subhash inamdar

subhash inamdar

Saturday, July 2, 2011

विंचुरकर वाडा काळाच्या पडद्याआड


एकेकाळचे वैभव समजले जाणारे पुण्यातील वाडे एकापाठोपाठ अस्ताला जात असताना त्यामध्ये
आता विंचुरकर वाड्याचीही भर पडणार आहे.
मोडकळीला आलेला हा वाडा ही पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची गंगोत्री असली तरीही काळानुसार राहण्यासाठी ही वास्तू आता पाडली जाणार आहे.
इतिहासाचा मोठा वारसा सांगणाऱ्या या वास्तूतून भविष्यामध्ये हा वारसा जपला जाणार का हाच प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.


लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ केला, ती सरदार विंचूरकर वाड्याची वास्तू
बिल्डरला विकण्यात आली आहे. सदाशिव पेठेत सरदार विंचूरकर यांचा पेशवेकालीन वाडा
अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार आहे. लोकमान्य टिळक यांचे काही काळ येथे वास्तव्य होते. तसेच 'केसरी'चे कार्यालयही येथेच होते आणि लोकमान्यांनी 'केसरी'तील अनेक अग्रलेख
याच वास्तूमध्ये लिहिले.
लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद या युगपुरुषांची ऐतिहासिक भेटही याच वाड्यात झाली होती.
येथील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात लोकांना प्रेरणा देण्यासाठी
लोकमान्य टिळक यांनी याच वाड्यात गणेशोत्सवास प्रारंभ केला.
आजही लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्टच्या (सरदार विंचूरकर वाडा) वतीने येथे
गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
दोन महिन्यांपूवीर्च या वाड्याचे मालक कृष्णकुमार दाणी यांनी ही वास्तू परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शनला
विकली आहे. वास्तूचा पुनर्विकास होताना हे स्मारक काळाच्या पडद्याआड जाऊ नये,
अशी अपेक्षा ट्रस्टचे खजिनदार रवींद पठारे, तसेच विश्वस्त जयंत मठकर आणि शीला घैसास
यांनी व्यक्त केली. या वाड्याच्या स्मृती जतन कराव्यात आणि भव्य स्मारक उभारावे,
अशी मागणी त्यांनी केली आहे.

या ऐतिहासिक वास्तूचा संरक्षित स्मारकांच्या यादीत (हेरिटेज) समावेश करावा,
असा प्रस्ताव पुढे आला.
सध्या महापालिकेकडून ऐतिहासिक वास्तूंची यादी अपडेट करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये
विंचूरकर वाड्याचा समावेश करण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.
लोकमान्य टिळकांशी संबंधित असलेल्या पूवीर्च्या गायकवाड वाड्याचा
म्हणजे आताच्या टिळक वाड्याचाही या पूवीर्च पुर्नविकास करण्यात आला आहे.

विंचूरकर वाडाही त्याच मार्गाने जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकमान्य टिळक यांच्यावर आमची पिढ्यानपिढ्या भक्ती असून या वाड्याचे
ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन लोकमान्यांच्या कार्याला साजेसे स्मारक येथे उभारण्यात येईल,
असे परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शनचे एमडी शशांक परांजपे यांनी स्पष्ट केले.
सध्या या वाड्याचा ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समावेश नाही.
तसेच त्या वास्तूची पडझड आणि दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे तेथे डागडुजी करून ऐतिहासिक स्मृती जतन करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9056089.cms