subhash inamdar

subhash inamdar

Monday, October 31, 2011

काळाप्रमाणे घडणारी नवी पीढी

- निर्मला गोगटे
आपल्या वयाला २ नोव्हेंबर २०११ ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठी संगीत रंगभूमिवर स्वतःची स्वतंत्र छाप पाडणा-या.. संस्कृत नाटकापासून वयाच्या १६ व्या वर्षी `मृच्छकटिक` नाटकात काम करुन सुमारे ३५ वर्षे अनेक संगीत नाटकात भूमिका केलेल्या सौ. निर्मला गोगटे आपल्या कारकीर्दीविषयी भरभरुन बोलत होत्या..



“आजच्यासारखी परिस्थिती असती तर माझ्यातली कलाकार स्त्री कुठच्याकुठे पोचली असती...ज्या काळात मी काम करायला लागले तो काळ स्त्रीयांना मानसिक दडपणात ठेवणारा आणि समाजाचा दबाव असेलला होता. तरीही मला जेवढे शक्य झाले तेवढ्या प्रामाणिक पणाने मी संगीत रंगभूमिवर अपार मेहनत घेऊन भूमिका केल्या. आज मी त्याबद्दल काही अंशी का होईना समाधानी आहे.. मात्र नवी पीढी शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटविणारी आहे. हुशारही आहे. काळाप्रमाणे स्वतःला घडविणारी मेहनती आहे.”...


सी. आर. व्यास, व्ही. आर. आठवले, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, जगन्नाथबुवा पुरोहित, कृष्णराव चोणकर, राम मराठे अशा गुरुंकडून तालीम घेऊन स्वयंवर, सौभद्र, मानापमान, सत्याग्रही, संशयकल्लोळ, शारदा, विद्याहरण, एकच प्याला, मृच्छकटिक, सुंदरा मनामध्ये भरली आशा अनेक संगीत नाटकात नायिकेच्या रुबाबात दिसणा-या आणि तेवढ्याच जिद्दीने नाट्यसंगीताचा खजाना संगीत रसिकांसमोर सादर करणा-या या कलावंत... आजही तेवढ्यात डौलाने वावरताहेत. उत्तम कांती, तजेलदार आणि आनंदी चेहरा, स्वरांशी नाते कायम ठेवत रंगभूमिवरच्या नाटकांबाबतच्या साक्षीदार असलेल्या निर्मला ताई बोलत होत्या.

शास्त्रीय संगीताची बैठक पक्की करुन नाट्यसंगीतात स्वतःचे नाव कमावले. आणि आज स्वरांशी नाते घट्ट पकडून ठेवत सुमारे दहाएक शिष्यांना ही कला शिकविण्यासाठी तत्परतेने उभ्या असलेल्या सौ. निर्मलाताई गोगटे यांच्याशी बोलताना त्यांनी पाहिलेल्या संगीत रंगभूमीवरच्या अनुभवांचे नमुने ऐकत मीही त्यात रंगून गेलो.

वसंतराव देशपांडे, राम मराठे, सुरेश पळदणकर, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, मास्टर दामले, सरस्वतीबाई राणे, नानासाहेब फाटक, मा. द्त्ताराम, परशुराम सामंत अशी कित्येक दिग्गजांची नावे बोलण्याच्या ओघात ओठी येतात.


नानासाहेब फाटकांसारखा नट होणे नाही...सांगताना त्या म्हणतात `त्यांचे गद्य संवाद हे पद्यासारखे लयदार असत. काय त्यांचे वावरणे. संवादातली ताकद तर औरच`.

आजवर शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या. अगदी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या दर्दी श्रोत्यांची दाद मिळविली. नाट्यसंगीत गायले. मात्र नाव मिळाले ते संगीत रंगभूमिवरच्या कामामुळे. माहेरी वडील डो. बापट यांच्या पाठिंब्यामुळे आणि इकडे म.ना. गोगटे यांच्या संमतीमुळे.

सुमारे ६३ वर्षे मुंबईत वावरल्यानंतर गोगटे पती-पत्नींनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. नबी पेठेतल्या भारतरत्न कै. भीमसेन जोशी यांच्या घरामागच्या परिसरात ते आज दोघेही शांततामय सहजीवनाचा आनंद घेताहेत. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी मुंबईत संसारात रमली आहे. आता संगीत दान हेच धेय्य मनाशी ठरवून ठराविक निवडक साधकांना शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे शिक्षण देत आहेत. त्यांच्याकडे शिकणा-यांना अट एकच स्वर तंबो-यावर लावायचा. सुगम जरी गायचे तरी सूर तंबो-यावर जुळला पाहिजे. आजही कुणी नाटकात काम करायला सांगितले तरी सगळी संगीत नाटके पाठ असल्यामुळे तयारी आहे... सहजच त्या उद्गारतात..

पती इंजीनियर. आता रिटायर्ड जीवन जगताहेत. मराठी विज्ञान परिषदेचे काम करत कार्यरत आहे.
निर्मला ताई...कधी कधी काही कविता, लेख लिहितात. त्यातल्या कांहींचा लाभही तुम्हाला कधी मी देणार आहे. आज मात्र त्यांच्या या ओळींनी या लेखाची सांगता करु या.... आणि त्यांच्या यापुढल्या जीवनात त्यांच्यातल्या जिद्दीला दाद आणि मनात ठरविलेल्या कार्याची महत्वाकांक्षा कायम रहावी अशी नटेश्वरापाशी प्रार्थना....


गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276

कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते

"कशी जाऊ मी यमुना, अडवितो कान्हा' या गवळणीनंतर हौसाबाईंच्या "शहर बडोदे सोडून दिधले वर्षे झाली बारा' या पारंपरिक बैठकीच्या लावणीतून लोककलेच्या सम्राज्ञीचे सौंदर्य उलगडले.

लता मंगेशकर यांची गजल ऐकून हा गानप्रकार शिकण्याची मिळालेली प्रेरणा आणि एकेक शब्द वीस-वीस वेळा घोटून पाठांतर केल्यावर शिकलेली "राजाओं का राज न रहा, न सुलतानोंकी शान, माटी में मिल जाएगा एक दिन माटी का इन्सान', ही गजल त्यांनी सादर केली. "गेले पयल्यानंच मी नांदाया', "जीव लावून माया कशी तोडली, सांगा पुरुषाची रीत ही कुठली', "बोल कन्हैया का रुसला राधेवरी', ही गवळण त्यांनी गायली.

लावणीगायनाला उस्ताद अल्लारखॉं यांनी केलेली तबलासाथ, पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी झालेली मैफल, वैजयंतीमाला यांनी केलेले कौतुक या आठवणींना याप्रसंगी उजाळा मिळाला. घोटकर यांच्यासमवेत हौसाबाईंनी सादर केलेल्या तमाशातील "झगडा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "श्‍यामसुंदर मदनमोहन जागो मोरे लाला' या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

डोक्‍यावरून घेतलेला साडीचा पदर, कपाळावर बंद्या रुपयाएवढे कुंकू, अशा सोज्वळ पेहरावातील वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या हौसाबाईंनी खड्या आवाजातील बैठकीच्या लावण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलेच; पण साळंत चार बुकदेखील न शिकलेल्या हौसाबाईंनी केवळ पाठांतरातून जतन केलेल्या गजल आणि कव्वाली सादर करीत उर्दू भाषेचा लहेजा गायकीतून उलगडला.

एका अपघातात पाठीच्या मणक्‍याला झालेल्या दुखापतीनंतर चालणे बंद झालेल्या हौसाबाईंच्या औषधोपचारासाठी मोठा खर्च येत असल्याची माहिती दादा पासलकर यांनी दिली. मात्र, या प्रतिकूलतेवर मात करून "कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते', हेच हौसाबाईंनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. रसिकांनी स्वयंस्फूर्तीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेला 16 हजार रुपयांचा निधी त्यांना प्रदान करण्यात आला.

"भरत नाट्य संशोधन मंदिर'तर्फे "गुजरा हुआ जमाना' कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ तमाशा कलावंत हौसाबाई जावळकर यांच्या गायनाची मैफल आयोजित केली होती. शाहीर दादा पासलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि या कलावतीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश पडला. हौसाबाईंना सुधीर जावळकर यांनी हार्मोनिअमची, पांडुरंग घोटकर यांनी तबल्याची, जयराम जावळकर यांनी ढोलकीची त्याचप्रमाणे सुलक्षणा जावळकर, पद्मा जावळकर आणि बेबीताई कोल्हापूरकर यांनी सहगायनाची साथ केली.

Friday, October 28, 2011

पुणेकर न्हाले स्वरांच्या नादात

दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज या दिवशी पुणे शहरात अनेक ठिकाणी 'दिवाळी पहाट'चे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी झालेल्या संगीत, नृत्य यांच्या रंगारंग कार्यक्रमाला रसिकांनी अतिशय उत्साहाने प्रतिसाद देऊन ते संस्मरणीय केले.

'बाबूजी आणि मी'
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके व श्रीधर फडके या पितापुत्रांतील सांगीतिक प्रवास उलगडणारा 'बाबूजी आणि मी' हा आगळा कार्यक्रम 'रंगयात्रा'चे शिरीष कुलकर्णी यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात झाला. या वेळी या दोघांच्या स्वररचना श्रीधर फडके आणि शिल्पा पुणतांबेकर यांनी सादर केल्या. त्यांना सचिन जांभेकर, केदार परांजपे आदींनी वाद्यांची साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

नवा सण नवा प्रकाश, नव्या या दिवशी उजळू दे आकाश, नवी चाहूल नवी आशा, प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा, असा शुभेच्छा संदेश पं. जसराज व माधुरी जसराज यांनी पुणेकरांना दिला.

'स्वरनूपुर'ला उत्साही प्रतिसाद
युवराज शहा, महावीर जैन विद्यालय आणि सॅटर्डे क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या 'स्वरनूपुर' या पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. गोवर्धन दूध यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.
स्वरनूपुरचे केतन गोडबोले, प्राची ओक यांनी गणेशवंदनेने कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर त्याची रंगत वाढतच गेली. त्याच्या मेणबत्ती नृत्याला सर्वांत जास्त प्रतिसाद मिळाला.

सारसबागेत नेत्रदीपक दीपप्रज्वलन

दिवाळीचा पाडवा आणि नववर्षानिमित्त सारसबागेत नागरिक, सारसबाग मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच विविध संघटना यांनी 'दीपोत्सव' साजरा केला. पहाटे ४पासून सारसबागेत हजारो नागरिक जमले होते. आकर्षक रांगोळ्या आणि आकाशकंदील यांमुळे हा परिसर उजळून निघाला. सारसबाग मित्र मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या 'दीपोत्सवा'चे हे १६वे वर्ष होते.
सचिन वठारे ग्रुप, वंदेमातरम कबड्डी संघ, कलाअकादमी ग्रीनरी सीकर्स, पुणे एव्हरेस्ट, विश्‍व प्रतिष्ठान, वुई फॉर एव्हरीवन या संघटनांतर्फे सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या.

हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजक अनिल गेलडा, सारसबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष अँड. एन. डी. पाटील, कार्यवाहक अँड. शिरीष शिंदे, राणी गावडे, माधवराव चिरमे, पल्लवी जाधव, कल्पना रावळ, पोपट ओस्तवाल, शिवाजीराव भागवत, दिलीप तातुसकर, नितीन काकडे, शिवाजीराव डावळकर, दिलीप रायसोनी, अजित लुणावत, सुलक्षणा नाईक यांनी प्रयत्न केले.

राणी लक्ष्मीबाई उद्यानात संगीत समारंभ

सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई उद्यानात 'दिवाळी पहाट' साजरी करण्यात आली. सुनीता गोकर्ण, श्रीकांत कुलकर्णी आणि नरेंद्र डोळे यांनी या वेळी सुरेल गाणी सादर केली. त्यांनी भाव-भक्तिगीते, भजने ते लावणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली. त्यांना रेवती समुद्र, अभिजित जायदे आदींनी वाद्यांची साथ केली. ज्योती घोडके यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, वा. हे. कुमठे, कैलासराव कोद्रे, महेश देशपांडे आदी उपस्थित होते.

अरण्येश्‍वर मंदिरात भावगीते

अरण्येश्‍वर मंदिराच्या परिसरात वॉर्ड ६७च्या वतीने भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर, सिंधूताई सपकाळ, उल्हास पवार, राजेंद्र ढुमे, अशोक तावरे, जांभोरकरगुरुजी यांच्या हस्ते महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी महिलांना साड्यावाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, मंजूषा गोडसे उपस्थित होत्या. नीला व्यवहारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


कस्तुरी पायगुडेंचा 'दीपस्वर'

निवारा वृध्दाश्रमातल्या सभागृहातली 'सांस्कृतिक पुणे'च्या सुभाष इनामदार यांनी आयोजलेली 'दिवाळी पहाट' कस्तुरी पायगुडे-राणे यांच्या अहिर-भैरव स्वरांच्या आवर्तनाने रंगत गेली.
कस्तुरी या प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम,भक्तिगीतेही त्या तेवढय़ाच तयारीने सादर करतात. नुकताच त्यांचा 'मी प्रेमिका' हा अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
या कार्यक्रमात त्यांनी 'रसिया म्हरो' ही बंदिश सादर केली. त्यानंतर 'बेग बेगा आओ मंदिर'द्वारे आपल्या आवाजाचा उत्तम आविष्कार सादर केला. शास्त्रीय गायनानंतर त्यांनी निगरुणी भजने सादर केली. 'अवघारंग एकचि झाला'ने त्यांनी मैफिलीची समाप्ती केली.
त्याना हार्मोनियमची साथ स्वानंद कुलकर्णी यांनी, तर तबल्याची साथ गणेश तानवडे यांनी केली. तंबोरा साथीला कल्याणी शेटे, आभा पुरोहित होत्या. सुभाष इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी 'रंगतरंग' या दिवाळी अंकाचे प्रकाशन रवी चौधरी यांच्या हस्ते झाले.

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?edorsup=Sup&queryed=42&querypage=8&boxid=25846398&parentid=4485&eddate=10/29/2011

Monday, October 24, 2011

तेलाच्या वातीतून मंदता पसरविणारा.




प्रकाश...लखलखणारा...ता-यांसारखा अवकाश उजळविणारा
अंधार दूर सारुन आपली स्वतःची प्रतिमा स्पष्ट करणारा..

कधी मिणमिणता...अंधुकसा ठिपका तर कधी आसंमतात पसरणारा
मनाची चेतना शमविणारा..

रुसलेल्या धरणीवर स्वतःचे अस्तित्व जपणारा..
किती रुपात..किती आकारात...किती वेगात धावणारा

कधी तेलाच्या वातीतून मंदता पसरविणारा..
कधी मानवाच्या सामर्थ्याने लख्ख भासणारा..

नाना रुपात नवचेतना आणणारा...
नाना रंगांची उधळण करणारा...

कौलारु घरातही तेज देणारा...
चौकोनी वास्तुलाही अस्तित्व देणारा..

महाल, वाडे, बंगले तर किल्लेही पाहिले तर लांबून साक्ष पटविणारा...
रुसलेल्यांना हसविणारा...

गहिरेपण जपत शांतपणे तेवणारा..
सूर्यास्ताला नमन करत सूर्यादयाला अर्घ्य देणारा..

गरीब-श्रीमंत यांच्यातला भेद दूर करणारा..
वास्तवतेला स्विकारुन नवी जागृती देणारा...

प्रकाश वास्तवतेला स्विकारुन नवी जागृती देणारा...
...प्रकाश
आनंदाचा ठेवा उधळत...सा-या चिंता दूर करणारा सण प्रकाशाचा

सर्व वाचकांना, मित्रांना, स्नेहीजनांना....नवे रुप देत उजाळा देणारा हा प्रकाशसण....

आपल्या दारी उजळविणारा...
प्रकाशकिरण घेऊन दाखल झालेला... सुभाष इनामदार, पुणे


Subhash inamdar
9552596276
subhashinamdar@gmail.com

Tuesday, October 18, 2011

'लग्नाची बेडी' २२ ऑक्टोबरला 'विजयानंद'मध्ये

आचार्य अत्रे लिखित 'लग्नाची बेडी'या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २२ ऑक्टोबरला 'विजयानंद'मध्ये झाला होता. हे नाटक ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे पुन्हा त्या स्मृती जागविण्यासाठी 'विजयानंद' सज्ज होत आहे.पुन्हा तिथेच खास निमित्त साधून पुन्हा त्या स्मृतिंना उजाळा देण्यात येणार आहे.

आचार्य अत्रे लिखित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २२ ऑक्टोबरला 'विजयानंद'मध्ये झाला होता. देशभरात या नाटकाने लोकप्रियता, प्रयोग संख्या आणि उत्पन्नाचे अनेक विक्रम केले. काळाच्या ओघात 'विजयानंद'चे चित्रपटगृहात रुपांतर झाले अन् काही वर्षांपूर्वी ते बंदही झाले.

नाटकाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी साडेदहा वाजता 'विजयानंद'च्या आवारात पुन्हा 'लग्नाच्या बेडी'च्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे. आचार्य अत्रे यांची ध्वनिफीत या वेळी ऐकविली जाणार असून,


या नाटकात भूमिका केलेल्या काही कलावंतांची मनोगते ऐकण्याची संधीही मिळणार आहे. रमेश देव, सीमा देव, स्वरूपकुमार, डॉ. गिरीश ओक यांच्यासह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि महापौर मोहनसिंग राजपालदेखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा आणि 'श्रीं ची इच्छा'तर्फे येत्या शनिवारी (२२ ऑक्टोबर) 'विजयानंद'मध्येच पुन्हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

या नाटकात गेल्या ७५ वर्षांत मराठी रंगभूमीवरील अनेक कलावंतांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नटवर्य बापूराव माने, रमेश देव, श्रीकांत मोघे, अरुण सरनाईक, प्रभाकर पणशीकर, प्रसाद सावकार, राजा गोसावी, शरद तळवलकर, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण, प्रशांत दामले, निर्मिती सावंत अशा अनेक कलावंतांनी यात भूमिका साकारल्या. डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, निळू फुले, विक्रम गोखले, तनुजा, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनीही या नाटकाचे काही प्रयोग केले होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10407593.cms

Monday, October 10, 2011

सूर हरवू देऊ नये—निर्मला गोगटे

गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....

भारत गायन समाजाने आपल्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संगीतभूषण पं.राम मराठे यांच्या २२व्या स्मृतिदीनी त्यांच्या नावाचा २५ हजार रूपयांचा पुरस्कार संगीत रंगभूमीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून पं. राम मराठे यांच्याबरोबर कामकरणा-या ज्येष्ठ आभिनेत्री सौ. निर्मला गोगटे यांना नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आणि गायक नट पं. रामदास कामत यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी पुण्यातल्या एस एम जोशी सभागृहात समारंभपूर्वक देण्यात आला. यावेळी आपल्या भावपूर्ण मनोगताबरोबरच निर्मला गोगटे यांनी तयार केलेल्या वरील ओळी बरेच काही सांगून जातात. त्याच तुमच्यापुढे ठेवल्या आहेत.



मा. कृष्णराव फुलंब्रीकर आणि त्यांचे शिष्य पं, राम मराठे दोघांचेही ललितपंचमीचे दिवशी निधन झाले. म्हणून या दोन महान कलावंतांची स्मृती या निमित्ताने भारत गायन समाजाकडून जपली गेली. दोन्ही महान कलावंतांच्या श्रेष्ठत्वाचे गोडवे समाजाचे पदाधिकारी सुहास दातार यांचेकडून सविस्तर सांगितले गेले. पुरस्कार वितरण समारंभानंतर दोन्हीही दिग्गजांनी गाजविलेली नाट्यपदे रसिकांसमोर सादर कली गेली. मुंबईचे शेखर खांबेटे यांनी यानिमित्ताने निवेदनातून आणि आपल्या तबला साथीद्वारे मास्टर कृष्णराव आणि राम मराठे यांच्या नाट्यगीतांचा आस्वाद घडविला. सुरेश बापट, सावनी कुलकर्णी, मेधा गोगटे यांनी सादर केलेल्या पदांना ऑर्गनची साथ मकरंद कुंडले यांची होती.

सो. निर्मला गोगटे २ नोव्हेबर २०११ ला पंचाहत्तरी पूर्ण करतील. एके काळी मा. दत्ताराम, पं. राम मराठे, छोटा गंधर्व, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत अशा अनेक दिग्गज कलावंतांबरोबर केल्ल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. आता त्याला ३५ वर्षे लोटली. मात्र आजही त्यांच्या कारकीर्दीचे संदर्भ दिले जातात. त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. त्यांच्याविषयीचे प्रेम आजही व्यक्त केले जाते. मकरंद कुंडले आणि त्यांची कन्या मेधा गोगटे यांनी छोटेखानी भाषणे करुन त्यांच्याविषयीचा आदर आणि त्यांनी घेतलेले अपार कष्टाची उजळणी केली.

पुरस्कार दिल्यानंतर केलेल्या वक्तव्यात रामदास कामत यांनी निर्मला गोगटे यांच्याबरोबर काम करण्यातला आनंद व्यक्त केला. त्यांच्याविषयी सांगताना ते म्हणाले,` शास्त्रीय संगीता त्यांनी जेवढी उंची गाठली तेवढीच उंची नाट्यसंगीतातही गाठली आहे. श्रेष्ठतम संगीतकाराच्या नावाने त्यांना हा पुरस्कार मिळाला हे उचित झाले. त्यांनी बालगंधर्वांची गायकी शिकली ती बालगंधर्वांबरोबर काम करणा-या कृष्णराव चोणकर यांच्याकडून. त्यांच्या संगीत नाटकातल्या भूमिकाही तेवढ्याच रंगल्या.`


खरे म्हणजे सर्वच समकालिन मोठ्या कलावंतांनी मला समजून घेतले. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली, याबद्दल श्रेय देताना त्याकाळचे आनंदी वातावरण अधिक आनंदी कसे राहिल असे सर्वांनीच पाहिल्याने नाटकात काम करण्याचा आनंद मिळाल्याचे सो. गोगटे सांगतात. १६व्या वर्षी पहिले पाऊल टाकेल. १८ व्या वर्षी मृच्छकटीक या संस्कृत नाटकात काम करून धीटपणा आल्याचे त्या म्हणतात. नाटकतातल्या अगदी पडद्यामागच्या लोकांनीही प्रेम दिले. निष्ठावान कलावंतांबरोबर काम करण्यामुळे खूप शिकायला मिळाले. साधी पण महान माणसे नाट्यक्षेत्रात होती. त्यानी कधीही प्रस्थापित असल्याचे न भासवता माझ्यासारख्या नवख्या कलाकारांना प्रोत्साहन दिल्यानेच माझी कारकीर्द बहरु शकली.

वलयांकित असूनही साधेपणाचे उदाहरण या समारंभाच्या निमित्ताने दिसले. भारत गायन समाजाने या ज्येष्ठ गुणी कलावंताला पुरस्कार देऊन त्यांची आठवण ठेवली याचा आनंद समारंभ पाहताना जाणवत राहिला.


-सुभाष इनामदार ,पुणे
subhashiandmar@gmail.com
Mob- 9552596276

Sunday, October 9, 2011

सावळ्या घना....`सुवर्णस्पर्शी`

सावळ्या घनातून सूरेल साद घालणारी सुवर्णा माटेगावकर





गायक कलावंताची प्रतिभा उमलते ती त्याच्या स्वतंत्र मैफलीतून. खुलते रसिकांच्या प्रतिसादातून. जेव्हा त्याचे सादरीकरण होते तेव्हा तो सूरही अंर्तमनाला स्पर्शून जातो. नेमके असेच काहीसे पुण्याच्या सुवर्णा माटेगावकरांच्या सावळ्या घना या आठ मराठी गीतांच्या अल्बमच्या सीडी अनावरण सोहळ्यात घडत गेले.

गेली कांही वर्ष हेच नाव तुम्ही रसिकांच्या मनावर कोरलेल्या, अधिराज्य करणा-या समर्थ गायकांच्या, संगीतकारांच्या रचना सादर करताना टाळ्यांच्या गजरात ऐकले असेल. पण ९ आक्टोबरची रविवारची सकाळ मात्र पुण्यातल्या रसिकाजनांना आपल्या स्वतंत्र गायकीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे ती जाहिरपणे सांगत होती.. अभिमानाने..

आणि सीडीतली एकेक गाणी सादर करून रसिकांच्या उस्फूर्त दाद घेऊन हे सूर खरचं `सुवर्णस्पर्शी` बनल्याची पावती देत सभागृहाभर फिरत होते. वय वर्षे अवघे ९७ असलेले दाजीकाका गाडगीळ यांच्याकडून वाकून आशीर्वाद घेताना सुवर्णाला धन्य वाटले असेल...

रंगमंचावर ज्यांनी ही सीडीतली गाणी संगीतबध्द केली ते अवघे ७० वर्षाचे तरुण संगीतकार अशोक पत्की. ज्यांच्या हस्ते सीडीची चंदेरी पेटी उघडली गेली त्या गायिका देवकी पंडीत. वेगळ्या वाटेने जाताना परंपरेचे जतन करुन तरूणांना वाव देणारा संगीतकार आनंद मोडक. कल्पक संगीतसंयोजक आणि संगीतकार आणि आगामी मराठी चित्रपटाचा निर्माता स्टुडिओ DWAN चा सर्वेसर्वा नरेंद्र भिडे. फाउंटन म्युझिकचे कांतीभाई ओसवाल. पडद्यामागचे सूत्रधार पराग माटोगावकर आणि आजची उत्सवमूर्ती जिने स्वतंत्र प्रतीभेचा सूर नवीन रचना गावून केला ती सुवर्णा...

मागे सावळ्या घनाचा रंगमंच भारुन टाकणार बॅनर. आणि एकेक करून सूत्रसंचालक संदीप कोकीळ यांच्या सूचनेनुसार आपल्या सूरांबरोबरच शब्दांतून व्यक्त होत जाणारे कलाकार... इतर गायकांची सहीसही नक्कल करुनही तो अस्सल आवाज पेश करुन टाळ्यांची दाद मिळवीत संगीत रसिकांना खुश करणारी गायिका सुवर्णा मात्र आपल्या वेगळ्यावाटेने जाणा-या स्वतःच्या स्वतंत्र सीडीच्या प्रकाशन सोहळ्यात पैठणीतून स्वर मिरवत यापुढची कारकीर्द आता मी स्वतंत्रपणे करणार आहे याची खात्री देत होती.

वैभव जोशी आणि संगीता बर्वे या कवींच्या शब्दांनी भारलेला हा पाऊस..वगवगळ्या वाटेवर या सीडीत भेटतो. कधी नटखट कृष्ण बनून..तर कधी राधेच्या प्रेमळ स्वरस्पर्शात...कवीतेला गीत होताना स्वरातून तो हळवा शब्द जेव्हा सूरांनी बाहेर उमटतो ते पाहण्याचे भाग्य लाभलेले हे दोन्ही गीतकार- कवी. त्यांच्यातल्या प्रतिभेला ओळखले आणि जाखले संगीतकार अशोक पत्की यांनी. आणि त्यावर सूरांचा सुवर्णस्पर्श चढविताना स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली ती सुवर्णा माटोगावकरांनी. साराच प्रवास रंगमंचावर एकेक कलावंत उलघडत होता...तो पाहणेही मनोरंजक ठरेल.

कलाकार म्हणून जेव्हा स्वतःचे स्वतंत्र गाणे गायला मिळते हा आनंदाचा ठेवा सुवर्णाच्या आयुष्यात आज आला याचा आनंद व्यक्त करताना देवकी पंडीत यांनी ,`स्वतःचा फर्स्टहॅंड अनुभव..अविस्मरणीय असतो...यातून स्वतःचे गाणे मिळते. कलाकाराला ते फार मोलाचे असते.` अजून सुव्रर्णाने नवीन गाणी गायला हवीत असे सांगताना देवकी पंडीत यांनी रसिकांना मुद्दाम म्हटले तुम्ही नवीन गाणी मोकळेपणानी ऐका ..


सुवर्णाच्या आवाजात शब्दातले भावविश्व उलगडणायचे सामर्थ्य आहे..तिने गाणी अतिशय सुंदर गायली आहेत. प्रत्येक गाण्यात तिने जीव ओतला आहे. सावळ्या घना ....शंभर वर्षाने असे गाणे तयार होते ते सावळ्या घनाच्या रुपाने आल्याचे अभिमानाने संगीतकार अशोक पत्की सांगतात तेव्हा यात वैभव जोशी आणि सुवर्णा माटेगावकर दोघांचाही न कळत सत्कार होतो.

स्वतःला शोधायची ही संधी आहे. ती सुवर्णाला या सीडीच्या निमित्ताने मिळाली आहे. त्यातून तिच्या स्वतःच्या प्रतिभेचा स्पर्श झालेला दिसतो असे आनंद मोडक सांगतात.
माझ्या स्वतःचा हा प्रवास खूप महत्वाचा आहे. आता मला जबाबदारीची जाणीव होतीय. संगीतकार अशोक पत्कींबरोबर काम करण्याचे भाग्य मिळाले याचाही आनंद आहे. आज आपल्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा दिवस असल्याचे सांगताना ती गुरु, आई-वडील यांचे ऋण व्यक्त करायला सुवर्णा माटेगावकर विसरल्या नाहीत. यापुढच्या प्रवासाला आपल्या आयुष्यात फार महत्व आहे...आता तो प्रवास अतिशय महत्वाचा आहे....

एका कलावंताला घडताना पाहण्याइतके दुसरे काहीही आनंददायी नाही... अनेक हिंदी-मराठी कार्यक्रमातून दुस-यांनी म्हटलेली गाणी म्हणताना पाहिल्यानंतर स्वतःच्या सीडीतून नवीन गीतांना सादर करताना तिच्यातल्या कलावंतांची ती परिक्षा होती...सुवर्णा त्या परिक्षेत उत्तम गुण मिळवून पास तर झालीच पण अनेक रसिकांच्या मनातही ठसली हेच तर सारे वेगळेपण...

नागपुरहून पुण्यात आलेली...नवखी मुलगी आपल्या सूरांच्या साथीने स्थिर झाली. स्वतःच्या मेहनतीने गायीका बनली.. स्वतःची वाट शोधत गीतकार-संगीतकार आणि वितरक लाभले आणी सीडी तयार झाली सावळ्या घना..

आज तीला स्वत्व सापडले.....खूप खूप शुभेच्छा.....



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276