subhash inamdar

subhash inamdar

Thursday, September 24, 2020

पुरूक्रमा..कलाजीवनाची संगीतमय वारी .

 


पुरुषोत्तम बेर्डे

30 June 2019

मुंबईच्या कामाठीपुराच्या शालेय जीवनापासून ती सुरु होते आणि एकेकाळचा कामाठीपुरातला वर्गमित्र शामाच्या आठवणीपर्यत टिपत रहाणारा हा एका कलावंताच्या आयुष्यातील कालखंड ऐकणे म्हणजे पुरूक्रमा.
पुरुषोत्तम बेर्डे यांच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता,संगीतकार, नाटककार ,प्रकाशयोजनाकार ,वेशभूषाकार आणि चित्रकार आशा विविध भूमिकात केलेली सर्जनशील कामगीरी यातून बेर्डे फिरवून आणतात.. तुम्हाला तुमच्या आत डोकवायला भाग पाडतात. कलाकृती सादर करताना होणारी प्रसववेदना आणि त्याच्या परिपूर्णतेतून होणारा मूक आनंद व्यक्त करण्याची पुरूषोत्तम बर्डे यांची ओळख या एकपात्री प्रयोगातून अधिक रसिकांच्या मनात भारून राहते.
आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडाची एकपात्री सफर ऐकताना सहाजिकच आपण अनेक टप्प्यावर मधुमधुन स्थारावतो.. त्यांचा संगीतमय आविष्कार एकतो.. त्यावेळचे कांही किस्से सनात साठवून घेतो..
कधी निलेश पाटील यांच्या निसर्गातील कव्याचा आस्वाद घेतो. तर जाऊबाई जारात नाटकाच्या निमित्ताने सोळा अभिनेत्रींच्या कसरतीतीून तावून निघालेल्या आठवणीत रमतो. आणि निर्माता दिलिप जाधव यांनी जाऊ बाईच्या एकहजाराव्या प्रयोगाच्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे यांना भेट दिलेल्या फोर्ड आयकॉनच्या अनोख्या भेटीला दाद देतो.



तर दूरदर्शनवर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करताना बातम्यांच्या मागे चुकून फ्लोअरचे दार उघडे राहािल्याने बेर्डे यांच्या शिट्टीने बातमीपत्रात होणारा गोंधळ लक्षात ठेवतो.






चित्रकाराच्या दुनियेची ओळख करून देणा-या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतल्यानंतर लिहलेल्या आणि त्याची निर्मिती केलेल्या टूरटूर या एकांकिकेपासून बेर्डेंची कला कारकार्द सुरु झाली. आणि रंगभूमिवर व्यावसायिक जबरदस्त यश दिलेल्या याच नाटकाने पुरुषोत्तम बेर्डे यांना नाव दिले. सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, प्रशांत दामले, विजय पाटकर ही नावे रंगभूमिवर स्थीरावली . याचे सारे श्रेय बेर्डे यांचेकडे जाते.

हमाल दे धमाल मधून त्यांनी चित्रपट रसिकांचे लक्ष वेधले. त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्य़ातून त्यांना अनिल कपूर यांची कशी मैत्री झाली. रजनिकांत, दिलिपकुमार यांनीही कसे स्वागत केले . आदरणीय दादामुनी अशोक कुमार यांनी दिग्दर्शक म्हणून कसे स्विकारले.. सारेच क्षण ऐकणे म्हणजे पुरुक्रमा करणे होय.
बालपणाचा काळ कामाठीपूरात कसा गेला..ते ये जीवन है..सांगणारे गाणे दाखवत त्यातून होणारे संस्कार कसे आपल्यातील गुणांना वाव देणारे ठरले ते पहाणे मजशीर आहे. गणीताच्या लोखंडे सरांचा मार टाळण्यासाठी खिडकीतून घेतलेले गाढवाचे दर्शन. हा अवघड विषय टाळण्यासाठी घेतलेला संस्कृत विषय..विविध कलांची लहानपणी झालेली ओळख.. सारेच या पुरुक्रमात ऐकता येते.
आपल्या आयुष्य़ात चुलचभाऊ लक्ष्मीकांत बेर्डे याचा सल्लागार आयुष्यात झालेला उपयोग ते व्यक्त करतात.
मोजक्या लोकांच्या संगतीत आपल्या कारकीर्दीचा हा आलेख अधिक व्यापक होतो. कलेच्या सर्व प्रांतात भ्रमंती करताना पुरूषोत्तम बर्डे यांना कसे अनुभव आले. निर्मिती सावंत पासून मकरंद अनासपुरे यांच्या पर्य़त अनेक नवोदितांना संधी देताना त्याना आलेला अनुभव. आता ते चित्रकाराच्या भुमिकेतून कसे नेमके टिपण करतात तेही कावळयांच्या तिक्ष्म नजरेतून ते आपल्या चित्रातून समाजविदारक गाष्टी मांडतात तेव्हा त्यांची सर्जनशील कलावंताची पारखी नजर स्तिमित करते.
मंगलगाणी दंगलगाणी, झपाटा अशा वाद्यवृंदांनाही आपल्या कलेच्या नजरेचा बहाल करून त्यांनी रंगभूमिवर दिसताना कलेने कलाकाराने कसे देखणे दिसावे याचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
पारखी नजर. साहित्याची आवड. अभिनयाची जाणीव. संगीताची जाण. दिग्दर्शनाची ताकद. आणि चित्रातून उभी रहाणारी कलाकृती प्रत्यक्ष कशी असावी याचे भान असणारे पुरुषोत्तम बेर्डे यांना पुरुक्रमातून अनुभवणे एक आनंदाचा ठेवा आहे.
हा आनंदाचा ठेवा अनुभवण्यासाठी गेलो असता.. पुरूषोत्तम बैर्डे यांचेसमवेत ..अरूण घाडीगावकर,सुभाष इनामदार



पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरुक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग पाहताना या आमच्या जुन्या मित्रत्वाची आठवण जागी झाली. पुरुषोत्तम बर्डे यांच्या या आगळ्या आत्मकथेची रसिकांनी सवार्थाने दखल घेऊन त्या कालखंडाची साेनेरी पाने आपल्याही मनात साठवून ठेवावी हेच सांगणे.



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

30 June 2019

तुमचा विसर न झाला..डॉ. विजय देव

 

डॉ. विजय देव



पुण्याच्या श्रद्धांजली सभेत बहुआयामी व्यक्तित्व उलगडले..

24 April 2019

सुख दुःखाच्या प्रसंगी सामोरे जाताना डॉ. विजय देव सरांकडे सकारात्मकतेने पहाण्याचा जो उमदेपणा होता तो फार कमी लोकांच्याकडे असतो. आपल्या अस्तित्वाचा आनंद आपल्या भोवतालच्या लोकांना व्हावा असे त्यांचे जगणे होते. ते गेल्याने आपल्या साऱ्या लोकांचा जगण्याचा एक श्वास कमी झाला. त्यांच्या जाण्याने कुटुंबात, समाजात रिकामी जागा निर्माण झाली आहे ती पुन्हा भरून येणे शक्य नाही. आपण सारे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असा विश्वास या परिवाराला देऊ..अशी भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढरे यांनी व्यक्त केली.
राज्यशास्त्राचे अभ्यासक, दुर्ग साहित्य संमेलनाचे जनक, उत्तम कथावचक, आणि समाजाला नवे आणि वेगळे काही देण्याची उर्मी असणारे लोकप्रिय प्राध्यापक डॉ. विजय देव यांच्या निधनानंतर रविवारी २१ एप्रिलला पुण्याच्या स. प. महाविद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. अरुणा ढेरे बोलत होत्या.

ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत व्यासपीठावर अरुण फिरोदिया, शि. प्र. मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि अरुणा ढेरे होत्या.डॉ. देगलूरकर म्हणाले, देव सर ज्ञानी होते, विश्वासू होते, सात्विक होते, संवेदनशील होते. ते कुठेही आधार असल्याशिवाय आपले मत मांडीत नसत.

यानिमित्त देव सरांच्या आठवणींचा पट इथे उलगडला गेला.. यातून विजय देव काय होते आणि ते कसे समाजाच्या साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि कुटुंब यातून ते कसे होते ते समोर आले.. आणि आपण नेमके काय गमावले याचे भान आले.

उत्तम प्रध्यापक, उत्तम लेखक वक्ते , गडांविषयी उत्तम जण याबरोबरच उत्तम समाजचिंतक म्हणून देव सर आपणाला अधिक भावल्याची भावना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केली.
संस्थात्मक काम करताना अपमान सोसावे लागतात पण त्यांना बळ देणारे देव सर नाहीत याची उणीव सतत भासणार असल्याचे ते म्हणाले. तरुणांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्थायीभाव होता.
दुर्ग साहित्य संमेलन हा साहित्यामध्ये सुरू झालेला नवा प्रवाह देव यांनी सुरू केला. सरांनी मोजके लिहिलंय पण पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल असे लिहिल्याचे मिलिंद जोशी आवर्जून सांगतात.

बाबा अतिषय मनापासून त्यांचे जीवन जगले आणि असं जीवन जागायचे असते हे आम्हा दोघींना त्यांनी शिकविले.. देव यांची कन्या ,अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल देव- कुलकर्णी आपल्या वडीलांविषयी बोलत होत्या.
कायम त्यांनी आम्हाला सांगितले की, अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे जाऊन काही काम करा. केवळ स्वतःचा नाही पण इतरांचाही विचार करा. त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीत सामील करून घ्या, हीच त्यांनी दिलेली सगळ्यात मोठी शिकवण आहे, असे त्या म्हणाल्या. आनेक गोष्टीत रस घेणे आणि त्यात रमणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी चिकाटीने, धाडसाने कॅन्सरला तोंड दिले. अतिशय हळव्या भावनेने मृणाल व्यक्त होत होती.

बावन्न वर्षांचा हा सुखी संसार आज संपला या शब्दात आपल्या भावना सांगत विजय देव यांच्या पत्नी डॉ. वीणा देव आपले मन मोकळ्या करत होत्या.
राज्यशास्त्र, मराठी, नाटक, संगीत यांच्या सोबतीनेच आमचा संसार सुरू झाला. कलाप्रेम दोघांकडून जपले गेले. ते स्वतः कलाकार. नव नवे उपक्रम करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यासाठी सतत मोठी ऊर्जा त्यांच्यापाशी होती. उपजत कलाकाराची वृत्ती, लोकनृत्य, कथाकथन आणि संगीत या सगळ्यांना पोषक वातावरण आम्ही एकमताने, आनंदाचे जिवंत ठवल्याचे त्या सांगत होत्या. वडील कसे असावेत याचा आदर्श माझ्यापाशी आप्पांच्या रूपाने होता. दुसरा आदर्श त्यांनी निर्माण केला .जितक्या आवडीने ते राज्यशास्त्र शिकवायचे तितक्याच आवडीने ते कादंबरीवाचन करायचे. आम्हा सगळ्यांचे मायेचे छत्र गेले पण तुमच्या मनात बाबांच्या विषयीचे प्रेम जिव्हाळा आहे, अतिशय भावुक होउन वीणा देव प्रकट होत होत्या.

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने मोहन शेट्ये यांनी ,दुर्ग साहित्य संमेलनाची भन्नाट कल्पना त्यांनी तेवढ्याच ताकदीने यशस्वी केली. बहुआयामी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत.. सदैव प्रसन्न रहाणे . जो वसा वारसा आहे तो पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले.

सप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संज्योत आपटे यांनी.. देव सरांच्या सोबत दोन पुस्तकांच्यासाठी काम करण्याचे भाग्य लाभले. त्यामुळेच त्यांचे राज्यशास्त्राचा व्यासंग, चिंतन आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व याचे आपणाला जवळून दर्शन झाल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

अभिरुप न्यायालय, अभिरुप संसद, गडावर जाणे आणि तिथला सगळा इतिहास सरांकडून ऐकणे ही मेजवानी असायची, असेही त्या म्हणाल्या. सर विद्यार्थ्यांत रमायचे. विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिदू होता. प्रत्येक विद्यार्थ्यांना काहीतरी गुण असतात ते समजून त्याला प्रोत्साहन देत.

सपच्या मानसशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. अलका देव यांनी देव यांच्यावर एक कविता करून आपल्या भावना वाचून दाखविल्या.
देवघराची यशोगाथा उजळू दे आंबरी..
मनी ठेवुनी एक आस ही विजयश्री गेले देवाघरी..
विद्यार्थी या नात्याने बबन मिंडे यांनी आपल्याला बाबांनी कसे मार्गदर्शन केले हे सांगून त्यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन आता मिळणार नाही याची हळहळ व्यक्त केली.

योगवर्गातले स्नेही अरुणभाई शहा श्रद्धांजली वाहताना म्हणाले, त्यांचा सोशिक स्वभाव, कोणावर टीका नाही असा होता .
जयप्रकाश सुराणा सांगतात, बारा तेरा वर्षे आम्हाला दर रविवारी सिंहगडावर जाताना चार तास साधूसारखा
त्यांचा सत्संग लाभला. दोन तीन वेळा मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ती पूर्णही केली. हे वेगळेपण माहीत करून दिले.
ज्ञान मार्गाचे ते साधक होते, त्यातूनच त्यांचा सारा विकास होत गेला असावा असे लेखक भरत सासणे सांगतात. रसिक आणि आनंदी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते म्हणायचे प्रेम हा पाचवा पुरुषार्थ आहे आणि तो प्रत्यकाने मिळवायला हवा . त्यांनी तो साधला होता आणि ते आपल्या वागण्याबोलण्यातून प्रेम पसरवीत होते.

उमदे व्यक्तिमत्व, प्रसन्न हास्य, प्रभावी अध्यापक, समाजमनस्क मन आणि खेळकर लोकव्यवहार या पाचिचे मिश्रण म्हणजे विजय देव असे न. म. जोशी यांनी देव यांचे वर्णन केले.
उद्योजक आणि स्नेही अरुण फिरोदिया म्हणाले,
अशा काही व्यक्ती असतात त्यांना जाणीव असते आपले पृथ्वीवरचे कार्य संपले आहे. आता आपण दुसरीकडे अनंतात विलीन व्हायचे. असे भाग्यवान असतात त्यातले देव होते.
पंचायतीला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या पूर्ण अधिकार बहाल करण्याचा कायदा लोकसभेत मंजूर होणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत फिरोदिया यांनी मांडले.

दुर्ग म्हणजे केवळ इतिहास नाही तर ती एक परिसंस्था आहे. त्यात इतिहासाबरोबर,पर्यावरण, निसर्ग आहे, तो समाज आहे. तिथे रहाणारे वस्ती वाड्यातले लोक आहेत. त्यांची वेशभूषा, खाद्यसंस्कृती, इथली गुरे, पिके, शेती, खाली हवा, पाणी हा सर्व त्या दुर्गाचा एक भाग आहे.. अशी संकल्पना देव यांनी मांडली. या संकल्पनेला व्यासपीठ देण्याचे काम गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाने केले. त्यांची ही संकल्पना तो विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत या मंडळाचे अभिजीत बेल्हे यांनी व्यक्त केले.

दुर्ग साहित्य संमेलन ही एक छान संकल्पना ते महाराष्ट्राला भेट देऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यात माणसे उभी करण्याची ताकद होती. गड या विषयातले ते विद्यापीठ होते ,असे बेल्हे म्हणाले. त्यांचा वारसा आम्ही पुढे नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाविद्यालयात देव सरांनी सुरू केलेले , संकल्पना राबविलेलले उपक्रम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे वचन सपचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी दिले.

दिलेल्या अभ्यासक्रमा शिवाय विद्यार्थ्याना मनापासून देणारा हा प्राध्यापक होता. शिक्षण प्रसारक मंडळींचे ते वैभव असल्याचा अभिमान शिप्र मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्या महाविद्यालयात डॉ. विजय देव यांनी प्राध्यापकी केली आणि प्राचार्य पद भूषविले या ठिकाणी शेकडो सुहृदांच्या साक्षीने झालेल्या श्रद्धांजली सभेचे संचालन स्नेहल दामले यांनी केले .



-सुभाष इनामदार .
subhashinamdar@gmail.com

24 April 2019