subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, July 12, 2011

योग्य गुरूकडून गाणं शिका-सानिया पाटणकर




सानिया, तुझ्या शास्त्रीय संगीताच्या प्रवासाबद्दल


- घरात सगळ्यांनाच संगीताची आवड होती. त्याचप्रमाणे मलाही शास्त्रीय संगीताची आवड होती. आताही मी या क्षेत्रात कार्यरत आहे. खरं तर, वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच मी संगीत शिकतेय. मी संगीताचं प्राथमिक शिक्षण लीलाताई घारपुरे यांच्याकडे घेतले. त्यानंतर मी डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे तेरा वर्षं संगीताचे धडे घेतले. मी परदेशात जाऊन शास्त्रीय संगीताच्या अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. सध्या मी डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतेय.

शास्त्रीय संगीतामधल्या अनेक प्रकारांपैकी तू कुठले संगीत प्रकार सादर करतेस?


- मी माझ्या मैफलींमध्ये ठराविक प्रकार सादर न करता, शास्त्रीय संगीताचे विविध प्रकार सादर करते. त्यामध्ये मग ख्याल, ठुमरी, दादरा, गझल, नाट्यगीत, टप्पा, तराणा यांचा समावेश आहे. या प्रकारांबरोबरच मी काही प्रमाणात अभंग, भक्तीगीतं व भावगीतंदेखील गाते. थीमवर आधारित काही कार्यक्रम आम्ही बरेच वेळा सादर करतो. त्यात वर्षाऋतू, कृष्णलीला आदी कल्पनांवर आधारित कार्यक्रमही सादर केले आहेत.

आतापर्यंत तुझे कोणते अल्बम प्रकाशित झाले आहेत? कोणते पुरस्कार मिळाले आहेत?

- शास्त्रीय संगीतावरच आधारीत "अनुभूती' या अल्बमचे दोन भाग, बंदिशींवर आधारीत "रागरसनांजली' आणि नुकताच प्रसिद्ध झालेला "रसिया' असे अनेक अल्बम मी केलेत. पुरस्कारांबाबत सांगायचं झालं, तर मला पं. जसराज ट्रस्टचा "पैंगणकर पुरस्कार', "राजीव गांधी पुरस्कार', "सूरमणी पुरस्कार' आदी पुरस्कार आतापर्यंत मिळालेत.

शास्त्रीय संगीतामध्ये शब्दाला असलेल्या महत्त्वाबद्दल तू काय सांगशील?

- स्वर हा शास्त्रीय संगीताचा पाया आहे; पण त्यामध्ये शब्दांनाही तितकंच महत्त्व असतं. आकार, उकार आणि इकार शब्दांशिवाय येणं शक्‍यच नाही. अर्थ असलेलं काव्यच योग्य प्रकारे फुलू शकतं, असं मला वाटतं. बंदिशींमध्ये तर शब्दाला फार महत्व असतं.

शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी तू कुठले प्रयत्न करते आहेस?

- वर्कशॉप्स, ऑनलाइन टीचिंग, लेक्‍चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन्स यावर मी सगळ्यांत जास्त भर देते. युवा पिढीला आवडत असलेलं हिदी संगीत, त्यामध्ये वापरले गेलेले राग आणि कुठल्या रागावर आधारित हे गाणं आहे, हे मी सांगायचा प्रयत्न मी कायमच करते. फ्युजन आणि नृत्यप्रकारांमध्ये शास्त्रीय संगीताचा कसा उपयोग होतो, हे सांगण्याचाही मी प्रयत्न करते.

या क्षेत्राची आवड असलेल्या युवा पिढीला काय सांगशील?

- खूप मेहनत घ्या. दिग्गजांचे संगीत सतत ऐका. योग्य गुरूकडून गाणं शिका. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करा. कारण शास्त्रीय संगीत हा संगीताचा पाया आहे.

-स्वप्नील रास्ते
(swapnilraste@gmail.com)
http://72.78.249.107/esakal/20110712/5017117233068200285.htm