subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 14, 2013

संतूरचे सूर माधुर्य



 संतूरचे सूर माधुर्य हे कायमच प्रत्येकालाच मोहोळ घालतात. मात्र, याला प्रयोगांची जोड व वैविध्याचे नावीन्य हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरले. पंडित उल्हास बापट यांनी संतूर या वाद्याच्या र्मयादा असूनही  त्यावर मात करून, नव्या रागांचीही निर्मिती केली आहे.
 यंदा १४ वर्षांनंतर या स्वरमंचावर संतूर वादनाची किमया त्यांनी रसिकांना दाखविली. राग पूर्वा कल्याणने त्यांनी वादनाला सुरुवात केली. वातावरणात प्रसन्नतेची लहर पसरवत त्यांनी आलाप सादर केला. जो, झाला यानंत विलंबित झपतालातील रचना सादर करत त्यांनी सुरांची बरसात केली. त्यानंतर दृत तीनतालातील रचना सादर केली.


 'क्रोमॅटिक ट्युनिंग' याविषयी रसिकांना समजवताना ते म्हणाले, ''१२ स्वर संतूरवर असले, तरी जो राग वाजवायचा तो सतत ट्यून करावा लागतो. परंतु, क्रोमॅटिक ट्युनिंगमध्ये १२ स्वर ट्यून करून, त्यानुसार ते वाजविण्यात येतात. म्हणजे प्रत्येकवेळी ट्यून करण्याची वेळ येत नाही. अत्यंत सतर्क राहून चुकून दुसरा स्वर वाजू नये याची काळजी घ्यावी लागते.'' हे त्यांनी विविध रागांची सरगम वाजवून सहोदारण समजून सांगितले.
आसमंतात भरून राहणारी वैशिष्ट्यपूर्ण मिंड ही त्यांच्या वादनाची खासियत. यासाठी वेगळी स्टीक व तंत्र त्यांनी विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या वादनाच्या वैविध्याचा अजून एक नमुना दाखवत मिश्रकाफी रागातील टप्पा त्यांनी सादर केला. 'आम्ही केवळ सूर व तालाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. शब्द फक्त दिलेला पाळतो.' असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी सुरांचा एक अनमोल नजराणा त्यांनी पेश केला. त्यानंतर 'देवा घरचे ज्ञात कुणाला' हे नाट्यपद सादर करून एक सुखद धक्का देणारा आविष्कार सादर करून त्यांनी मैफलीचा समारोप केला.
त्यांना रामदास पळसुले (तबला), गौरी लिमये (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

No comments:

Post a Comment