काही महिन्यापूर्वी झलक संस्थेच्या तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सादर झालेल्या अमृताचा कल्लोळू या अभंगवाणीच्या कार्यक्रमाने मला एक वेगळाच आनंदाचा धक्का दिला. त्याविषयीच मी आज लिहिणार आहे.
हा पूर्णतः नविन चालींवर आधारित कार्यक्रम असूनही प्रेक्षागृह तुडुंब भरलेले होते.सुप्रसिध्द गायक रघुनंदन पणशीकर आणि सौ. मंजुषा पाटील. गायक कलाकार तर उत्तमच होते, परंतु मन उल्हसित झाले ते अत्यंत अप्रतिम, वेगळ्या आणि बुध्दीप्रधान चाली ऐकून.
संपूर्णपणे रागदारीवर आधारित असलेल्या त्या नाविन्यपूर्ण रचनांनी माझ्यासारख्या जयपूर गायकीचा अभ्यास करणा-या कलावंताला तर भुरळच पडली. रचनाकार प्रा. केशव परांजपे त्यांच्या रसाळ, प्रभावी, अभ्यासपूर्ण, ओघवत्या शैलीत ज्ञानदेवांच्या अभंगाचे रंग उलगडून दाखवत होते. रसिकांच्या कानांना ही एक मेजवानीच मिळाली होती.
मीही संतकवींच्या अनेक रचना गाते, परंतु रचनांमधली आशयघनता. विषयाच्या गाभ्याला ङात घालण्याची हातोटी आणि अवघड वळणे असूनही थेट ह्दयाशी संवाद साधणा-या रचना . असा सुंदर संगम पाहून भारावल्यासारखे झाले.
रचनाकारांची भेट घेतल्याशिवाय राहवेना. निरनिराळे राग, निरनिराळ्या वजनाचे ठेके. कधी लोकसंगीताचा बाज घेउन येत होते. रागदारीचा तर सखोल अभ्यास जाणवत होता. भूप रागातल्या सकळ मंगळनिधी या नामाच्या अभंगातून मूर्छना तत्वाने साकारलेले वैविध्य जाणवत होते.
त्यानंतरच्या मन तुरंबा काहो, अनुपम्य नेने, सुखाचिये आवडी, कृपाळू माझा ज्ञानेश्वर या विशेष उल्लेखनीय रचनांमध्ये तोडी, मारवा, ललत, गोरखकल्याण, केदार, भैरवी अशा अनेक रागांच्या छटा मन मोहविणा-या होत्या.
घडचक्री कुंभार घडीतसे माती, ही सात मात्रांच्या ठेक्यातली लोकसंगीताचा बाज घेऊन आलेली रचना तर खूपच मनाला भिडली.
सुरवातीचा शुध्द स्वरांचा आणि शेवटचा भैरवीमधला गजरही नेहमी आपण ऐकतो त्या गजरांपेक्षा निराळी छाप मनावर ठेऊन गेला.
तुझा आण वाहिन गा देवराया, नी तर डोळ्यात पाणी आणि अंगभर रोमांच आणले.
कॉमर्ससारख्या विषयाचे प्राचार्य असूनही सौंदर्यपूर्ण कलात्मक दृष्टी, सांगीतीक विचार इतका परिपूर्ण कसा असे आश्चर्य वाटून मी केशवजींची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली. अत्यंत सुरेल आणि अगत्यशील असा परांजपे दांपत्याकडून पाहुणचार घेत असताना माहिती कळली, की इतक्या सुंदर रचनांमागे तीस वर्षांचा अभ्यास आहे. संगीतावरच्या नितांत प्रेमामुळे त्यांनी मुंबई विलेपार्ले येथे स्वरमाऊली हा शास्त्रीय संगातासाठीची संस्था स्थापन केली. ही संस्था मुख्यतः उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देते. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचा वरदहस्त केशवजींना लाभला आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
किशोरीताईंच्या गायकीचा त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या रचनांतून जाणवतो. स्वरमाऊलीच्या वतीने २५० हून अधिक कार्यक्रम. ५० पेक्षा अधिक कार्यशाळा. मुलाखती झालेल्या आहेत. सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे, हा त्यांचा हूतू सफल झाला आहे. केशव परांजपे यांनी विविध वृत्तपत्रे,. अनुभवसारख्या मासिकातून किशोरीताईं, पं. जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, शोभा गुर्टू, पं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारख्या दिग्गजांच्या संगीतविषयक सविस्तर मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. समीक्षालेखन, कवितालेखन हे साहित्यातील प्रांतावरही त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.
अमृताचा कल्लोळू या कार्यक्रमाप्रमाणेच ज्ञानेश्वरांच्या विराण्या, अभंग, रामदास, संत तुकाराम त्याचप्रमाणे ग्रेस, बोरकर, बहिणाबाई चौधरी, आरती प्रभू, मर्ढेकर, पाडगावकर या कर्व कवींच्या काव्यांना त्यांनी चाली लावल्या आहेत.
केशवजी म्हणाले की, रांगांकडे पाहण्याची उत्कट, सुंदर, संवेदनाक्षम दृष्टी त्यांना किशोरीताईंच्या गायकीमध्ये मिळाली. एखाद्या रचनेसाठी चाल सुचणे यासाठीही जन्मजात देणगीच असावी लागते. त्यामुळे त्यांचा चालींमध्य़े आत्म्याची कहन जाणवते. प्रसरणशील, विस्तारक्षम चाली, काही भाग रांगांसाठी मोकळा तर काही भाग विविध रागांच्या pharses घेऊन येतो. त्यांचा भावनिक प्रभाव, रागांमधल्या स्वरचित्रांचा प्रभाव चालींमध्ये नक्कीच प्रतित होतो.
कवितेचे, शब्दांचे म्हणणे स्वरातून व्यक्त करण्याइतक्या समर्थ चाली केशवजींच्या आहेत. त्यांच्या मते कविता गुणगुणताना अनेक विचार सुचतात. त्यातून सर्वंकश भावना ज्यातून प्रकट होतील ती चाल तयार होते. म्हणूनच ह्यातून निर्माण होणा-या कलाकृतीला बुध्दीमत्तेच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेल्या ह्या चाली आहेत.
अनेक भावना, अनेक रंग, अशा मिश्र चाली असूनही त्यात एकजिनसीपणा जाणवत रहातो. कधी थेट संवाद तर कधी आर्त व्याकुळता त्यात जाणवते.
केशव परांजपे अत्यांत साधे, मितभाषी परंतु बहुआयामी व्याक्तिमत्व.
कधी कधी दुर्गम वाटणा-या चाली असूनही स्वतःला भावले ते मांडले, असा व्यवहारीपणाचा स्पर्शही नसलेला दृष्टीकोन.
म्हणूनच पैसा, प्रसिध्दी यांच्यामागे लाहहलेल्या आजच्या जगात कोणताही व्यावसायिक हेतू न ठोवता संगीतासाठी, संगीत करणा-या अशा लोकांचे मोल अधिक वाटते.
सौ. सानिया पाटणकर, पुणे
(शास्त्रीय गायिका)
मोबा- ९४२२५२३४९१