शास्त्रीय संगीतावर आधारित व्हायोलिन, सतार, हार्मोनियम, बासरी आणि तबला अशा वाद्यातून सादर केलेला आविष्कार शुक्रवारी पुरुषोत्तम गोडबोले यांच्या संकल्पनेवर आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गांधर्व महाविद्यालयात ( शनिवार पेठ, मेहुणपुरा) संध्याकाळी ६ वाजता सर्वासांठी सादर होत आहे.
गांधर्व महाविद्यालयाच्या ८० व्या वर्षातील विविध उपक्रमांतर्गत हा खास कार्यक्रम आयोजित केला आहे.
वडिलांकडून आलेला संगीताचा वारसा जपत आणि संगीत नाटकात आपल्या गायनाने छाप पाडणारे गायक नट कै. उदयराज गोडबोले यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन संगीताची ही परंपरा पुरुषोत्तम गोडबोले यांनी जपली, वाढविली. वडिल एके काळी सांगली संस्थानचे मातब्बर गायक. त्यांनी १९४६ साली वालचंदनगरला वाद्यवृंद रचनांचा कार्यक्रम केला होता. पुरुषोत्तम गोडबोले यांच्या वयाच्या १० व्या वर्षीचा तो ठसा पक्का बसला. स्वतः व्हायोलिन, हार्मोनियम तरुण पिढीला शिकवताना आपणही असा शास्त्रीय संगीतावर वाद्यवृंद तयार करावा अशी संकल्पना आली. त्यातूनच वाद्यशिकणारे कलावंत एकत्र करुन त्यांनी हा रागदारीवर आधारित वाद्यवृंद रचना बसविल्या. अनेक ठिकाणी या कार्यक्रमानंतर मिळालेली पसंती पाहून तोच पुढे नव्या रचनांची भर घालीत त्यांनी तो सिध्द केला आहे.
`स्वर संवाद`, प्रस्तुत या वाद्यवृंद रचनांच्या कार्यक्रमात सहभागी कलावंत आहेत – पुरुषोत्तम गोडबोले, अशोक पटवर्धन, निकिता गुंदेचा (व्हायोलिन), निलिमा कुलकर्णी, कांचन खाडीलकर (सतार), माधवी करंदीकर, देवेंद्र पटवर्धन, हेमा कुलकर्णी (हार्मोनियम), अजरुद्दीन शेख (बासरी), अनिल दोशी, अभिजित पानवलकर (तबला) आणि निवेदक आहेत ज्योती परांजपे.
वयाच्या ८०व्या वर्षीही पुरुषोत्तम गोडबोले नविन कल्पना या माध्यमातून साकार करुन रसिकांची दाद घेत आहे. य़ापूर्वी १९८१ ला गानवर्धनच्या मंचावरही त्यांचा असाच आविष्कार गाजल्याचे रसिकांच्या लक्षात असेल.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276