subhash inamdar

subhash inamdar

Monday, August 22, 2011

शब्द झाले मायबाप!

कवी वैभव जोशी यांच्या कविता-गीत-गझलांची "संपूच नये असं वाटणारी" मैफल आज टिळक स्मारक मंदिरात सादर झाली ती मायबोलीकर किरण सामंत, आनंद आणि कौतुक शिरोडकर यांच्या 'सृजन थिएटर्स' निर्मित "शब्द झाले मायबाप" या कार्यक्रमाच्या औचित्याने. मायबोली हे संकेतस्थळ(www.maayboli.com) मराठी साहित्याला वाहिलेल्या अनेक संकेतस्थळांपैकी सर्वात अग्रेसर. स्वत: वैभवने लिहायला सुरूवात केली ती याच संकेतस्थळावर. आपण काहीतरी दर्जेदार लिहू शकतो हा आत्मविश्वास मिळाल्यानंतर वैभवचा कविता क्षेत्रातला प्रवास तिथून जो सुरू झाला तो आज "११ मराठी आल्बम्स, ३ आणि नवीन येणा-या ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिकां या सा-यांमधून गेल्या ३ वर्षांत जवळजवळ १५०हून अधिक गाणी" ही जणु काही एक अजून एका मोठ्या पल्ल्याची सुरूवातच आहे इथपर्यंत!

पडदा उघडल्यानंतर स्टेजवर फक्त वैभव आणि सुरूवात ह्या कवितेने "सूर झाला ईश्वर, शब्द झाले मायबाप" हे म्हणजे भारत पाकिस्तानची मॅच असावी आणि सचिनने ओपनिंगलाच फटकेबाजी सुरू करावी! आजपर्यंत तरी अशा मैफली पाहिल्या आहेत की ज्या रंगात यायला किमान काही वेळ जावा लागतो. परंतु आज मात्र पहिल्या क्षणापासून ते औपचारिक शेवटापर्यंत ही मैफल रसिकांच्या हृदयात आरपार घुसली होती हे तिथे उपस्थित असलेला कुणीही नाकारू शकणार नाही. मिलींद कुलकर्णी यांच्या संयत आणि चपखल निवेदनालाही दाद दिलीच पाहिजे. कमलेश भडकमकर यांच्या संगीतयोजनेसोबत वैशाली सामंत, राहूल देशपांडे, अमृता नातू, रघुनंदन पणशीकर, मधुरा दातार, दत्तप्रसाद रानडे, जयदीप बागवडकर, जान्हवी अरोरा अशा ख्यातनाम गायकांनी मराठी आल्बम आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेल्या व होत असलेल्या वैभवच्या गाण्यांचे जोरदार सादरीकरण केले.मैफल अजून रंगात आली ती कवी सौमित्र आणि वैभव यांनी सादर केलेल्या वैभवच्या कविता आणि गझलांनी! सौमित्र वैभवची एक गझल सादर करताना थांबून 'व्वा' म्हणाला तेव्हा हे अधोरेखित झालं की आज तिथे जमलेले श्रोतेच नव्हे तर वैभवसकट इतर सारे कलाकार स्वत: एक "श्रोता" झाले होते! सादर करणारा जेव्हा श्रोता होतो, तेव्हा ती मैफल तिच्या अत्त्युच्य बिंदूवर असते. मी जितके काही कार्यक्रम पाहिले आहेत त्यात गायक येतात आणि गाऊन जातात. पण आज प्रत्येक गायकाला वैभवबद्दल काहीतरी जिव्हाळ्याचं बोलायचं होतं. त्याची गझल, गीत सादर करताना प्रत्येकाने प्राण ओतला होता हे सांगण्यात जर्राही अभिनिवेशीपणा नाही. एखाद्या चांगल्या गझलेत जसा प्रत्येक शेर ही एक अर्थपूर्ण कविता असते त्याप्रमाणेच आजच्या कार्यक्रमातला प्रत्येक परफॉर्मन्स ही एक स्वतंत्र आणि विलोभनीय अशी एक मैफिल होती आणि या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा म्हणजे वैभव जोशी!

इतका नितांतसुंदर आणि दर्जेदार मराठी कार्यक्रम रसिकांना दिल्याबद्दल प्रायोजक श्री. रामचंद्र चिंचलीकर आणि एलिगंट केअरटेकर संस्था यांचे जितके कौतुक करावे, आभार मानावे तितके कमीच आहे.



टीप: सदर कार्यक्रमात सहभागी असलेले पण या लेखात नाव न येऊ शकलेले अजूनही काही दिग्गज कलाकार असतील तर ते केवळ लेखकाचे अज्ञान समजावे.
vinayak khambayat