subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, February 9, 2011

प्रभात’काळात रमले रसिक

शांताराम आठवले जन्मशताब्दी

प्रभात फिल्म कंपनीच्या मराठी चित्रपटांच्या गीता द्वारे काव्यपूर्ण चित्रपटगीतांचे 'बीज' पेरून तीनशे चित्रपटगीते लिहिणारे गीतकार.
ग दि माडगुळकर यांनी आदर्श मानलेले गीतकार.

‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक दिवंगत शांताराम आठवले यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता नुकतीच मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर येथे एका कार्यक्रमात झाली. शांताराम आठवले यांच्या लेखणीतून साकारलेल्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाद्वारे त्यांचे उचित स्मरण व्हावे, या विचाराने प्रेरित होऊन येथील उदयोन्मुख गायक श्रीरंग भावे याने ‘‘बीज अंकुरले रोप वाढले’’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या निमित्ताने शांताराम आठवले यांच्या उज्ज्वल कारकीर्दीची व चित्रपटसृष्टीच्या रम्य प्रभातकालाची उपस्थितांना प्रचिती आली. आठवले यांचे चिरंजीव सुदर्शन आठवले व ज्येष्ठ कन्या मंगला काकनूरकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. दरवर्षी आम्हीच आमच्या बाबांप्रित्यर्थ कार्यक्रम करतो, पण या वर्षी एका तरूण गायकाने जन्मशताब्दीचे निमित्त साधून असा कार्यक्रम करायचे ठरवले, हे पाहून आम्ही आठवले कुटुंबीय श्रीरंग भावेचे कौतुक करतो व त्याचे आम्ही आभारी आहोत, असे मनोगत सुदर्शन आठवले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात अवीट गोडीच्या विविधरंगी गाण्यांचा समावेश होता. माधुरी करमरकर यांची ‘आला वसंत ऋतू आला’,‘तुझा नि माझा एकपणा’, केतकी भावे-जोशी हिचे ‘भाग्यवती मी’,‘राधिका चतुर बोले’, पूर्वजा पाध्येची ‘अहा भारत विराजे’, ‘हासत नाचत जाऊ’, चिन्मय लेले व पूर्वजाचे ‘दोन घडीचा डाव’ आणि श्रीरंग भावेची ‘आनंद आनंद अवघा’ व ‘आधी बीज एकले’ ही गाणी विशेष रंगली. ‘बघत राहूदे तुझ्याकडे’, ‘उमलली एक नवी भावना’ या सारख्या द्वंद्व गीतांबरोबर ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रुती भावे, सागर साठे, वरद कठापूरकर, हनुमंत रावडे, प्रसाद पाध्ये, अनंत जोशी आणि निषाद करलगीकर या वादकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. धनश्री लेले यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची उंची वाढली.
रंगश्रुती म्युझिकची निर्मिती व श्रीरंग भावे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाला गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीचे सुभाष सराफ, अरूण फडके, हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचे उदय दिवाणे, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई यांचे सहकार्य  होते.

हा कार्यक्रम मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी व्हावा, असे मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केले.

Shantaram Athavale is a name associated with Marathi literature and film industry. Marathi is a regional language from the state of Maharashtra, known to the world due to it’s famous capital city of Bombay (Mumbai), in India. He has written 300 film songs, directed six and acted in 2 Marathi films, written 200 poems (with 2 published books) and 10 books on various subjects.

http://www.shantaramathavale.com/

No comments:

Post a Comment