subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, December 29, 2010

सुगम संगीताचा इतिहास शब्दबद्ध

नव्या पिढीत सुगम संगीताची आवड आणखी वाढावी, यासाठी "स्वरानंद'च्या वतीने मराठी सुगम संगीताचा इतिहास शब्दबद्ध करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबविला जात आहे.

महाराष्ट्राभर मराठी सुगम संगीताचा रंगमंचीय आविष्कार सादर करणारी "स्वरानंद प्रतिष्ठान'  सुगम संगीताचा इतिहास आणि सूची तयार करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. हे काम प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, गीतकार सुधीर मोघे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त प्रकाश भोंडे यांनी दिली.

मराठी भावगीते, चित्रपट गीते, अभंग, लोकसंगीत असे सुगम संगीताचे आविष्कार सूत्रबद्धरित्या रंगमंचाच्या माध्यमातून एकत्रपणे सादर करण्याचा प्रयत्न विश्‍वनाथ ओक आणि हरीश देसाई यांनी 40 वर्षांपूर्वी प्रथम केला. त्यातून "स्वरानंद'चा जन्म झाला. सुगम संगीतावर "फोकस' करून वाटचाल करण्याऱ्या प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर पु. ल. देशपांडे, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, शांता शेळके, यशवंत देव, अशोक पत्की अशा दिग्गजांचे गौरव सोहळे झाले. तसेच, रंजना पेठे, अजित सोमण, सुधीर दातार, अरविंद थत्ते, अपर्णा संत, हृषीकेश रानडे, मधुरा दातार अशा वेगवेगळ्या पिढीतील गायक-वादकांनी आपली कला सादर केली, असे भोंडे यांनी सांगितले.