बालगंधर्व चित्रपट पाहून आलेल्या युवकांच्या घोळक्यातून एक आवाज उमटला, "काय, आवाज लागलाय यार! मस्तच. एक नंबर. आपल्याला तर जाम आवडलं बुवा.....'
तितक्यात दुसरा आवाज उमटला, "अगदी खरंय, मी आधी नाट्यसंगीत फारसे ऐकायची नाही; पण या गाण्यांची गोडी लागली.' दुसरीकडे याच प्रेक्षकांच्या घोळक्यात मिसळलेले दोन आजोबा गप्पा मारत होते, "गाणी ऐकताना अगदी बालगंधर्वांचीच आठवण झाली. हे शिवधनुष्य चांगले पेलले......'
बालगंधर्वांच्या गाण्याची नव्या पिढीला ओळख करून देणारा आणि जुन्या पिढीला पुन्हा त्या संगीतनाटकाच्या सुवर्णयुगात नेणारा आवाज आहे, आनंद भाटे यांचा.
बालगंधर्व यांच्या जीवनावर चित्रपट करायचा म्हणजे अनेक आव्हाने नक्कीच समोर असणार; पण त्यातील सगळ्यात मोठे आव्हान असणार ते बालगंधर्वांची गायकी पुन्हा नव्याने उभी करण्याचे. बालगंधर्वांच्या ध्वनिफिती न वापरता, गायकाकडून ही गाणी गाऊन घेण्यात आली. यामध्ये दुहेरी आव्हान होते. बालगंधर्व हे केवळ गायक-नट नव्हते तर अनेकांचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या भक्तांच्या अपेक्षांना उतरण्याचे आव्हान त्यात होतेच; पण त्याचबरोबर नव्या पिढीलाही ही गाणी आपली वाटली पाहिजेत, बालगंधर्वांची शैली जपत त्यात नावीन्यताही जपली पाहिजे. भाटे यांनी या सर्व आव्हानांचा अत्यंत आत्मविश्वासाने सामना केला आणि त्याला यश आल्याचे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते. बालगंधर्व हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनावर चित्रपट करणे ही खूप चांगली आणि आव्हानात्मक गोष्ट होती. निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत सगळी भट्टी जमून आली. त्यामुळे प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधी आनंद यांना मिळाली हे त्यांचे मोठे भाग्य आहे. बालगंधर्व यांची जी गायकी कळली ती कशी मांडता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चित्रपटात वेळेचे बंधन, दृष्याची सुसंगती या गोष्टी सांभाळाव्या लागल्या. त्यादृष्टीने त्यांनी गाण्यात योग्य ते बदल केले. या बदलांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
"चिन्मया सकल हृदया....' हे गाणे बालगंधर्व म्हणतात असे दृष्य चित्रपटात आहे. हे खरे बालगंधर्वांचे गाणे नाही. संगीतकार कौशल इनामदारने नवीन चाल देऊन भजन चित्रपटात आणले. परंपरेशी सुसंगत चाल करणे आव्हान होते. आनंद, आदित्य ओक व कौशल अशी त्यांची चांगली टीम जमली होती. तिघांनी मिळून या गाण्यांविषयी, सादरीकरणाविषयी विचार केला. बालगंधर्वांच्या गाण्यात हे विसंगत वाटता कामा नये हे आव्हान स्वीकारले. अनेक लोकांना ते आवडले. चांगला प्रतिसाद रसिकांकडून मिळाला. बालगंधर्वांच्या सुवर्णकाळाचा पुनःप्रत्यय प्रेक्षकांना दिल्याबद्दल वेगळेच समाधान "बालगंधर्व'च्या टीमला मिळाले आहे यात शंका नाही.
-वसुधा जोशी
http://www.esakal.com/esakal/20110521/4751203579187930167.htm
No comments:
Post a Comment