शनिवारी संध्याकाळी( शनिवार १४ जानेवारी २०१२) पुण्यातल्या भारत गायन समाज या शताब्दी पाहिलेल्या वास्तूत मिरजेचा गायक कलावंत हृषीकेश बोडस जेव्हा छोटा गंधर्वांच्या नटखट सौंदर्यपूर्ण पध्दतीने सौभद्र या संगीत नाटकातले `लाल शोलजोडी जरतारी` हे पद रंगवत होता तेव्हा भारत गायन समाजात स्मृतीत गेलेले थोर गायक नट, साथीदारही त्यांचे गाणे एकूण तृत्प मनाने या गुणी गायकाला आशीर्वादच देत असतील.....
खरेच आजची ती संध्याकाळ उपस्थित संगीत रसिकांसाठी वेगळी आठवण जपली जाणारी होती. मिरजेचा गायक अतिशय जिद्दीने आणि मनापासून सुरांना कुरवाळत आपल्या गायनात रंग भरत होता. स्वरराज छोटा गंधर्व, तात्यासाहेब पित्रे आणि संस्थेच्या एक देणगीदार शांताबाई अण्णेगीरी यांच्या स्मरणार्थ हा गायनाचा जलसा आयोजित केला होता.
आरंभी मुलतानी रागाच्या विविध आलापींनी बोडसांनी गाणे खुलविले..आपल्या लयादार आदाकारीच्या सुरेल फिरतीमधून गळ्याची गोड जात सर्वपरिचित होऊन गेली.. आणि मग स्वरांशी आणि लयींशी खेळत आपला राग डौलदार पध्दतीने सादर करुन त्यांनी श्रोत्याकडून दाद मिळविली.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनितीबाई खाडीलकर यांच्या हस्ते कलावंतांचा आणि साथीदार राजीव परांजपे( हार्मोनियम) आणि तबला साथीला बसलेले संस्थेचे कार्यवाह विद्यानंद देशपांडे यांचा सन्मान केला गेला.
`या नव नवल नयनोत्सवा` आणि छोटा गंधर्वांनी गायलेल्या अभंगाच्या रचनेतून गंधर्व गायकीची मोहक छाप त्यांनी रसिकांच्या मनावर कोरुन दाखविली.
एकूणच पुण्यात अनेक ठिकाणी अनेक गायकांच्या मैफली झडत असतात...पण ही ह्षीकेश बोडसांची गायनाची रंगत काही वेगळी आणि लडीवाळ पणाने स्वरांना कुरवाळत बहारदार सादर होत होती.
मला तर बुवा त्यांच्यातल्या कृष्णाच्या रुपाने एकेकाळी मोहवून टाकले होते...आजही सौभद्र आठवले की त्यांनी केलेला कृष्ण आणि वर्षा खाडीलकर (आता भावे) यांनी सादर केलेली रुक्मीणी आजही लक्षात रहाते.
सुभाष इनामदार,पुणे
No comments:
Post a Comment