नटसम्राट बालगंधर्व...आपल्या स्वर्गीय गायनाने अबालवृध्दांना भारून टाकणारा जादूगार.
युवा पिढीचे आश्वासक गायक श्री. अतुल खांडेकर गंधर्वगायकीच्या श्रवणाने मंत्रमुग्ध झाले. त्यांना मातुलगृहाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आजी श्रीमती माणिक भट आणि आई सौ.मानसी खांडेकर दोघींनीहा नाट्यसंगीताचा विशेष अभ्यास केला आहे. अतुल यांनी लहानपणी आईकडून संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. नंतर विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि शास्त्रीय संगीतात ते रममाण झाले. योगायोगाने श्रीमती जयमाला शिलेदार यांचा सहवास लाभला आणि गंधर्वगायकीचे विराट दर्शन घडले. बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ पदे त्यांच्याकडून शिकायला मिळाली. कीर्ति शिलेदार यांच्या मार्गदर्शनामुळे गंधर्व गायकीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन सापडला. गुरूंकडून मिळालेला हा ठेवा रसिकांसमोर सादर करावा अशी इच्छा होत होती.
नू.म.वि. हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक संपत इंगळे गुरूजींचा अतुलवर विशेष लोभ. त्यांनीच अतुल यांच्या अनेक मैफली घडवून आणल्या होत्या. बालगंधर्वांच्या पदांचा कार्यक्रम अतुल यांनी करावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. ती त्यांची इच्छा त्यांनीच बोलून दाखविली आणि कांही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. म्हणूनच इंगळे गुरूजींच्या स्मृतींना भावांजली अपर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.
बालगंधर्वांच्या सांगितिक कारकिर्दिचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम कलाद्वयी संस्थेमार्फत सादर होत आहे. बालगंधर्वांच्या गायकीचे दर्शन घडविणे हे सर्वथा अशक्य आहे. त्यांच्या गायनाची नक्कल करणे चूकच आहे. ते दुरापास्तही आहे. फक्त या थोर गायकाने जे ब्रह्मांड उभे केले आहे, त्यापुढे नतमस्तक व्हावं असे प्रत्येक निष्ठावान गायक कलावंतांना वाटते. पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव अशा अनेक प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांनी नाट्यसंगीताचा जो अनुपम खजिना निर्माण केला आहे त्याची छोटीशी झलक तरी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
असा बालगंधर्व आता न होणे... हे तर सर्वश्रुत आहे. हेच विधान त्यांच्या गायकीबाबतही करता येईल. त्यामुळे हे गंधर्वगायकीचे दर्शन नाही..तर गंधर्वगायकीतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न करावा. विस्मयकारक करणा-या या गायकीला दंडवत घालावा. आणि या गायकीचा आनंद जो स्वतःला होतो तोच सर्व रसिकांना द्यावा याच उद्देशाने हा गंधर्वगायकीचा मागोवा घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.
तो राजहंस एक.. हा दृकश्राव्य कार्यक्रम २१ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वाजता पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. बालगंधर्वांच्या परंपरेतील काही कलाकारांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे, आणि बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण यांचा या कार्यक्रमात समावेश असेल. ही सर्व तांत्रिक बाब अमोघ रानडे सांभाळत असून गायनाचा सारा भार अतुल खांडेकर यांच्यावर आहे. लोकप्रिय पदांबरोबरच काही दुर्मिळ पदांची झलक दाखविण्याचाही त्यांचा प्रयत्न इथे राहणार आहे.
त्यांना संजय़ गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), रवि शिधये (व्हायोलिन), अभय माटे (पखवाज) या कलावंतांची संगीत साथ असणार आहे. डॉ.मंदार परांजपे आणि सौ. वर्षा जोगळेकर यांचे निवेदन असून सर्वांसाठी तो खुला आहे. श्रीमती जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि बालगंधर्व चित्रपटात गंधर्वांची पदे म्हटलेला आनंद भाटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
गुरूंचे मार्गदर्शन, उपजत बुध्दी आणि मेहनत या बळावर अतुल खांडेकर यांनी आजवरची संगीत क्षेत्रातली वाटचाल केली आहे. गाण्यात गुरफटलेला मुलगा अशीच त्याची लहानपणापासून ओळख असली तरीही व्यवसायाने सिव्हील इंजीनीयर असलेल्य़ा अतुलने हा संगीताचा ध्यास मोठ्या प्रेमाने जोपासला आहे.. गंधर्व गायकीला मानाचा मुजरा करणारा हा कार्यक्रम ज्या निष्ठेने आणि तळमळीने करीत आहे. ते कौतुकास्पद आहे.
वर्षा जोगळेकर, पुणे