subhash inamdar

subhash inamdar

Friday, December 31, 2010

कलाकार नव्हे तर कला मोठी

""कलाकार नव्हे तर कला मोठी असते, याचे भान कलाकाराला येते तेव्हा कला आणखी मोठी, समृद्ध होत असते,'' असे प्रतिपादन तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी गुरुवारी येथे केले. संगीत हे प्रवाहशील असते आणि असायला हवे. त्यामुळे ते अधिक भावते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

स्वरानंद प्रतिष्ठानच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित समारंभात संगीतकार केदार पंडित यांना "केशवराव भोळे पुरस्कार', गायक विजय कोपरकर यांना "माणिक वर्मा पुरस्कार', गायिका बेला शेंडे यांना "उषा अत्रे पुरस्कार', वादक कमलेश भडकमकर यांना "विजया गदगकर पुरस्कार' पं. तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, गीतकार सुधीर मोघे, कार्यकारी विश्‍वस्त प्रकाश भोंडे उपस्थित होते.
कलेच्या सेवेत ईश्‍वरसेवा आहे, असे सांगून पं. तळवलकर म्हणाले, ""हल्लीचे संगीत पूर्वीसारखे नाही, अशी ओरड होत असली तरी या मताशी मी सहमत नाही. संगीत हे प्रवाहशील असते आणि असायलाही हवे. त्यामुळे ते अधिक भावते. खरे तर संगीत ही एक संस्कारक्षम विद्या आहे. त्याशिवाय संगीत आत्मसात करता येत नाही. म्हणून कलाकारांनी संगीतातच रमायला हवे. पुरस्कार मिळवण्यापेक्षा रसिकांचे प्रेम मिळवणे महत्त्वाचे आहे''. सुगम संगीताच्या क्षेत्रात "स्वरानंद' गेली 40 वर्षे सतत काम करते हे अतिशय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

कमलेश भडकमकर म्हणाले, ""संगीतात सतत कष्ट करण्याची तयारी हवी. मात्र, रिऍलिटी शो, झटपट प्रसिद्धी-पैसा यामुळे सध्या कष्ट करण्याची पद्धत कमी होत आहे. हे असुरक्षिततेचे वातावरण घातक आहे.''

पुरस्काराला महत्त्व असते. मात्र, तो कोणातर्फे, कोणाच्या हस्ते, कोणासोबत मिळतोय यालाही महत्त्व असते, असे कोपरकर यांनी सांगितले.

केदार पंडित यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला.
तर, "वाजले की बारा', "अप्सरा आली' ही गीते सादर करून बेलाने रसिकांची खास दाद मिळवली.





No comments:

Post a Comment