेताचे आभिनंदन करीत पुन्हा असा कार्यक्रम कर..आणि आम्ही नक्की तिकीट काढून येऊ असा आश्वासक आशीर्वाद देउन परतली.


ब-याच कालावधीनंतर काहीतरी शुभ्र, नवे, टवटवीत आणि अभिजीत असे उगवू पहात आहे. त्याची जाणीव ठेऊन दिल्लीवरून सुचेताने येऊन वारंवार आपल्या कवीतांचा संगतमय आविष्कार करावा यासाठी हट्ट करून बसणार आहेत.
घोर काननी गर्द त्या वनी
शीळ घालीत मंजूळ वारा
स्तब्ध तरूंवर हळूच चढतो
गूढ अनामिक एक शहारा
गवसत नाही गरी मला तो
मोह बावरा चित्र देखणे
कधी बहरतो कधी आकसतो
चंद्र मनीचा कलेकलेने....

अशा कलेकलेने फुलत जाणा-या काव्यप्रवासाला आमच्या रसिकांच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि त्याची गीतेही ऐकण्याची संधी मिळावी हिच इच्छा.

Thursday, March 3, 2011

महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांची स्मृती लष्करी संग्रहालयात

भारतीय सैन्य दलात ३० रेजिमेंट आहेत. त्यापैकी महार रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंट या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यापैकी महार रेजिमेंट ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून उभारली गेली आहे. त्यासाठी १९२२ ते १९४१ या कालावधीत प्रयत्न करण्यात आले. जुलै १९४१ मध्ये या रेजिमेंट विषयीचा शेवटचा मसुदा डॉ. आंबेडकरांनी दिला. ब्रिटिश शासनाकडून सप्टेंबर १९४१ मध्ये याविषयी आदेश निघाले आणि एक महिन्याच्या अवधीतच पहिली महार बटालियन स्थापन झाली. महार रेजिमेंटच्या २३ बटालियन आज कार्यरत आहेत. महार रेजिमेंटच्या अनेक आठवणी, कागदपत्रे, महत्त्वाचा दस्तऐवज, दुर्मिळ छायाचित्रे, पदके सुधाकर खांबे यांनी या वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवली आहेत. महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांची स्मृती जपणारे पुण्यातील हे लष्करी वस्तुसंग्रहालय मालधक्का चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात ‘सुभेदार धर्माजी खांबे स्मरणार्थ राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय’ या नावाने साकारले आहे. यासाठी त्यांचे चिरंजीव सुधाकर खांबे अथक प्रयत्न करीत आहेत.

या संग्रहालयाच्या माध्यमातून अभ्यासक, कलाप्रेमी आणि संग्राहक यांना मोठे सहकार्य होणार आहे. श्री. सुधाकर खांबे यांनी या लष्करी संग्रहालयात भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटमधील आपल्या पूर्वजांच्या शौर्यगाथेचा इतिहास चित्रमय रूपात मांडला आहे. त्यात रेजिमेंटच्या स्थापनेपासूनच्या विविध प्रसंगांची लष्करी छायाचित्रे, लष्करी अधिकाऱ्यांच्या व सैनिकांच्या वापरातील रुबाबदार पोशाख व कॅप्स, कॅप बॅजेस, शोल्डर बॅजेस, बटन्स, बेल्ट्स, रेजिमेंटच्या स्थापनेपासूनचे कमांडंट, तसेच आपल्या पराक्रमाच्या बळावर शौर्यपदके मिळवून दिलेल्या वीर योद्धय़ांची छायाचित्रे, शौर्यवान व कर्तृत्ववान अधिकारी/ सैनिकांना मिळालेली शौर्य व सेवापदके (मेडल्स), भारतातली आणि परदेशातील वेगवेगळ्या मोहिमेत शौर्य गाजविल्याबद्दल बहाल करण्यात आलेली पदके, सन्मान व प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह, सरसेनापतींच्या हस्ताक्षरातील पत्र, ग्रीटिंग कार्ड्स, सेवापुस्तके, विविध सोहळ्याप्रसंगी काढलेली प्रथम दिवस अनावरण पाकिटे याशिवाय लष्कराशी संबंधित अनेक वस्तू श्री. खांबे यांनी अतिशय परिश्रमाने प्रसंगी भटकंती करून मिळविल्या व तितक्याच समर्पकरीतीने त्यांची मांडणी या लष्करी संग्रहालयात केली आहे.

देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या वीर जवानांचे सदैव स्मरण राहून भारतीय लष्कराची स्मृती चिरंतन राहावी या उद्देशाने या संग्रहालयाची स्थापना केली आहे.

हवालदार राऊ कांबळे १९४७ मध्ये जम्मू-काश्मीर युद्धात शहीद झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठविलेले त्यांच्याच हस्ताक्षरातील सांत्वनपत्र, तसेच सर्वात जुने आणि दुर्मिळ असे १८९० दरम्यानचे मूळ सेवापुस्तक श्री. खांबे यांचे आजोबा (आईचे वडील) यांचे आणि पहिल्या जागतिक युद्धातील १९१७ च्या दरम्यानचे सेवापदक उपलब्ध आहे. तसेच १०९ बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रन्ट्री व नंतर १११ महार बटालियन १९१७ च्या दरम्यान पहिल्या महायुद्धात सहभागी झाले त्यांचे त्यावेळचे सेवापदक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे दुर्मिळ छायाचित्र, १८८० च्या अफगाण युद्धात शौर्य गाजविल्यामुळे पनवेलची जहागिरी व राव बहादूर हा खिताब मिळालेले सुभेदार गंगाराम भातनकर यांचे रुबाबदार छायाचित्र तसेच  पहिल्या जागतिक युद्धात तुर्कस्तान येथे रणांगणावर शहीद झालेले जमादार सवादकर यांचे तुर्कस्तान येथील स्मारक व कोरोनेशन पदक, १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भीमा-कोरेगाव येथील स्तंभास दिलेली भेट तसेच जुलै १९४२ मध्ये कामठी (नागपूर) येथील महार रेजिमेंट मुख्यालयास दिलेली भेट, १९४९ रोजी महार रेजिमेंटच्या २ बटालियनला दिल्ली येथे सहपत्नी दिलेली भेट, महार रेजिमेंटचे १९४५ मध्ये इराक येथील मोहिमांचे चित्र, १९४७ दरम्यानचे फाळणीचे फोटो,

 १९६२ च्या युद्धातील दुर्मिळ फोटो तसेच परमवीर चक्र ते वीरचक्र यांना शौर्य पदके म्हणतात. ही पदक मिळविलेल्या विरांची तसेच परमवीरचक्र, महावीरचक्र, कीर्तिचक्र, अशोकचक्र यांची छायाचित्रे. महार रेजिमेंटचे अधिकारी/ सैनिक यांनी संग्रहालयासाठी दिलेले स्मृतिचिन्ह, मानचिन्ह, मानपत्र त्याचप्रमाणे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची पत्रे व त्यांनी दिलेले अभिप्राय, महार रेजिमेंट असोसिएशन (यूके) येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांचे छायाचित्र व पत्र आदींचा समावेश या संग्रहात आहे.
ले. कर्नल करंदीकर यांच्या वापरातील १९५३ सालातील लष्करी गणवेश, तसेच ब्रिगेडियर बजीना (वीरचक्र) यांच्या वापरातील लष्करी गणवेश, डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषद लंडन येथून (महार रेजिमेंट स्थापनेसाठी प्रयत्न करीत असताना) पाठविलेले त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र, माजी लष्करप्रमुख जनरल के. व्ही. कृष्णाराव आणि जनरल जे. जे. सिंग यांनी पाठविलेली शुभेच्छा पत्रे, काठमांडू (नेपाळ) येथे महार रेजिमेंटकडून मशिनगनचे प्रशिक्षण देतानाचे छायाचित्र, महार रेजिमेंटला मशिनगनचा हुद्दा मिळालेल्या आदेशाचे पत्र, महार रेजिमेंटशी संबंधित वर्तमानपत्रातील कात्रणे, लष्कराच्या विविध महत्त्वाच्या प्रसंगाची ‘प्रथम दिवस अनावरण’ डाक पाकिटे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती व माहिती, महार रेजिमेंटच्या इतिहासाची रेजिमेंटने प्रकाशित केलेली पुस्तके, सी.डी. आणि मासिके , स्वतंत्र महार रेजिमेंट स्थापनेसाठी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला जुलै १९४६ मध्ये सादर केलेला मसुदा हेही येथे पाहावयास मिळतो.

आजपर्यंत या लष्करी संग्रहालयास सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, आजी-माजी लष्करी अधिकाऱ्यांनी तसेच देशी-परदेशी अभ्यासक, इतिहास संशोधक यांनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तसेच तीनही दलांच्या प्रमुख प्रतिभाताई पाटील यांनीसुध्दा या संग्रहालयास भेट देऊन या दस्तऐवजांचे कौतुक केले. या आगळ्या-वेगळ्या राष्ट्रीय व समाजोपयोगी कार्याचे महत्त्व ओळखून ज्यांच्याकडे लष्कराशी संबंधित वस्तू असतील तर त्यांनी या संग्रहालयाच्या वाढीसाठी देणगी म्हणून द्याव्यात, अशी विनंती या संग्रहालयाचे संस्थापक सुधाकर खांबे यांनी केली आहे.
दुर्मिळ लष्करी वस्तू व  दस्तऐवज जतन करून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. युद्ध व आपत्कालीन समयी आपल्याला सैनिकांची व लष्कराची आठवण होते. त्या संकटसमयी आपण त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वतोपरी मदत करतो. कालांतराने सर्वानाच त्यांचे विस्मरण होते. पुणे मनपाने या संग्रहालयाची भरभराट होण्याच्या दृष्टीने आर्थिक आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सुधाकर धर्माजी खांबे (वय ५८ वर्षे) हे सेवायोजन कार्यालयात (एम्प्लॉयमेंट एक्सचेंज) रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना त्यांच्या तीन पिढय़ांचा लष्करी वारसा लाभल्यामुळे त्याचा त्यांनी संग्रहालयाच्या उभारणीत पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. ऐतिहासिक महत्त्वाच्या दुर्मिळ लष्करी वस्तू संग्रहित करणे अशक्य असूनसुध्दा त्यांनी ते साध्य केले आहे. त्यांना वडिलांकडून संग्राहक वृत्तीचे बाळकडू मिळाले असल्यामुळेच त्यांनी या लष्करी संग्रहालयाची उभारणी केली. हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लष्करी संग्रहालय व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या लष्करी वस्तुसंग्रहालयाची उभारणी सुधाकर खांबे यांनी आपली शासकीय नोकरी सांभाळून केली आहे. त्यांच्याकडे महार रेजिमेंट संबंधित २५० च्या आसपास मूळ फोटो असून या व्यतिरिक्त भारतातील इतर रेजिमेंटची प्रथम दिवस अनावरणाची ३५० पाकिटे आहेत.

दयानंद ठोंबरे
nand.tho@gmail.com


http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140386:2011-03-03-18-17-43&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212