subhash inamdar

subhash inamdar

Friday, February 18, 2011

बंदिश हावभाव अभिनयासह ...


बिरजू महाराजांचे व्यासपीठावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पंडितजींसोबतच्या गेल्या ५० वर्षांतल्या आठवणी त्यांनी श्रोत्यांशी शेअर केल्या. 'पंडितजींच्या गाण्याची पद्धत स्वतंत्र होती, त्यांनी सर्वांपर्यंत संगीत पोचवले. त्यांनी पुढच्या जन्म गायकाचाच घ्यावा आणि आपण सगळ्यांनी पुन्हा श्रोतेच व्हावे,' असे त्यांनी नमूद केले.

' जाने दे मैका सजनवाँ ' ही बंदिश त्यांनी गायली आणि श्रोत्यांना जिंकून घेतले. ते केवळ गायला आले होते खरे, मात्र थोडेतरी सादरीकरण केल्याशिवाय त्यांना रहावले नाही. 'जाने दे मोहन देर हुई' ही बंदिश हावभाव आणि अभिनयासह त्यांनी सादर केली. त्यांनी बसूनच केलेल्या सादरीकरणाला रसिकांनी मनापासून दाद दिली.

पंडितजींच्या आठवणीत आर्त स्वरांनी भिजलेली मैफल... 'भीमसेनजी की इतनी याद आ रही है पता नहीं गा पाऊंगी या नहीं' असे प्रसिद्ध गायिका परवीन सुलताना यांचे भावोद्गार आणि प्रत्येकाच्याच मनात हुरहूर अशा वातावरणात भारतरत्न भीमसेन जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली.



राम गणेश गडकरी .... "पिंपळपान'

जुन्या वाड्यांच्या जागी टोलेजंग इमारती होण्याच्या प्रक्रियेत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाकडे पाहून गोविंदाग्रज ऊर्फ ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी "पिंपळपान' ही कविता लिहिली, ते कसबा पेठेतील त्यांचे निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कसबा गणपतीजवळच असलेल्या फणी आळी तालमीपाशी "136 कसबा पेठ' येथे राम गणेश गडकरी यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. पिंपळपान या कवितेबरोबरच "प्रेमसंन्यास' या नाटकाचे लेखनही या वास्तूतच झाले. 1919 मध्ये याच वास्तूत त्यांची प्राणज्योत मालवली. या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गडकरी वास्तव्यास होते. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली.

या वास्तूविषयी ....... भालचंद्र वामन धडफळे या बालमित्राने 1910 मध्ये गडकऱ्यांना या वास्तूमध्ये राहण्यासाठी जागा दिली. त्यापूर्वी किर्लोस्कर नाट्यगृह म्हणजे सध्याचे वसंत चित्रपटगृह येथे काही काळ गडकरी राहत असत. "136 कसबा पेठ' येथे राहण्यास आल्यानंतर गडकरी यांनी मातुःश्री सरस्वतीबाई आणि बंधू शंकर यांना बोलावून घेतले. या वास्तूला ते "आमचा भूतमहाल' असे म्हणत असत.
या वास्तूचे वर्णन करताना गडकरी म्हणतात, ""फणी आळीतील लहानशा गल्लीत हा आमचा सिन्नरकरांचा वाडा आहे, समोर एक पिंपळ आहे. तळमजल्यावर तुळशीराम वाण्याचे दुकान आहे. दुसरा आणि तिसरा मजला आमच्याकडे अवघ्या पाच रुपयांमध्ये भाड्याने आहे. गल्लीत टांगे, मोटारी व लोकांच्या रहदारीची वर्दळ बिलकूल नसल्याने जणू काय आम्ही एखाद्या खेड्यात राहतो, असे आम्हाला सदोदित वाटते. भोवतालच्या शांततेमुळे सरस्वतीदेवीचा संचार मी एकटाच असता येथे ताबडतोब होतो आणि त्या- त्या वेळी मी गद्य व पद्य लिहीत असतो.''

याच वास्तूत 15-16 वर्षांचे असताना आचार्य अत्रे त्यांचा "फुलबाग' कवितासंग्रह घेऊन गडकरी यांना भेटावयास आले होते. 13 जून 1917 रोजी गडकरी यांचा दुसरा विवाह याच वास्तूत झाला. त्यांच्या अवघ्या 34 वर्षांच्या जीवनातील अखेरचा नऊ वर्षांचा कालखंड या वास्तूने पाहिला आहे. अनेक मोठी माणसे त्यांना भेटायला येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. गडकरी बाहेरून आले की समोरील पिंपळाला आणि वास्तूला नमस्कार करून मगच घरात जात, असे वि. ना. कोठीवाले यांनी "गडकरी जीवन चरित्रा'त लिहिले आहे.

 ही स्मृती जागविणारी वास्तू काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी पिंपळ आणि पार आजही या बदलामध्ये तसाच राहिला ......