मी नाटकाचा वेडा माणूस...बालगंधर्व मुंबईला आमच्या मामाकडे यायचे. त्यावेळी लांब बसून त्यांना ऐकायचो...मध्येच खुळ्यासारखा एखादा प्रश्न विचारायचो...आमच्यातले अंतर कमी होत गेले. १९३२ मध्ये एका चटईवर बसून गप्पा मारण्याइतके आमचे संबध जमले...माझं आणि बालगंधर्वाचे नात हे भक्त आणि दैवतासारखे होते ...
आयुष्याची शताब्दी गाठलेले बुजूर्ग कलाकार अण्णासाहेब शिरगावकर जुन्या आठवणींना उजाळा देत होते...हेच बालगंधर्व समर्थपणे साकारणारा अभिनेता सुबोध भावे समीप आला आणि अण्णासाहेबांनी त्याला चक्क वाकून नमस्कार केला!
बालगंधर्व चित्रपटातील सुबोध भावे, आनंद भाटे, माधव वझे, अथर्व कवेर्, राहुल सोलापूरकर या कलाकारांचा सत्कार संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते रामदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरगावकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
बालगंधर्वाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी प्रेक्षकांना गंधर्वयुगात नेले. बालगंधर्व आणि शाहू महाराज यांची झालेल्या भेटीपासून ते त्यांच्या संगीताच्या बैठकांचे वर्णन करत त्यांनी कार्यक्रमात रंग भरला. त्याकाळात महाराष्ट्रात बालगंधर्वांचा फोटो नाही असं एकही घर नव्हतं. बालगंधर्वांची फॅशन त्या काळातल्या बायका करायच्या. शिरगावकरांनी सांगितलेल्या बालगंधर्वांच्या या आठवणीने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. बालगंधर्वांची भूमिका केलेला सुबोध भावे प्रेक्षकातून उठून शिरगावकरांकडे गेला. त्यावेळी आताच्या चित्रपटातील बालगंधर्व हेच, अशी ओळख त्यांना करून दिल्यावर या बुजूर्ग कलाकाराने चित्रपटातल्या बालगंधर्वांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सभागृहातले वातावरण नि:शब्द झाले होते.
राज्यात शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व हे तीन युगपुरुष होऊन गेले, त्यांचे कर्तृत्त्व मराठी माणसाच्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचे पांडुरंग हे जसे दैवत आहे, तसेच संगीत नटांचे बालगंधर्व दैवत आहे. शास्त्रीय संगीतातला अवघडपणा बालगंधर्वांनी नाट्य संगीतात जोपासला. शास्त्रीय संगीत रसिकांपर्यंत पोहोचवले ते बालगंधर्वांनीच, असा गौरव या वेळी कामत यांनी केला.
No comments:
Post a Comment