नावाजलेल्या तब्बल ४५३ संगीतकाराचा समावेश असलेला कोश तयार झाला आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात योगदान देणाऱ्या या संगीतकारांवर अशा प्रकारचा कोश प्रथमच तयार झाला आहे. त्याचे प्रकाशन प्रभाकर जोग, अशोक पत्की आणि आनंद मोडक या तीन संगीतकारांच्या उपस्थितीत शनिवारी झाले.
प्रतीक प्रकाशनातर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी कोशाचे लेखक मधू पोतदार आणि अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे उपस्थित होते. पत्की म्हणाले, 'कोश तयार करणे हा कटकटीचा विषय आहे. पण, तो पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. इतिहास समजण्यास कोश उपयोगी ठरतात.''
मोडक म्हणाले, 'ध्यास, कामावर निष्ठा आणि उत्तमतेची निष्ठा असेल तरच असे कोश तयार होऊ शकतात. कोश काही वर्षांत तयार होत नसतात, त्यासाठी आयुष्य वेचावे लागते.'' पोतदार म्हणाले, 'एका-एका संगीतकारावर पूर्ण ग्रंथ लिहावा, इतक्या ताकदीचे कलावंत मराठी चित्रपटसृष्टीत होऊन गेले. त्यांची दखल योग्य वेळी घ्यायला हवी.''