श्रीखोल या वाद्याबरोबर तबल्यानं ताल धरला, तेव्हा रसिकांना दोन्ही वाद्यांच्या ताकदीचा अंदाज आला. प्रत्येक तालावर रसिकांच्या टाळ्या पडत होत्या आणि या टाळ्यांचे मानकरी होते, शुभांकर बॅनर्जी आणि गोपाळ बर्मन हे दिग्गज कलाकार. सुरांमध्ये प्रेक्षक रंगून जातात, तशीच ताकद वाद्यांच्या तालांमध्येही असते, हे या दोघांनी 'डमरू तालवाद्य महोत्सवा'च्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केले.
' महाराष्ट्र टाइम्स' आणि बँक ऑफ महाराष्ट्र प्रस्तुत 'डमरू- द ड्रम फेस्टिव्हल ऑफ इंडिया' हा तीन दिवसीय महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला. प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे 'ग्लॅड पीपल' आणि 'तालचक्र' हे संयोजक आहेत. कवेर्नगर येथील महालक्ष्मी लॉन्सवर हा तीन दिवसीय महोत्सव पुणेकरांसाठी यादगार ठरणार हे नक्की. या महोत्सवातून जगभरातील सुमारे २४ तालवादक एका रंगमंचावर येणार आहेत!
पं. कुमार बोस, पं. सुरेश तळवलकर, पं. अनिंदो चॅटर्जी आणि विद्वान विख्खू विनायक यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं शुक्रवारी उद्घाटन झालं. शुभांकर बॅनर्जी आणि गोपाळ बर्मन यांच्या श्रीखोल-तबला जुगलबंदीनं महोत्सवाची झोकात सुरुवात झाली. तब्बल एक तास रंगलेल्या या मैफलीत रसिक इतके रंगून गेले होते, की त्यांच्याही अंगात तालांची जणू जादूच भिनली होती!
या जुगलबंदीनंतर प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चॅटर्जी आणि त्यांचे शिष्य रूपक भट्टाचार्य यांच्या सत्रानेही महोत्सव रंगतदार केला. स्टार ड्रमर रणजित बारोट यांच्या ड्रमरने तर अक्षरश: तोडलेच!
येत्या रविवारपर्यंतचालणाऱ्या महोत्सवामध्ये तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी, शिवमणी, पखवाजवादक पं. भवानी शंकर, पं. कुमार बोस, घट्टमवर मास्टरी असलेले विख्खू विनायकराम आणि खंजिरा मास्टर व्ही. सेल्वा गणेश या कलाकारांचे सादरीकरण पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10011768.cms