subhash inamdar

subhash inamdar

Thursday, December 30, 2010

दमां'च्या पुस्तकांचे हक्क "मेहता पब्लिशिंग'कडे

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची लोकप्रिय पुस्तके बाजारपेठेमध्ये सहजपणे उपलब्ध होत नाहीत. हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क "मेहता पब्लिशिंग हाउस'कडे दिले आहेत. नव्या पिढीच्या वाचकांसाठी नव्या संचातील १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत. 

मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनील मेहता यांना मिरासदारांची पुस्तके बाजारामध्ये मिळत नसल्याचा अनुभव आला. आठ महिन्यांपूर्वी त्यांना "माझ्या बापाची पेंड' हे पुस्तक हवे होते. त्यांनी चौकशी केली असता या पुस्तकासह मिरासदारांची सर्वच पुस्तके उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यातून त्यांनी प्रसिद्ध अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या माध्यमातून प्रा. मिरासदार यांच्याशी संपर्क साधला आणि पुस्तके नव्याने प्रकाशित करण्याची इच्छा प्रदर्शित केली. मिरासदार यांनी त्यांच्या १८ पुस्तकांचे हक्क मेहता पब्लिशिंग हाऊसला दिले.
मेहता म्हणाले, ""एखाद्या लेखकाची पुस्तके उपलब्ध होत नाहीत याचा अर्थ त्यांचे नाव कमी होते की काय, अशी भीती मला वाटली. ही पुस्तके नव्या पिढीपर्यंत पोहोचवावीत हा यामागचा उद्देश आहे. मिरासदार यांच्या बहुतांश पुस्तकांना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची मुखपृष्ठे आहेत. त्यामुळे उर्वरित पुस्तकांनादेखील नव्याने मुखपृष्ठे करून द्यावीत, ही आमची विनंती फडणीस यांनी मान्य केली आहे. "मिरासदारी' आणि "निवडक द. मा.' या पुस्तकांमध्ये त्यांच्या निवडक कथांचा समावेश आहे.''
"गाणारा मुलूक', "मी लाडाची मैना तुमची', "नावेतील तीन प्रवासी', "माझ्या बापाची पेंड', "चुटक्‍याच्या गोष्टी, "गुदगुल्या', "भोकरवाडीच्या गोष्टी', "सरमिसळ', "चकाट्या', "हसणावळ', "गंमत गोष्टी', "जावईबापूंच्या गोष्टी', "गप्पांगण', "माकडमेवा', "बेंडबाजा', "खडे आणि ओरखडे', "सुट्टी आणि इतर एकांकिका' आणि "विरंगुळा' ही १८ पुस्तके फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment