subhash inamdar

subhash inamdar

Friday, February 11, 2011

सर्वाधिक गायक, वादक आणि चित्रकार पुण्यामध्ये

पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक गायक, वादक आणि चित्रकार राहत असल्याची माहिती भारतीय कला मंचाने कलाकार डायरीसाठी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

पुण्यासह राज्याच्या विविध भागात राहणारे शास्त्रीय, सुगम संगीत गायक, वादक, कवी, लेखक, चित्रकारांपासून कार्यक्रमांचे संयोजक, निवदेक यांची माहिती देणारी 'कलाकार डायरी' भारतीय कला मंच गेल्या अकरा वर्षांपासून प्रसिद्ध करीत असून त्यांच्या आता तब्बल आठ हजार कलाकारांच्या माहिती संग्रह तयार झाला आहे. यात अभिनेते, नर्तक, लोककला सादर करणारे कलाकार, वाद्य दुरुस्ती करणारे, सन्मानचिन्ह तयार कारागिर, संयोजक, समीक्षक, नाट्यगृह, कला संस्थांची माहिती देण्यात येते.

सुरुवातीला केवळ पाचशे कलाकारांच्या माहितीने सुरू झालेली ही डायरी आता आठ हजार कलाकारांपर्यंत पोचली असून, यात सर्वाधिक कलाकार पुण्यात राहत असल्याचे दिसून आले आहे. कलाकारांचे विभागणी केली, तर ७० टक्के गायक, वादक, चित्रकार आणि शिल्पकार पुण्यातच वास्तव्यास आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, नृत्य कलाकार मुंबईमध्ये सर्वाधिक आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये त्यांची खूप कमी संख्या आहे, अशी माहिती भारतीय कला मंच संस्थेचे प्रमुख धनंजय देशपांडे यांनी दिली.

अनेकांना आपल्या घरी, सोसायटीत अथवा संस्थेत विविध उपक्रमांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम करायचे असतात. पण त्यांना संयोजनाचा अनुभव नसल्याने कलाकार कुठे राहतात, त्यांच्याशी संपर्क कसा साधावा, कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे, याबद्दल गोंधळ होतो. सर्वसामान्यच नव्हे, तर मोठमोठ्या संस्थांही याबाबत फारशी माहिती नसते, अशा व्यक्तींना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. बालकलाकारांपासून ते ज्येष्ठ कलाकारांची माहिती दिली जाते.

या वषीर्ही मार्चमध्ये डायरी प्रसिद्ध होणार असून, कलाकारांनी आपली नावे आणि संक्षिप्त माहिती नाव पत्यासह लिहून भारतीय कला मंच, २३, स्वप्नशिल्प अपार्टमेंट, डॉ. भगली शेजारी, सिंहगड रस्ता, पुणे : ५१, फोन ९४२२३०४३४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.