subhash inamdar

subhash inamdar

Monday, September 24, 2012

सतार आणि जलतरंग वादनाची जुगलबंदीश्री गणेशोत्सव मंडळातर्फे सतारवादक समीप कुलकर्णी आणि जलतरंगवादक मिलिंद तुळणकर यांची जुगलबंधी युनायटेड वेस्टर्न सभागृहामध्ये जोरदार रंगली. पाण्यावर उमटणारे सुरांचे तरंग आणि २० तारांमधून उमटणारे सतारीचे सूर यांची सांगड भारतीय शास्त्रीय संगीतातून घालण्याची वेगळ्या प्रकारच्या कार्याक्रमाची संकल्पना समीप कुलकर्णी यांची होती. 

 

कार्यक्रमाची सुरुवात जलतरंगवर राग किरवाणी मधील एका रचनेने झाली. त्यानंतर नुकताच जपान दौरा गाजवून आलेल्या समीप कुलकर्णी यांनी राग यमन मध्ये शांत व मनमोहक आलापीने रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या. त्यानंतर सतार व जलतरंग या दोन्ही वाद्यांवर जोड आणि झाला दोघांनी एकत्र वाजवला. त्यानंतर दोघांनी ताल रूपक, मध्य तीनताल, द्रुत तीन ताल आणि अति द्रुत तीनताल मध्ये चार बंदिशी सादर केल्या.  

सूर आणि तालावरील कमालीच्या प्रभुत्वाची रसिकांना अनुभूती आली. कुलकर्णी यांची ही ६३२ वी मैफिल होती, भारताबरोबर या आधी अमेरिका, युरोप, जपान, सिंगापूर, थायलंड, जपान अशा अनेक देशात त्यांनी मैफली गाजवल्या आहेत. 
व्यवसायाने आयटी इजीनियर असलेल्या कुलकर्णी यांनी हॉलीवूडच्या दोन चित्रपटात वादन पण केले आहे. 
तुळणकर यांनी भारत, कॅनडा, अमेरिका, दुबई अशा अनेक देशात सतार व जलतरंगच्या जुगलबंधीचे कार्यक्रम गाजवले आहेत. 
राग यमनमध्ये सतारीवर 'जब दीप चले आना', 'आज जाने कि जिद ना करो', 'जिंदगी के सफर रंग लाते है' अशा हिंदी गीतांनी कार्यक्रमामध्ये रंगत आणली. 
कार्यक्रमाचा शेवट समीप कुलकर्णी यांनी राग दरबारी मध्ये फ्युजन सादर करून केला. 

कार्यक्रमाला तबल्याची साथ गणेश तानवडे आणि ड्रम्सची साथ योगेश वाघ यांनी केली.

Monday, September 17, 2012

गुरुची नक्कल टाळा- सईदुद्दीन डागर
शनिवारी झालेल्या डॉ. प्रभा अत्रे यांच्या ८१ व्या सत्कार सोहळ्याच्या पाठोपाठ 'गानवर्धन' आणि 'तात्यासाहेब नातू फाउंडेशन'च्या वतीने दिला जाणारा 'स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार'  तरुण आणि शास्त्रीय संगीत पुढे नेणारा तडफदार गायकाला दिला जाणारा पुरस्कार सोहळाही रविवारी टिळक स्मारक मंदिरात असाच रंगला..यंदा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा शिष्य आणि बालगंधर्व चित्रपटाने बहुचर्चीत झालेला गायक आनंद भाटे यांला तो सन्मानपूर्वक डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या हस्ते दिला गेला.
पुरस्कार सोहळ्यानंतर आनंद भाटे यांनी सादर केलेला राग पूरिया कल्याण आणि त्यानंतरची विलंबित बंदिश ऐकून श्रोत्यांना काही काळ पंडितचींच्या गाण्य़ाचा या कलावंतात स्पर्श असल्याची जाणीव झाली.. आनंद भाटे यांची शास्त्रीय संगीतातील तयारी आणि त्याची स्वरांची बैठक तेवढीच बोलकी असल्याचे रसिकांना मनोमन पटले...किराणा घराण्याच्या अभ्यासू ..विचक्षण अशा गायनाने संपन्न असा डॉ. प्रभा अत्रे यांनीही आनंद भाटेच्या गायनाला तन्मयतेने दाद दिल्याचे रसिक अनुभवित होता..

बसंत रागातल्या काही बंदिशी सादर करुन तर आनंद भाटे यांनी प्रेक्षागृहातून वारंवार टाळ्यांचे कौतूक ऐकले. डॉ. प्रभा अत्रे यांनी रचलेली आणि नुकतीच त्याला शिकविवेली रचना `देवा लंबोदर गिरीजा नंदना`, त्यांच्यासमोर सादर करतानाही तिच मोहकता आणि स्वरांचा लगाव कायम ठेवला..
शेवटी पं.भीमसेन जोशी या गुरुचे अजरामर भजन ..जो भजे हरि को सदा...त्यांच्या आठवणींना उजाळा देत कमालीच्या तडफदारपणे आणि रंगतदार गाऊन तन्मयता आणि स्वरांवरची फिरत आणि सादरीकरणातली आर्तता सारेच दाखवून दिले.. त्यांना तबला साथ केली ती भरत कामत यांनी तर संवादिनीवर संगत केली ती सुयोग कुंडलकर यांनी तेवढीच मोहक.

आरंभी पुरस्कार सोहळ्यात `गुरूंना खूप शिष्य मिळतात आणि शिष्यांनाही खूप गुरू मिळतात. पण ज्या गुरूंमध्ये कलेची ताकद असते, त्यांचे शिष्यच गायक बनतात. गुरूंच्या कलेची ताकद शिष्याच्या कलेतून समोर येते. तुम्ही ज्या गुरूंकडून संगीताचे धडे घेतले, त्यांची कला पुढे नेणे ही शिष्याची जबाबदारी आहे; पण गुरूची नक्कल मात्र करू नका,` असा कानमंत्र उस्ताद सईदुद्दीन डागर यांनी दिला.
डॉ. अत्रे म्हणाल्या, 'या क्षेत्रातील ही पिढी कर्तबगार आहे. नवीन मुले आव्हानांना सामोरे जातात. स्वत:चा वेगळा व्यवसाय आणि संगीतकलेची जोपासना अशा दोन्ही गोष्टी ही पिढी सर्मथपणे करते आहे..'


पुरस्कारानिमित्त बोलताना भाटे म्हणाले, 'मी या क्षेत्रात अगदी नवखा असताना गानवर्धन संस्थेने मला प्रोत्साहन दिले. नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य या संस्थेकडून केले जाते. त्या संस्थेकडून मला मिळालेला पुरस्कार मौल्यवान आहे.' याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कृ.गो.धर्माधिकारी यांनी संस्थेचा उद्देश स्पष्ट केला..तर राजेंद्र कंदलगावकर यांनी आनंद भाटेच्या कारकीर्दीविषयी आपले निरिक्षण नोंदविले.

तात्यासाबेह नातू फौंडेशनच्या वतीने बोलताना शारंग नातू यांनी यापुढे आम्ही हा पुरस्कार सुरु ठेवणार असून यापुढे कथ्थक नृत्यातील कलावंतासाठी स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी केली. अपरिचित कलावंतांचे कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे उद्दीष्ट स्पष्ट केले.

दोन दिवसांच्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला सोहळा आणि त्यानंतरचे कलावंताचे गायन यातूनच संस्थेची काटेकोर शिस्तही नजरेतून सुटली नाही..खरं तर यामुळेच हा यशस्वी झाला म्हटले तरच ते योग्य ठरेल.
सुभाष इनामदार,पुणे


subhashinamdar@gmail.com


9552596276

(यातील सारी छाय़ाचित्रे आहेत नव्यानेच छायाचित्रांच्या व्यवसायात आलेल्या नचिकेत सुरेश जोग यांची..)
 

Sunday, September 16, 2012

सूरांनी जोडलेली नाती वाढावित...

डॉ. प्रभा अत्रे


आज माझ्या नात्यातले कोणी नाही..पण सूरांनी जोडलेल्या नात्यातल्या मंडळींनी माझा वाढदिवस असा करावा याचा अधिक आनंद आहे..हीच नाती अधिक वाढावित हिच इच्छा...किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका स्वरप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांनी शनिवारी टिळक स्मारक मंदिरात आपल्या भाषणाच्या आरंभी सांगितलेल्या दोन शब्दांनी सारे रसिक तर भारावलेच पण सारे साधक कृतार्थ पावले..

संगीतामुळे गुणी आणि ज्ञानी माणसांचा सहवास मिळाला. शाश्वरताची जाणीव आणि पूर्णत्वाकडे जाणारा मार्ग कधी न संपणारा असतो, याचे भानही संगीतानेच दिले. हा सांगीतिक प्रवास रसिकांच्या प्रेमामुळेच यशस्वी झाल्याची भावना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.


"गानवर्धन' संस्थेतर्फे त्यांचा ८१व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिशय भावमधूर आणि स्वरांच्या चाहत्या रसिकांच्या साक्षिने त्यांना जेव्हा मंत्रोच्चाराच्या गजरात सुवासिनींनी ओवाळले तेव्हा तो सोहळा पाहणा-या रसिकांचे मनही गहिवरुन गेले..

तुमच्या गाण्याने सरस्वतीच्या वीणेवरही रोमांच उभे राहतात ...अशा पवित्र स्वरांना आणि त्या स्वरप्रतिभेचा गौरव होताना पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे आम्ही सारे धन्य झालो. स्वर हा किराणा घराण्याचा ईश्वर होता आणि या ईश्व्राची आराधना करून रसिकांना आनंद देण्याचे काम डॉ. प्रभा अत्रे यांनी केल्याचे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी म्हटले. शिवशाहिरांनी त्यांना अशाच गात रहा असा आशिर्वाद दिला. तर उल्हास पवार यांनी त्यांच्या सुरेल मैफलीचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याच्या आठवणी सांगितल्या..

सुचेता भिडे-चाफेकर यांनी धवल अशा फुलांच्या आणि मोजक्या शब्दातून प्रभाताईंना शुभेच्छा दिल्या. तात्यासाहेब नातू फौउंडेशनच्या वतीने शारंग नातू यांनी २५ हजार रुपयांचा चेक देऊन प्रभाताईंचा सन्मान केला.

गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. ग. धर्माधिकारी यांनी आपल्या संस्थेच्यावतीने शिवशाहिरांच्या हस्ते त्यांच्या आत्तापर्य़च्या सुरेल प्रवासाची साक्ष असणा-या शब्दातून सन्मानपत्र अर्पण केले..

सत्कार समारंभानंतर ख्यातनाम गायक उल्हास कशाळकार यांनी आपल्या सुरेल स्वरातून डॉ. प्रभा अत्रे यांना स्वरांची फुलेच अर्पण केली..त्यांच्या जोरदार तानांनी आणि नादमय बंदिशीतून मल्हार रागाच्या आलापीतून विविध छटांचे दर्शन घडले. दीड तासाच्या या मैफलीची साथही तशी उत्तम साथिदारांनी कमालीची रंगवीली. तबला साथ केली ती पं. सुरेश तळवलकर यांनी तर हार्मानियमची संगत डॉ. अरविंद थत्ते यांची होती...

स्वरातून बहरलेल्या मैफलीतून नादब्रम्हाची ती सुरेलता अवघ्या मंदिरात अखेरपर्यत निनादत होती..सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


(यातील सारी छाय़ाचित्रे आहेत नव्यानेच छायाचित्रांच्या व्यवसायात आलेल्या नचिकेत सुरेश जोग यांची..)