वडिलांना मी लहानपणापासून 'अहो' म्हणायचो.
कारण आई त्यांना अशीच हाक मारायची.२००५ला आई गेली.
आता वडील गेले.माझी मनःस्थिती आत्ता,आज कशी आहे,हे सांगणे अवघड जात आहे.
वडिलांना भूतकाळाच्या स्मरणरंजनात रमणे आवडत नसे.
पण त्यांच्या गाण्यात,स्वरविस्तारात सर्वरसपरिपोष व्हायचा,
आणि भावनांची अनुभूती,एकाग्रतेने ऐकणाऱ्याला येत असे.
शब्दात न मावणाऱ्या संवेदना,अक्षरांनी न सांगता येणारे
अमूर्त विचार,प्रेम,वेदना हे सर्व साकारण्याची दार्शनिक सिद्धी त्यांच्या गाण्यात होती,आहे.
त्याचे इंग्रजी हस्ताक्षर फार सुंदर होते आणि खूप झरझर पत्र लिहित असत.
आयुष्यात मी पाहिलेला अतिशय शुद्ध मनाचा माणूस असे त्यांचे वर्णन होऊ शकेल.
या शुद्धतेनेच आणि दृढ श्रद्धेने त्यांना संगीत सिद्धी लाभली.सर्व वेळ मनात गाणेच असायचे.
मनाने फार कणखर होते.फक्त माझी बहिण शुभदा हिचे कन्यादान करताना खूप हळवे झाले होते.डोळ्यातून पाणी वहात होते.
अतिशय कमी बोलायचे पण जे बोलायचे ते नेमके आणि मार्मिक असे.
फार थेट विनोदबुद्धी होती.युक्तिवाद आणि शब्दांचे खेळ त्यांना फारसे रुचत नसत.
खरे स्थितप्रज्ञ आणि गाणे इतके रोमारोमात की कितीही विचित्र आपत्तींमध्ये त्यांच्या कलाविश्कारामध्ये
काहीही फरक पडला नाही.रोजच्या आयुष्यातही अतिशय निडर आणि साहसी होते.हे सगळे बघत बघत मी वाढलो.
व्यवहारी जगाच्या रोखठोकपणाचे वास्तव,त्यातले हीण याची झळ त्यांनी आम्हा मुलांना कधीच लागू दिली नाही.
मला गाण्याचे अतोनात वेड.गाणे हा आमचा,घराच्या सर्वांचा स्थाईभाव.घरी आईसुद्धा कायम रियाझ करत असे.
वडिलांच्या गाण्यामुळे मला कलेची उंची म्हणजे काय असते ते लवकर कळले.
आपल्याला आयुष्यात फक्त गायचं आहे हा साक्षात्कार वडिलांना वयाच्या नवव्या वर्षी झाला.
मला तस काही इतक्या लवकर कळल नाही.
१९५२ साली माझा जन्म झाला.तेव्हापासून आत्तापर्यंत गाणे हा माझ्या आयुष्यातला श्वासासारखा साथीदार आहे.
गाण्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करु शकत नाही.पण वडिलांसारखे गाणे आपण गाऊ शकत नाही असे त्यावेळी वाटले.मी या भावनेवर मात करायला हवी होती.
आईवडिलांना मी व्यावसायिक गायक व्हावे असे वाटत नव्हते.असो.
वडिलांच्या गाण्याचे तेज,त्याची धग आणि शीतलता - यांनी मी समृध्द झालो.
वाचनाची आवड होतीच.त्यात भर,मला गाण्याचे,पेंटिंगचे,फोटोग्राफीचे भूत लागले.दृश्यकलेची प्रकृती,रचना,रंगांची गूढता,सांकेतिकता
आणि परिणाम शोधताना मी खुळा होऊ लागलो.तेच आर्ट स्कूलमध्ये जाऊन शिकलो.तरी कलावंताला जगण्यासाठी
सोसावी लागणारी धावपळ माझ्या वाट्याला यावी आणि बेभरवश्याचे जिणे मी जगावे हे वडिलाना फारसे पसंत नव्हते.पण त्यांनी विरोध केला नाही.
पुढे मला जगण्याची काही कोडी उलगडली,व्यावहारिक यश मिळाले.थोडी मान्यता लाभली. तेव्हा मला झालेला आनंद आईवडिलांनी पाहिला.
काही मोठ्या कलावंतांनी,समीक्षकांनी माझे कौतुक केलेले त्यांनी ऐकले.माझी चित्रे विकली जाताना पाहिली.त्यांना बरे वाटले असणार.
मला काही बोलले नाहीत.मी त्यांचाच मुलगा असल्यामुळे एक स्वतंत्र,निर्भीड मुक्तपणा माझ्यात संचारला असावा.
त्यांचे गाणे हा माझ्या मनाचा कणा आहे.हे सर्व संस्कार आणि त्यातून मला आकळलेले जग हीच माझी प्रेरणा.
मुंबईतल्या माझ्या पेंटिंगच्या पहिल्या प्रदर्शनाला ताजमहाल हॉटेलमध्ये ते आले होते.पण १९८६ साली मक्स म्युलर भवनतर्फे पुण्यात झालेल्या
माझ्या पहिल्या आर्ट फोटोग्राफीच्या प्रदर्शनाच्यावेळी ते लांबच्या दौऱ्यावर होते.ते प्रदर्शन त्यांनी मग घरीच पाहिले.
पेंटिंगवर,चित्रकलेवर मात्र आमचे कधीच फारसे संभाषण झाले नाही.पण समकालीन सर्व नामवंत चित्रकार,शिल्पकार
त्यांच्या मैफलींना हजर असायचे.त्यांच्याशी ते माझी ओळख करून द्यायचे.
वडील खूपच झपकन निर्णय घ्यायचे आणि त्यावर ठाम असायचे.गम्मत अशी की
त्यावेळी वेडेपणाचा casual वाटणारा तो निर्णय नंतर परिस्थितीशी अनुरूप मिळताजुळता ठरायचा.
जणू परिस्थितीनी त्यांच्या विचारांना सुसंगत रूपात स्वतःला बदलून घेतले आहे असे वाटावे इथपर्यंत.
इतकी त्यांची इच्छाशक्ती बलदंड होती.
वयाच्या अगदी लहानपणापासून सर्व भारतभर मी त्यांचाबरोबर प्रवास केला.तुफान प्रवास.
गाणे हा त्यांचा शरीरधर्म होता.गाण्यातून त्यांना उत्तम प्राणायामसुद्धा व्हायचा त्यामुळे खूप छान तीन चार तासांचा
कार्यक्रम झाला की ते खूप ताजेतवाने होत असत.एरवी अगदी साधे दिसणारे त्यांचे व्यक्तिमत्व ते स्टेजवर गायला बसले
की तेजःपुंज भासू लागे.हा चमत्कार मी खूप वेळा पाहिला आहे.जबरदस्त गाणे झाल्यावर मैफलीमध्ये
श्रीत्यांच्या मनात एक निशब्द आनंदाचे नीरव समाधान पसरत असे.मी अनेकदा त्या आनंदाच्या शांततेत गेलो आहे.
असा अनुभव की ज्यातून मी दिवस दिवस बाहेर येऊ शकत नसे.जागेपणी आणि झोपेतसुद्धा गाणे ऐकू यायचे.
अशा स्वप्नमय आभासात मी अगदी आत्ता आत्तापर्यंत जगलो.
गेली काही वर्षे आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व घर आणि आम्ही?
आम्ही आजारलो.
वडिलांचा आवाज,त्यांच्या गाण्याची दुनिया..तिने आम्हाला शक्ती दिली.
ते गेले.त्यांच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण आपल्याबरोबर असणारच आहे. अगदी हवे ते,हवे त्या वेळी.
पण त्यांच्या प्रत्यक्ष मैफलीचे स्वरवैभव आणि तो परिणाम आता फक्त कल्पनेत आणि आठवणीत रहाणार.
त्यांच्या केवळ घरात असण्यामुळे खूप बरे असायचे.
मी आयुष्यभर ज्या वात्सल्याच्या कृपाछायेत होतो तिला मी अंतरलो आहे हे मानायला मन तयार नाही.
त्यांच्या व्यक्तीमत्वात अथांग प्रेमाचे तेज होते आणि ते देशात,विदेशात समाजातल्या सर्व थरातील माणसांना जाणवत असे.
त्यांच्या इतके अफाट प्रेम फार कमी कलावंतांना लाभले.ते काहीतरी असाधारण अध्यात्मिक पातळीवर होते.
संगीताच्या,गाण्याच्या उत्तुन्गतेच्या ,खोलीच्या परिपूर्णतेच्या नव्या व्याख्या आणि शक्यता त्यांनी रसिकांना दाखवल्या.
परंपरेला सांभाळून तिच्या नव्या क्षितिजांचा विस्तार त्यांनी श्रोत्यांच्या नजरेत आणला.माझी आई स्व.वत्सला त्यांच्या
या शोधयात्रेतील खरी सोबती आणि त्यांची खरी समिक्षक होती.तिच्या मतांचा ते आदर करीत असत.फक्त गाण्याच्या प्रेमानेच
ते एकमेकांच्या जवळ आले होते.उत्तम संगीत ,उत्तम गाणे हाच आई वडिलांच्या जगण्याचा,आमच्या घराचा आशय होता.वडिलांना भेटायला आमच्याकडे
वेगवेगळ्या क्षेत्रातली फार मोठी माणसे घरी यायची.खूप थोर कलाकार जवळून बघायला मिळायाचे.त्यांचा सहवास मिळायाचा.
साधू,सत्पुरुषांचे,कलावंतांचे आदरातिथ्य करण्यात वडिलांना विशेष आनंद व्हायचा.हा आनंद घरातल्या आम्हा
सर्वाना जाणवायचा आणि सर्वांमध्ये तो उतरत असे.फार साधे आणि निरागस स्वभावाचे होते.फील लेव्हलवर माणसांची पारख होती.
लहानपणापासून सर्व देश त्यांनी एकट्याने पालथा घातला होता.नैसर्गिक शहाणपण आले होते.तसे बहुभाषिक होते.
जग कळायचे.भिडस्त होते पण मी भिडस्त नाही असे सांगायचे.
त्यांना भटकायला खूप आवडायचे.पण साधा माणूस कसा जवळच्या बागेत फिरून येईल तसे हे दुसर्या गावालाच जाऊन यायचे.
अतिकाळजीने आईची प्रकृती बिघडायची .त्यांचेही गणित चुकायचे.पण नंतर त्यांच्या सोबत जाऊन त्यांची काळजी घेण्याचा निर्णय तिने घेतला.
वडिलांनाही तिच्या बरोबर असण्याचा आधार वाटायचा.वडिलांना,त्यांच्या गाण्याला त्या गाण्याच्या दर्जाइतकी
प्रतिष्ठा मिळावी असे आईला खूप वाटे.पण माझ्या लहानपणी त्यांचे मोठेपण,त्यांच्या गाण्याचा दर्जा
इथे पुण्यात सर्वांना कळत नव्हता.अभिजात कलेविषयी तशी अनास्थाच होती.आधुनिक चित्रकलेबद्दल अजूनही आहे तशी.
पण शास्त्रीय संगीताच्या बाबतीत हे चित्र बदलले.वडिलांनी अभिजात गाणे हे सर्वांच्या जवळ नेऊन ठेवले.
आज सर्व जगात जिथे जिथे लोकांना गाण्याचा कान आहे तिथे तिथे भीमसेन जोशी हे नाव लोकांना माहित आहे.
वडिलाना लोकमान्यता,प्रेम,वैभव,राजमान्यता आणि उंचच उंच प्रतिष्ठा सर्व काही मिळाले.
आणि माझ्या आईची इच्छा सर्वार्थांनी साकार झाली.
अभिजात कलेला आणि कलावंताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळण्यासाठी भीमसेन जोशी यांच्या
हातून देवाने फार मोठे काम करून दाखवले आणि त्यांचा मुलगा म्हणून हे सर्व
ही आनंदयात्रा मी अगदी जन्मापासून जवळून पाहू शकलो.मी भाग्यवान आहे.
-जयंत जोशी ,
पुणे.