subhash inamdar

subhash inamdar

Friday, August 17, 2012

एक रविवार एक चित्रकार- रवीमुकुल

' एक रविवार एक चित्रकार ' चा पहिला रविवार प्रसिद्ध चित्रकार रवीमुकुल यांच्या सोबत....


' अक्षर मानव ' च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'एक रविवार एक चित्रकार ' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर रविवारी एक नवा आणि नामवंत चित्रकार आपल्या शैलीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधेल, काही प्रात्याक्षिके चित्रकार करून दाखवेल आणि विद्यार्थाकडूनही करून घेईल. हा उपक्रम सलग सात रविवार चालणार आहे.

या उपक्रमाला १९ ऑगस्टच्या रविवार पासून सुरुवात होत आहे.

पहिल्या रविवारी प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल हे मुलांमध्ये मिसळून चित्रकलेबद्दल संवाद साधतील. मुलांनी घरून आणलेला डबा सुद्धा ते खातील. अतिशय खेळीमेळीच्या आणि मोकळ्या वातावरणात मुलांना चित्रकलेचा निखळ आनंद देणारा हा उपक्रम आहे. चारुहास पंडित, मेहबूब शेख, ल. म. कडू, देविदास पेशवे, अनिल उपळेकर, गिरीश सहस्त्रबुद्धे हे नामवंत चित्रकार अनुक्रमे २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर, ९ सप्टेंबर, १६ सप्टेंबर, २३ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर या उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. आठव्या रविवारी मुलांची चित्रकलेची स्पर्धा घेतली जाईल आणि उत्कृष्ट चित्रकारांना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

रविमुकुल यांच्याविषयी -


मुखपृष्ठांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन हा प्रकार आपल्याकडे नाहीच. मी स्वतः त्यासाठी एक थोडासा प्रयत्न करतो आहे. स्लाइड्सच्या माध्यमातून मुखपृष्ठनिर्मितीची माहिती देणारा, त्यातील आव्हानं सांगणारा मुखपृष्ठाची गोष्ट, हा कार्यक्रम मी सादर करत असतो. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शिवाय यावर आधारित एक पुस्तकही मी लिहीत आहे. माझ्या मते तरी मराठीत हा असा पहिलाच प्रयत्न असावा. मुखपृष्ठ काढणं हे एक आव्हान असतं आणि दर वेळी त्यात काही तरी नवीन शिकण्याची संधी मिळते असं मला वाटतं. मुखपृष्ठ काढण्याआधी पुस्तक वाचायलाच हवं ते वाचलं की आपल्या मनात त्याची एक प्रतिमा तयार होते. ज्यात आपले तसेच लेखकाचे अनुभव मिसळले जातात व यातून एक चांगलं मुखपृष्ठ तयार होतं. प्रत्येक मुखपृष्ठामागे एक गोष्ट असते. कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकासाठी मुखपृष्ठ तयार करण्याचं काम जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा ते तयार करण्याआधी मी मुद्दाम येरवडा तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या कोठड्या पहायला गेलो होतो. त्यामुळे मला नेमकं काय करायचं आहे याची जाणीव आली. अशाच वेगवेगळ्या प्रक्रियेतून हे मुखपृष्ठ तयार होत असतं. या कलेला अनुल्लेखाने मारणं थांबवायला हवं.

रविमुकुल हे नामवंत मुखपृष्ठकार, ग्रंथ सजावटकार, क्यालीग्राफर, छायाचित्रकार आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास ३००० पुस्तकांची मुखपृष्ठे केलेली आहेत. 'मुखपृष्ठाची गोष्ट' हा दीड तासाचा कार्यक्रमही ते सदर करतात.स्थळ : श्री शिवाजी मराठा संस्थेचे जिजामाता मुलींचे हायस्कूल , ४२५ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरीच्या समोरची गल्ली, शिवाजी रस्त्याजवळ,
पुणे - ४११००२
दिनांक : रविवार, १९ ऑगस्ट २०१२
वेळ : सकाळी १० ते १


------

हेतू काय ?

या उपक्रमाला पुण्यातील शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील विविध शाळांमधील ९ ते १५ या वयोगटातील १०० विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे.
दर रविवारी चित्रकार नवे असतील विद्यार्थी मात्र तेच असतील. मुलांमध्ये चित्रकला या विषयाची आस्था वाढावी, त्यांच्यातील चित्रकाराला चालना मिळावी, चित्रकलेची समाज वाढावी, चित्रकलेचा व्यावसायिक उपयोग त्यांना कळावा आणि चित्रकलेचा सलग संस्कार मुलांवर व्हावा, हा हेतू यामागे आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आलेले नाही.

-------