पुण्यात आयोजित करण्यात आलेली रविवार दि. १३ मार्चची `सुरेल सभा` खर्या अर्थाने रसिकांसाठी आनंदाचा ठेवा ठरली. पं. संजीव अभ्यंकर यांनी रात्रीच्या रागांचे स्वरूप त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण शैलीत उलगडून दाखवित केलेल्या सुरांच्या वर्षावात श्रोते चिंब झाले.
मैफिलीची सुरूवात 'पुराना चंद्रकंस' या रागातील "ए पिया बिन" या बडा ख्यालाने झाली व त्यानंतर मैफिलीत उत्तरोत्तर रंग भरत गेला. पुढे 'बिहागडा' रागातील मध्य लयीतील "आली री अलबेली" ही बंदिश त्यांनी सादर केली. या बंदिशीतील स्थायी व अंतरा हे दोन्ही वेगळ्या तालात बांधलेले होते. स्थायी त्रितालात तर अंतरा एकतालात बद्ध होता. हा वैविध्यपूर्ण अविष्कार श्रोत्यांची मने जिंकून गेला. मध्यंतराआधी नगध्वनी कानडा आणि नायकी कानडा यांच्या सुरेल मिलाफातून त्यांनी या दोन्ही रागांचे अंतरंग स्पष्ट केले.
मध्यंतरानंतर प्रचलित 'चंद्रकंस' रागातील स्वरचित तराणा पंडीतजींनी रसिकांपुढे मांडला व त्यास रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. 'कलावती' रागातील "जा री जा री छिप जा सखी री" या द्रुत बंदिशीनंतर त्यांनी एकनाथ महाराजांची गवळण सादर केली आणि सिंध भैरवीतील अभंगाने सांगता करीत त्यांनी या मैफिलीस कळस चढविला.
रागसादरीकरणासोबतच पंडीतजींनी श्रोत्यांशी केलेला संवाद या मैफिलीत विशेष ठरला. पंडीतजींची रसिकांपर्यंत सदैव काहीतरी नाविन्यपूर्ण पोचवण्याची आस आणि तळमळ त्यांच्या शब्दांतून जाणवत होती. बोलतांना ते म्हणाले, कुठल्याही वैमानिकाला विमान स्वत:च्या बळावर इष्ट स्थळी नेण्याची इच्छा असते. विमानाने वैमानिकास नव्हे तर वैमानिकाने विमानास वश केले पाहिजे. तसेच कधीतरी, गात असता, गळा बुद्धीवर मात करून जातो. पण बुद्धीला जे हवं ते गळ्यातून बाहेर निघणं हे खरं अवघड काम! गाणं अनवट आणि बुद्धीप्रधान असूनही ते लोकांपर्यंत सहजतेने पोचले पाहिजे. त्यातील रस, रंग अबाधित राहीला पाहीजे यातच खरे कसब!
पंडीतजींच्या आवाजातील गोडवा, स्वरांचा लगाव आणि सुरांतील सच्चेपणा, अत्यंत गुंतागुंतीची तानप्रक्रिया पण संगीत अभ्यासकापासून ते सामान्य श्रोत्यापर्यंत ते तितक्याच सुरसतेने कळेल असं रसभरीत गाणं यामुळे ही मैफल श्रोत्यांच्या चिरस्मरणात राहील याबाबत शंका नाही.
केदार केसकर