subhash inamdar

subhash inamdar

Saturday, February 26, 2011

भीमसेन जोशींना रत्नागिरीत स्वरश्रद्धांजली

 शास्त्रीय संगीताच्या मैफलीने आज रत्नागिरीत स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 21 राग, 24 अभंगांच्या माध्यमातून 60 कलाकारांनी 16 तासांची आदरांजली वाहून जिल्ह्यातील संगीतप्रेमीना एकत्र आणले.
 
 हरी ओम मंगल कार्यालयात सकाळी 6 वाजता मैफलीला सुरवात झाली. भीमसेन जोशींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून मैफल सुरू झाली. रसिकांच्या भीमसेन जोशींविषयीच्या प्रतिक्रिया लिहिण्यासाठी नोंदवही ठेवण्यात आली होती.
 
 मैफलीत सुरवातीला पं. भीमसेन जोशी यांची तोडी रागाची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर श्रुती पाध्ये-जगन्नाथ जोशी (ललत), अनिल पाध्ये (अहिरभैरव), विनया परब (बिलावल), रवींद्र मेहेंदळे (बिलास तोडी), आनंद प्रभुदेसाई (नटभैरव), विजय रानडे (तोडी), सुलभा निजसुरे, श्रीधर व नयन पाटणकर (बिहाग, मधुवंती), उदय गोखले (कलावती), स्वप्नील गोरे (बहुकंस सारंग), अमेय आखवे (मुलतानी), प्रतीक जोशी (भीमपलास), सायली बर्वे (मधुवंती), अदिती करंबेळकर (यमन), तनुजा काळसेकर (बागेश्री), चिंतामणी दामले (तबला सोलो), मृणाल परांजपे (मधुवंती), संगीता बापट (मुलतानी), समिता जोशी, सुवर्णा परांजपे (कलावती, तिलंग), धनंजय जोशी (पूरिया), श्‍वेता जोगळेकर (नंद), संध्या सुर्वे (जोगकंस) यांनी आपली कला सादर केली. राम तांबे, नरेंद्र रानडे, शमिका भिडे, बंडू भागवत यांनी सादर केलेल्या अभंगवाणीने रसिकांची वाहवा मिळविली.

रात्री आनंद पाटणकर, राजाभाऊ शेंबेकर, प्रसाद गुळवणी यांनी पं. भीमसेन जोशींच्या ध्वनिमुद्रित भैरवीने मैफलीची सांगता केली.
सर्व कलाकारांना हेरंब जोगळेकर, राजू धाक्रस, प्रथमेश शहाणे, प्रसाद वैद्य, पराग वैशंपायन, राजा केळकर, मिलिंद टिकेकर, पांडुरंग बर्वे, सचिन भावे, विनय वळामे, मधुसूदन लेले, वैभव फणसळकर, सुहास सोहोनी, आशीष प्रभुदेसाई, महेश दामले, आनंद निवेकर, विजय रानडे, आनंद पाटणकर आदींनी संगीतसाथ केली.
आर्ट सर्कलच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या वेगळ्या उपक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 

Thursday, February 24, 2011

प्रमोद मराठे

गांधर्व महाविद्यालाचे  सर्वेसर्वा प्रमोद मराठे

Born in the family of musicians, he received preliminary lessons in vocal classical music from his father , Pt . Dhundiraj Marathe .
Later he decided to concentrate wholly on harmonium playing. He received harmonium training from Shri Dilip Gosavi of Kalyan. At present he is receiving advance training from Pt Manohar Chimote. He has been accompanying most of the top class artists such as Pt. Bhimsen Joshi , Dr. Prabha Atre , Mrs Malini Rajurkar Mrs Veena Saharabuddhe .Pt Prabhkar Karekar , Mrs Aarti Ankalikar to name a few.
पूर्वी संगीत कलेला समाजात मानाचे स्थान नव्हते. ही कला काही थोडया लोकांपुरतीच मर्यादित होती. त्यावेळी पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी संगीत शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. स्वतःच्या निर्व्यसनी आणि निष्कलंक चारित्र्याने एक आदर्श निर्माण केला. संगीतप्रसारासाठी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांचा अनेक शिष्यांनी गुरुंचा हा वारसा पुढे चालविला. त्यापैकी एक होते विनायकराव पटवर्धन. गुरुंच्या आज्ञेनुसार संगीत रंगभूमीवरची दैदिप्यमान कारकीर्द सोडून शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी पूर्णवेळ वाहून घ्यायचे ठरविले आणि ८ मे १९३२ रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी त्यांनी गांधर्व महाविद्यालय पुणे या संस्थेची स्थापना केली. ती महान परंपरा गांधर्व महाविद्यालयाचे आत्ताचे प्राचार्य पं. प्रमोद मराठे चालवित आहेत. 

     प्रमोदजींचा जन्म एका संगीत-अभ्यासक कुटुंबात झाला. वडील श्री. धुंडिराज मराठे हे संगीत प्रवीण होते. जवळ जवळ ५० वर्ष त्यांनी गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषविले आणि निरपेक्षपणे संगीताची सेवा केली. स्वतः संगीतप्रसाराचे कार्य करीत असताना त्यांनी प्रमोदजीच्या आई कमलताई यांनाही लग्नानंतर विशारद पर्यंतचे शिक्षण दिले आणि आपल्या कार्यात सहभागी करुन घेतले.

      आई-वडिलांकडून आलेला संगीताचा वारसा घेऊन पं. प्रमोद मराठे दोन दशकाहून अधिक काळ कलेच्या सेवेत व्यग्र आहेत. सुरुवातीचे शिक्षण वडीलांकडून घेतल्यावर त्यांनी श्री. दिलीप गोसवी आणि पं. मनोहर चिमोटे यांच्याकडे हार्मोनियमचे शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात १८-१८ तास रियाज त्यांनी केला आणि या संवादिनीवर प्रभुत्व मिळविले.

       हार्मोनियम हे खरं तर पाश्चिमात्य वाद्य पण ते भारतीय संस्कृती मध्ये असं काही रुळलं आहे की इथलेच वाटावे. कुठलीही गायनाची मैफ़ल याच्या साथीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे याचं खरं सार्थ नाव संवादिनी असेच आहे. 

       संगतकाराला साथ करत असताना अनेक गोष्टींचे भान पाळावे लागते. कलाकाराला फ़ुलवणारं वादन त्याच्याकडून अपेक्षित असते. श्री. प्रमोद मराठे हे अतिशय उत्तम संगतकार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गंगुबाई हनगळ, डॉ. प्रभा अत्रे, श्री. मालिनी राजूरकर, पं राजन-साजन मिश्रा, पं. प्रभाकर कारेकर, वीणा सहस्त्रबुध्दे, उ. राशिदखान, श्री. आरती अंकलीकर, श्री. संजीव अभ्यंकर, पं. सी. आर. व्यास आदि मान्यवरांना हार्मोनियमची साथ केली आहे. पं. यशवंतबुवा जोशी, पं. बाळासाहेब पूछवाले, पं. के. जी. गिंडे, आणि दिनकर कैकणी यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या कलेची तारीफ़ केली आहे.

        त्यांनी संपूर्ण भारतभर अनेक संगीतमहोत्सवांमध्ये वादन केले आहे. सवाई गंधर्व संगीत समारोह, विविद स्मृती समारोह (पुणे), चतुरंग आणि गुणीदास संगीत समारोह (मुंबई), भारतभवन (भोपाळ), सप्तक मैफ़िल (नागपूर), इंडियन म्युझिक अ‍ॅकॅडमी (मद्रास), भातखंडे कॉलेज (लखनौ) विष्णू दिगंबर जयंती समारोह आणि शंकरलाल समारोह (नवी दिल्ली), तानसेन समारोह (ग्वाल्हेर) हे त्यापैकी काही.

       १९९२ मध्ये माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी पं. प्रमोद मराठे यांना राष्ट्रपतीभवनातील भजन महोत्सवासाठी ३ दिवस विशेष निमंत्रित केले होते.


ई.टी.व्ही., डीडी यासारख्या विविध राष्ट्रीय चॅनेल्स आणि आकाशवाणीवर त्यांनी आपले वादन सादर केले आहे. आजपर्यंत त्यांनी एच.एम.व्ही., टी.सिरीज, रिदम हाऊस, अलूरकर आणि फ़ाउंटन यासारख्या नावाजलेल्या म्युझिक कंपन्यांसाठी ५० पेक्षा जास्त कलाकारांच्याबरोबर १०० च्या वर कॅसेट्स साठी सहवादन केले आहे.

       त्यांनी अनेक मान्यवर कलाकारांसमवेत देशात तसेच परदेशाही कार्यक्र्म केले आहेत. ऑस्ट्रेलिया, दुबई, अबुधाबी, युके, मस्कत, बहारीन, सिंगापूर, हॉंगकॉंग, फ़्रान्स, स्कॉट्लंड, स्विर्झंलंड, अमेरिका, कॅनडा, इटली आणि अफ़गाणिस्तान आदि देशांचा दौरा त्यांनी केला आहे.

       सध्या ते गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषवित आहेत. या ऎतिहासिक संस्थेशी ते १९८२ पासून निगडीत आहेत. गांधर्व महाविद्यालय आणि प्रमोद मराठे हे एक समीकरणच झाले आहे. विद्यालयाला सध्याचे वैभव प्राप्त करुन देण्यामध्ये श्री. मराठे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत विद्यालयात अनेक बदल झाले आहेत. काही वर्षांपूर्वीच विद्यालयाने जुन्या वास्तुतून नव्या वास्तूत पदार्पण केले. सध्या विद्यालयाकडे ५००० स्के. फ़ूट जागा आहे. त्यात एक मोठा हॉल आहे जिथे संगीत समारोह, सभा आयोजित केल्या जातात. याशिवाय ९ वर्ग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरले जातात. विद्यालयाकडे समृध्द अशी लायब्ररी आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना रहाण्यासाठी हॉस्टेल आहे. आज विद्यालयात शास्त्रीय गायन, हार्मोनियम, तबला, सुगम संगीत, कथक, भरतनाट्यम शिकविले जाते. संगीत अलंकार, संगीत प्रवीण पर्यंतच्या अभ्यासक्रमांची तयारी करुन घेतली जाते. आज विद्यालयात ५००हून अधिक विद्यार्थी संगीत साधना करीत आहेत. परदेशातील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिकवण्या तसेच परीक्षांची सोयही आता आहे. त्याला भरघोस प्रतिसाद ही मिळत आहे. 
श्री. शरद पवार यांच्या विशेष निमंत्रणामुळे पं. मराठे बारामतीच्या सरस्वती संगीत विद्यालयाचे प्राचार्यपदही समर्थपणे सांभाळतात. सध्या या विद्यालयात ४००हून अधिक विद्यार्थी गायन-वादनाचे शिक्षण घेत आहेत.

      गांधर्व महाविद्यालयाची वाकड नंतर आता फ़लटण येथेही शाखा सुरु होत आहे.
      श्री. मराठे हे नुसतेच उत्तम कलाकार नाहीत तर उत्तम मार्गदर्शकही आहेत. त्यांचे अनेक शिष्य आज संगीत क्षितीजावर चमकत आहेत. डॉ. सलिल कुलकर्णी, राजीव तांबे, मिलिंद कुलकर्णी, उमेश पुरोहित, तन्मय देवचक्के व इतर अनेक. याशिवाय अनेक विद्यार्थी उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय अनेकजण उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यातले अनेकजण उत्तम संगतकार आहेत. संगतकार हे मुख्य कलाकाराइतकेच तयारीचे असतात तथापि त्यांना मुख्य कलाकाराइतकी लोकप्रियता मिळत नाही आणि मानधनही अतिशय कमी मिळते याची खंत प्रमोदजींना वाटते.

     पं. मराठे यांनी आत्तापर्यंत विविध रागांमध्ये आणि निरनिराळ्या तालांमध्ये ५०हुन अधिक रचना केल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून देखील ते काम करतात. त्यांनी हार्मोनियमवर अनेक पुस्तके लिहिली आहेत जी संगीत अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे गांधर्व महाविद्यालयाने शैक्षणिक सीडीज आणि कॅसेट्सची निर्मितीही केली आहे. 

     यासर्व कार्यामध्ये पं. मराठे यांच्या पत्नी सौ. परिणिता मराठे आणि मुलगा चि. प्रणित यांचा सहभागही अत्यंत महत्वाचा आहे. सौ. परिणिता विद्यालयाच्या कार्यालयीन कामकाजवर देखरेख करतातच पण पुस्तके, सीडीज आणि कॅसेट्सच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे.त्या संगीत विशारद आणि एम.ए.(संगीत) आहेत.

    पं. प्रमोद मराठे यांच्या विद्यालयाच्या बाबतीत अनेक नव्या योजना आहेत. विद्यार्थ्यांना भरभरुन ज्ञान देणारा गुरु म्हणून त्यांचा लौकिक आहे. पाश्चात्य संगीताच्या आक्रमणामुळे भारतीय संगीत लोकांमध्ये रुजविण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच गांधर्व महाविद्यालयांसारखी विद्यालये ही सामाजिक आणि सांस्कृतिक गरज आहे. 
 - गौरी शिकारपूर ,
पुणे
email- geetgauri@gmail.com
      
 

    

Friday, February 18, 2011

बंदिश हावभाव अभिनयासह ...


बिरजू महाराजांचे व्यासपीठावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पंडितजींसोबतच्या गेल्या ५० वर्षांतल्या आठवणी त्यांनी श्रोत्यांशी शेअर केल्या. 'पंडितजींच्या गाण्याची पद्धत स्वतंत्र होती, त्यांनी सर्वांपर्यंत संगीत पोचवले. त्यांनी पुढच्या जन्म गायकाचाच घ्यावा आणि आपण सगळ्यांनी पुन्हा श्रोतेच व्हावे,' असे त्यांनी नमूद केले.

' जाने दे मैका सजनवाँ ' ही बंदिश त्यांनी गायली आणि श्रोत्यांना जिंकून घेतले. ते केवळ गायला आले होते खरे, मात्र थोडेतरी सादरीकरण केल्याशिवाय त्यांना रहावले नाही. 'जाने दे मोहन देर हुई' ही बंदिश हावभाव आणि अभिनयासह त्यांनी सादर केली. त्यांनी बसूनच केलेल्या सादरीकरणाला रसिकांनी मनापासून दाद दिली.

पंडितजींच्या आठवणीत आर्त स्वरांनी भिजलेली मैफल... 'भीमसेनजी की इतनी याद आ रही है पता नहीं गा पाऊंगी या नहीं' असे प्रसिद्ध गायिका परवीन सुलताना यांचे भावोद्गार आणि प्रत्येकाच्याच मनात हुरहूर अशा वातावरणात भारतरत्न भीमसेन जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली.



राम गणेश गडकरी .... "पिंपळपान'

जुन्या वाड्यांच्या जागी टोलेजंग इमारती होण्याच्या प्रक्रियेत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाकडे पाहून गोविंदाग्रज ऊर्फ ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी "पिंपळपान' ही कविता लिहिली, ते कसबा पेठेतील त्यांचे निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कसबा गणपतीजवळच असलेल्या फणी आळी तालमीपाशी "136 कसबा पेठ' येथे राम गणेश गडकरी यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. पिंपळपान या कवितेबरोबरच "प्रेमसंन्यास' या नाटकाचे लेखनही या वास्तूतच झाले. 1919 मध्ये याच वास्तूत त्यांची प्राणज्योत मालवली. या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गडकरी वास्तव्यास होते. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली.

या वास्तूविषयी ....... भालचंद्र वामन धडफळे या बालमित्राने 1910 मध्ये गडकऱ्यांना या वास्तूमध्ये राहण्यासाठी जागा दिली. त्यापूर्वी किर्लोस्कर नाट्यगृह म्हणजे सध्याचे वसंत चित्रपटगृह येथे काही काळ गडकरी राहत असत. "136 कसबा पेठ' येथे राहण्यास आल्यानंतर गडकरी यांनी मातुःश्री सरस्वतीबाई आणि बंधू शंकर यांना बोलावून घेतले. या वास्तूला ते "आमचा भूतमहाल' असे म्हणत असत.
या वास्तूचे वर्णन करताना गडकरी म्हणतात, ""फणी आळीतील लहानशा गल्लीत हा आमचा सिन्नरकरांचा वाडा आहे, समोर एक पिंपळ आहे. तळमजल्यावर तुळशीराम वाण्याचे दुकान आहे. दुसरा आणि तिसरा मजला आमच्याकडे अवघ्या पाच रुपयांमध्ये भाड्याने आहे. गल्लीत टांगे, मोटारी व लोकांच्या रहदारीची वर्दळ बिलकूल नसल्याने जणू काय आम्ही एखाद्या खेड्यात राहतो, असे आम्हाला सदोदित वाटते. भोवतालच्या शांततेमुळे सरस्वतीदेवीचा संचार मी एकटाच असता येथे ताबडतोब होतो आणि त्या- त्या वेळी मी गद्य व पद्य लिहीत असतो.''

याच वास्तूत 15-16 वर्षांचे असताना आचार्य अत्रे त्यांचा "फुलबाग' कवितासंग्रह घेऊन गडकरी यांना भेटावयास आले होते. 13 जून 1917 रोजी गडकरी यांचा दुसरा विवाह याच वास्तूत झाला. त्यांच्या अवघ्या 34 वर्षांच्या जीवनातील अखेरचा नऊ वर्षांचा कालखंड या वास्तूने पाहिला आहे. अनेक मोठी माणसे त्यांना भेटायला येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. गडकरी बाहेरून आले की समोरील पिंपळाला आणि वास्तूला नमस्कार करून मगच घरात जात, असे वि. ना. कोठीवाले यांनी "गडकरी जीवन चरित्रा'त लिहिले आहे.

 ही स्मृती जागविणारी वास्तू काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी पिंपळ आणि पार आजही या बदलामध्ये तसाच राहिला ......




 

Tuesday, February 15, 2011

आदरांजली स्वरभास्कराला


भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलीच्या रणांगणावर तंबोरा घेउन कित्येक वर्ष साथ करणारे दोन स्वरसाधक माधव गुडी आणि राजेंद्र दिक्षित ( राठोड) यांनी आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी १० फेब्रुवारीला टिळक स्मारक मंदीरात  स्वरांजली सभेत गाऊन त्या स्वरांचे स्मरण केले. एक वेगळा प्रत्यय त्यांनी रसिकांना दिलाच पण गुरून दिलेले स्वरांचे देणे आपण किती तंतोतंत साध्य केले आहे याचे दर्शन घडविले.
रथसप्तमीचा दिवस म्हणजे पंडीतचींचा वाढदिवस असायचा.  आज ते आपल्यात नाहीत पण त्यांची अभंगवाणी आणि ते सूर आजही मनात साठले आहेत. या निमित्ताने त्या सुरांना या दोन शिष्यांनी मोकळी वाट करून दिली. अत्यंत सुरेल आणि सुंदर मैफलीला रसिकांना प्रतिसाद इतका मिळाला की टिळकची बाल्कनीही ब-याच दिवसांनी उघडली गेली. आणि टाळ्यांच्या गजरात रसिक दाद देत होता.
दोन्ही शिष्यांच्या अभंगवाणीच्या गायकीतून पंडीतजींचा सहीसही प्रत्यय उत्तरोत्तर रंगत गेला. इंद्रायणी काठी, मन राम रंगी रंगले, तिर्थ विठ्टल यासारखे अभंगवाणीने अजरामर केलेले अभंग  राजेंद्र दिक्षित आणि माधव गुडी यांनी आळवून त्या दिव्य स्वरसमूहांचा आनंद वाढविला.
पंडितजींचे ज्येष्ठ पुत्र राघवेंद्र जोशी, आमदार गिरीश बापट, उल्हासदादा पवार, संदीप खर्डेकर यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावून कलावंतांच्या कलेला पर्यायाने पंडीतजींच्या गाण्यालाच आजरांजली वाहिली. प्रत्येक अभंगानंतर समर्पक अशी आठवण आणि पंडीतजींच्या मोठेपणाचा भाग रंगवत नेऊन मंगेश वाघमारे यांनी अभंगवाणी रसरशित होण्याला मदत केली.
आदरांजली स्वरभास्कराला या कार्यक्रमाला पुण्यातील नावाजलेल्या कलाकारांची साथसंगत लाभली. हार्मानियमवर संजय गोगटे तर व्हायोलिनवर सौ. चारुशीला गोसावी यांनी अभंगातील प्रत्येक जागा जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहचविल्या. तबल्याची साथ वयाने सर्वात लहान असलेला विनित तिकोनकर यांनी फारच सुंदर केली. तसेच त्याचे वडील अविनाश तिकोनकर यांनी पखवाजवर समर्पक साथ करून मैफलीची रंगत वाढवित ठेवली. पंडीतजींबरोबर जवळपास प्रत्येक कार्यक्रमात टाळाची साथ करुन वाहवा मिळविणारे बुजुर्ग कलाकार माऊली टाकळकर यांचीही साथ या कर्यक्रमाला लाभली  होती हे माठे भाग्यच म्हणायचे.
दोन-अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता पंडीतजींच्या जो भजे हरि को सदा या भजनाच्या ध्वनिमुद्रणाने झाली आणि पंडीतजींचा धीर गंभीर स्वर मनात साठवून रसिक तृप्त झाला.

<iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/UmgAa5xJjlM" frameborder="0" allowfullscreen></iframe>


Friday, February 11, 2011

सर्वाधिक गायक, वादक आणि चित्रकार पुण्यामध्ये

पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक गायक, वादक आणि चित्रकार राहत असल्याची माहिती भारतीय कला मंचाने कलाकार डायरीसाठी केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

पुण्यासह राज्याच्या विविध भागात राहणारे शास्त्रीय, सुगम संगीत गायक, वादक, कवी, लेखक, चित्रकारांपासून कार्यक्रमांचे संयोजक, निवदेक यांची माहिती देणारी 'कलाकार डायरी' भारतीय कला मंच गेल्या अकरा वर्षांपासून प्रसिद्ध करीत असून त्यांच्या आता तब्बल आठ हजार कलाकारांच्या माहिती संग्रह तयार झाला आहे. यात अभिनेते, नर्तक, लोककला सादर करणारे कलाकार, वाद्य दुरुस्ती करणारे, सन्मानचिन्ह तयार कारागिर, संयोजक, समीक्षक, नाट्यगृह, कला संस्थांची माहिती देण्यात येते.

सुरुवातीला केवळ पाचशे कलाकारांच्या माहितीने सुरू झालेली ही डायरी आता आठ हजार कलाकारांपर्यंत पोचली असून, यात सर्वाधिक कलाकार पुण्यात राहत असल्याचे दिसून आले आहे. कलाकारांचे विभागणी केली, तर ७० टक्के गायक, वादक, चित्रकार आणि शिल्पकार पुण्यातच वास्तव्यास आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, नृत्य कलाकार मुंबईमध्ये सर्वाधिक आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये त्यांची खूप कमी संख्या आहे, अशी माहिती भारतीय कला मंच संस्थेचे प्रमुख धनंजय देशपांडे यांनी दिली.

अनेकांना आपल्या घरी, सोसायटीत अथवा संस्थेत विविध उपक्रमांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम करायचे असतात. पण त्यांना संयोजनाचा अनुभव नसल्याने कलाकार कुठे राहतात, त्यांच्याशी संपर्क कसा साधावा, कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे, याबद्दल गोंधळ होतो. सर्वसामान्यच नव्हे, तर मोठमोठ्या संस्थांही याबाबत फारशी माहिती नसते, अशा व्यक्तींना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. बालकलाकारांपासून ते ज्येष्ठ कलाकारांची माहिती दिली जाते.

या वषीर्ही मार्चमध्ये डायरी प्रसिद्ध होणार असून, कलाकारांनी आपली नावे आणि संक्षिप्त माहिती नाव पत्यासह लिहून भारतीय कला मंच, २३, स्वप्नशिल्प अपार्टमेंट, डॉ. भगली शेजारी, सिंहगड रस्ता, पुणे : ५१, फोन ९४२२३०४३४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.

Wednesday, February 9, 2011

प्रभात’काळात रमले रसिक

शांताराम आठवले जन्मशताब्दी

प्रभात फिल्म कंपनीच्या मराठी चित्रपटांच्या गीता द्वारे काव्यपूर्ण चित्रपटगीतांचे 'बीज' पेरून तीनशे चित्रपटगीते लिहिणारे गीतकार.
ग दि माडगुळकर यांनी आदर्श मानलेले गीतकार.

‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक दिवंगत शांताराम आठवले यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता नुकतीच मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर येथे एका कार्यक्रमात झाली. शांताराम आठवले यांच्या लेखणीतून साकारलेल्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाद्वारे त्यांचे उचित स्मरण व्हावे, या विचाराने प्रेरित होऊन येथील उदयोन्मुख गायक श्रीरंग भावे याने ‘‘बीज अंकुरले रोप वाढले’’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या निमित्ताने शांताराम आठवले यांच्या उज्ज्वल कारकीर्दीची व चित्रपटसृष्टीच्या रम्य प्रभातकालाची उपस्थितांना प्रचिती आली. आठवले यांचे चिरंजीव सुदर्शन आठवले व ज्येष्ठ कन्या मंगला काकनूरकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. दरवर्षी आम्हीच आमच्या बाबांप्रित्यर्थ कार्यक्रम करतो, पण या वर्षी एका तरूण गायकाने जन्मशताब्दीचे निमित्त साधून असा कार्यक्रम करायचे ठरवले, हे पाहून आम्ही आठवले कुटुंबीय श्रीरंग भावेचे कौतुक करतो व त्याचे आम्ही आभारी आहोत, असे मनोगत सुदर्शन आठवले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात अवीट गोडीच्या विविधरंगी गाण्यांचा समावेश होता. माधुरी करमरकर यांची ‘आला वसंत ऋतू आला’,‘तुझा नि माझा एकपणा’, केतकी भावे-जोशी हिचे ‘भाग्यवती मी’,‘राधिका चतुर बोले’, पूर्वजा पाध्येची ‘अहा भारत विराजे’, ‘हासत नाचत जाऊ’, चिन्मय लेले व पूर्वजाचे ‘दोन घडीचा डाव’ आणि श्रीरंग भावेची ‘आनंद आनंद अवघा’ व ‘आधी बीज एकले’ ही गाणी विशेष रंगली. ‘बघत राहूदे तुझ्याकडे’, ‘उमलली एक नवी भावना’ या सारख्या द्वंद्व गीतांबरोबर ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रुती भावे, सागर साठे, वरद कठापूरकर, हनुमंत रावडे, प्रसाद पाध्ये, अनंत जोशी आणि निषाद करलगीकर या वादकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. धनश्री लेले यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची उंची वाढली.
रंगश्रुती म्युझिकची निर्मिती व श्रीरंग भावे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाला गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीचे सुभाष सराफ, अरूण फडके, हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचे उदय दिवाणे, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई यांचे सहकार्य  होते.

हा कार्यक्रम मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी व्हावा, असे मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केले.

Shantaram Athavale is a name associated with Marathi literature and film industry. Marathi is a regional language from the state of Maharashtra, known to the world due to it’s famous capital city of Bombay (Mumbai), in India. He has written 300 film songs, directed six and acted in 2 Marathi films, written 200 poems (with 2 published books) and 10 books on various subjects.

http://www.shantaramathavale.com/

Tuesday, February 8, 2011

स्मरण गुरूंचे

गायन वादनाचार्य कै. पं. गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने स्वरबहार या संस्थेने व्हायोलिन वादनाची मैफल पुण्याच्या स्नेहसदनच्या दालनात शनिवारी ५ फेब्रुवारी २०११ला आयोजित केली होती. दरवर्षी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्याचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. भालचंद्र देव हा कार्यक्रम आयोजित करीत असतात.
कार्यक्रमाच्या पूर्वाधात  अनेक वर्ष बबनराव हळदणकरांना साथ करणारे पुणे आकाशवाणीचे निवृत्त व्हायोलिनवादक आणि पं. डी.के.दातार यांचे शिष्य रत्नाकर गोखले यांचे वादन रंगले. प्रारंभी  भिमपलास रागात विलंबित एकताल आणि द्रुत तीन ताल सादर केला. पं. गजानबुवांनी बांधलेली जयताश्री रागातली एक रचनाही सादर केली. शेवटी पं. भीमसेन जोशी यांचा अधिक देखणे हा अभंग सादर करून आपल्या सुरेल आणि गायकी पध्दतीने वादनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकरांचे शिष्य मयंक बेडेकर यांनी अतीशय समर्पक साथ केली.
उत्तरार्धात भालचंद्र देव ( पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य) आणि सौ. चारूशीला गोसावी (भालचंद्र देवांची कन्या व शिष्या) यांच्या व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगदार झाली. जुगलबंदीतून सादर केलेली मधुवंती रागातली रचना सुरेल तर होतीच पण ती तेवढीच बहारदारपणे या दोन कलावंतानी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मधुवंतीनंतर सादर झालेला राग होता श्री. या श्री रागातली पं. गजाननबुवांची मध्यलय तीनतालातली रचना सादर करून भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना तबला साथ केली ती रविराज गोसावी (चारूशीला देव यांचे पुत्र) यांनी. त्यांच्या वादनकौशल्यावर खूष होऊन रसिकांनी टाळ्याची पावतीही दिली. उत्तरार्धानंतरच्या कार्यक्रमाचे आणि एकूणच मैफलीचे संचलन राजय गोसावी यांनी केले. या पितापुत्रींचे वारंवार कार्यक्रम होवोत हिच आमची इच्छा.
गुरूंचे स्मरण करताना आजोबा. भालचंद्र देव. कन्यका आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी. तबल्यावर नातू रविराज गोसावी आणि सूत्रे हाती होती ते जावई राजय गोसावी. असा हा नात्याचा सुरेख आणि सुरेल संगम स्नेहसदनाच्या मंचावर एकत्रित झाला. 

<iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/PPOXM4hpHeY" frameborder="0" allowfullscreen></iframe>




Monday, February 7, 2011

पावले मंचावर थिरकली

'जीवन के हर मोड पे...' या गाण्यावर अमितकुमार आणि आशा भोसलेंची पावले मंचावर थिरकली, तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांनी दाद देऊन अख्खं मैदान डोक्‍यावर घेतले. "आजा आजा मैं हूँ प्यार तेरा..', आशा आणि जॉली यांचे "जब अंधेरा होता है...' आणि जॉलीचे "शोले'तील "मेहबुबा...मेहबुबा...' या गाण्यांना श्रोत्यांच्या तालबद्ध टाळ्यांची साथ मिळाली. "पंचम'दांबद्दलच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील प्रसंगांचे दाखले देत या कलाकारांनी ही संगीतरंजनी रंगविली. आर. डी. बर्मन यांना अनेक वर्षांपासून साथ देणाऱ्या पंधरा कलाकारांची उपस्थिती या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये होते. "पंचम'दांनी प्रत्येक गाणे रचताना वापरलेल्या वाद्यांसह सर्व गाणी सादर करण्यात आली.

ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात बिनाका गीतमालाद्वारे असंख्य गाणी लोकांपर्यंत पोचविणारा एक आवाजही श्रोत्यांना आज "पाहायला' मिळाला. तो आवाज म्हणजे अमीन सयानी. तेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते. आर. डी. बर्मन, किशोरकुमार यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. पंचमदा आणि गुलजार हे एक अजब "कॉंबिनेशन' होते. त्या दोघांच्या मैत्रीच्या आठवणींना आशा भोसले यांनी उजाळा दिला. "दो लब्जों की है', "आपके कमरेमे कोई रेहता है', "आजा आजा मैं हूँ प्यार तेरा' अशी एकाहून एक सरस गाणी आशाताईंनी सादर केली. "दम मारो दम'ने कार्यक्रमाचा कळस गाठला.
सौ. अरुणा नाईक मेमोरिअल फाउंडेशन आणि लायन्स क्‍लब, मुकुंदनगर यांनी आशा भोसले यांच्या "राहुल ऍण्ड आय' या सूरमयी संगीत रजनीचे शनिवारी आयोजन केले होते

Friday, February 4, 2011

भीमसेन जोशी कलादालन

भव्य ऑडिटोरीयम ... ३०० पेटिंग्ज लावता येतील अशी आर्ट गॅलरी ... चार लाखांच्यावर संग्रह असणारी म्युझिक गॅलरी ... अशा वैशिष्ट्यांसह सहकारनगर येथील वसंतराव बागूल उद्यानात उभारण्यात आलेल्या ' भारतरत्न पं . भीमसेन जोशी कलादालना ' चे उद्घाटन पंडितजींच्या ९० व्या जयंती दिवशी १० फेब्रुवारीला करण्यात येणार आहे .

पंडितजींच्या उपस्थितीत ९०व्या वाढदिवशी कलादालनाचे उद्घाटन करण्याचा महानगरपालिकेचा संकल्प होता . मात्र , ते नियतीला मान्य नव्हते , अशी खंत महापौर मोहनसिंग राजपाल यांनी व्यक्त केली . पालिकेचे विरोधी पक्षनेते आबा बागूल यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबवण्यात आला आहे . या प्रकल्पात मिनी थिएटर , म्युझिक आणि आर्ट गॅलरी , डॉक्युमेंटरी पहाण्याची व्यवस्थाही कलादालनात करण्यात आली आहे , असे राजपाल यांनी सांगितले . भारतीय संगीताचा गेल्या अनेक वर्षातला प्रवास , पुणे शहराचे संगीत क्षेत्रातले योगदान , कलाकार आणि त्यांच्या कारकिदीर्ची माहिती कलादालनात मिळेल . तसेच छोटे सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्याची सोय इथे करण्यात आली असल्याचे ते म्हणाले .

शहरातल्या शौकिनांना इथे हवे ते संगीत ऐकता येईल . मराठी , हिंदी , इंग्लिश सिनेमांची गाणी , भावगीते , पॉप , रॉक , शास्त्रीय संगीताचा खजिना म्युझिक गॅलरीच्या माध्यमातून पुणेकरांसाठी उघडत असल्याचे बागुल यांनी नमूद केले . या म्युझिक गॅलरीत २८ क्युबिकल्स करण्यात आली आहेत . प्रत्येक क्युबिकलमधे कम्प्युटर आणि हेडफोन्स आहेत . याच कम्प्युटरवर पुस्तकेही डाऊनलोड करण्याची योजना आहे . रसिकांना संगीताचा आस्वाद घेताघेता आवडीची पुस्तके वाचण्याची सोयही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .

कलादालनाच्या प्रवेशद्वारावर पंडितजींचे विठ्ठल आणि संत तुकारामांसमवेत भव्य शिल्प साकारण्यात आले आहे . १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन होईल . यावेळी पुण्याचे सर्व खासदार , आमदार आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित रहाणार आहेत . उद्घाटनानंतर कलादालन सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत सर्वांसाठी नाममात्र शुल्कात खुले होईल .

ऐका , दुमिर्ळ ग्रामोफोन रेकॉर्डस्ही !

दुमिर्ळ शास्त्रीय संगीताच्या मैफली , जुन्या गाण्यांचा हजार ५०० ग्रामोफोन रेकॉर्डस्चा वैयक्तिक संग्रह रमेश गणेश देव यांनी पुणेकरांसाठी खुला केला आहे . या कलादालनात ग्रामोफोन ऐकण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे . या रेकॉर्ड्स ऐकण्यासाठी मात्र अगाऊ नोंदणी करावी लागेल .

Around 12,000 sq ft area in the garden has been dedicated to the art gallery named after the late Pandit Bhimsen Joshi. It will showcase the best in performing and visual arts.

Addressing a news conference here on Friday, Congress leader Aba Bagul said the gallery has an 80-seater amphitheatre, 28-cubicle music library, 3,000 sq ft of art display space and another 3,000 sq ft for arts-related programmes that will be held on a regular basis. A collection of around 7,000 records on stalwarts of Indian classical music, donated to the gallery by Ramesh Ganesh Deo and other music connoisseurs, will be used for music appreciation sessions.

"This has been our most ambitious project worked out during the last two years at a cost of Rs 3.5 crore. We will be requesting the chief minister to appoint an independent agency to manage this huge facility, instead of inviting tenders," said Bagul.

The civic garden department undertook the job of constructing the gallery and other improvements at the Bagul garden, over two years ago. "This gallery is a unique project dedicated to arts and this facility should be taken care of in the right manner. I will also be seconding the request to the CM regarding appointment of a separate agency for proper management," said mayor Mohansingh Rajpal, who was also present for the news conference.

At the gallery's entrance, a mural of Pandit Bhimsen Joshi welcomes visitors. The music library comprises a collection of around four lakh songs that can be heard on the headphones and videos on different genres of Indian music that can be seen on the latest flat screen monitors. Fitted with the state-of-the-art acoustics, the amphitheatre will screen documentaries and short films on arts.

"We will be issuing time-based smart cards to those who want to make use of our music library. There will also be a nominal entry charge. We will organise regular exhibitions on the first floor that can display around 300 paintings. We have ensured special lighting for a better display," said Bagul.

The Mandhre Art Gallery on the second floor, has been named after the late Marathi film actor Suryankant Mandhre. It will showcase Mandhre's personal collection of photographs and paintings done by him.

The gallery's inauguration will be attended by artistes from the field of music, art, dance, theatre and cinema. "Beautification work at the garden is also on. We are in the process of fitting lights for a special evening fountain show that we hope to begin soon," said Bagul. After the inauguration, the gallery will be open from 6 am to 6 pm.
(http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pt-Bhimsen-art-gallery-to-open-on-Feb-10/articleshow/7428186.cms)
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7429325.cms)

Tuesday, February 1, 2011

"आता नीरव शांती...."

वडिलांना मी लहानपणापासून 'अहो' म्हणायचो.
कारण आई त्यांना अशीच हाक मारायची.२००५ला आई गेली.
आता वडील गेले.माझी मनःस्थिती आत्ता,आज कशी आहे,हे सांगणे अवघड जात आहे.

वडिलांना भूतकाळाच्या स्मरणरंजनात रमणे आवडत नसे.
पण त्यांच्या गाण्यात,स्वरविस्तारात सर्वरसपरिपोष व्हायचा,
आणि भावनांची अनुभूती,एकाग्रतेने ऐकणाऱ्याला येत असे.
शब्दात न मावणाऱ्या संवेदना,अक्षरांनी न सांगता येणारे
अमूर्त विचार,प्रेम,वेदना हे सर्व साकारण्याची दार्शनिक सिद्धी त्यांच्या गाण्यात होती,आहे.
त्याचे इंग्रजी हस्ताक्षर फार सुंदर होते आणि खूप झरझर पत्र लिहित असत.

आयुष्यात मी पाहिलेला अतिशय शुद्ध मनाचा माणूस असे त्यांचे वर्णन होऊ शकेल. 
या शुद्धतेनेच आणि दृढ श्रद्धेने त्यांना संगीत सिद्धी लाभली.सर्व वेळ मनात गाणेच असायचे.
मनाने फार कणखर होते.फक्त माझी बहिण शुभदा हिचे कन्यादान करताना खूप हळवे झाले होते.डोळ्यातून पाणी वहात होते.
अतिशय कमी बोलायचे पण जे बोलायचे ते नेमके आणि मार्मिक असे.
फार थेट विनोदबुद्धी होती.युक्तिवाद आणि शब्दांचे खेळ त्यांना फारसे रुचत नसत.
खरे स्थितप्रज्ञ आणि गाणे इतके रोमारोमात की कितीही विचित्र आपत्तींमध्ये त्यांच्या कलाविश्कारामध्ये 
काहीही फरक पडला नाही.रोजच्या आयुष्यातही अतिशय निडर आणि साहसी होते.हे सगळे बघत बघत मी वाढलो.
व्यवहारी जगाच्या रोखठोकपणाचे वास्तव,त्यातले हीण याची झळ त्यांनी आम्हा मुलांना कधीच लागू दिली नाही.

मला गाण्याचे अतोनात वेड.गाणे हा आमचा,घराच्या सर्वांचा स्थाईभाव.घरी आईसुद्धा कायम रियाझ करत असे.
वडिलांच्या गाण्यामुळे मला कलेची उंची म्हणजे काय असते ते लवकर कळले.
आपल्याला आयुष्यात फक्त गायचं आहे  हा साक्षात्कार वडिलांना वयाच्या नवव्या वर्षी झाला.
मला तस काही इतक्या लवकर कळल नाही.
१९५२ साली माझा जन्म झाला.तेव्हापासून आत्तापर्यंत गाणे हा माझ्या आयुष्यातला श्वासासारखा साथीदार आहे.
गाण्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करु शकत नाही.पण वडिलांसारखे गाणे आपण गाऊ शकत नाही असे त्यावेळी वाटले.मी या भावनेवर मात करायला हवी होती.
आईवडिलांना मी व्यावसायिक गायक व्हावे असे वाटत नव्हते.असो.
वडिलांच्या गाण्याचे तेज,त्याची धग आणि शीतलता - यांनी मी समृध्द झालो.
वाचनाची आवड होतीच.त्यात भर,मला गाण्याचे,पेंटिंगचे,फोटोग्राफीचे भूत लागले.दृश्यकलेची प्रकृती,रचना,रंगांची गूढता,सांकेतिकता 
आणि परिणाम शोधताना मी खुळा होऊ लागलो.तेच आर्ट स्कूलमध्ये जाऊन शिकलो.तरी कलावंताला जगण्यासाठी 
सोसावी लागणारी धावपळ माझ्या वाट्याला यावी आणि बेभरवश्याचे जिणे मी जगावे हे वडिलाना फारसे पसंत नव्हते.पण त्यांनी विरोध केला नाही.
पुढे मला जगण्याची काही कोडी उलगडली,व्यावहारिक यश मिळाले.थोडी मान्यता लाभली. तेव्हा मला झालेला आनंद आईवडिलांनी पाहिला.
काही मोठ्या कलावंतांनी,समीक्षकांनी माझे कौतुक केलेले त्यांनी ऐकले.माझी चित्रे विकली जाताना पाहिली.त्यांना बरे वाटले असणार.
मला काही बोलले नाहीत.मी त्यांचाच मुलगा असल्यामुळे एक स्वतंत्र,निर्भीड मुक्तपणा माझ्यात संचारला असावा.
त्यांचे गाणे हा माझ्या मनाचा कणा आहे.हे सर्व संस्कार आणि त्यातून मला आकळलेले जग हीच माझी प्रेरणा.
मुंबईतल्या माझ्या पेंटिंगच्या पहिल्या प्रदर्शनाला ताजमहाल हॉटेलमध्ये ते आले होते.पण १९८६ साली मक्स म्युलर भवनतर्फे पुण्यात झालेल्या 
माझ्या पहिल्या आर्ट फोटोग्राफीच्या प्रदर्शनाच्यावेळी ते लांबच्या दौऱ्यावर होते.ते प्रदर्शन त्यांनी मग घरीच पाहिले.
पेंटिंगवर,चित्रकलेवर मात्र आमचे कधीच फारसे संभाषण झाले नाही.पण समकालीन सर्व नामवंत चित्रकार,शिल्पकार 
त्यांच्या मैफलींना हजर असायचे.त्यांच्याशी ते माझी ओळख करून द्यायचे.

वडील खूपच झपकन निर्णय घ्यायचे आणि त्यावर ठाम असायचे.गम्मत अशी की 
त्यावेळी वेडेपणाचा casual वाटणारा तो निर्णय नंतर परिस्थितीशी अनुरूप मिळताजुळता ठरायचा.
जणू परिस्थितीनी त्यांच्या विचारांना सुसंगत रूपात स्वतःला बदलून घेतले आहे असे वाटावे इथपर्यंत.
इतकी त्यांची इच्छाशक्ती बलदंड होती.

वयाच्या अगदी लहानपणापासून सर्व भारतभर मी त्यांचाबरोबर प्रवास केला.तुफान प्रवास.
गाणे हा त्यांचा शरीरधर्म होता.गाण्यातून त्यांना उत्तम प्राणायामसुद्धा व्हायचा त्यामुळे खूप छान तीन चार तासांचा 
कार्यक्रम झाला की ते खूप ताजेतवाने होत असत.एरवी अगदी साधे दिसणारे त्यांचे व्यक्तिमत्व ते स्टेजवर गायला बसले 
की तेजःपुंज भासू लागे.हा चमत्कार मी खूप वेळा पाहिला आहे.जबरदस्त गाणे झाल्यावर मैफलीमध्ये 
श्रीत्यांच्या मनात एक निशब्द आनंदाचे नीरव समाधान पसरत असे.मी अनेकदा त्या आनंदाच्या शांततेत गेलो आहे.
असा अनुभव की ज्यातून मी दिवस दिवस बाहेर येऊ शकत नसे.जागेपणी आणि झोपेतसुद्धा गाणे ऐकू यायचे.
अशा स्वप्नमय आभासात मी अगदी आत्ता आत्तापर्यंत जगलो.
गेली काही वर्षे आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व घर आणि आम्ही?
आम्ही आजारलो.
वडिलांचा आवाज,त्यांच्या गाण्याची दुनिया..तिने आम्हाला शक्ती दिली.
ते गेले.त्यांच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण आपल्याबरोबर असणारच आहे. अगदी हवे ते,हवे त्या वेळी.
पण त्यांच्या प्रत्यक्ष  मैफलीचे स्वरवैभव आणि तो परिणाम आता फक्त कल्पनेत आणि आठवणीत रहाणार.
त्यांच्या केवळ घरात असण्यामुळे खूप बरे असायचे.
मी आयुष्यभर ज्या वात्सल्याच्या कृपाछायेत होतो तिला मी अंतरलो आहे हे मानायला मन तयार नाही.

त्यांच्या व्यक्तीमत्वात अथांग प्रेमाचे तेज होते आणि ते देशात,विदेशात समाजातल्या सर्व थरातील माणसांना जाणवत असे.
त्यांच्या इतके अफाट प्रेम फार कमी कलावंतांना लाभले.ते काहीतरी असाधारण अध्यात्मिक पातळीवर होते.
संगीताच्या,गाण्याच्या उत्तुन्गतेच्या ,खोलीच्या परिपूर्णतेच्या नव्या व्याख्या आणि शक्यता त्यांनी रसिकांना दाखवल्या.
परंपरेला सांभाळून तिच्या नव्या क्षितिजांचा विस्तार त्यांनी श्रोत्यांच्या नजरेत आणला.माझी आई स्व.वत्सला त्यांच्या 
या शोधयात्रेतील खरी सोबती आणि त्यांची खरी समिक्षक होती.तिच्या मतांचा ते आदर करीत असत.फक्त गाण्याच्या प्रेमानेच 
ते एकमेकांच्या जवळ आले होते.उत्तम संगीत ,उत्तम गाणे हाच आई वडिलांच्या जगण्याचा,आमच्या घराचा आशय होता.वडिलांना भेटायला आमच्याकडे
वेगवेगळ्या क्षेत्रातली फार मोठी माणसे घरी यायची.खूप थोर कलाकार जवळून बघायला मिळायाचे.त्यांचा सहवास मिळायाचा.
साधू,सत्पुरुषांचे,कलावंतांचे आदरातिथ्य करण्यात वडिलांना विशेष आनंद व्हायचा.हा आनंद घरातल्या आम्हा
सर्वाना जाणवायचा आणि सर्वांमध्ये तो उतरत असे.फार साधे आणि निरागस स्वभावाचे होते.फील लेव्हलवर माणसांची पारख होती.
लहानपणापासून सर्व देश त्यांनी एकट्याने पालथा घातला होता.नैसर्गिक शहाणपण आले होते.तसे बहुभाषिक होते.
जग कळायचे.भिडस्त होते पण मी भिडस्त नाही असे सांगायचे.

त्यांना भटकायला खूप आवडायचे.पण साधा माणूस कसा जवळच्या बागेत फिरून येईल तसे हे दुसर्या गावालाच जाऊन यायचे.
अतिकाळजीने आईची प्रकृती बिघडायची .त्यांचेही गणित चुकायचे.पण नंतर त्यांच्या सोबत जाऊन त्यांची काळजी घेण्याचा निर्णय तिने घेतला.
वडिलांनाही तिच्या बरोबर असण्याचा आधार वाटायचा.वडिलांना,त्यांच्या गाण्याला त्या गाण्याच्या दर्जाइतकी 
प्रतिष्ठा मिळावी असे आईला खूप वाटे.पण माझ्या लहानपणी त्यांचे  मोठेपण,त्यांच्या गाण्याचा दर्जा 
इथे पुण्यात सर्वांना कळत नव्हता.अभिजात कलेविषयी तशी अनास्थाच होती.आधुनिक चित्रकलेबद्दल अजूनही आहे तशी.
पण शास्त्रीय संगीताच्या बाबतीत हे चित्र बदलले.वडिलांनी अभिजात गाणे हे सर्वांच्या जवळ नेऊन ठेवले.
आज सर्व जगात जिथे जिथे लोकांना गाण्याचा कान आहे तिथे तिथे भीमसेन जोशी हे नाव लोकांना माहित आहे.
वडिलाना लोकमान्यता,प्रेम,वैभव,राजमान्यता आणि उंचच उंच प्रतिष्ठा सर्व काही मिळाले.
आणि माझ्या आईची  इच्छा सर्वार्थांनी साकार झाली.

अभिजात कलेला आणि कलावंताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळण्यासाठी भीमसेन जोशी यांच्या
हातून देवाने फार मोठे काम करून दाखवले आणि त्यांचा मुलगा म्हणून हे सर्व 
ही आनंदयात्रा मी अगदी जन्मापासून जवळून पाहू शकलो.मी भाग्यवान आहे.
-जयंत जोशी ,

पुणे.