subhash inamdar

subhash inamdar

Monday, October 31, 2011

कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते

"कशी जाऊ मी यमुना, अडवितो कान्हा' या गवळणीनंतर हौसाबाईंच्या "शहर बडोदे सोडून दिधले वर्षे झाली बारा' या पारंपरिक बैठकीच्या लावणीतून लोककलेच्या सम्राज्ञीचे सौंदर्य उलगडले.

लता मंगेशकर यांची गजल ऐकून हा गानप्रकार शिकण्याची मिळालेली प्रेरणा आणि एकेक शब्द वीस-वीस वेळा घोटून पाठांतर केल्यावर शिकलेली "राजाओं का राज न रहा, न सुलतानोंकी शान, माटी में मिल जाएगा एक दिन माटी का इन्सान', ही गजल त्यांनी सादर केली. "गेले पयल्यानंच मी नांदाया', "जीव लावून माया कशी तोडली, सांगा पुरुषाची रीत ही कुठली', "बोल कन्हैया का रुसला राधेवरी', ही गवळण त्यांनी गायली.

लावणीगायनाला उस्ताद अल्लारखॉं यांनी केलेली तबलासाथ, पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी झालेली मैफल, वैजयंतीमाला यांनी केलेले कौतुक या आठवणींना याप्रसंगी उजाळा मिळाला. घोटकर यांच्यासमवेत हौसाबाईंनी सादर केलेल्या तमाशातील "झगडा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "श्‍यामसुंदर मदनमोहन जागो मोरे लाला' या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

डोक्‍यावरून घेतलेला साडीचा पदर, कपाळावर बंद्या रुपयाएवढे कुंकू, अशा सोज्वळ पेहरावातील वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या हौसाबाईंनी खड्या आवाजातील बैठकीच्या लावण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध तर केलेच; पण साळंत चार बुकदेखील न शिकलेल्या हौसाबाईंनी केवळ पाठांतरातून जतन केलेल्या गजल आणि कव्वाली सादर करीत उर्दू भाषेचा लहेजा गायकीतून उलगडला.

एका अपघातात पाठीच्या मणक्‍याला झालेल्या दुखापतीनंतर चालणे बंद झालेल्या हौसाबाईंच्या औषधोपचारासाठी मोठा खर्च येत असल्याची माहिती दादा पासलकर यांनी दिली. मात्र, या प्रतिकूलतेवर मात करून "कलेच्या तारुण्याला वयाचे बंधन नसते', हेच हौसाबाईंनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले. रसिकांनी स्वयंस्फूर्तीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेला 16 हजार रुपयांचा निधी त्यांना प्रदान करण्यात आला.

"भरत नाट्य संशोधन मंदिर'तर्फे "गुजरा हुआ जमाना' कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ तमाशा कलावंत हौसाबाई जावळकर यांच्या गायनाची मैफल आयोजित केली होती. शाहीर दादा पासलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि या कलावतीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश पडला. हौसाबाईंना सुधीर जावळकर यांनी हार्मोनिअमची, पांडुरंग घोटकर यांनी तबल्याची, जयराम जावळकर यांनी ढोलकीची त्याचप्रमाणे सुलक्षणा जावळकर, पद्मा जावळकर आणि बेबीताई कोल्हापूरकर यांनी सहगायनाची साथ केली.

No comments:

Post a Comment