subhash inamdar

subhash inamdar

Sunday, October 9, 2011

सावळ्या घना....`सुवर्णस्पर्शी`

सावळ्या घनातून सूरेल साद घालणारी सुवर्णा माटेगावकर

गायक कलावंताची प्रतिभा उमलते ती त्याच्या स्वतंत्र मैफलीतून. खुलते रसिकांच्या प्रतिसादातून. जेव्हा त्याचे सादरीकरण होते तेव्हा तो सूरही अंर्तमनाला स्पर्शून जातो. नेमके असेच काहीसे पुण्याच्या सुवर्णा माटेगावकरांच्या सावळ्या घना या आठ मराठी गीतांच्या अल्बमच्या सीडी अनावरण सोहळ्यात घडत गेले.

गेली कांही वर्ष हेच नाव तुम्ही रसिकांच्या मनावर कोरलेल्या, अधिराज्य करणा-या समर्थ गायकांच्या, संगीतकारांच्या रचना सादर करताना टाळ्यांच्या गजरात ऐकले असेल. पण ९ आक्टोबरची रविवारची सकाळ मात्र पुण्यातल्या रसिकाजनांना आपल्या स्वतंत्र गायकीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे ती जाहिरपणे सांगत होती.. अभिमानाने..

आणि सीडीतली एकेक गाणी सादर करून रसिकांच्या उस्फूर्त दाद घेऊन हे सूर खरचं `सुवर्णस्पर्शी` बनल्याची पावती देत सभागृहाभर फिरत होते. वय वर्षे अवघे ९७ असलेले दाजीकाका गाडगीळ यांच्याकडून वाकून आशीर्वाद घेताना सुवर्णाला धन्य वाटले असेल...

रंगमंचावर ज्यांनी ही सीडीतली गाणी संगीतबध्द केली ते अवघे ७० वर्षाचे तरुण संगीतकार अशोक पत्की. ज्यांच्या हस्ते सीडीची चंदेरी पेटी उघडली गेली त्या गायिका देवकी पंडीत. वेगळ्या वाटेने जाताना परंपरेचे जतन करुन तरूणांना वाव देणारा संगीतकार आनंद मोडक. कल्पक संगीतसंयोजक आणि संगीतकार आणि आगामी मराठी चित्रपटाचा निर्माता स्टुडिओ DWAN चा सर्वेसर्वा नरेंद्र भिडे. फाउंटन म्युझिकचे कांतीभाई ओसवाल. पडद्यामागचे सूत्रधार पराग माटोगावकर आणि आजची उत्सवमूर्ती जिने स्वतंत्र प्रतीभेचा सूर नवीन रचना गावून केला ती सुवर्णा...

मागे सावळ्या घनाचा रंगमंच भारुन टाकणार बॅनर. आणि एकेक करून सूत्रसंचालक संदीप कोकीळ यांच्या सूचनेनुसार आपल्या सूरांबरोबरच शब्दांतून व्यक्त होत जाणारे कलाकार... इतर गायकांची सहीसही नक्कल करुनही तो अस्सल आवाज पेश करुन टाळ्यांची दाद मिळवीत संगीत रसिकांना खुश करणारी गायिका सुवर्णा मात्र आपल्या वेगळ्यावाटेने जाणा-या स्वतःच्या स्वतंत्र सीडीच्या प्रकाशन सोहळ्यात पैठणीतून स्वर मिरवत यापुढची कारकीर्द आता मी स्वतंत्रपणे करणार आहे याची खात्री देत होती.

वैभव जोशी आणि संगीता बर्वे या कवींच्या शब्दांनी भारलेला हा पाऊस..वगवगळ्या वाटेवर या सीडीत भेटतो. कधी नटखट कृष्ण बनून..तर कधी राधेच्या प्रेमळ स्वरस्पर्शात...कवीतेला गीत होताना स्वरातून तो हळवा शब्द जेव्हा सूरांनी बाहेर उमटतो ते पाहण्याचे भाग्य लाभलेले हे दोन्ही गीतकार- कवी. त्यांच्यातल्या प्रतिभेला ओळखले आणि जाखले संगीतकार अशोक पत्की यांनी. आणि त्यावर सूरांचा सुवर्णस्पर्श चढविताना स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली ती सुवर्णा माटोगावकरांनी. साराच प्रवास रंगमंचावर एकेक कलावंत उलघडत होता...तो पाहणेही मनोरंजक ठरेल.

कलाकार म्हणून जेव्हा स्वतःचे स्वतंत्र गाणे गायला मिळते हा आनंदाचा ठेवा सुवर्णाच्या आयुष्यात आज आला याचा आनंद व्यक्त करताना देवकी पंडीत यांनी ,`स्वतःचा फर्स्टहॅंड अनुभव..अविस्मरणीय असतो...यातून स्वतःचे गाणे मिळते. कलाकाराला ते फार मोलाचे असते.` अजून सुव्रर्णाने नवीन गाणी गायला हवीत असे सांगताना देवकी पंडीत यांनी रसिकांना मुद्दाम म्हटले तुम्ही नवीन गाणी मोकळेपणानी ऐका ..


सुवर्णाच्या आवाजात शब्दातले भावविश्व उलगडणायचे सामर्थ्य आहे..तिने गाणी अतिशय सुंदर गायली आहेत. प्रत्येक गाण्यात तिने जीव ओतला आहे. सावळ्या घना ....शंभर वर्षाने असे गाणे तयार होते ते सावळ्या घनाच्या रुपाने आल्याचे अभिमानाने संगीतकार अशोक पत्की सांगतात तेव्हा यात वैभव जोशी आणि सुवर्णा माटेगावकर दोघांचाही न कळत सत्कार होतो.

स्वतःला शोधायची ही संधी आहे. ती सुवर्णाला या सीडीच्या निमित्ताने मिळाली आहे. त्यातून तिच्या स्वतःच्या प्रतिभेचा स्पर्श झालेला दिसतो असे आनंद मोडक सांगतात.
माझ्या स्वतःचा हा प्रवास खूप महत्वाचा आहे. आता मला जबाबदारीची जाणीव होतीय. संगीतकार अशोक पत्कींबरोबर काम करण्याचे भाग्य मिळाले याचाही आनंद आहे. आज आपल्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा दिवस असल्याचे सांगताना ती गुरु, आई-वडील यांचे ऋण व्यक्त करायला सुवर्णा माटेगावकर विसरल्या नाहीत. यापुढच्या प्रवासाला आपल्या आयुष्यात फार महत्व आहे...आता तो प्रवास अतिशय महत्वाचा आहे....

एका कलावंताला घडताना पाहण्याइतके दुसरे काहीही आनंददायी नाही... अनेक हिंदी-मराठी कार्यक्रमातून दुस-यांनी म्हटलेली गाणी म्हणताना पाहिल्यानंतर स्वतःच्या सीडीतून नवीन गीतांना सादर करताना तिच्यातल्या कलावंतांची ती परिक्षा होती...सुवर्णा त्या परिक्षेत उत्तम गुण मिळवून पास तर झालीच पण अनेक रसिकांच्या मनातही ठसली हेच तर सारे वेगळेपण...

नागपुरहून पुण्यात आलेली...नवखी मुलगी आपल्या सूरांच्या साथीने स्थिर झाली. स्वतःच्या मेहनतीने गायीका बनली.. स्वतःची वाट शोधत गीतकार-संगीतकार आणि वितरक लाभले आणी सीडी तयार झाली सावळ्या घना..

आज तीला स्वत्व सापडले.....खूप खूप शुभेच्छा.....सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276