subhash inamdar

subhash inamdar

Saturday, July 23, 2011

संगीत सावित्री- अभिनव आविष्कार-३१ जुलैला

संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त नटसम्राट बालगंधर्वांनी रंगमंचावर आणलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे शेवटचे नाटक संगीत सावित्री या नाटकाचा कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार रविवार

संध्याकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिरात सादर होणार आहे
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा) यांच्या वतीने होणा-या या अभिनव प्रयोगाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन आणि प्रस्तुती पं. जयराम पोतदार यांची आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत पोतदार अधिक माहिती देताना सांगतात, या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस या थिएटरमध्ये ६ मार्च 1932 रोजी करण्यात आला. नाटकात सत्यवान- गंगाधरपंत लोंढे, नारद-मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि सावित्रीच्या भूमिकेत स्वतः बालगंधर्व अशा भूमिका होत्या. नाटकाचे पहिले काही प्रयोग हाऊस फुल्ल झाले याचे कारण ही सारी तेव्हाची स्टार कास्ट. मात्र १९३२ साली चित्रपटाचे बोलपटात रूपांतर झाले. त्यामुळे बोलपट पाहण्यासाठी नाट्य रसिकांचाही तिकडे ओढा वाढला.सहाजिकच नाटकाकडे रसिक येईनासा झाला.
संगीत सावित्री हे संगीत आणि कथानक दोन्ही दृष्ट्या उत्तम असूनही रसिकांनी याकडे पाठ फिरविली. नाईलाजाने बालगंधर्वांना या नाटकाचे प्रयोग बंद करावे लागले.

साबरमती नदीकाठी एक वर्षाची कारागृहाची शिक्षा भोगत असताना १९२९ साली या नाटकाची गद्य संहिता खाडिलकरांनी लिहून काढली होती. पण नंतर बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांनी नाटकातील गाण्यांना चाली देण्याचे मान्य केल्यावर १९३३ साली खाडिलकरांनी नाटकातली पदे रचली.

नाटकाचे संगीत दिग्दर्शन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी मोठ्या कुशलतेने केले असल्याने त्यातल्या गाण्यांचा दर्जा उत्तमच होता. मात्र या नाटकाचे पुन्हा प्रयोग झाले नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. रसिकांच्या विस्मृतित गेलेली एक चांगली कलाकृती पुन्हा लोकांसमोर यावी या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे पं. जयराम पोतदार यांनी सांगितले.

सादरीकरणात संगीत नाटकातील पारंपारिक पध्दतीप्रमाणे सूत्रधार-नटीच्या संवादातून नाटकाचे कथानक कथन केले जाणार आहे. संवादातून कथा पुढे सरकत राहिल आणि गायक-गायिका त्यातली पदे सादर करतील. संगीत नाटकाप्रमाणे ऑर्गन आणि तबला साथ पिटात असणारच आहे. कार्यक्रम नाट्यमय करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. अवघ्या अडीच तासात संगीत रसिकांना संगीत नाटकाचा पूर्ण अनुभव देण्याची ही पध्दत पुण्यात पं. पोतदार रूढ करू इच्छीत आहेत.

रविवार ३१ जुलैला संध्या. ५ वा, भरत नाट्य मंदिर,पुणे

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, नवी दिल्ली (पुणे शाखा)
डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटक
संगीत सावित्री- कथामय नाट्य संगीताचा अभिनव आविष्कार
संगीत दिग्दर्शन- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर आणि बालगंधर्व

संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व प्रस्तुती- जयराम पोतदार

संगीत मार्गदर्शन- संजय हरिभाऊ देशपांडे
गायक- सुरेश साखवळकर, सीमा रानडे आणि रविंद्र कुलकर्णी
सूत्रधार- सुभाष इनामदार, नटी- विनया देसाई
तबला- संजय कंरदीकर. ऑर्गन- जयराम पोतदार



No comments:

Post a Comment