शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच नाट्यसंगीत या सर्व क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे कलाकार म्हणून विजय कोपरकर यांचा विशेष नावलौकिक आहे.
वयाच्या ८ व्या वर्षापासून सतत २२ वर्षे संगीतसाधना करून विविध मान्यवर गुरूंकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले आहे. अगदी सुरवातीचे मार्गदर्शन त्यांनी डॉ. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडून घेतले. त्यानंतरची पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. नंतरची आठ वर्षे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून संगीत शिकण्याचे भाग्य मिळाले.
विजय कोपरकर हे आकाशवाणीचे उच्च दर्जा लाभलेले गायक असून आजवर देशात-परदेशात अनेक मान्यवर संगीत महोत्सवात त्यांचे गायन झाले आहे. त्यातले विशेष उल्लेखनीय म्हणजे एन. सी. पी.ए.(मुंबई), पुण्याचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव, दीनानाथ मंगशकर समारोह (गोवा), राजाभाऊ पूंछवाले समारोह (जबलपूर), नागवर्धन सभा (कानपूर), पं. जितेंद्र अभिषेकी स्मृति समारोह (मंगलोर), भजन सभा ( कालिकत-केरळ), इंडिया इंटरनॅशनल सेंटर (दिल्ली). याशिवाय अहमदाबाद, नाशिक, इंदूर, आग्रा, चेन्नई, मणिपाल या ठिकाणीही त्यांच्या मैफली झाल्या आहेत. नुकतेच ते अमेरिकेचा दौराही करून आले अहेत. विजय कोपरकर यांनी गायलेल्या विविध रागांच्या ध्वनिफिती यापूर्वीच प्रकाशित झाल्या आहेत.
आजवरच्या संगितिक कामगिरीबद्दल त्यांना अनेक मानसन्मान, पुरस्कार मिळाले आहेत. १९८३ ते १९९० या वर्षात त्यांना सुधीर फडके यांच्या सुलश्री प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती मिळाली होती. याशिवाय गांधर्व महाविद्यालयाचा पं. रामकृष्णबुवा वझे पुरस्कार. अनंतरंग आर्ट फौंडेशनचा कलागौरव पुरस्कार. सुशिलकुमार शिंदे ट्रस्टचा सुशील स्नेह पुरस्कार. विश्वेश फौंडेशनचा विश्वेश पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.
विजय कोपरकर हे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.ई. (Mattallurgy) असे उच्चविद्याविभूषित असून एक लघुउद्योजक म्हणूनही स्वतःचा व्यवसाय सांभाळतच आहेत.
No comments:
Post a Comment